#Jhund: अपुन की बस्ती गटर में लेकिन तुम्हारे दिल में गंध है…
नागराज मंजुळे यांचा झुंड या चित्रपटांची समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात चर्चा आहे. मात्र, हा सिनेमा प्रत्येकाला त्याच्या जीवनातील काही प्रसंगांची आटवण करून देतो.. वाचा चित्रपट विश्लेषक नरेंद्र बडवे यांनी त्यांच्या जीवनातील सांगितलेला प्रसंग
X
किंग्ज सर्कलच्या सुंदर कमला नगर झोपडपट्टीत दोन-तीन नेपाळी कुटुंब होती. थापा त्यांच्या पैकीच एक होता. त्यांच्या बाजूला मोहन दादा राहायचा. मोहन दादा आणि त्याचा भाऊ बिल्लू. माटुंगा जिमखानात फुटबॉल खेळायला जायचे. थापा ही त्यांच्या सोबत खेळायचा. काटक शरीराचा थापा चपळ होता. त्याच्याकडे बॉल आला की तो सहसा सोडायचा नाही. गोलपोस्ट पर्यंत घेऊन जाताना प्रतिस्पर्धी संघानं आणलेले सर्व अडथळे तो सहज पार करायचा. नेमका गोल करायचा. आजूबाजूचे त्याला डोक्यावर घ्यायचे. झोपडपट्टीत ही तो पॉप्युलर होता. अनेक कामात पुढे असायचा. त्यानं शिक्षणमध्येच सोडलं. त्यामुळं मिळेल ते काम करणं. काम नसेल तेव्हा नाक्यावरच्या टोळक्यात असायचा. रोज संध्याकाळी मैदानावर नक्की यायचा. आम्ही त्यांची प्रॅक्टीस पाहायला जायचो.
अकरावीला असताना रामबाग जवळच्या गुजराती शाळेजवळ थापाला भररस्त्यात चॉपरने मारला. रक्ताच्या थारोळ्यात तो तडफत होता. काही मिनिटातच निपचित झाला. त्याच्यासोबत आणखी एका कामाटी मुलाला मारलं होतं. मणि नाव होतं त्याचं बहुतेक. मंदिराजवळ राहणारा विजय हल्ल्यात वाचला होता. त्याला पोलिसांनी नंतर चांगलाच तोडला. पोरीचा मॅटर होता.
पुढे समजलं की माझ्या वर्गातल्याच लोबोनं हा हल्ला केला होता. लायन्स पायोनियर शाळेत आम्ही एकत्र शिकत होतो. लोबो अँटॉप हिलला राहायचा. घटनेच्या दोन दिवस आधी तो मला भेटला होता. झोडपट्टीतल्या मद्रासी गणेश दादाच्या दारुच्या गुत्यावर. त्यानं माझ्याशी मजाक मस्तीही केली. लोबो सोबत माझ्याच वर्गातल्या इतर दोन मित्रांना ही अटक झाली होती. ते दोघे माटुंगा लेबर कॅम्पात राहायचे. हल्ल्याच्यावेळी ते लोबो सोबत होते. थापा आणि मणिचा कोथळा लोबोने बाहेर काढला होता.
या घटनेचा माझ्यावर खुपच परिणाम झाला होता. मेलेले आणि मारणारे दोघे ही माझ्या ओळखीचे होते. मी जवळपास रोजच त्यांना भेटत होतो. त्यांच्यासोबत गप्पा मारायचो. खेळायचो.
थापा गेल्यानंतर ही मोहन दादा आणि बिल्लो माटुंगा जिमखान्यात खेळत राहिले. मोहनदादा पुढे रेल्वेत टिसी झाला तर बिल्लो नेव्हीत कॅडेड. सुंदर कमला नगर झोपडपट्टीतून बाहेर पडलेलं ते पहिलं कुटुंब होतं.
नागराजच्या झुंड सिनेमामुळं हे सर्व आठवलं. अंकुश मसराम उर्फ डॉन आणि बाबूला पाहताना सतत थापा आणि मणीची आठवण येत राहिली. मोहनदादाही आठवला. तो आम्हा लहान मुलामध्ये खुपच पॉप्युलर होता. कमला नगरातल्या झुंडीतल्या मोहनदादाला फुटबॉलनं खुप पुढे नेला. थापा वेळे आधीच संपला.
झुंड आवडण्यामागे हे अनुभवही आहेत.
#jhund
#filmfakira