विठ्ठलाच्या पायावर सॅनिटायझर टाकणं योग्य की अयोग्य?
X
हजारो वर्षाच्या परंपरा कोरोनामुळं यंदा थांबल्या. राज्यातील कोट्यावधी लोकांचं श्रद्धा स्थान असलेली अनेक धार्मिक स्थळ सध्या बंद आहेत. त्यात भेटी लागी जीवा असं म्हणत वर्षभर ज्या वारीची वारकरी वाट पाहतो ती वारी देखील यंदा कोरोनामुळं चुकली. सर्व वारकऱ्यांनी संत सावता माळी म्हणतात तसं...
कांदा, मुळा, भाजी
अवघी विठाई माझी
लसूण, मिरची, कोथिंबिरी
अवघा झाला माझा हरी
असं म्हणत आपल्या कामातच देवाचं दर्शन घेतलं. मात्र, आता पंढरपूरचं विठ्ठलाचं मंदिर भाविकांसाठी खुलं करण्याची मागणी समोर येत आहे. मात्र, कोरोनाचं संकट असताना पंढरपूरचं मंदिर उघडताना दोन व्यक्तीमध्ये अंतर कसं ठेवायचं? राज्यभरातून भाविक येणार. अशा वेळी कोव्हिड च्या काळात हे सर्व नियोजन कठीण होत आहे.
पोलिस, प्रशासन, इतर सर्व शासकीय यंत्रणा कोरोनाशी लढण्यात व्यस्त असताना मंदिर खुलं करण्याची मागणी आता समोर येत आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यासह राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मंदीर खुली करण्याची मागणी केली आहे.
Courtesy: Social Media
मात्र, राज्य सरकारने धार्मिक स्थळं उघडण्यास परवानगी दिल्यानंतर पंढरपुरात भाविकांनी विठुरायाचं दर्शन घेतल्यानंतर विठ्ठलाचे पायावर सॅनिटायझर मारु नये. कारण त्यात अल्कोहल असतं. आणि देवाच्या पायावर अल्कोहोलयुक्त सॅनिटायझर टाकण्यास आमचा ठाम विरोध आहे. असं मत वारकरी संप्रदायाने व्यक्त केलं आहे.
प्रकाश आंबेडकर आक्रमक का?
विश्व वारकरी सेना वंचित बहुजन आघाडीच्या सोबतीने १ लाख वारकरी घेऊन विठ्ठल मंदिर प्रवेशाचे आंदोलन करणार आहे. या आंदोलनाचे नेतृत्व प्रकाश आंबेडकर करणार असल्याने प्रशासनाने धसका घेतलाय़. तसेच भाजपनेही या मुद्द्यावर राज्यभर घंटानाद आंदोलन पुकारले आहे तर सर्वच पक्षातील राजकीय नेते मंदिर उघडण्याबाबत आता आक्रमक होऊ लागले आहेत. अशावेळी सरकारचा निर्णय लवकरच अपेक्षित आहे. यासंदर्भात विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील मंदीर खुली करण्याचा आग्रह धरला आहे.
करोनाची भीती
या पार्श्वभूमीवर इतर मंदिराच्या तुलनेने पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात चरणांवर दर्शन असल्याने याबाबत वेगळा प्रश्न उभा राहणार आहे. एखाद्या करोनाग्रस्त भाविकाने विठुरायाच्या चरणांवर माथा टेकून दर्शन घेतल्यास त्यानंतर येणाऱ्या भाविकालाही करोना संसर्गाची भीती निर्माण होऊ शकते. हे टाळण्यासाठी देवाच्या पायावर सॅनिटायझर टाकावे लागेल आणि यालाच वारकरी संप्रदायाने विरोध दर्शविला आहे.
वारकरी फडकरी दिंडी समाज संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, कुंभारगावकर महाराज, लबडे महाराज, विनायक महाराज गोसावी, रामकृष्ण महाराज यांनी करोनाचे संकट संपेपर्यंत पायावर दर्शनाऐवजी मुखदर्शन सुरू केले तरी चालेल, असे सांगत पायावर सॅनिटायझर टाकण्यास विरोध दर्शवला आहे. वारकरी संप्रदायात मद्य निषिद्ध असताना अल्कोहोल असलेले सॅनिटायझर देवाच्या पायावर मारणे. वारकरी संप्रदायाला अमान्य असल्याचे त्यांनी सांगितले.
वारीचे अभ्यासक डॉ. श्रीरंग गायकवाड यांच्या मते करोनाकाळात धार्मिक स्थळे सुरु करणे म्हणजे आरोग्याशी खेळणे होईल, भक्ती, आस्था, श्रद्धा सगळं जरी बरोबर असलं तरी आरोग्याच्या दृष्टीकोनातून हे घातक आहे. करोनाच्या या परिस्थितीत सरकारने जे नियम दिले आहेत म्हणजे फिजीकल डिस्टसिंग पाळूनही विठ्ठलाचे दर्शन घेता येईल. मुखदर्शन हा उत्तम पर्याय आहे. वारकऱ्यांना मंदिरांचा कळस जरी दिसला तरी त्यांना विठ्ठलाचे दर्शन घेतल्यासारखे वाटते. सध्या करोनाच्या रुग्णांची काळजी घेतली पाहिजे. मुख्यमंत्र्यांचा फंड कुठे खर्च केला जातो? पीएम फंड कऱोना रुग्णांसाठी वापरला जातोय का? यावर बोललं पाहिजे आंदोलन केलं पाहिजे. आपण हे सोडून मंदिर खुली करण्याचा अट्टाहास करुन आंदोलन करवी हे विठ्ठलाच्या खऱ्या भक्तांनाही वाटणार नाही आणि खुद्द देवालाही वाटणार नाही. आणि म्हणून माणसांनी माणसांचा विचार करायला हवा आणि करोनाच्या संकटावर मात केली पाहिजे.
तर दुसरीकडे, पंढरपूरचे स्थानिक पत्रकार अभिराज उबाळे सांगतात की, कोरोना येण्यापूर्वी दिवसाला विठ्ठलाच्या दर्शनासाठी १५ हजार भाविक येत असतं. मात्र, लॉकडाऊन मुळे अनेक व्यवसायावरही परिणाम झालेला आहे. पंढरपूरचे ५० ते ६० टक्के अर्थकारण हे धार्मिक स्थळांवर अवलंबून आहे. दररोज २५ हजारांच्या आसपास लोक पंढरपूरात येत असतात. त्यांच्या राहण्याची सोय, फुल, हार खरेदी पासून फोटो, मूर्ती,प्रसाद इ. खर्च होत असतो. परंतु या लॉकडाऊनमुळे सर्वच ठप्प झालं आहे.
सगळीकडून धार्मिक स्थळे सुरु करण्याची मागणी होत आहे. यात विठ्ठलाच्या मंदिराला वेगळचं महत्व आहे. कारण विठ्ठलाची स्वयंभू मूर्ती असल्यामुळे त्याची झीज होऊ नये. म्हणून विठ्ठलाच्या पायी सॅनिटाईझर फवारणी करण्याला विरोध होत आहे. यात आस्था आणि विज्ञान यातून जर आपण पाहिलं तर विठ्ठलाच्या पायी सॅनिटाईझर फवारणी करु नये. ही मागणी योग्य आहे. तसेच पर्यायी मार्ग मूखदर्शन असावा... त्यामुळे विठ्ठलाच्या मूर्तीचे ही आयुष्य वाढले आणि भाविकांच्या आरोग्य स्वस्थ राहील. असं मत अभिराज यांनी मॅक्समहाराष्ट्रशी बोलताना व्यक्त केलं.
मात्र, यामध्ये पंढरपूरचं मंदिर सुरु झाल्यास अनेकांचं पोट पुन्हा सुरु होईल. पंढरपुरातील बंद पडलेला व्यापार सुरु होईल. यासाठी काही लोक आग्रही असल्याचं मत समोर येत आहे.
धार्मिक स्थळ सुरु झाली पाहिजेत का? यावर सामाजिक विचारवंत संजय सोनावणी सांगतात, करोनामुळे देशाचे खूप मोठ नुकसान झालं आहे. देशाचे आर्थिक नुकसान भरपाईसाठी किती वेळ लागणार आहे. हे सांगता येणार नाही. श्रद्धास्थान नाकारण्यात आलं आहे. मंदिर असतील मशीद असेल ही आता खुली करणं गरजेचं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जे व्यवसाय बंद केले आहे ते पुन्हा सुरु करावेत. आरोग्य व्यवस्थेची सरकारने काळजी घेतली पाहिजे. त्याचबरोबर नागरिकांनी स्वतःच्या प्रकृतीची काळजी घेतली पाहिजे. असं मत संजय सोनवणी यांनी व्यक्त केलं आहे.
या संदर्भात अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अविनाश पाटील सांगतात की, देव संकल्पनेविषयी श्रद्धा प्रत्येकाचा व्यक्तिगत खाजगी मामला आहे. त्याच्याविषयी आपण उपासना आणि कर्मकांड करणं हे आपल्या व्यक्तिगत जीवनाचा भाग असू शकतो. पण त्यामुळे सार्वजनिक आरोग्य, सार्वजनिक हित आणि कायदासुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही. याची काळजी आपण घेतली पाहिजे. अशी घटनावृत्त कर्तव्याची जबाबदारी भारतीय संविधानाने आपल्यावर नागरिक म्हणून टाकली आहे. त्या भूमिकेतून या परिस्थितीकडे बघितलं पाहिजे. मला असं वाटतं, ज्या सॅनिटायझर मध्ये अल्कोहोल साधारतः 95 टक्के आणि बाकीचे अनेक रासायनिक पदार्थ असतात, या शिवाय काही पदार्थ जे आपण संसर्ग टाळण्यासाठी सॅनिटायझर वापरतो. त्यामुळे हात कोरडे पडतात. तसेच सॅनिटाझर मध्ये असलेले अल्कोहोल लगेच उडून जातं.
यामुळे सॅनिटायझर फवारणी जरी केली तरी त्यातील अल्कोहोल उडून जाते. परंतु त्यातील काही रासायनिक पदार्थांचा परिणाम विठ्ठलाच्या मूर्तीवर होण्याची निश्चितपणे शक्यता आहे. फक्त हे तपासणं गरजेंच आहे. अल्कोहोल मिश्रित सॅनिटायझर आपण टाकतोय म्हणजे आपण दारूच्या स्वरुपाच प्रसाद देतोय. हे मान्य करण योग्य होणार नाही.
भारतीय पंरपरेमध्ये आणि श्रद्धेमध्ये आपल्याकडे अनेक देव-दैवतांना दारूचे नैवद्य देण्याची प्रथा चालत आली आहे. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये संसर्ग टाळण्यासाठी सॅनिटायझर आवश्यक असणे गरजेच आहे.
हे मूर्तीवर टाकण्यापासून परावृत्त करायचे असेल, तर आपण मूर्तीला स्पर्श किंवा एकूणच शारिरीक स्पर्श टाळणे आवश्यक आहे. तसेच शारीरिक विलगीकरण ठेवणं गरजेच आहे. हे या संसर्गजन्य परिस्थिती कोविड१९ च्या विरोधात चालू असलेल्या लढाईमधलं सगळ्यात मोठं गमक आहे. हा मुद्दा श्रद्धेचा भावनेचा न करता परिस्थितीजन्य गरज आणि सार्वजनिक, व्यक्तिगत आरोग्याची काळजी या अंगाने बघावं असं आवाहन वारकरी संप्रदाय आणि सर्व भक्तांना करतो. असं अविनाश पाटील यांनी व्यक्त केलं आहे.
सॅनिटायझरमुळे विठ्ठलच्या मूर्तीवर काय परिणाम होऊ शकतो? या संदर्भात भू-गर्भ शास्त्रज्ञ डॉ. मुकुंद बरीदे यांच्याशी बातचित केली असता, अद्यापपर्यंत मंदिरांवर किंवा देव-दैवतांच्या मूर्तीवर सॅनिटायझरची फवारणी करण्यात आली नाही. मात्र, करोनामुळे संसर्ग टाळण्यासाठी सॅनिटायझरचा वापर अत्यावश्यक झाला आहे. त्याचबरोबर सॅनिटायझरमध्ये 95 टक्के अल्कोहोलचे प्रमाण असते. मात्र त्याचा हवेशी संपर्क आल्यास तो उडून जातो. परंतु सॅनिटायझरमध्ये वेगवेगळ्या रासायनिक पदार्थाचा समावेश असतो. त्यामुळे त्या केमिकल्सचा परिणाम मूर्तीवर होऊ शकतो. तात्काळ याचे परिणाम दिसणार नाही. परंतु यामुळे मूर्तीची झीज होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. असं मत भू-गर्भ शास्त्रज्ञ डॉ. मुकुंद बरीदे यांनी व्यक्त केलं आहे.
एकंदरित लॉकडाऊन मुळे धार्मिक स्थळ बंद असल्यामुळे याचा सर्वाधिक फटका मंदिरावर सुरु असलेल्या रोजगार, उदयोग-धंदे आणि व्यसायिकांना बसला आहे. देशाचा आर्थिक गाडा सुरळीत ठेवण्यासाठी अनेक बंद असलेले व्यवसाय सुरु करणं जरी महत्वाचे असले तरी आरोग्याला जपणं ही महत्वाचे आहे. विठ्ठल मंदिर सुरू करण्याबाबत मंदीर प्रशासन अजूनही साशंक असून सध्या करोनाची वाढती परिस्थिती पाहता मंदिर उघडणे शक्य नसल्याचा समितीचा सूर आहे. मात्र, शारिरिक अंतर ठेऊन मुखदर्शन घेता येऊ शकतं असं अनेक भाविकांचं म्हणणं आहे. त्यामुळं शासनाने मंदिर उघडण्यास परवानगी दिली तरी भाविकांच्या आरोग्याचा प्रश्न कायम राहणार आहे.