सम्राट अशोकाची सर्वसमावेशक शिक्षण व्यवस्था...
सम्राट अशोकाने त्याच्या साम्राज्यात केलेल्या शिक्षण विकासाचा परामर्श घेतला आहे भि.म. कौसल यांनी..
X
भौतिक आणि अध्यात्मिक जीवनाचे निर्माण आणि वैयक्तिक व सामाजिक जीवनातील विभिन्न जबाबदा-या यशस्वीरितीने पार पाडण्यासाठी शिक्षणाची नितांत आवश्यकता असते. मनुष्य जीवनात शिक्षणाला फार महत्त्व आहे. शिक्षणाशिवाय मनुष्यजीवन फारच संकुचित होते. ज्या व्यक्तिकडे ज्ञान किंवा शिक्षण नाही त्याचे जीवन अंधकारमय असते. विद्या किंवा ज्ञानाला मनुष्याचा तिसरा डोळा मानण्यात येते. शिक्षण जीवनातील सर्व प्रश्नांना मूळापासून समजून घेण्यास समर्थ बनविते आणि योग्य दिशेने वाटचाल करण्यास प्रवृत्त करते. जीवनातील सर्व समस्या आणि अडथळे शिक्षणामुळे नष्ट करता येतात. शिक्षणामुळे जीवन जगण्याचे योग्य सिद्धांत आणि आचरण समजून घेणे सोपे होते.
मनुष्याचे शरीर व मन शिक्षणाने परिष्कृत होते. विद्या किंवा ज्ञानाने मनुष्याची प्रतिष्ठा वाढते. शिक्षणामुळेच सर्व लौकिक सुख प्राप्त करणे शक्य होते. दुस-या शब्तात सांगायचे झाल्यास शिक्षणाने मनुष्य जीवन सार्थक ठरते. शिक्षणामुळे केवळ मनुष्य जीवनच परिष्कृत व उन्नत होत नाही तर समाजाची देखील योग्य दिशेने वाटचाल करण्यास मदत होते. शिक्षणामुळेच आत्मनिर्भर होण्यास मनुष्याला मदत मिळते. एवढेच नव्हेतर समाजनिर्मितीत तो योगदान देतो आणि सामाजिक उत्तरदायित्वाप्रति जागरूक राहतो. शिक्षणामुळे मनुष्याचा अत्मविश्वास वृद्धिंगत होतो.
भारतीय शिक्षण व्यवस्थेचा ऐतिहासिक आढावा
सिंधू संस्कृती ही भारताची सर्वात प्राचीन संस्कृती असल्याचे ऐतिहासिक पुराव्यावरून सिद्ध झालेले आहे. सिंधू सभ्यताकालीन समाज कृषी, उद्योग, व्यापार, स्थापत्य अभियांत्रिकी, शिल्पकला, धातूविज्ञान आणि तत्सम तंत्रज्ञानात अतिशय निपुण असल्याचे पुरावे तेथील उत्खननात आढळले आहेत. ज्याअर्थी या सर्व क्षेत्रात तत्कालीन समाज आघाडीवर होता त्याअर्थी वर उल्लेख केलेल्या विविध विद्याशाखांचे शिक्षण देणा-या संस्था अस्तित्वात असणार हे ओघाने आलेच.
मोहंजोदडो आणि हडप्पा येथील उत्खननात भाजलेल्या मातीच्या शेकडो मुद्रा आढळलेल्या आहेत. या मुद्रांवर चित्रलिपित मजकूर कोरलेला आहे. यावरून त्यावेळी लेखन आणि वाचन कला अस्तित्वात होती, हे स्पष्ट होते. कोणताही भेदभाव न करता सर्वप्रकारचे शिक्षण सर्वांना उपलब्ध होते. याचा पुरावा ऋग्वेदाच्या पाचव्या मंडळातील 30 व्या सुक्ताच्या नवव्या ऋऋचेत आढळतो.(1) या ऋचेत असा उल्लेख आहे की नमुची दासाच्या स्त्री सैन्याने युद्धभूमिवर इंद्राचा सामना केला. ज्याअर्थी महिला युद्धभूमिवर शत्रू सैन्याचा सामना करतात त्याअर्थी त्यांना युद्ध काैशल्याचे प्रशिक्षण मिळाले असणार, त्याशिवाय त्या युद्धभूमिवर उतरू शकत नाहीत. यावरून एक बाब स्पष्ट हाेते की सिंधू संस्कृतीच्या काळात सर्वप्रकारचे शिक्षण स्त्री-पुरुषांना उपलब्ध असावे.
वर उल्लेख केल्याप्रमाणे तत्कालीन सिंधू सभ्यताकालीन लोकांना सर्व प्रकारचे शिक्षण उपलब्ध असल्यामुळे सामाजिक व आर्थिक प्रगतीवर त्याचा सकारात्मक परिणाम झाला. म्हणूनच धनधान्य आणि कलागुणांनी समृद्ध अशा या सिंधू संस्कृतीची बलस्थाने नष्ट करण्यासाठी विशेषतः शिक्षणापासून त्यांना वंचित करण्याचे धोरण आर्यांनी अवलंबिल्याचे दिसते. विविध क्षेत्रातील शिक्षण उपलब्ध असल्यामुळे ते आर्थिकदृष्टीने समृद्ध झाले आहेत, याची जाणीव आर्य नेतृत्त्वाला (इंद्र) होती. त्यामुळे त्यांना शिक्षणापासून वंचित केल्यास त्यांच्या आर्थिक प्रगती मध्ये बाधा उत्पन्न होऊन ते आर्यांचे कायमचे गुलाम होतील याची त्यांनी खूणगाठ बांधली असावी व त्यादृष्टीने या धोरणाची अंमलबजावणी केल्याचा उल्लेख ऋग्वेदाच्या चौथ्या मंडळातील 28 व्या सुक्ताच्या चौथ्या ऋचेत आढळतो.(2)
विश्वस्मात्सीमधमाँ इन्द्र दस्यून्विशाे दासीरकृणाेरप्रशस्ताः.
अबाधेथाममृणतं नि शत्रूनविन्देथामपचितिं वधत्रै:.
अर्थ - हे इंद्रा ! आपण या दस्यूजनांना सर्व गुणांनी हीन केले आणि यज्ञकर्मरहित दासांना निंदित केले. हे इंद्र आणि साेम ! आपण दोघेही शत्रूंना बाधा पोहचवा, त्यांना मारा आणि त्यांच्या हत्त्येच्या बदल्यात यजमानांची पूजा स्वीकार करा.
ही ऋचा ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची आहे. सिंधू सभ्यताकालीन लोक कृषी, उद्योग, व्यापार, स्थापत्य आणि धातू अभियांत्रिकी, शिल्पकला व तत्सम अन्य तंत्रज्ञानात अतिशय तज्ज्ञ होते. त्यामुळेच तेथे आर्थिक समृद्धी नांदत होती. या ऋचेतील हा उल्लेख की दस्यूजनांना गुणहीन केले, यावरून असे दिसते की आर्यांनी दस्युंच्या शिक्षण संस्थांना नष्ट केले असावे, जेणे करून दासांच्या आर्थिक समृद्धीची दारे बंद व्हावी.
त्यानंतर दासांना कायमचे गुलाम करण्याच्या हेतूने वर्णव्यवस्था निर्माण करून त्यांना शेवटच्या शूद्र वर्ण बहाल केला आणि शिक्षणासह सर्व अधिकारापासून वंचित केले. याबाबतचा उल्लेख ऋग्वेदातील 10 व्या मंडळाच्या 90 व्या सुक्ताच्या 12 व्या ऋचेत आढळताे.(3) उत्तर वैदिक काळात देखील सर्व शास्त्रकारांनी शूद्रांच्या शिक्षणाचा निषेध केला. शूद्रांसाठी सर्व संस्कार वर्जित असल्याचा उल्लेख वाजसनेयी संहितेतही आढळताे.(4) आपल्यापेक्षा उच्च स्थानी असलेल्या त्रैवर्णिकांची सेवा करणे त्यांचे मुख्य कर्तव्य हाेते. त्यांची उपजीविका उच्चवर्णियांची सेवा करण्यावरच अवलंबून होती.(5) त्यांच्याद्वारे त्यक्त वस्तू जसे जुने कपडे, पादत्राण इत्यादीचा ते उपयोग करीत तथा त्यांच्या उष्ट्या अन्नावर त्यांचा गुजारा होत असे.(6) एवढी भीषण अवस्था एकेकाळी संपन्नावस्थेत असणा-या या लाेकांची झाली होती.
बुद्धकालीन शिक्षण व्यवस्था
इ.स.पू. सहाव्या शतकात बुद्धाचा उदय होईपर्यंत वैदिक व्यवस्थेने अतिशय विकृत रूप धारण केले होते. धर्म किंवा तत्त्वज्ञानापेक्षा निरर्थक विधी, कर्मकांड आणि यज्ञकर्म यांनी प्रमुख स्थान घेतले हाेते. बहुसंख्य लोकांना शिक्षणापासून वंचित करण्यात आल्यामुळे या कर्मकांडाची निरर्थकता त्यांना कळत नव्हती. यातून बहुसंख्य लाेकांचे माेठ्याप्रमाणावर आर्थिक शोषण होत असे. यज्ञकर्म किंवा कर्मकांड करणा-या ब्राह्मणांचे समाजात अवास्तव स्ताेम माजले होते. कारण अध्ययन आणि अध्यापनचे सर्व अधिकार त्यांच्याकडे एकवटलेले होते. विशेषतः अध्यापनाचे कार्य केवळ ब्राह्मणच करू शकत होता त्यामुळे तो म्हणेल ती पूर्वदिशा अशी स्थिती निर्माण झाली होती.
बुद्धाच्या उदयानंतर या परिस्थितीत बदल होऊ लागला. बुद्धाने या बहुसंख्य जनतेच्या शोषणाचे किंवा दुःखाचे कारण शोधून त्यावर आर्य अष्टांगिक मार्गाच्या रूपाने उपाययोजना शोधून काढली. त्याचा एक भाग म्हणून बुद्धाने सार्वत्रिक शिक्षणाचा पुरस्कार केला, ज्याची चर्चा दीघनिकायाच्या लोहिच्च सुत्तात आढळते.(7) या धोरणाचा अतिशय सकारात्मक परिणाम झाला. धर्म, जात किंवा वर्णाची कोणतीही आडकाठी न येता सर्वांसाठी शिक्षण मोकळे झाले. भिक्खू संघात सहभागी झालेले व संघाबाहेर असलेले सामान्य लोक शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात पुनःश्च येऊ लागले. विहारे ही शिक्षणाची महत्त्वाची केंद्रे बनली. यातून सर्व प्रकारचे शिक्षण दिले जात असे.
भिक्खूंच्या निवासस्थानाची अडचण लक्षात घेता पाच प्रकारच्या निवासाची बुद्धाने अनुमती दिली.(8) याचा परिणाम असा झाला की अनेक विहारांची निर्मिती हाेऊ लागल्याने स्थापत्य शास्त्राच्या शिक्षणाला चालना मिळाली. सामान्य जनतेला रोजगाराचे साधन उपलब्ध व्हावे यासाठी विविध प्रकारच्या शिल्पकलांना बुद्धाने प्रोत्साहन दिले.(9) भिक्खू संघ व सर्वसामान्यांच्या आराेग्याचा विचार करता शल्य चिकित्सा आणि औषधी शास्त्राच्या अभ्यासाला अनुमती दिली.(10) अशाप्रकारे बुद्धाने पुढाकार घेतल्यामुळे समाजात विविध प्रकारच्या शिक्षणाला चालना मिळाली. ती देखील काेणताही सामाजिक भेदाभेद न करता.
अशाेककालीन शिक्षण व्यवस्था
बुद्धाने दिलेला हा शैक्षणिक वारसा सम्राट अशोकाने मोठ्या नेटाने पुढे नेला असे दिसते. सम्राट अशोकाच्या काळात शिक्षणाचा प्रचार प्रसार मोठ्या प्रमाणावर झाला. जनतेला साक्षर करण्याचे महत्त्वाचे कार्य बौद्ध विहारांमार्फत करण्यात येत असे. अशी विहारं अशोकाच्या साम्राज्यात सर्वत्र पसरलेली होती. समाजात लोकप्रिय शिक्षणाचा प्रचार करण्याचे विहारे ही फार महत्त्वपूर्ण केंद्र होती. त्यामुळे साक्षरतेचे प्रमाण विशेषतः बौध्द धम्माचे पालन करणा-या अनुयायांमध्ये सर्वाधिक होते. ही बाब सारनाथ येथील लघू स्तंभ लेख एक वरून स्पष्ट होते.
(11) या लेखाच्या सुरुवातीला संघामध्ये फुट पाडणा-या भिक्खू व भिक्खूणी यांना देण्यात येणा-या शिक्षेचा उल्लेख आहे. अशा भिक्खू व भिक्खूणींना श्वेत वस्त्र परिधान करवून विहारातून निष्कासित करण्यात यावे, त्याचबराेबर हे आदेश भिक्खू व भिक्खूणी संघात प्रसारित केले जावेत, असे अशोक म्हणतो, अशोक पुढे म्हणतो- "देवतांच्या प्रियने याप्रमाणे सांगितले आहे, असा एक लेख जवळच्या विहारात लावण्यात यावा आणि या लेखाची दुसरी प्रत उपासकांसाठी प्रदर्शित करण्यात यावी."
‘‘ते उपासक उपोसथ दिवशी हा आदेश वाचतील. प्रत्येक उपोसथा दिवशी प्रत्येक महामात्र उपोसथ करील कारण हा आदेश त्याला योग्य प्रकारे समजावा. महामात्र त्यांच्या अधिकार क्षेत्रातील भागात सर्वत्र या आशयाचे आदेश प्रसारित करतील. अशाप्रकारे कोट गाव, नगर आणि जिल्ह्यात या आशयाचे आदेश पाठविण्यात यावेत.’’
सम्राट अशोक या आदेशांचे अगदी खेडेगावांपासून जिल्हा स्तरापर्यंत प्रसारित करण्याचे आदेश देतो याचा अर्थ शिक्षणाचा प्रचार प्रसार सर्वत्र झाला असावा. त्यामुळे हे आदेश सामान्य जनता सहज वाचू शकत होती. त्यामुळेच अशोकाने अशाप्रकारचे आदेश प्रसारित केले, ही बाब स्पष्ट होते. आजवर धम्माचा उपदेश मौखिक स्वरूपात दिला जात असे. मात्र सम्राट अशोकाच्या शिक्षण विषयक धोरणाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे लिखित स्वरूपात धम्म सामान्य जनतेपर्यंत पोहचविणे, हे होय. सम्राट अशोकाच्या समग्र प्रयत्नांमुळेच शिक्षणाचा प्रचार समाजातील केवळ उच्चभ्रू वर्गापुरताच मर्यादित न राहता तळागाळातील लोकांपर्यंत झाला होता, हे स्पष्ट होते. यावरून आणखी एक बाब स्पष्ट हाेते की अशोकाच्या काळात साक्षरतेने फार मोठी झेप घेतली होती. अशोकाच्या काळात विहारं ही महत्त्वाची शिक्षण केंद्र हाेती.
या विहारांतून धम्माची व्याख्या तथा धम्म जिज्ञासा (चर्चा) आणि सर्व भारतभर शिक्षणाचा प्रसार होत असे. बुद्धाचे महत्त्वपूर्ण उपदेश भिक्खू व भिक्खूणी तसेच उपासक आणि उपासिकांपर्यंत पोहचावे यासाठी अशोकाने भरपूर प्रयत्न केले याची झलक भाब्रू शिलालेखावरून येते.(12) या लेखात अशोक म्हणतो ‘‘मगधचा राजा प्रियदर्शी संघाला अभिवादन करतो! आपणास विदित आहे की बुद्ध, धम्म आणि संघामध्ये माझी किती श्रद्धा आहे. हे भदंतगण ! माझी अशी इच्छा आहे की अनेक भिक्खू आणि भिक्खूणींनी सतत या धम्म ग्रंथांचे श्रवण करावे आणि (मनात) धारण करावे. त्याचप्रमाणे उपासक आणि उपासिका यांनी देखील (ऐकावे व धारण करावे) म्हणून हे भदंतगण ! मी हा लेख लिहित आहे, जेणे करून जनतेने माझा अभिप्राय समजून घ्यावा.’’
भाब्रू शिलालेख यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे की सम्राट अशोक बुद्ध, धम्म आणि संघावर श्रद्धा व्यक्त करीत बौद्ध धम्माचा तो अधिकृतरित्या अनुयायी झाला आहे, हे स्पष्ट करतो. या लेखाचे दुसरे महत्त्व असे की या लेखात बुद्धाच्या अतिशय महत्त्वपूर्ण सात सुत्तांचा ताे उल्लेख करतो आणि यांचे भिक्खू, भिक्खूणी तसेच उपासक उपासिकांनी नेहमी श्रवण व मनन करावे अशी सूचना करतो. याचा अर्थ सम्राट अशोकाने स्वतः या सुत्तांचा अभ्यास केला असावा व त्यांच्या सामाजिक उपयोगितेची त्याला खात्री पटली असावी. या सात सुत्तांचे सतत श्रवण, मनन व चिंतन करण्याची सूचना भिक्खू भिक्खूणींसह उपासक उपासिकांना करतो. याचा अर्थ शिक्षण केवळ संघापूरतेच मर्यादित नव्हते तर उपासक, उपासिकांच्या रूपाने सामान्य जनतेपर्यंत पोहचले होते.
अशोकाच्या शिक्षणविषयक धोरणामुळे सर्व सामान्य जनतेत शिक्षणाचे आकर्षण वाढले आणि अधिकाधिक लोक शिक्षित होऊ लागले. त्यामुळे जनता धम्म जिज्ञासा (चर्चा) करण्याच्या योग्यतेची झाली. सम्राट अशोक गावक-यांशी धम्मविषयक चर्चा करीत असल्याचा उल्लेख शाहबाजगढी शिलालेख आठ मध्ये आढळतो.(13) या लेखात असा उल्लेख आढळताे की धम्मयात्रेच्या वेळी तो ग्रामवासियांचे दर्शन आणि त्यांना धम्माच्या उपदेशासह त्यांच्याशी तदुपाेयगी धम्मचर्चा करीत असे. याचा अर्थ तत्कालीन जनता साक्षर होती व शिक्षणाच्या बळावरच सम्राट अशोकाची धम्मचर्चा करण्याच्या याेग्यतेची झाली होती.
वैद्यकीय शिक्षण
सम्राट अशाेकाच्या कारकीर्दित वैद्यकीय शिक्षण आणि औषधाेपचार क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती झाली हाेती, असे दिसते. यामध्ये मनुष्य व पशूवैद्यकीय साेयिसुविधांचा समावेश हाेता. अशाप्रकारची व्यवस्था केवळ स्वतःच्या साम्राज्यातच नव्हेतर साम्राज्याच्या दक्षिणेकडील शेजारील राज्यात देखील करण्यात आली हाेती. एवढेच नव्हेतर मित्रत्वाचे संबंध असणा-या पश्चिमेकडील ग्रीक राजांच्या जसे सिरिया, इजिप्त, मेसिडाेनिया इत्यादी राज्यातही त्याने वैद्यकीय साेयीसुविधा उभारण्यासाठी मदत केली. याबाबतचा उल्लेख गिरनार शिलालेख दाेन मध्ये आढळताे.
(14) या लेखात अशाेक म्हणताे देवतांचा प्रिय प्रियदर्शी राजाच्या राज्यात सर्व ठिकाणी आणि जे सीमवर्ती राज्य आहेत जसे चाेल, पांड्या, सतीयपुत्र, केरळपुत्र, ताम्रपर्णी (श्रीलंका) पर्यंत आणि यवनराज अंतियाेक आणि अंतियाेकचे शेजारी राजे त्या सर्वांच्या राज्यात प्रियदर्शी राजाने दाेन प्रकारच्या चिकित्सालयाची स्थापना केली आहे. मनुष्यांची चिकित्सालये आणि पशूंची चिकित्सालये, मनुष्य आणि पशूंच्या उपयाेगी औषधी (वनस्पती) जेथे उपलब्ध नव्हती तेथे (बाहेरून) मागविण्यात आली व लागवड करण्यात आली. त्याचप्रमाणे कंदमूळ आणि फळझाडे जेथे उपलब्ध नव्हती तेथे मागवून त्यांची लागवड करण्यात आली. मार्गावर पशू आणि मनुष्यांच्या विश्रांतीसाठी विहिरी खाेदविण्यात आल्या आणि वृक्षाराेपण करण्यात आले.
मनुष्यांसाठीच नव्हे तर पशूंसाठी देखील चिकित्सालयांची व्यवस्था करणे त्याकाळातील सामाजिक जीवनात पशूंचे महत्त्व अधाेरेखित करणारे आहे. याचे कारण त्याकाळातील कृषी अर्थव्यवस्था ही पूर्णतः पशूंवर अवलंबून हाेती. शेती, दुधदुभते, खते, चामडे, इत्यादींसाठी पशूंची गरज भारत असे. त्यासाठी पशूंची देखभाल करणे व निगा राखणे तत्कालीन समाजाची गरज हाेती. केवळ चिकित्सालयेच नव्हेतर विश्रांतीसाठी विहिरी तयार करून वृक्षाराेपण देखील करण्यात आले. त्याकाळात राजाच्या पदरी विशाल सेना असे. सम्राट अशाेकाचे साम्राज्य अतिशय बलाढ्य असल्याने सैन्य सज्जताही तेवढीच बळकट असणार. त्यासाठी घाेडदळ, हत्ती दलाची माेठ्या प्रमाणावर गरज भासत हाेती. सैन्य शक्तीचा महत्त्वाचा घटक असणा-या या प्राण्यांची विशेष काळजी घेण्यात येत असे. त्यासाठी देखील पशू चिकित्सालयांची गरज भासत असावी. त्याकाळात आयुर्वेदिक चिकित्सा पद्धती प्रचलित असल्याने मनुष्य आणि पशूंसाठी औषधी वनस्पतीची लागवड करून काळजी घेण्यात येत असावी. यावरून एक गाेष्ट स्पष्ट हाेते की, प्रत्येक चिक्तित्सालयाची स्वतंत्र आयुर्वेदिक वाटिका असावी.
या वाटिकांमध्ये विभिन्न ठिकाणांवरून औषधी वनस्पती आणून लागवड करण्यात येत असावी. मनुष्य आणि पशूंची माेफत चिकित्सा हाेत असे. ज्याअर्थी एवढ्या माेठ्या साम्राज्यात माेठ्याप्रमाणावर मनुष्य आणि पशूंसाठी चिकित्सालयांची व्यवस्था हाेती त्याअर्थी मनुष्य आणि पशूंवर चिकित्सा करणारे प्रशिक्षित मनुष्यबळ असणार हे ओघाने आलेच. दाेन्ही प्रकारचे उत्तम चिकित्सक निर्माण करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण देणा-या संस्था देखील निश्चितच असाव्या. या संस्थांमधून निष्णात वैद्य आणि पशूवैद्यक तयार करण्याची अशाेकाने व्यवस्था केली असंणार. या प्राण्यांच्या उपचाराबराेबरच त्यांच्या विशिष्ट प्रकारच्या भाेजनाची देखील काळजी घेतली जात असावी. त्यासाठी अशाेकाने पशू शाळांची देखील निर्मिती केली हाेती, ज्याचा उल्लेख गिरनार शिलालेख सहा मध्ये आलेला आहे.(15) तसेच अशाेकाने हत्तींसाठी स्वतंत्र नागवनाची देखील निर्मिती केली हाेती याचा उल्लेख स्तंभलेख पाच मध्ये आढळताे.(16) आयुर्वेदिक वाटिकांची निर्मिती करण्यासाठी लागणारे वनस्पती शास्त्रातील तज्ज्ञ मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था देखील असावी.
तसेच मनुष्य व पशूंच्या चिकित्सालयात काम करणारे चिकित्सक वगळून इतर मनुष्यबळ जसे रुग्णांची सुश्रूषा व देखभाल करणारा सहायक कर्मचारी वर्ग माेठ्याप्रमाणात असावा. तसेच औषधवाटिकांची देखभाल करण्यासाठी माेठ्याप्रमाणावर मनुष्यबळाची गरज भासत असावी. केवळ औषधी वाटिकांचीच अशाेकाने निर्मिती केली नाही तर राजमार्गावर वटवृक्षांचे राेपण, आम्रवाटिका, विहिरी, धर्मशाळा इत्यादींचे निर्माण देखील केेले. याविषयीची माहिती स्तंभलेख सात मध्ये आढळते.(17) सम्राट अशाेकाने वर उल्लेख केलेले जे विविध उपक्रम राबविले त्यासाठी माेठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची गरज भासत हाेती. या सर्व उपक्रमांमधून लाखाे लाेकांना नाेकरी, राेजगार उपलब्ध झाला असावा. परिणामी त्यांच्या आर्थिक प्रगतीस निश्चितच हातभार लागला असणार यात शंका नाही.
स्थापत्य अभियांत्रिकी शिक्षण
भगवान बुद्ध आपला अंतीम प्रवास वैशाली येथून सुरू करतात आणि कुशीनगर येथे ते महापरिनिर्वाणपदाला प्राप्त हाेतात. यावेळी आनंद बुद्धाला दाह क्रिया कशी करावी याविषयी विचारतात. त्यावर बुद्ध दाह क्रियेविषयी आनंदाला माहिती देऊन म्हणतात की शरीराला जाळून त्यावर स्तूप निर्माण करण्यात यावे. यावेळी बुद्ध स्तूप निर्माण करण्यायाेग्य चार व्यक्तिंची माहिती आनंदाला देतात. 1) तथागत सम्यकसंबुद्ध, 2) प्रत्येक बुद्ध, 3) तथागताचे श्रावक (शिष्य) आणि 4) चक्रवर्ती सम्राट यांच्या अवशेषावर स्तूप निर्माण करण्यात यावेत, अशी सूचना करतात.(18) बुद्धाच्या दाहक्रियेनंतर त्यांच्या शरीर अवशेषांचे आठ भागात विभाजन करण्यात येऊन त्यावर स्तूप निर्माण करण्यात आले. अशाप्रकारे स्तूप निर्मितीची प्रथा सुरू झाली.
सम्राट अशाेेक बाैद्ध धम्माचे अनुयायी असल्यामुळे त्यांनी देखील असंख्य स्तूपांची निर्मिती केल्याचे उल्लेख पाली साहित्यात आढळतात. महावंश या श्रीलंकेच्या इतिहासग्रंथावरून आचार्य माेग्गलीपुत्त तिस्स यांच्या सूचनेनुसार 84 हजार स्तूप निर्माण केल्याची माहिती मिळते. रामग्राम येथील स्तूप वगळता सम्राट अशोकाने इतर स्तूप परत उकरून काढले. त्यातील अस्थि अवशेषांवर चंदनाच्या लाकडात पुनःश्च अग्नी संस्कार करण्यात येवून त्या अवशेषांचे 84 हजार भागात विभाजन करण्यात आले व त्यावर स्तूपांची निर्मिती करण्यात आली. मध्यप्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्रप्रदेश इत्यादी ठिकाणी अनेक स्तूप उत्खननात आढळत आहेत, हा त्याचा पुरावा आहे. सम्राट अशाेकाच्या स्वतःच्या काेरीव लेखावरून माहिती मिळते की निग्लीव (निग्लीवसागर, नेपाळ) येथे पूर्वीचे बुद्ध काेणागमन यांच्या स्तूपाचा जीर्णाेद्धार करत त्याचा आकार दुप्पट केला.(19) तसेच बिहारमध्ये बाराबर टेकडीवर आजीविकांसाठी निग्राेध गुहेसह अन्य दाेन गुहांची निर्मिती केली.
(20) सम्राट अशाेकाने सांची व भरहूत येथील स्तूपांची निर्मिती केली हाेती. याशिवाय सारनाथ, येथील धमेक स्तूप व बिहार मधील केसरिया स्तूप (जगातील सर्वात उंच स्तूप) जे आजही अस्तित्वात आहेत, निर्मिती सम्राट अशाेकाने केली. सातव्या शतकात भारतात आलेला चीनी प्रवासी युवाङ्च्वाङ याने त्याच्या प्रवास वर्णनात 80 पेक्षा जास्त स्तूप आणि विहार पाहिल्याचा उल्लेख केला आहे जे अशाेकाने निर्माण केले गेले असे त्याकाळात म्हटले जात हाेते.(21) विविध ठिकाणी उभारलेल्या या स्तूपांचा मुख्य आराखडा व स्तुपाच्या विविध अंगांचे जसे मेधी, अंड, त्यावरील हार्मिका, छत्रयष्टी व छत्रावली, प्रदक्षिणा पथ, वेदिका, ताेरणद्वार आदींचे आराखडे तयार करणारे कुशल अभियंते व तंत्रज्ञ असल्याशिवाय हे काम पूर्णत्वास नेणे शक्य झाले नसते. केवळ अभियंतेच नव्हे तर प्रत्यक्ष स्तूपाची निर्मिती करणारे अनेक कारागीर, स्तूप निर्मितीस लागणारे विविध प्रकारचे साहित्य, अशा विविध क्षेत्रातील मनुष्यबळाची एक साखळी या प्रकल्पांवर कार्य करीत असणार, हे ओघाने आलेच. या लाेकांच्या प्रशिक्षणाची साेय असल्याशिवाय धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्त्वाची कलाकृती निर्माण हाेऊच शकत नाही.
याशिवाय सम्राट अशाेकाने अनेक ठिकाणी एकाच दगडातून निर्माण केलेले अतिशय गुळगुळीत असे विशालकाय स्तंभ देखील उभारले हाेते. चाैथ्या शतकात भारताचा प्रवास करणा-या फा-हियान याने असे सहा स्तंभ पाहिल्याची नाेंद त्याच्या प्रवास वर्णनात केलेली आहे. यात श्रावस्ती येथील जेतवन विहाराच्या द्वाराच्या दाेन्ही बाजूला असणारे दाेन स्तंभ ज्यातील एका स्तंभाच्या शीर्षस्थानी धम्मचक्र व दुस-या स्तंभाच्या शीर्षावर वृषभ प्रतिमा, संकास्य येथील शीर्षभागी सिंह आकृती असणारा स्तंभ, कुशीनगर ते वैशाली मार्गावरील चाैथा स्तंभ, ज्यावर लेख काेेरलेला हाेता. पाटलीपुत्र येथील पाचवा स्तंभ व याच परिसरातील शीर्षभागी सिंह आकृती असलेला सहावा स्तंभ यांचा समावेश आहे. याशिवाय युवाङ्च्वाङ् याने पंधरा स्तंभ पाहिल्याचा उल्लेख त्याच्या प्रवास वर्णनात केलेला आहे. यात संकिसा श्रावस्ती, कपिलवस्तू, कपिलवस्तू जवळील निग्लीव, लुंबिनी, कुशीनगर, सारनाथ, वैशाली, पाटलीपुत्र, राजगृह येथील स्तंभांचा समावेश आहे. शिल्पकलेच्या क्षेत्रात हे स्तंभ माैर्यकलेचे कीर्तिमान स्थापित करणारे आहेत. या स्तंभांच्या शीर्षावरील सिंह, गज (हत्ती), वृषभ (बैल) आणि अश्व (घाेडा), या कलाकृती अप्रतिम व सजीव म्हणाव्या अशा आहेत. याशिवाय हे स्तंभ एवढे चकचकीत आहेत की तत्कालीन कारगिरांच्या नैपुण्यपूर्ण कामगिरीची कल्पना येते.
या स्तंभांची निर्मिती बनारसजवळील चुनार येथील दगडाच्या खाणीत हाेत असे. ज्या ठिकाणी हे स्तंभ आढळले त्यावरून एक बाब स्पष्ट हाेते की या स्तंभांना स्थापित करण्याची याेजना अगाेदरपासूनच तयार असावी. साधारण 50 फुट उंची, 50 इंच जाडी, आणि सुमारे 50 टन वजनाचे हे स्तंभ सुरक्षितपणे त्यांच्या गंतव्य स्थळी पाेहचविणे हे खराेखर अतिशय जाेखिम व जिकीरीचे काम असावे. या भव्य स्तंभांचे निर्माण, त्यांना ठरलेल्या स्थानी पाेहचविणे व तेथे उभारणे, हे अशाेककालीन कुशल अभियंते, तंत्रज्ञ यांच्या काैशल्याची साक्ष पाटवितात. सम्राट अशाेकाने या क्षेत्रात कार्यरत अभियंते, तंत्रज्ञ, कारागिर इत्यादींना प्राेत्साहन देत या अमर कलाकृती निर्माण केल्या, ही बाब यावरून स्पष्ट हाेते.
सैनिकी शिक्षण
मगध साम्राज्य इ.स.पू. सहाव्या शतकापासून एक बलाढ्य साम्राज्य म्हणून उदयास आले. हा काळ साम्राज्यांचा उदयाचा काळ मानला जाताे. या काळात भारतात साेळा बलाढ्य साम्राज्ये हाेती. इ.स.पू. चाैथ्या शतकाच्या अखेरीस भारतावर विदेशी आक्रमण झाले. काळाची गरज लक्षात घेता यावेळी सुसज्ज सैन्य निर्मितीवर भर देण्यात येऊ लागला. सम्राट अशाेकाने तर विशाल सेना बळगली हाेती. परिणामी सैनिकी शिक्षण व त्याच्याशी संबंधित उद्याेगांना चालना मिळणे क्रमप्राप्त हाेते. विशाल सेनेसाठी धनुष्यबाण, तलवारी, रथ, चाक, भाले, चिलखत इत्यादीची माेठ्या प्रमाणावर गरज भासत हाेती. त्यामुळे खाण, लाेहार, सुतार इत्यादी उद्याेगांना चालना मिळणे अपरिहार्य हाेते. कारण राजाने या वस्तूंच्या निर्मितीसाठी कारखाने उभारणे स्वाभाविक हाेते. त्यामुळे या उद्याेगांचे शिक्षण व प्रशिक्षण देणारे मनुष्यबळ व तरुण प्रशिक्षणार्थींची माेठ्या प्रमाणावर आवश्यकता भासत हाेती. अगदी सुरुवातीच्या काळात सिंधू संस्कृतीच्या प्रभावामुळे ऋग्वैदिक ब्राह्मणांनी उपयुक्त शिक्षण व औद्याेगिक प्रशिक्षण घेतले असले तरी नंतरच्या काळात जाती व्यवस्थेने कठाेर रूप धारण केल्यामुळे उपयुक्त आणि औद्याेगिक शिक्षण व प्रशिक्षणात ब्राह्मणेत्तर वर्गाचाच जास्त भरणा हाेता.(22) हा ब्राम्हणेतर वर्ग म्हणजेच शूद्र वर्ग हाेय. या उद्याेगधंद्यात शूद्रांचा भरणा असल्यामुळे त्यांच्या आर्थिक समृद्धित कमालीची वाढ झाली.
निष्कर्ष
1) वरील विवेचनावरून हे सिद्ध हाेते की अशाेकाच्या काळात काेणताही भेदभाव न बाळगता सम्राट अशाेकाने औपचारिक शिक्षण सर्वसामान्य जनतेला उपलब्ध करून दिले. त्यामुळे तत्कालीन भारताचा साक्षरता दर उंचावला.
2) उपयुक्त आणि औद्याेगिक शिक्षण व प्रशिक्षणात शूद्र वर्गाचा भरणा वाढला.
3) व्यावसायिक व औद्याेगिक शिक्षणाला चालना मिळाल्यामुळे सामान्य जनतेला नाेकरी व राेजगाराच्या संधी माेठ्या प्रमाणावर उपलब्ध झाल्या. परिणामी साम्राज्याची आर्थिक व सामाजिक भरभराट झाली. परिणामस्वरुप तत्कालीन भारताताचा जीडीपी मोठ्याप्रमाणावर वाढला.
भि.म. कौसल
संदर्भ सूचि
1) ऋग्वेद, 5.30.9
2) कित्ता, 4.28.4
3) कित्ता, 10.90.12
4) वाजसनेयी संहिता, 26.2
5) गाैतम धर्मसूत्र, 1.57
6) कित्ता, 10.60
7) दीघनिकाय, लाेहिच्च सुत्त
8) विनयपिटक, चूल्लवग्ग, शयन-आसन स्कंधक
9) सुत्तनिपात, चूल्लवग्ग, महामङ्गलसुत्त
10) विनयपिटक, महावग्ग, भैषज्य स्कंधक
11) अशाेक, राधाकुमुद, मुकर्जी, माेतीलाल बनारसीदास, दिल्ली, 1974, पृृ. 162-164
12) Asoka, Prof. D.R. bhandarkar,University of Calcutta, 1969, pp. 335-336
13)Ibid, pp. 282-283
14) अशाेक, राधाकुमुद मुकर्जी, माेतीलाल बनारसीदास, दिल्ली, 1974, पृ. 110-112.
15) Asoka, Prof. D.R. Bhandarkar, University of Calcutta, 1969, pp. 309-310.
16) Ibid pp. 309-310
17) Ibid, pp. 314-317
18) दीघनिकाय, महापरिनिब्बान सुत्त
19) अशाेक, राधाकुमुद मुकर्जी, माेतीलाल बनारसीदास, दिल्ली, 174, पृ. 172.
20) कित्ता, पृ. 172-173
21) SIUKI, Buddhist records of the western world, Samuel Beal, Motilal Banarasidas Publishers, Delhi, 1981,Book VI-X.
22)Education in Ancient India, A.S. Altekar, Isha books, Delhi, pp.160.