कंगना, वानखेडे, मलिक मला कुठेच भेटले नाहीत...
सध्या प्रत्येक माध्यमांवर कंगना रणौत, समीर वानखेडे, नवाब मलिक झळकत आहेत. ग्रामीण भागातही यांचीच चर्चा आहे का? 10 आठवड्यांचा मराठवाडा दौरा केलेल्या हेरंब कुलकर्णी यांना या लोकांबाबत चर्चा करताना कोणी का दिसलं नाही? ग्रामीण भागात नक्की काय प्रश्न आहेत? हे प्रश्न माध्यमांवर दिसतात का? वाचा मुख्य माध्यमांना आरसा दाखवणारा हेरंब कुलकर्णी यांचा स्पेशल रिपोर्ट
X
नुकताच १० दिवसांचा मराठवाड्याचा दौरा करून मी आलो. बीड, जालना, परभणी, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर या जिल्ह्यात गेलो. खेड्यापाड्यात फिरलो कार्यकर्त्यांशी बोललो. या दौर्यात फिरताना मला कंगना राणावत, समीर वानखेडे, नवाब मलिक या तिघांचे नाव सुद्धा कुठे ऐकायला मिळाले नाही...
मी जिल्हाधिकारी कचेरीपासून खेड्यातल्या चावडी पर्यंत फिरत होतो. सामाजिक राजकीय कार्यकर्त्याना भेटत होतो. पण या तिघांचा उल्लेख कोणीच केला नाही; की त्यांच्या गप्पात तो विषयही नव्हता.. दुसरीकडे जिथे हॉटेलमध्ये जेवायला जायचो तिथे बातम्या सुरु असल्या की हे तीनच चेहरे मला दिसत होते. फेसबुकवर whatsapp वर चक्कर मारली की यांच्या संदर्भातील पोस्ट दिसत होत्या.
इलेक्ट्रॉनिक मीडिया ला अनेक कंगोरे आहेत, TRP भोवती फिरायचं आहे व त्यावर आपण टीका करतो. पण सोशल मिडीयावर हे काय सुरू आहे? मीडीया आणि सोशलमिडिया ही सामान्य माणसांच्या जगण्यापासून इतकी दूर का असावी? जगण्याचे प्रतिबिंब म्हणजे माध्यमे आणि समाजाचे स्पंदन म्हणजे समाज माध्यम असेल तर मग वास्तवापासून इतके दूर का ?
माझ्याशी बोलताना लोक सोयाबीनवर बोलत होते. अतिवृष्टीचे पैसे मिळाले नाहीत हे सांगत होते. पीक विम्याची संतापजनक पद्धत यावर आकडेवारी मांडत होते. मला मित्र Vilas Bade ने संवेदनशील नजरेने मध्यंतरी लिहिलेला दीर्घ लेख आठवत होता.
लोक मराठवाड्यातील रस्त्यांवर भाष्य करत होते. बाल विवाहावर प्रश्न विचारले की, त्याचे ताणेबाणे उलगडून दाखवत होते. दारिद्र्य रूढी-परंपरा तेथील राजकारण्यांनी प्रश्नांकडे केलेले दुर्लक्ष असे सारे त्यांच्या बोलण्यातून झिरपत होते आणि पडद्याकडे आणि फेसबुकवर नजर टाकली की तिथे मात्र कंगना, वानखेडे, मलिक या जगाचा आणि त्या जगाचा काही ताळेबंद लागत नाही.
कधी कधी वाटते एकाच महाराष्ट्रात दोन महाराष्ट्र आहेत का...?
पुणे, मुंबई आणि नाशिक या त्रिकोणात जे काही घडते तेच जणू महाराष्ट्राचे प्रतिबिंब आहे. असे सर्वत्र चर्चिले जाते. पण मराठवाड्यातील गरीबांचे जग, विदर्भातील सामान्य माणसाचे जग आणि इथला अभिजनवर्ग जो विचार करतो, जे लिहितो, बोलतो त्याचा काहीच संबंध का नसावा ?
भावविश्वात इतके तुकडे का बरे पडले आहेत?
असाच प्रश्न पडतो. अर्थात मला हे मान्यच आहे की, सध्याचे सरकार, हिंदुत्ववादी पक्ष आणि कंगनासारख्या प्रवृत्ती ज्या प्रकारचे नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करत आहेत. या देशाच्या इतिहास संस्कृती आणि पुरोगामी मूल्यांना ठरवून धक्के मारत आहेत. त्याला विरोध करायला हवा. त्या दृष्टीने सोशल मिडीया उत्तम काम करत आहे. त्यातील खोटेपणा उघड करावाच लागेल. परंतु हे करताना आपल्याला मर्यादा ठरवून घ्यायला हव्यात. लिहिण्याची टक्केवारी ठरवावी लागेल की, हा सांस्कृतिक आणि वैचारिक संघर्ष करताना प्रत्यक्ष जगण्या मरण्याच्या प्रश्नाकडे आपण बोलायचे की नाही?
धर्मनिरपेक्षतेवर बोलताना प्रत्यक्ष सोयाबीनवरही बोलावे लागेल. पुरुषसत्ताक पद्धतीच्या विरोधात बोलताना बाल विवाहावर बोलावे लागेल. कंगनावर बोलताना खेड्यातील विधवेच्या दुःखावर ही बोलावे लागेल. हे जर आपण केले नाही तर या दोन जगातील अंतर अधिक वाढत जाईल व या गरीबांच्या जगाची वेदना अशीच उपेक्षित राहील.
राजकारण हे मनोरंजनाच्या पातळीवर जात असताना आपण सोशल मिडीया म्हणून त्याला बळी पडत आहोत का? याचा प्रत्येकाने विचार करायला हवा.
समीर वानखेडे आणि नवाब मलिक यांच्यामधले कोणीही जिंकले तरी खरंच आपल्या आणि गोरगरिबांच्या जगण्यात खरंच काय फरक पडणार आहे? काँग्रेस राष्ट्रवादी सोडून शिवसेना भाजपा बरोबर गेली काय याने गुणात्मक काय फरक पडेल? मोदी फडणवीस यांना केंद्रस्थानी मानून आपल्या सगळ्या पोस्ट फिरत राहिल्याने उलट आपण त्यांनाच केंद्रस्थानी आणून ठेवतो आहोत, त्यापेक्षा तळागाळातल्या माणसांच्या प्रश्नाला टोकदारपणे मांडत राहिले तरच सध्याच्या सरकारांना व नेत्यांना आपण खऱ्या अर्थाने अडचणीत आणू शकतो. त्यांच्या राजकीय साठमारीच्या खेळात आपण मनोरंजनाचे एक प्यादे का बनत आहोत?
प्रत्यक्ष फिरताना पावलापावलावर दिसणारे भीषण वास्तव अत्यंत अस्वस्थ करणारे आहे. त्याची जागा आणि अवकाश प्रस्थापित माध्यमात संकुचित आकुंचित होत असताना सोशल मीडिया ची जबाबदारी वाढली आहे. यात सर्वसामान्य माणसांच्या जगाचे प्रतिबिंब अधिक अधिक पडले तर प्रस्थापित माध्यमांनाही त्याप्रमाणे बदलून घ्यावे लागेल परंतु आपण चूक करत आहोत की, आपण राजकारण्यांच्या अजेंड्यावर आणि प्रस्थापित माध्यमांच्या अनुकरणाला बळी पडतो आहोत.
याचा गंभीरपणे प्रत्येकाने विचार करायला हवा. आपल्या एकूण पोस्टमध्ये राजकारण सोडून प्रत्यक्ष समाजाच्या प्रश्नांवर च्या पोस्ट जास्त वाढायला हव्यात. हे प्रत्येकाने ठरवले तर सोशल मिडीयाचा चेहरा बदलू शकतो मित्रांनो आपण ते करूया.
शेवटी ज्या भारतीय राज्य घटनेचा आपण आग्रह धरतो तिला आव्हान देणाऱ्या प्रवृत्तींच्या विरोधात आपण लिहितो बोलतो ते महत्वाचे आहेच पण त्या राज्यघटनेचा गाभा हा सामाजिक न्याय आहे. तो सामाजिक न्याय ज्या घटकांना नाकारला जातो. त्या घटकांच्या कहाण्या आपण लिहिल्या त्यांना न्याय मिळवून दिला तरच घटनेचे रक्षण होणार आहे. तेव्हा विरोध तर करावाच पण तो न्याय मिळवून देण्यासाठीही आपल्या वॉल चा वापर करू या.
इलेक्ट्रॉनिक माध्यमे यांच्या अपरिहार्यता आणि अजेंडा हा स्वतंत्र चर्चेचा विषय असला आणि त्यावर खूपवेळा बोलले जात असले तरी सोशल मिडीया हा आपला मिडीया आहे. त्याला आपण अधिक जबाबदार व संवेदनशील करू या राजकारण्यांच्या अजेंड्याला आपण बळी नको पडायला....