एका पाण्याच्या घोटासाठी...
संपुर्ण देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना राजस्थान मध्ये एका दलित मुलाला मडक्यातून पाणी प्यायला म्हणुन शिक्षकाने मारहाण केल्याची घटना घडली. त्या लेकराचा काही दिवसांनी उपचारादरम्यान मृत्यू देखील झाला. पण हे प्रकरण माध्यमांना साध उचलुन धरावंसं वाटलं नाही. पण अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रीया व्यक्त केल्या. प्रसिध्द लेखक, ज्येष्ठ पत्रकार द्वारकानाथ संझगिरी यांनी देखील कठोर शब्दांत कोणत्या जगात राहतो आपण? हा सवाल उपस्थित केलाय. जाणुन घेण्यासाठी वाचा हा लेख
X
संपुर्ण देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना राजस्थान मध्ये एका दलित मुलाला मडक्यातून पाणी प्यायला म्हणुन शिक्षकाने मारहाण केल्याची घटना घडली. त्या लेकराचा काही दिवसांनी उपचारादरम्यान मृत्यू देखील झाला. पण हे प्रकरण माध्यमांना साध उचलुन धरावंसं वाटलं नाही. पण अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रीया व्यक्त केल्या. प्रसिध्द लेखक, ज्येष्ठ पत्रकार द्वारकानाथ संझगिरी यांनी देखील कठोर शब्दांत कोणत्या जगात राहतो आपण? हा सवाल उपस्थित केलाय. जाणुन घेण्यासाठी वाचा हा लेख....
खूप बेचैन झालो मी!
डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी महाडच्या चवदार तळ्याचा मुक्तीसंग्राम १९२७ साली केला.
आज ९५ वर्ष झाली.
देश स्वतंत्र होऊन ७५ वर्ष उलटली.
तरीही आज राजस्थानच्या एका गावातला एक दलित
मुलगा, तहान लागली म्हणून तथाकथित वरच्या वर्णाच्या शिक्षकाच्या पाण्याला तोंड लावतो म्हणून त्याला असं चोपल जातं की तो मरतो.
कुठल्या जगात राहतो आपण?
शिक्षकाने देशातल्या मुलांना घडवायचं असतं.
इथे शिक्षकच अजून मध्ययुगातील आहेत.
राजकीय स्वातंत्र्य म्हणजे स्वातंत्र्य नव्हे.
फक्त ब्रिटिश गेले म्हणून देश पूर्णपणे स्वतंत्र होत नाही.
सामाजिक स्वातंत्र्य तळागाळापर्यंत पोहोचणं महत्वाचं असतं.ते कधी तिथे पोहचणार?
परकीय गेले. स्वकीय आले.
देशाची विविध स्तरावर भरभराट झाली.
पण देशाच्या सामाजिक इमारतीचे मजले काही कमी झाले नाहीत. ते कायद्याने गेले. पण मनात राहिले.
म्हणूनच सर्वच नाही ,पण काही टेरेस फ्लॅट मधली माणसं , तळमजल्यावर वरच्या माणसाकडे " ते खालचे" म्हणून पाहतात. आम्ही समाजपुरूषाच डोक, ते पाय ही वृत्ती मनातून अजून बाद होत नाही.
किती महान गोलंदाजांनी तिला बाद करायचा प्रयत्न केला.
त्यातले डॉ बाबासाहेब आंबेडकर हे सर्वात महान गोलंदाज. पण विविध सामाजिक मजल्यावरच्या,
महात्मा फुले, लोकहितवादी, आगरकर, सावरकर, महात्मा गांधी, विठ्ठल रामजी शिंदे, भाऊराव पाटील, प्रबोधनकार ठाकरे पासून अगदी बाबा आढावा पर्यंत अनेकांनी गोलंदाजी केली. अनेकदा ही वृत्ती बाद होतोय असं वाटत. तिचे झेल उडतात. पण कुणीतरी तिला जीवनदान देत.
अजूनही दलित मुलाची तहान त्याच्या जीवावर बेतावी?
कुठल्या जगात आहोत आपण?
फार कुणी ह्या बातमीची दखल घेतली नाही.
ही बातमी दाबण्याचा प्रयत्न झाला. त्या दलित कुटुंबाची तोंड उघडण्याची हिंमतही उशिरा झाली. अजून किती दबाव आणि भीती
ह्या समाज घटकांवर आहे विचार करा.
आपण स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात दंग होतो.
चार राजकीय ठेवणीतल्या प्रतिक्रिया सोडल्या तर कुणाला
फारस काही वाटलं नाही. त्या राजकीय प्रतिक्रिया सुद्धा मतांवर डोळे ठेऊन केलेल्या.
जर स्वातंत्र्य एका लहान मुलाची तहान भागवत नसेल, त्याला एक घोट पाण्यासाठी जीव द्यावा लागत असेल, आणि ज्याने मुलांना नवी दृष्टी द्यावी तो शिक्षकच जर त्याचा मारेकरी असेल तर समाजाचं काहीतरी चुकतंय.
आणि स्वातंत्र्याच! सुध्दा.!
- द्वारकानाथ संझगिरी