ठाकरे साहेब इतकी तत्परता कशासाठी...?
Kangana Ranaut vs Shiv Sena Why Thackeray government does not focus on the main issue
X
कंगनाच्या अवैध बांधकामावर ज्या तातडीने कारवाई झाली त्याचं स्वागत करायला हरकत नाही. पण शिवसेनेने तितकीच तत्परता मुंबई महापालिकेच्या हद्दीत असलेल्या ८९ हजार ३९० अनधिकृत, अवैध बांधकामांवरच्या कारवाईसाठी दाखवायला हवी होती.
इतकी तत्परता इतर अनधिकृत बांधकामांवरच्या कारवाईबाबत दाखवली असती तर हुसैनी बिल्डींग, कैसर बाग बिल्डींग, साई सिद्दी बिल्डींग, कमला मिल प्रकरण, हॉटेल सिटी किनारा, भानू फरसाण मार्ट यासारख्या घटनांमध्ये मुंबईकरांचे जीव नसते गेले.
इतकी तत्परता मुंबईच्या रस्त्यावरचे खड्डे बुजवण्यात दाखवली असती तर दरवर्षी खड्ड्यांमुळे मुंबईकर मेले नसते... इतकी तत्परता विजबिलवाढीच्या बाबतीत दाखवली असती तर सर्वसामान्यांची लूट नसती झाली.. इतकी तत्परता कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत दाखवली असती तर मंत्र्यांच्या घरी नेऊन एका सामान्य कार्यकर्त्याला माराहण नसती झाली. त्यानंतरही कारवाई नाही.
इतकी तत्परता आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यासाठी दाखवली असती तर पांडुरंग रायकर सारख्यांच्या जीव नसता गेला. इतकी तत्परता जर रुग्णालयात बेड, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन सिलेंडर पुरवण्यात दाखवली असती तर कित्येक जण वाचू शकले असते. इतकी तत्परता कोविडसाठी केरळवरुन आलेल्या डॉक्टरांना सुविधा आणि पगार देण्यासाठी दाखवली असती तर ते परत नसते गेले.
इतकी तत्परता पुण्यातल्या जम्बो कोविड सेंटरच्या सुविधांबाबत दाखवली असती तर २५ डॉक्टर आणि नर्सेसनी राजीनामे नसते दिले. इतकी तत्परता कोरोनाला रोखण्यात दाखवली असती तर सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या रुग्णांच्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचं पहिलं नाव आलं नसतं.
इतकी तत्परता विदर्भात आलेल्या भीषण पुरस्थितीबाबत दाखवली असती, मदत पोहोचवली असती, स्वतः दौरा केला असता तर मदतीसाठी आजही विदर्भ ताटकळत नसता. इतकी तत्परता मराठा आरक्षणाबाबत सुरु असलेल्या सुप्रीम कोर्टातल्या युक्तीवादाबाबत दाखवली असती तर मराठा आरक्षणावर स्थगिती नसती आली. कंगना रोज काहीतरी बरळतेय. त्यामुळे शिवसेनेने देखील तितक्याच किंवा त्याच्याही खालच्या थराला जात सुडबुद्धीने कारवाई करण्याची गरज नव्हती.
(सौरभ कोरटकर यांच्या फेसबूक वॉलवरुन साभार..)