रामदास आठवलेंमधला पँथर संपला का ?
अन्याय अत्याचार झाल्यावर व्यवस्थेवर तुटून पडणारा नेता अशी रामदास आठवलेंची ओळख होती. आज राज्यात धार्मिक द्वेष वाढला आहे. जातीय अत्याचाराच्या घटना घडत आहेत. हिंदू मुस्लिम दंगली घडत आहेत. एकेकाळी व्यवस्थेला हादरऊन सोडणाऱ्या रामदास आठवलेंमधील पँथर संपला आहे का ? वाचा अशोक कांबळे यांचा लेख…
X
सोलापूर / अशोक कांबळे : अत्याचार झाल्यास धाऊन जाणारा, तुटून पडणारा नेता अशी ओळख रामदास आठवले यांची होती. परंतु आज राज्यातील धार्मिक जातीय तणावाच्या वातावरणावर त्यांचे मौन का असा प्रश्न अनेकांना पडलाय. यावर रामदास आठवले यांनी ठोस भूमिका मांडावी,अशी इच्छा सर्वसामान्य कार्यकर्त्यांची आहे. मध्यंतरी औरंगजेबाच्या स्टेटसवरून कोल्हापूरात दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावर आठवलेंनी त्यांनी कडक भूमिका घेणे अपेक्षित होते. परंतु तसे झाले नाही. अलीकडच्या काळात मनोहर भिडे यांनी महात्मा गांधी यांच्यावर केलेल्या वादग्रस्त विधानावर देखील आठवले ठोस भूमिका घेणे टाळत आहेत. सर्वसामान्य जनतेच्या सुख-दुःखात सहभागी होणाऱ्या या नेत्याची जनतेपासून नाळ तुटताना दिसत आहे. त्यामुळेच एकेकाळी अरे ला कारे करणारे पँथर केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले यांच्यातील पँथर संपला आहे का ? अशी चर्चा आंबेडकरी समूहात सुरू आहे.
रामदास आठवले यांची चळवळीची सुरुवात..
चळवळीत ज्यांनी स्वतःची जागा निर्माण केली,असे दलित पँथरचे नेते रामदास आठवले यांचा जन्म २५ डिसेंबर १९५९ ला सांगली जिल्ह्यात झाला. १९७१ ला सिद्धार्थ होस्टेलमध्ये विद्यार्थी म्हणून दाखल झाले आणि १९७२ ला दलित पँथरची स्थापना झाली तेव्हा त्यात सतत सहभागी होणारा कार्यकर्ता म्हणून रामदास आठवले सर्वाना परिचित होते. त्यात त्यांची जडणघडण झाली. हॅंडबिल वाटणारा आणि पोस्टर लावणारा कार्यकर्ता. कालकथीत प्रसिद्ध कवी नामदेव ढसाळ, थोर विचारवंत राजा ढाले, आजचे थोर साहित्यिक ज.वी पवार, कालकथीत प्रा.अरुण कांबळे, राजकारणात या नेत्यांच्या पुढे रामदास आठवले कधी निघुन गेले त्यांना देखील कळले नाही. पँथर ते केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री हा प्रवास तसा साधा व सोपा नव्हता. रामदास आठवले यांनी केवळ संघर्ष करून त्यांचे अस्तित्व टिकवुन ठेवले आहे. परंतु त्यांच्यातील पँथर व भिमसैनिक मात्र संपला आहे का ? अशी चर्चा मात्र रंगली आहे. तेव्हाच्या पँथर नेत्याचे आज कुठे अस्तित्व ही दिसत नाही.
रामदास आठवले म्हणजे एक चळवळ
रामदास आठवले एक व्यक्ती नाही तर एक चळवळ झाली आहे. त्यांना कुठेही कधी ही भेटता येते. कार्यकर्त्यांच्या सुख दुःखात, कार्यकर्त्यांच्या नात्यातील दुःखात कधीही वेळ काढून भेटणारा व भेटून सामाजिक बांधिलकी जपणारा नेता आहे. त्यांच्या बाबत राजकीय, वैचारिक दृष्ट्या अनेक मतभेद असू शकतात. त्या वेदना त्यांनी अनेकदा एकल्या आणि त्यातून मार्ग काढला, कॉंग्रेस राष्टवादीचे प्रत्येक जिल्ह्यातील नेते रिपाईच्या कार्यकर्त्यांना सालदार, विकाऊ टाकावू समजून वागणूक देत होते. पण भाजप-सेना युती बरोबर आठवले गेल्यामुळे खेड्यापाड्यातील वातावरण बदलले आहे. कारण कपटी मित्रा पेक्षा दिलदार शत्रू बरा अशी म्हण शहाणे लोक सांगतात, तशी परिस्थिती गावागावात होती. खैरलांजी घडल्या नंतर राष्टवादीचा पंचायत समिती, जिल्हापरिषद, विधानसभेत धुवा उडला पाहिजे होता. पण तसे झाले नाही याची कारणे कार्यकर्त्यांनी शोधली पाहिजेत.
अन्याय-अत्याचार झाल्यास धावून जाणारा नेता
समाजावर अन्याय-अत्याचार झाल्यावर सर्वात पहिला धावून जाणारा नेता म्हणजे रामदास आठवले होय. आज ही ते अन्याय अत्याचार झाल्यावर सर्वात प्रथम पोहचतात. मागासवर्गीय, ओबीसी, आदिवासी अल्पसंख्याक समाजातील रामदास आठवले यांच्याबद्दल नाराजी असली,तरी त्यांच्या सारखा समाजात कार्यकर्त्यात मिसळणारा दुसरा नेता नाही. त्यामुळेच समाजात त्यांचे अनुयायी मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळेच इतर सर्व मागासवर्गीय आंबेडकरी चळवळीतील गटा-तटात आठवले प्रभावशाली गट म्हणून ओळखला जातो. नेते भरपूर आहेत,पण तो जिव्हाळा इतर नेत्या मध्ये नाही. वसतिगृहात राहून राजकारणात जागा निर्माण करणारे रामदास आठवले कुशल संघटक आहेत. हे विसरता येणार नाही. कारण ते एकमात्र मान्यताप्राप्त नेते म्हणून देशभर ओळखले जातात. त्यांची सर्व माध्यमे म्हणजे नाटककार, चित्रकार, विडंबनकार, पत्रकार, संपादक विविध वाहिन्या वरील सिरीयल वाले दखल घेतात, चला हवा येऊ द्या ने तर त्यांना सर्व समाजाच्या घराघरात पोचविले.
रामदास आठवले यांच्याबद्दल समाजात वाढतेय नाराजी
रामदास आठवले सत्तेत गेल्यापासून लोकांसाठी त्यांना जास्त वेळ देता येत नाही. त्याचबरोबर रामदास आठवले कवितावरून अनेकदा देखील ट्रोल होताना दिसतात. त्यांच्यातील आंबेडकरवाद आणि पँथर वर देखील जनतेतून चर्चा होताना दिसत आहे. पूर्वीच्या प्रमाणे लोकांच्या मदतीला धावून जाणारा रामदास आठवले यांच्यातील पँथर लोकांना आता दिसत नाही.त्यांच्यातील पँथर जागा व्हावी हीच अपेक्षा.