Home > मॅक्स ब्लॉग्ज > क्या क्या खतरेमे है?

क्या क्या खतरेमे है?

कुठल्याही धर्माची दुकानदारी करणाऱ्या, लोकांची डोकी भडकवून तरुणांच्या हातात दगड, काठ्या, चाकू, बंदुका देणाऱ्या नेत्यांची मुलं उच्चशिक्षित, परदेशात, सुरक्षित व्यापारी का असतात? वाचा फ्रान्समध्ये घडलेल्या घटनेच्या निमित्ताने आनंद शितोळे यांचा लेख..

क्या क्या खतरेमे है?
X

"जर या पुस्तकात कुराणच्या आणि अल्लाच्या विरोधात काही असेल तर ती ईशनिंदा आहे. म्हणून ही पुस्तक जाळून टाका आणि जर या पुस्तकात कुराणच्या आणि अल्लाच्या विरोधात काही नसेल तर या पुस्तकांची काहीच गरज नाही. कारण जगातलं सगळं ज्ञान कुराणमध्ये आहे. म्हणून ही पुस्तक जाळून टाका" इस.६३७ मध्ये सध्याच्या इराकमध्ये तिग्रीस नदीकाठी असलेल शहर "Ctesiphon" हे तेव्हाच समृद्ध शहर होतं. ज्यामध्ये पर्शियन लेखक आणि तत्त्वज्ञ यांनी लिहिलेले ग्रंथ मोठ्या लायब्ररी मध्ये होते. ते अरब आक्रमकांनी जाळून टाकले. त्यावेळी वरच वक्तव्य केलेलं होतं. त्या जाळपोळीत सगळ शहर उध्वस्त झालं ज्याचे अवशेष आजही आहेत.

काल फ्रांस मध्ये अगदी तेच घडलंय. उपहासात्मक टीका सुद्धा सहन होत नाही. म्हणून पत्रकार, व्यंगचित्रकार मारले गेले आहेत. सगळ्या इस्लामच्या अनुयायांना हेच सांगण आहे की, खरोखर इस्लाम खतेरेमे आहे. जर ह्या दहशतवाद्यांविरुद्ध आवाज उठवला नाही. मुस्लीम जनमत जगभरात ह्या विरोधात एकवटलं नाही. तर ही प्रवृत्ती अजून अक्राळविक्राळ स्वरूप धारण करेल. धर्मग्रंथ आहे. म्हणून त्याचा आपल्या सोयीने अर्थ लावायचा. त्यातल्या मूळ तत्वांची मोडतोड करून आपल्या दुकानदारीला सोयीचे फतवे काढायचे आणि कुणी विरोधात बोलाल की ईशनिंदा म्हणून थेट माणसं मारून टाकायची? हा कोणता धर्म सांगतो? आणि असं सांगत असेल तर असा धर्म धर्मच नव्हे.

काळाची पावलं ओळखून, धर्माची नीट वस्तुनिष्ठ चिकित्सा करून जर सहकार्य आणि शांततेच्या मार्गावर अनुयायी चालले तरच इस्लामला भवितव्य आहे. नाहीतर सगळ्या जगाशी उभा दावा मांडून सगळ्या जगाला शत्रू बनवून तुम्ही तुमची मनमानी फार काळ करू शकणार नाहीत. हे सजग, शहाणपण असलेलं, सुधारणा घडवून आणणार जनमत तयार करायची जबाबदारी सगळ्या सुशिक्षित मुसलमानांची आहे. जर कचरा तुमच्या घरात झाला असेल तर तो जबाबदारी घेऊन, प्रसंगी जीवाचा धोका पत्करून तुम्हालाच साफ करायचा आहे. त्याच्यासाठी बाहेरून कुणीही येणार नाही आणि मदत करणार नाही.

आम्हीही आमचं घर साफ करायचा प्रयत्न करतोय. तेव्हा देशद्रोही किंवा धर्मभ्रष्ट ठरवले जातोय. तुम्हालाही तेच भोगावं लागेल पण त्याला पर्याय नाही. कारण आता पाणी तुमच्या डोक्यावरून चाललंय आणि उरलेल्या जगाच्या पण!! कुठल्याही धर्माची दुकानदारी करणाऱ्या, लोकांची डोकी भडकवून तरुणांच्या हातात दगड, काठ्या, चाकू, बंदुका देणाऱ्या नेत्यांची लेकरं बाळ उच्चशिक्षित असतात. परदेशात सुरक्षित ठिकाणी व्यापार, नोकरी धंदा करतात आणि सामान्य माणसांची पोर एकमेकांची डोकी फोडतात?

आपण आपल्याला का वापरू देतो? हा प्रश्न आपणच आपल्याला विचारण्याची वेळ आलेली आहे. इस्लामच्या अनुयायी असलेल्यांना निर्णय घ्यायचा आहे. आपल्याला या कट्टरवादी लोकांच्या नादी लागून सगळ्या जगाला बेचिराख करू पाहणाऱ्या तालिबानी वाटेवर जायचय की गंगा जमनी तहजीब नावाच्या एका नितांतसुंदर गोष्टीला जपून सहजीवन आणि सहकार्याने जगून, शिक्षणाची, प्रगतीची कास धरून आपलं कुटूंब, घर, समाज एक पाऊल पुढे न्यायचा आहे.

(आनंद शितोळे यांच्या फेसबुक भिंतीवरून)

Updated : 20 Oct 2020 10:02 AM IST
Next Story
Share it
Top