सामाजिक विषमतेच्या अंतासाठी झुंड
"सचिन आणि विनोद कांबळी हे एकाच उंचीचे खेळाडू होते" मग विनोद कांबळीची का पीछेहाट होते? वाचा झुंडच्या निमित्ताने खेळातील समानतेवर भाष्य करणारा समता कला मंचच्या अजय कसबे यांचा लेख
X
उपर प्लॅस्टिक बनगई झोपडी
रेल्वे लाईन बाजुमे वाईन
कैसे भी तो ढक गई खोपडी
सरकारमान्य देशी शहर मे
बढती रही गई झोपडपट्टी
झोपडपट्टी म्हटलं की, आपल्याला खाडकन दिसते ते म्हणजे बांबू, चटाई,पत्रा,लाकूड त्यावर टाकलेला प्लास्टिक आणि उभी असलेली झोपडी. थोडं बाहेर आलं की दिसते ती म्हणजे मोठा भुंगा करत धावणारी रेल्वे. जी कुठे झोपडपट्टीच्या अगदी मधोमध अंथरलेल्या लाईन वरून धावते, तर कुठे धावते ती झोपडपट्टीच्या बाहेरून. इथे कोण राहतो ? काय करतो? कसा राहतो ? याचा कोणालाच फरक पडत नाही. व्यवस्था नेहमीच उच्चवर्णीय आणि उच्चवर्गीय यांची बाहुले बनून काम करत असते, यात मात्र शंका नसावी. तिथे झोपडपट्टीचा कोण ऐकणार?
झोपडपट्टी ऐशीबाहेर, गावकुसाबाहेर दारिद्र्याने ग्रासलेल्या,जातिव्यवस्थेने अपंग केल्याने खितपत पडलेल्या गावाची असो किंवा गावापासून काही अंतरावर चमकणाऱ्या शहराची. ती तुमच्या आमच्यासाठी झोपडपट्टीच असते. हालाकी सध्या तिला झोपडपट्टी कोणी संबोधत नाही, कारण आता तिचं नामकरण झालंय.
आंबेडकर नगर,मंडल नगर,भीम नगर,गौतम नगर,संत रविदास,नगर,फुलेनगर,साठे नगर इत्यादी.... झुंड सिनेमा मधील झोपडपट्टी ही काहीशी अशीच आहे. जिथे माफिया-गुंड, दारू विक्रेते-दारुडे गांजाडी-स्मगलर, चोर आणि दारिद्र्याचा चार भिंतीत कसबसं आपलं पोट भरणारी जिवंत माणसं पण आहेत. जी व्यवस्थेसाठी मात्र, मुर्दाड अवस्थेत पडलेले मुडदे बरे अशी अवस्था झोपडपट्टींची आहे...
आज आपण एकविसाव्या शतकात जगत आहोत जिथे शिक्षण, समाजकारण, अर्थकारण, राजकारण, क्रीडा या सर्व प्रकारच्या क्षेत्रांना एक मोठा दर्जा आणि महत्व आहे. पण ही सर्वोच्च क्षेत्र कोण भरतं ? ती कोणासाठी खुली आहेत ? याचं जित जागते उदाहरण म्हणजे ' झुंड', झुंड सिनेमातील भिंत दोन भारताचे चित्रण करते. ज्यावर लिहिलेलं दिसतं 'भिंत ओलांडण्यास सक्त मनाई आहे '. ही भिंत आज उभी केली असं नाही शंबुक-एकलव्या पासून झुंड मधील अंकुश,बाबू,मोनिका, खेलचंद पर्यंत ही भिंत जशीच्या तशीच उभी आहे.
हे सर्वच पात्र शंबुक आणी एकलव्याची वंशज आहेत. जी आशा सर्व भिंती ओलांडण्याच धाडस ठेवतात. पण या भिंती ओलांडल्यावर जसे शंबुकाची जीभ छाटून कानात तप्त शिष्याचं तेल ओतण्यात येतं. एकलव्याचा अंगठा कापण्यात येतो, तर अंकुश सारख्या प्रतिभावंत खेळाडूला गुन्हेगार म्हणून तडीपार करण्यात येतं. या सर्वच प्रकारच्या मालिकांचा ठाव राजा शाहू महाराज व संयाजीराव गायकवाड यांना होता. त्यांना ठाऊक होतं की शोषक हे शोषितांचा अस्तित्व नाकारतात, अस्तित्व निर्माण करण्यात अडथळा होतात, संधी उपलब्ध होऊ देत नाहीत,संधी उपलब्ध झालीच तर ती संधी शोषक आपल्या धनसंपदा च्या जोरावर आपल्या पक्षात खेचून घेतात. म्हणून शाहू महाराजांनी आरक्षणाची सुरुवात केली तर संयाजीराव गायकवाड यांनी बाबासाहेबांना परदेशात शिक्षणासाठी जाण्यास मदत केली व आपल्या संस्थानात नोकरीवर रुजू केले.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देखील याच झोपडीत राहणार्या पैकीच एक होते. कॉम्रेड अण्णाभाऊ साठे, बाबुराव बागुल, नामदेव ढसाळ यांचाही याच झोपडपट्टीत जन्म झाला. काला,कबाली,सारापट्टा या सामाजिक आशयाच्या सिनेमांचे दिग्दर्शक पा रंजीत , पेरियार पेरूमल, कर्णन यासारख्या चित्रपटांचे दिग्दर्शक मारी सिल्वराज, पिस्तुल्या फँड्री सैराट व झुंड सारख्या चित्रपटांचा खरा नायक महाराष्ट्राचा लाडका नागराज अण्णा हा देखील झोपडपट्टीतल्या मातीतलच बीज आहे.
आज शिक्षण,नोकरी,अर्थकारण,समाजकारण,राजकारण व मराठी सिनेमा सृष्टी पासून टॉलीवूड, बॉलीवूड मध्ये आपल्या अस्तित्वाच्या छटा उमटवता ना आपल्याला झोपडपट्ट्या दिसत आहेत. या सर्वांच्या आयुष्यात मेहनत, कष्ट आणि संघर्ष तोही खडतर मार्गानेच असतो. मात्र,यांनी आलेल्या संधीचं सोनं करून दाखवलं हे माञ निश्चित. आता ही संधी नेमकी येते कोठून? तर ही संधी येथे भारतीय राज्य घटनेच्या चौकटीतून अर्थातच आरक्षणातून, आरक्षण हे दर्जाची व संधीची समानता प्राप्त करून देत.
संधी केवळ संधी नसुन ती दर्जाची असण्यासाठीच आरक्षण आहे. सुप्रीम कोर्टा च्या मतानुसार आरक्षण हे सामाजिक न्यायावर आधारलेला आहे, मग सर्वच क्षेत्रात सामाजिक न्याय होतो का? खरंच येथे दलित,पीडित,शोषित व वंचित घटक मुख्य प्रवाहात आलेत का? आरक्षणाच्या तरतुदीचा मुख्य हेतू होता सामाजिक न्याय, सामाजिक समानता मग किती न्याय मिळाला ? आणि किती समानता आली ? हा प्रश्नच...
शिक्षण आणि नोकरी मध्ये आपल्याला झुंड पाहायला मिळेल पण हीच झुंड खेळापासून वंचित का आरक्षणातून आयएएस,डॉक्टर, इंजिनिअर बनू शकतो मग आरक्षणातून भारताचे प्रतिनिधित्व करणारा अंकुश का तयार होत नाही ? झुंड मध्ये कोर्टासमोर बोलताना अमिताभ म्हणतो की "ही आपली पोर आहेत यांना कित्येक वर्षांपासून आपणच बहिष्कृत करून ठेवले"
भारताचा माजी कर्णधार कपिल देव म्हणतो की "सचिन आणि विनोद कांबळी हे एकाच उंचीचे खेळाडू होते" . मग विनोद कांबळीची का पीछेहाट होते याचं कारण विषमतावादी व्यवस्थेने तेंडुलकरला संधी वारंवार देऊन विनोद कांबळीला संधी नाकारली. म्हणजेच अमिताभच्या भाषेत त्याला ' बहिष्कृत' केलं.
पुढे अमिताभ असं म्हणतो की"ही मुलगी हरियाणाच्या झोपडपट्टीची आहे हिने स्टेट लेव्हल पर्यंत फुटबॉल खेळला आहे" मग प्रश्न हा सतावतो ती नॅशनल का खेळू शकली नाही? तिच्या सोबत ही तसंच झाला असेल जसं मागासवर्गीय क्रिकेटपटू अंडर १४ चे भूपेन ललवाणी आणि स्पिनर सत्यक पटेल सोबत झालं. २०१३ मध्ये एक बातमी आली होती कि अंडर १४ श्रेणीसाठी सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन ची निवड झाली. परंतु त्यापेक्षा चांगली खेळी मागासवर्गीय भूपेन ललवानी नाबाद ३९८ आणि सत्यक पटेल ने एका खेळीत सहा विकेट घेतल्या होत्या, तरी देखिल निवड समितीने यांच्या कामगीरी कडे दुर्लक्ष केले. भूपेन आणी सत्यक ची संधी नाकारत अर्जुन ला संधी चा साधू बनवले.
अमिताभ म्हणतो "यांच्या कर्तृत्वाला कसं ओळखणार आपण कोण करत यांची निवड ? कशी होते यांची निवड ? कोठे होते यांची निवड ?मुंबई मधे ?स्पोर्ट अकॅडमी मधे? मुंबई आणि स्पोर्ट अकॅडमी पूर्ण भारत नाही . शाळा,महाविद्यालय,विद्यापीठांच्या भिंतीपलीकडे पण एक भारत आहे. ही पोरं एक दगड मारून डुकराला मारून खाली पाडतात. या पोरांच्या हातात जर चेंडू दिला तर हे जगातले सर्वात वेगवान गोलंदाज होतील" ही काळ्या दगडावरची रेष आहे. आरक्षणाच्या नावाने गदारोळ करणारे म्हणतात भारत सोडला तर कोठेच आरक्षण नाही. हा त्यांचा चुकीचा भ्रम आहे. अमेरिका, चीन, जपान यासारख्या देशांमध्ये आरक्षण आहे. दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघात आरक्षण आहे. ज्या कारणाने ५ श्वेत खेळाडूंसोबत ६ अश्वेत खेळाडूंचा ही समावेश होतो. अश्वेत असलेले टेंबा बवूमा हे आज घडीला दक्षिण आफ्रिकेचे कप्तान बनू शकले याचं कारण त्यांच्या क्रिकेट टीम मधलं आरक्षण आहे. सुप्रीम कोर्टाचे म्हणणे आहे की आरक्षण मेरीट च्या विरोधात नाही तर सामाजिक न्याय आहे.
मग का भारतीय टीम मध्ये दलित मागासवर्गीय खेळाडूंना जागा मिळत नाही? झुंड देखील देखील आपल्याला तेच दाखवते की दलित मागासवर्गीय मुलांमध्ये खेळाची प्रतिभा आहे. झोपडपट्टी मधिल मुल खेळू शकतात खेळतात. जसं की वंचित समाजामधील मुलं संधी मिळाली की डॉक्टर, इंजिनिअर बनू शकतात अगदी तसंच त्यांना इथे खेळण्याची संधी दिली तर ते चांगले क्रिकेटर, फुटबॉलपटू एकंदरीतच चांगले खेळाडू बनू शकतात. आज पर्यंत या झुंड ची खेळाप्रती त्यांच्या प्रतिभे सोबत उपेक्षाच झालेली आहे. या उपेक्षांचा अंत करायचा असेल तर आपल्याला खेळांमध्ये देखील आरक्षण लागू करून दर्जाची व संधीची समानता उपलब्ध करावी लागेल.. मग ती झुंड, झुंड न राहता नॅशनल टीम बनेल आणी ती खरी असेल भारताची नॅशनल टीम. सामाजिक समानतेसाठी सामाजिक विषमतेचा अंत करेल...