शिवसेना खरंच वाघ आहे का...
X
बाळासाहेब, उद्धव, आदित्य आणि काही पोस्टरवर रश्मी ठाकरे, नंतर जमलंच तर शिवाजी महाराज ( गरजेनुसार ) किंवा आणि पक्षाची निशाणी असा आटोपशीर कारभार. पक्षाचे नेते, उपनेते यांची लायकी ड्रम गेट पर्यंत कधी थांबून जाईल याची शाश्वती नसलेला हा पक्ष.
बाळासाहेब गेल्यानंतर मातोश्रीचा दबदबा कायम ठेवण्यात उद्धव ठाकरे आणि त्यांचे जवळचे लोक यशस्वी झालेयत. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे राज्यभर फिरतायत, मेहनत घेतायत असं असलं तरी त्यांचं राजकारण एका कोषाच्या बाहेर जाताना दिसत नाही.
सौ. सोशल मीडिया
मध्यंतरी शिवसेनेने थेट उत्तरप्रदेश मध्ये जाऊन राममंदिराच्या मुद्द्यावर वातावरण पेटवण्याचा प्रयत्न केला, इतक्या वर्षांनंतरही विषच पेरायची बुद्धी ज्या पक्षाच्या नेत्याला होत असेल ते स्वत:ला वाघ कसं म्हणवून घेतात, असा प्रश्न मला पडतो. त्यांच्या घड्याळात काळ पुढे सरकला नसेल, पण या देशाचा काळ आता पुढे जाऊ पाहतोय, त्याची गती थांबवण्यासाठी सहपरिवार प्रयत्न करणाऱ्यांना प्रबोधनकारांचे वारसदार तरी कसं म्हणायचं हा प्रश्न ही मला पडतो.
सौ. सोशल मीडिया
वाघ, वाघाचं पिल्लू आणि पिल्लाची पिल्लं अशी शिवसेनेची व्याख्या मी काही काळापूर्वी केली होती. मातोश्री घराच्या बाहेर हा पक्ष जायला तयार नाही, ज्याला वाढायचंय त्याने मातोश्री पर्यंत यायलाच पाहिजे हा अहंकार अजूनही या पक्षात आहे. हा अहंकार बाळगण्याचा शिवसेनेला पुरेपूर अधिकार आहे, त्यांचा पक्ष त्यांनी कसा चालवायचा हे उद्धव ठाकरेंनी आणि त्यांच्या कोअर टीमने ठरवावं, त्याला कुणाचा आक्षेप असण्याचं काहीच कारण नाही. माझा आक्षेप त्यांनी आतापर्यंत केलेल्या धूळफेकीला आहे.
सौ. सोशल मीडिया
उद्धव ठाकरेंनी आजपर्यंत जाहीर प्रचार सभांमध्ये ज्या ज्या वेळी मोठमोठ्याने सरकारला इशारे दिलेयत, त्याच्या नंतरच्या कॅबिनेट बैठकांमध्ये शिवसेनेच्या मंत्र्यांनी सरकारला साधा प्रश्न ही विचारलेला नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करणाऱ्या शिवसेनेच्या मंत्र्यांनी नेहमीच कॅबिनेट मध्ये फडणवीसांचे हात बळकट केलेयत. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर जोरजोरात भाषणं करणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या एकाही मंत्र्यांने या मुद्द्यावर राजीनामा दिलेला नाही. शिवसेनेने सरकारचा पाठींबाही काढला नाही. मग, लोकांमध्ये जाऊन विरोधी पक्षाची भूमिका घेण्यामागे नक्की काय कारण आहे... याचा खुलासा उद्धव ठाकरेंनी करणे गरजेचं होतं. मात्र, आपण वाघ नाही हे काल त्यांनी दाखवून दिलं.
पत्रकार परिषदेत एकही प्रश्न विचारू दिला गेला नाही. शिवसेनेने आजपर्यंत अनेक प्रश्नांची प्रतिप्रश्न विचारून बोलती बंद केलेली आहे. काल ते प्रतिप्रश्न विचारायला ही थांबलेले नाहीत.
ठाकरे परिवाराची ईडी मार्फत चौकशी व्हावी अशी मागणी भारतीय जनता पक्षाने केली होती. याच पक्षाच्या अध्यक्षासोबत झालेले सगळे अपमान गिळत उद्धव ठाकरे यांनी हातमिळवणी केली. यात वाघाची मांजर झाली वगैरे टाइपच्या पोस्ट फिरवून भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, तसंच विरोधी पक्षांनी सोशल मिडीयावर खूप उच्छाद मांडला. पण वस्तुस्थिती अशी आहे की, हा वाघ कधीच नव्हता..शिवसेना आहे म्हणून मराठी माणूस आहे, शिवसेना आहे नाहीतर हिंदूंची सुंता झाली असती अशा भ्रामक अफवा पसरवून पसरवून मोठा झालेला हा पक्ष आहे, त्यातलं 80 टक्के समाजकारण मुंबईतल्या अनेक एसआरए प्रोजेक्ट आणि मोक्याच्या जागा गिळण्यामध्ये खर्च झालेलं आहे.
शिवसेना सत्तेत आहे त्या सत्तेच्या काळातच कधी नव्हे ती मंत्रालयात आत्महत्या झाली, अनेकांनी आत्महत्यांचे प्रयत्न केले. कामगारांचे प्रश्न, महिलांचे प्रश्न, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, उद्योगाचे बुरे हाल, विविध समाजांमध्ये असंतोष.. अशा अनेक घटना या काळात झालेल्या आहेत. या सगळ्या घटनांची जबाबदारी न घेता शिवसेनेने सत्ता उपभोगली आहे. वाघाच्या जितक्या कहाण्या ऐकल्या आहेत, त्यातला खरा वाघ असा पळत नाही.
- रवींद्र आंबेकर