Home > मॅक्स ब्लॉग्ज > पत्रकार दिन : पत्रकारिता हा केवळ व्यवसाय नाही...

पत्रकार दिन : पत्रकारिता हा केवळ व्यवसाय नाही...

आज पत्रकार दिन आहे...पण आजच्या काळात पत्रकारितेपुढे मोठी आव्हानं निर्माण झाली आहेत. इंग्रजांच्या काळात इंग्रज सरकारच्या विरोधात लिहिल्या नंतर संपादकांना, पत्रकारांना जेलमध्ये धाडलं जायचं. ही माहिती पत्रकारांना असतानाही त्या काळात सर्व घरादारावर तुळशी पत्र ठेवून संपादक लिहित होते. मात्र, सध्या अशी परिस्थिती पाहायला मिळते का? सुनिल तांबे यांनी राष्ट्रीय पत्रकार दिनी लिहिलेला लेख खास मॅक्स महाराष्ट्रच्या प्रेक्षकांसाठी...

पत्रकार दिन :  पत्रकारिता हा केवळ व्यवसाय नाही...
X

Photo courtesy : social media

पत्रकारिता ताजी, अचूक व सत्य माहिती प्रसारित करणं ही अँग्लोसॅक्सन पत्रकारितेची मूल्यं समजली जातात. माहितीवर आधारित निर्णय योग्य ठरण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे माहिती अर्थात बातमीला पवित्र मानलं जातं. माहितीला क्रयमूल्य असतं. ह्या बाजारपेठेच्या धारणेवर ही पत्रकारिता उभी असते.

मात्र, पत्रकारिता हा केवळ व्यवसाय नाही, समाजात इष्ट ते परिवर्तन घडवून आणण्यासाठी केली जाणारी चळवळ म्हणजे पत्रकारिता अशी धारणा भारतीय स्वातंत्र्यलढ्यात विकसीत झाली. गांधीजी, आंबेडकर, पेरीयार रामस्वामी नायकर इत्यादी सर्व राजकीय नेते पत्रकार व संपादक होते.

स्वदेशी आंदोलनाच्या या काळात 1907 साली उत्तर प्रदेशात म्हणजे त्यावेळच्या संयुक्त प्रांतात शांति नारायण भटनागर यांनी आपली स्थावरजंगम मालमत्ता विकून 'स्वराज' नावाचं साप्ताहिक सुरू केलं. काँग्रेसमधील जहाल गटाची नाकेबंदी ब्रिटीश सत्तेने सुरू केली. शांति नारायण भटनागर यांना राजद्रोहाच्या गुन्ह्याखाली तीन वर्ष सक्तमजूरीची सजा झाली. स्वराजचा छापखाना जप्त करण्यात आला. परंतु पुन्हा नवीन छापखाना सुरू करण्यात आला. होतीलाल वर्मा, बाबू राम हरी यांनी 11 अंकांचं प्रकाशन केलं. त्यानंतर दोघांनाही अटक करण्यात आली.

होतीलाल वर्मा यांना दहा वर्षांची तर बाबू राम हरी यांना 21 वर्षांची सजा झाली. मुंशी रामसेवक यांची संपादक म्हणून निवड झाली. त्यांना तात्काळ अटक करण्यात आली. देहरादूनहून नंदगोपाल चोपडा आले. त्यांनी संपादनाची धुरा खांद्यावर घेतली. 12 अंक प्रसिद्ध झाल्यावर त्यांना 30 वर्षांची सजा ठोठावण्यात आली. तरिही बारा व्यक्तींनी संपादकपदासाठी अर्ज केले. त्यातून लद्धा रामकपूर यांची संपादक म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांनी केवळ तीन संपादकीय लिहीली. प्रत्येक संपादकीयासाठी 10 वर्षं अशी एकूण 30 वर्षाची सजा त्यांना फर्मावण्यात आली.

प्रत्येक संपादकाला गजाआड केलं जात होतं. त्यावेळी स्वराज मध्ये जाहिरात छापली जात असे—सम्पादक चाहिए, वेतन दो सूखे ठिक्कड (रोटी), एक गिलास ठंडा पानी, हर सम्पादकीय लिखने पर 10 वर्ष काले पानी की कैद. तरिही संपादक मिळत होते.

उतू नये, मातू नये, घेतला वसा टाकू नये असं पत्रकारितेचं व्रत असतं, पत्रकारिता ही एक चळवळ असते यावर स्विडीश अकादमीने शिक्कामोर्तब केलं. फिलिपाईन्सची मारिया रेस्सा आणि रशियाचा दमित्री मुरातोव या दोन पत्रकारांना नोबेल पुरस्कार मिळाला. या निमित्ताने जगातील सर्व चळवळ्या पत्रकारांना मनःपूर्वक शुभेच्छा.

Updated : 6 Jan 2022 11:19 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top