योगानंदाची गोष्ट
X
इंद्रदत्त, व्याडी आणि वररुची हे तिघे आचार्य वर्ष यांचे शिष्य होते. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी गुरुला विचारलं, आपल्याला कोणती गुरुदक्षिणा द्यावी? एक हजार सुवर्णमुद्रा, आचार्य वर्ष म्हणाले. तिन्ही शिष्यांकडे एवढी संपत्ती नव्हती. मगध सम्राट नंद आपल्याला मदत करेल असा विचार त्यांनी केला. सम्राटाचा मुक्काम त्यावेळी अयोध्येत होता. तिघे अयोध्येत पोहोचले तेव्हा सम्राट नंद मृत्यू पावल्याची बातमी त्यांना मिळाली. इंद्रदत्त म्हणाला...
'आता एकच उपाय आहे, योगसामर्थ्याने माझा आत्मा नंदाच्या शरीरात प्रवेश करेल. राजा जिवंत झाल्यावर वररुचीने तिथे येऊन एक हजार सुवर्णमुद्रांची याचना करावी, मी त्याची इच्छा पूर्ण करेन. सुवर्णमुद्रा घेऊन वररुची निघाला की, माझा आत्मा राजाच्या शरीराचा त्याग करेल आणि पुन्हा या देहात प्रवेश करेल. या काळात व्याडीने माझ्या देहाचं रक्षण करावं.
इंद्रदत्तचा आत्मा नंदाच्या शरीरात प्रवेश करतो. आता तो नंद नसतो तर योगानंद असतो. कारण योग सामर्थ्याने तो जिवंत झालेला असतो. वररुची त्याच्याकडे दान मागतो. योगानंद तात्काळ आदेश देतो की वररुचीला एक हजार सुवर्णमुद्रा देण्यात याव्यात.
नंद सम्राटाचा प्रधान असतो शकटार. त्याला संशय येतो. मेलेला राजा जिवंत कसा झाला? जिवंत झाल्यावर हा वररुची ताबडतोब कसा टपकला, असे प्रश्न त्याला पडतात. परंतु राजाज्ञेचं पालन करायला हवं. शकटार आदेश देतो की, पंचक्रोशीतली सर्व प्रेतं जाळून टाका. इंद्रदत्तच्या देहाची राखण करत बसलेल्या व्याडीला न जुमानता सैनिक तो देह जाळून टाकतात.
सर्व प्रेतं जाळण्यात आल्याचा अहवाल मिळाल्यावर शकटार वररुचीला एक हजार सुवर्णमुद्रा देतो. योगानंदाची गोची होती. त्याला राजाच्या शरीरात राहायचं नसतं. पण त्याचा देह नष्ट झालेला असतो. निरुपायाने तो राजा म्हणून दिवस कंठू लागतो. जो समाज आपल्याला पसंत नाही. त्यामध्ये आपल्याला राहावं लागतं. अशा परिस्थितीत जगायचं कसं? आपली नैतिकता टिकवायची कशी?
असा प्रश्न अनेकांना पडतो. एका अर्थाने आपल्याला स्वातंत्र्याची सजा झालेली असते. योगानंदाची गोष्ट वेगळ्या नजरेने पाहायली. तर विसाव्या शतकातला अस्तित्ववाद आपल्याला ११ व्या शतकातील सोमदेवाच्या कथासरित्सागरात सापडू शकतो. परंतु ही दृष्टी २० व्या शतकातच प्राप्त होऊ शकते. कथासरित्सागरात केवळ गोष्टी आहेत.
(सुनील तांबे यांच्या फेसबुक भिंतीवरून)