हीच का फाटक्या भगव्यांची भारतीय संस्कृती? डॉ. मुग्धा कर्णिक
दिवाळीच्या दिवशी फटाके फोडणे ही हिंदू परंपरा नाही, महाकाव्य आणि पुराणातही फटाक्यांचा उल्लेख नाही, असे कर्नाटकच्या महीला आयपीएस अधिकारी डी. रूपा मौदगिल यांनी ट्विटरवर
X
म्हटल्यानंतर त्यांना भक्तांच्या रोषाला सामोरे जावे लागले, वादग्रस्त अभिनेत्री कंगना राणौतनेही थेट डी.रुपांच्या राजीनाम्याची मागणी केली. या फटाक्यावादावरुन फटाका इतिहासावर प्रकाश टाकला आहे डॉ.मुग्धा कर्णिक यांनी.....
फटाके आणि फटाके तयार करण्यासाठी लागणारी बंदुकीची दारू ही मुळात तयार झाली चीनमधे.
इसवीसनानंतरच्या पहिल्या दोन शतकांतच चीनमधे बंदुकीची दारू वापरून युद्धात शत्रूला त्रस्त करण्याचे मार्ग शोधून काढण्यात आले होते. त्याच सुमारास ही काळी पावडर वापरून बांबूच्या नळ्यांत भरून पहिले फटाके चिन्यांनी तयार केले. असेही बांबू आगीत टाकले की त्यातल्या पोकळ्यांतली हवा तापून त्याचा आवाज करून स्फोट होत असे हे देखील चिन्यांनीच शोधले होते. मग त्या पोकळ्यांत किंवा त्यानंतर कागदाच्या घट्ट सुरनळ्यांतून काळी दारूपावडर भरून त्यांनी फटाके करायला सुरुवात केली.
हे चिनी फटाके १३व्या शतकात चीनमधून प्रथम युरोपमधे गेले. तिथून जगभर पसरले. १४व्या शतकात इटलीतल्या लोकांनी फटाके स्वतः तयार करायला सुरुवात केली. ही आतषबाजी सर्व जगातल्या राजेरजवाड्यांनी स्वीकारली. लोकांचे डोळे दीपवण्यासाठी कुठल्याही उत्सवाच्या वेळी फटाके फोडायची सुरुवात १४व्या शतकानंतर जगभर झाली. भारतातही ही लोकांना दीपवण्याची चैन राजेरजवाड्यांनी केली.
भारताची संस्कृती जी पाच ते सहा हजार किंवा त्याहीपेक्षा जास्त वर्षे जुनी आहे त्यात गेली सहाशे वर्षे चीनमधून आय़ात झालेली फटाका संस्कृती ही भारतीय संस्कृती आहे असे म्हणणारे नेहमीचेच यशस्वी ट्रोल आणि भक्त आहेत. अर्थात त्यांच्या अकलेची कीव किती करणार... दमलो ब्वा.
युरोपमधे जगाला लुटून दारूकामात पैसे जाळण्याचा काळ मोठा होता. सतराव्या शतकापासून चौदाव्या लुईच्या काळापासून या फटाका-कलेला बहर आलेला.
जेव्हा दारूकाम शक्य नव्हते तेव्हा नीरोसारखे राजे शहर जाळून आतषबाजी करत होते- त्यांचेच दिवाळखोर वंशज सारीकडे निपजत होते. आणि राजघराण्याच्या शक्तीचे प्रतीक असलेल्या किल्ल्यांवरून, प्रासादांवरून फटाके उडवले जात राहिले.
आज हे लिहिण्याचे कारण एवढेच की अनेक भारतीयांना दिवाळीत फटाके उडवणे हा खरोखरच आपल्या प्राचीन संस्कृतीचा भाग वाटू लागला आहे.
राम, कृष्ण, हर्षवर्धन, पुलकेशी, अशोक, चंद्रगुप्त सगळे दिवाळीत लवंग्या फोडत होते बर्र्का...
धूर काढत होते सगळे...
प्रदूषण वगैरेची काही पर्वा नव्हती हों त्यांना...
कानाखाली फटाके काढायला हवेत या मूर्खांच्या.
कुणीही चांगलं सांगितलं की त्याला शिव्या घालायच्या हा २०१४नंतरचा युगधर्म झाला आहे.
विराट कोहलीने फटाके उडवू नका सांगितले, केले ट्रोल. कर्नाटकात रुपा मुद्गल या आय़पीएस अधिकारी स्त्रीने फटाके हा भारतीय संस्कृतीचा मुळीच भाग नाही असे सांगितले तिलाही ट्रोल केले गेले. यात आपला फुसका बार कंगना राणौतही फुसकल्या. तेवढ्यात तिने रुपाच्या निवडीसंदर्भात आरक्षणावरही दुर्गंधी धूर सोडला.
सत्याला ट्रोल करणे, शिवसुंदराला ट्रोल करणे हीच या फाटक्या भगव्यांना भारताची संस्कृती वाटू लागली आहे...
त्यांचे अच्छे दिन आहेत.
बाकीच्यांच्या नाकातोंडात विषारी धूर धूर...
मरा...