Home > मॅक्स ब्लॉग्ज > मोदींच्या राज्यात हिंदू असुरक्षित आहेत का?

मोदींच्या राज्यात हिंदू असुरक्षित आहेत का?

मोदी सरकारला आता ८ वर्ष पूर्ण होतील...या आठ वर्षांत मोदी पंतप्रधान आणि अमित शहा गृहमंत्री असूनही देशातील हिंदू खतरें में का आलाय? मोदी-शहा-भागवत या सर्व हिंदूंना सुरक्षेची भावना का देऊ शकले नाहीत...याचे परखड विश्लेषण केले आहे, मॅक्स महाराष्ट्रचे संपादक रवींद्र आंबेकर...

मोदींच्या राज्यात हिंदू असुरक्षित आहेत का?
X

नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये देशाची सूत्रे म्हणजेच पंतप्रधान पदाची सूत्रे हातात घेतली. आज आपण २०२२ मध्ये आहोत. म्हणजे नरेंद्र मोदींच्या सरकारला बघता बघता ८ वर्षे होत आहेत. दोन वर्षांनंतर ते पुन्हा निवडणुकीला सामोरे जातील. या आठ वर्षाच्या काळात भाजप आणि संघ परिवारातील सर्व प्रमुख नेते हिंदू-मुस्लीम वर उतरले आहेत. प्रत्येक निवडणुकीच्या आधी हिंदू-मुस्लीम वादाची पेरणी केली जाते. या आठ वर्षांत मोदी पंतप्रधान आणि अमित शहा गृहमंत्री असूनही देशातील हिंदू खतरें में का आलाय? मोदी-शहा-भागवत या सर्व हिंदूंना सुरक्षेची भावना का देऊ शकले नाहीत हा मोठा प्रश्न आहे.

आज महागाई १४ टक्क्यांनी वाढल्याचे आकडे समोर आले आहेत. इंधन-खाद्य तेला पासून कुठलीच गोष्ट महागाईच्या फेऱ्यापासून लांब राहिलेली नाही. मात्र या महागाईच्या माऱ्यामुळे परेशान गरीब, निम्न मध्यमवर्गाच्या दुःख-वेदनेची थट्टाच भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी लावली आहे. शेकडो काय हजारों रूपयांनी महागाई वाढली तरी आम्ही विकत घेऊ टाइपातील मेसेजेस सोशल मिडीयावर पसरवून मोठ्या प्रमाणावर जनमानस प्रभावित करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. कुठे जरा असंतोष दिसला तर पुन्हा हिंदू मुसलमान, बुलडोझर, आरती, भोंगा असे विषय आहेत. कुठे मांस-मच्छीवरून वाद ही आहेत. तणाव आहे. रामानंतर आता हनुमान ही मार्केट मध्ये आणण्यात आला आहे. सगळीकडेच बाजार मांडण्यात आला आहे.

कुठलाही तणाव निर्माण होण्यासाठी काही तरी कारण लागतं. सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिर निर्माणा संदर्भातला निकाल दिल्यानंतर देशभर तणाव निर्माण होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती, मात्र मुस्लीम समुदायाने हा निर्णय स्विकारून त्यावर प्रतिक्रीयाच दिली नाही. एकदोन भाडोत्री नेते सोडले तर कोणी यावर काही बोललं नाही. या प्रकारामुळे आयटी सेल ने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इमेज कशी दहशतीची आहे, कोणाची हिंमत नाही मोदींच्या समोर बोलण्याची, अशा पद्धतीने रंगवली. नरेंद्र मोदींना आव्हान देईल असा कुठलाही नेता सध्या देशात नाही, मुस्लीम समाजात असण्याची शक्यताच दूर. देशात हिंदूंची लोकसंख्या ८० टक्के. शासन, प्रशासन, न्यायालये, पोलिस, माध्यमं सर्वांचाच ताबा बहुतांश हिंदूंकडेच. देशाचा मूड ही हिंदुत्ववादाकडे म्हणजेच लोकार्थाने उजवीकडे वळलेला. तरीही 2019 मध्ये पक्षाला ३७ टक्के मतं मिळून लोकसभेच्या एकूण जागांच्या ५५.८० टक्के जागा मिळाल्या. राजकारणामध्ये बहुमत हे बहुमत असतं. त्याला ३७ टक्के म्हणून अल्पमत म्हणत नाहीत. ६३ टक्के विरोधात असले तरी विरोधकांचं बहुमत होत नाही, उलट अशी अभूतपूर्व परिस्थिती निर्माण होऊ शकते जिथे विरोधी पक्षनेता ही अस्तित्वात येऊ शकत नाही. तर या अशा अभूतपूर्व यशाच्या कोंदणात जेव्हा अदूरदर्शी लोकं बसतात तेव्हा मोठं संकट निर्माण होतं.

नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात काही नाविन्यपूर्ण कल्पनांना प्रोत्साहन देण्यात आलं. लोकांचा सरकार मधला सहभाग कसा वाढेल याकडे लक्ष देण्यात आलं. डिजीटल इंडीया, स्टार्टअप इंडिया, मेक इन इंडिया असं देशाभिमानाशी जोडलेल्या उपक्रमामुळे देशातील तरूणांमध्ये नवचैतन्य निर्माण झालं होतं. जगातील सर्वांत तरूण देश, त्यांच्या आशा-आकांक्षा सर्वच आसमंतात भरारी घेण्यासाठी सज्ज होत्या. अशा तरूणांना नरेंद्र मोदी नावाचं इंजिन मिळाल्याचा आनंद होता. नरेंद्र मोदींनी जगभरात भारतीयांचं मार्केटींग केलं, मोठमोठे इवेन्ट केले. परराष्ट्र धोरणासंदर्भात अनेक लोकांनी टिका केली, मात्र मोदींनी त्याची पर्वा केली नाही. लोकांचा इतका सपोर्ट असलेला नेता असल्यावर अशा टिका-टिप्पणींची चर्चा करण्याची तशी गरज नाही. नरेंद्र मोदींनी नोटबंदी केली, त्यानंतर अर्थव्यवस्थेचं डिजीटलायजेशन केलं, राफेल डील केलं. या सर्वांवर प्रचंड टिका झाली. त्यातच कोविड चा प्रादुर्भाव झाला. कोविड मधील गोंधळावर ही खूप टिका झाली. मात्र नरेंद्र मोदींच्या डिजीटल-आयटी आर्मी ने सर्व हल्ले परतवून लावले. तज्ज्ञांच्या मते चौकीदार चोर है ही राहुल गांधींची कँपेन प्रचंड प्रभावशाली झाली होती. या कँपेन मुळे मोदींच्या प्रतिमेला धक्का बसला. त्यामुळे मैं भी चौकीदार अशी अँटी कँपेन मोदींना काढावी लागली. कोविड महामारीच्या दरम्यान भारतात ४० लाख लोकं मेल्याचे रिपोर्ट बाहेर येणं, महागाई गगनाला भिडणे अशा परिस्थितीत ही नरेंद्र मोदी सरकारवर लोकांची नाराजी स्पष्टपणे बाहेर येत नाही. विरोधातील आवाज सोशल मिडीयाच्या अल्गोरिदम मध्ये दाबला जातो. निवडणुकांच्या मॅनेजमेंट मध्ये त्यांचा हातखंडा आहे त्यामुळे निवडणुकांच्या प्रचाराच्या मुद्द्यांमधून बेरोजगारी, महागाई, द्वेष असे सगळे मुद्दे गायब होऊन जातात, आणि उरतो तो रिफाइंड हिंदू-मुस्लीम वाद.

सर्वांत जास्त खासदार, सर्वोच्च पकड असूनही मोदींच्या राज्यात हिंदू खतरे में आला तो बेरोजगारी, महागाई मुळे. देशातील कुठल्याही समस्येचा पहिला पिडीत देशात बहुसंख्येने असलेला हिंदू आहे. ८० टक्के हिंदूंना या सर्व समस्यांच्या झळा बसतात. काही मूठभर लोकं स्वतःला मिळणाऱ्या भरमसाठ फी साठी देशातील सर्व समस्यांचं एक वेगळं चित्र रंगवून लोकांसमोर ठेवतात. काल एका महाशयाने तर तेल २००० रूपये झाले तरी मी घेईन अशी प्रतिक्रीया दिली. अशा प्रतिक्रिया सोशल मिडीयावर देणाऱ्यांची संख्या लाखोंनी आहे. सोशल मिडिया प्लॅटफॉर्म अशा प्रतिक्रीया देणाऱ्या अकाऊंट ना मोकळं रान देतात. हिंसाचार-बलात्कार-धमक्या अशा प्रकारच्या कंटेंट मध्ये देशातला तरूण गुंतून गेला आहे. आपल्या विकासाच्या रस्त्यात एकतर काँग्रेस नाहीतर मुस्लीम आणि ते ही संपले तर आरक्षण वाले आहेत अशी ठाम समजूत या तरूणांची घालून देण्यात आली आहे. या तरूणांना संघपरिवार दररोज नवनवीन शत्रू दाखवत आहे. कधी पाकिस्तान, कधी कधी आपल्याच देशातील मुस्लीम .. द्वेषासाठी त्यांना कोणीही चालतं.

साधा विचार करा. ३७ टक्के लोकांनी निवडून आणलेल्या या सरकारच्या बाहेर जे लोकं इतर पक्षांतून निवडून आलेयत ते काय पाकिस्तानातून टपकलेयत काय? ते ही या देशातीलच आहेत. पण राजकीय-वैचारिक विरोधकांना देशद्रोही ठरवून मोकळं व्हायचं या नितीमुळे आज एकूणच संपूर्ण देश संकटात सापडलाय. देशातील हिंदू मुस्लीमांमुळे नाही तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे असुरक्षित झालाय. या देशाची राज्यघटना आज संकटात आहे. या असुरक्षित हिंदूंना आता आपलं नवं हिंदू राष्ट्र हवंय. या नवीन हिंदूराष्ट्राची नशा कमी म्हणून की काय त्याला अखंड भारत चा ही तडका लावलाय.

देशासाठी येता काळ खूप कठिण आहेच, पण आता तो महाकठिण आहे. आजच्या काळाच शांततेबाबत बोलणारे, सहिष्णुतेसाठी आर्जव करणारे, धर्मनिरपेक्षतेचा आग्रह धरणारे, दंगलींना विरोध करणारे सगळेच देशद्रोही आहेत. या देशद्रोहींच्या यादीत जो पर्यंत हिंदू बहुमताने सामील होत नाही, तोपर्यंत या देशाचं काही खरं नाही.

Updated : 19 April 2022 6:53 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top