परिवर्तनाचे शिलेदार प्राध्यापक डॉ.राम ताकवले : विजय गायकवाड
शिक्षण हे फक्त चार भिंतीमध्ये होऊ शकत नाही म्हणून दूर शिक्षण(Distance Education) हवे, बांधावरच्या शेतकऱ्याला माहिती तंत्रज्ञानाचा (IT in Agriculture) व्यासपीठ मिळायला पाहिजे असं आयुष्याच्या शेवटपर्यंत ठासून सांगणारेआंतरराष्ट्रीय कीर्तीचे शिक्षणतज्ञ, पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि इग्नू चे पहिले कुलगुरू भारतातल्या मुक्त शिक्षण प्रसारात सिंहाचा वाटा असणारे प्रा.डॉ.राम ताकवले यांचे वयाच्या 90 व्या वर्षी काल निधन झाले त्यांच्या कार्याचा आढावा घेतला आहे विजय गायकवाड यांनी...
X
शिक्षण हे फक्त चार भिंतीमध्ये होऊ शकत नाही म्हणून दूर शिक्षण(Distance Education) हवे, बांधावरच्या शेतकऱ्याला माहिती तंत्रज्ञानाचा (IT in Agriculture) व्यासपीठ मिळायला पाहिजे असं आयुष्याच्या शेवटपर्यंत ठासून सांगणारेआंतरराष्ट्रीय कीर्तीचे शिक्षणतज्ञ, पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि इग्नू चे पहिले कुलगुरू भारतातल्या मुक्त शिक्षण प्रसारात सिंहाचा वाटा असणारे प्रा.डॉ.राम ताकवले यांचे वयाच्या 90 व्या वर्षी काल निधन झाले त्यांच्या कार्याचा आढावा घेतला आहे विजय गायकवाड यांनी...
90 वर्षाचा या गृहस्थाने जेव्हा डोळे मिटले असतील त्याआधी किती काम करून ठेवलं याची गणती होणार नाही..
सुदैवाने पुण्यातील कृषी महाविद्यालयात असताना मला असंख्य किडे होते. एका बाजूला कृषी शिक्षण चालू होतं दुसऱ्या बाजूला फोटोग्राफीचा छंद, पुण्यामध्ये व्याख्यानं आणि भटकंती सोबत earn while learn म्हणून मला ज्या कृषी विस्तारामध्ये (agriculture extention) मध्ये करिअर करायचे होते त्या संधी शोधत होतो. प्रभाकर भोसले सरांचे बळीराजा शेती विषयक मासिक, गोडवा सनराईज.. त्याआधी येलो पेजेसच्या धर्तीवर राजेश उरकुडे Rajesh Urkude सरांसोबत केलेल्या ग्रीन पेजेस साठी काम असेल. प्रत्येक अनुभव हा जीवन समृद्ध करत होता.. एका टप्प्यावर माझी ओळख शिवराई टेक्नॉलॉजीशी Sanjay Borkar झाली.. या ठिकाणी शेतीविषयक सॉफ्टवेअर बनवायचे काम चालू होते. वर्ष 2002-03 असेल.
शेतकरी आत्महत्यांचा शेती इतिहासातील काळाकुट्ट अध्याय सुरू होण्यापूर्वीचा तो काळ होता. मागच्या आठवड्यात विनोद चंद Vinod Chand सर Max Maharashra ऑफिसला आले होते. ते 1983 पासून माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करतात. APTECH या संगणक प्रशिक्षण संस्थेच्या प्रमुख संस्थापक होते.
मी 1996-97 मध्ये संगणक शिकायला सुरुवात केली होती त्यावेळेस dos, Lotus-123, Tally असे बूट करून फ्लॉपॅटिक्स वाले कम्प्युटर वापरत होतो.
शिवराय टेक्निलॉजी सोबत परिवर्तन या प्रकल्पासाठी काम सुरू केले त्यावेळेस मायक्रोसॉफ्टने विंडोज लॉन्च केले होते. इंटरनेट त्यावेळेस फक्त डायलअप कनेक्शन वर उपलब्ध होते. पुण्यामध्ये त्यावेळी ताशी 30 रुपये ते दहा रुपये अशा दराने सायबर कॅफेंचा यांचा सुळसुळाट झाला होता. सांगायचं मुद्दा असा की शेतीसाठी सॉफ्टवेअर हा विषय कोणाच्या गिनतीमध्येही नव्हता त्यावेळेस आम्ही शेतीसाठी सॉफ्टवेअर बनवले होते.
त्यामध्ये एका एकर किंवा एका हेक्टर साठी किती बियाणे लागेल हे मोजणारे सीड कॅल्क्युलेटर.. पीक रोग आणि किडीचे लक्षण सांगून अचूकपणे पिकाला झालेला रोग ओळखणे आणि त्यावरील उपाय योजना सुचवणारे एक सॉफ्टवेअर डेव्हलप केले होते. सन्मित्र संगणक अभियंते Rajendra Chavan गमतीने मला म्हणायचं तू शेतीचा की आयटीचा? असू त्यानिमित्ताने अनेक मित्र मिळाले ते आजही संपर्कात आहेत. Harshad Khuspe Sachin Wani Surendra Agarwal स्मिता महाडिक Gayatri-Smita Gole
परिवर्तन नेटवर्कची त्यापुढ्याशी योजना होती की प्रत्येक तालुक्यामध्ये गावांमध्ये एक संगणक कनेक्शन असलेलं सेंटर उभारायचं त्या ठिकाणी शेतकरी आपली समस्या घेऊन येईल आणि एक तज्ञांच्या नेटवर्क मधून शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण होईल असा तो परिवर्तन प्रकल्प होता. राष्ट्रकुल संघ ( Commmonwelth) महाराष्ट्र ज्ञान विकास महामंडळ (MKCL) या प्रकल्पाचे सहभागीदार होते. संजय बोरकर आणि त्यांची टीम हात धुवून शेतीसाठी माहिती तंत्रज्ञान या विषयाच्या मागे लागले होते त्यातूनच आम्ही काही मल्टीमीडिया सीडी तयार केल्या होत्या. मी त्या ठिकाणी एग्रीकल्चर रिसर्च म्हणून जॉईन झालो होतो त्यामुळे स्क्रिप्ट तयार करायच्या रिसर्च करायचा आणि फिल्डवर जाऊन शूट करायचे त्यातूनच औषधी वनस्पती आंबा आणि दापोली कृषी विद्यापीठाची मल्टीमीडिया सीडी तयार केली होती. ERP नावाचे एक सॉफ्टवेअर त्यावेळेस निर्मितीच्या प्रक्रियेत होते.. पुढे काय झाले आता त्याचा ट्रॅक नाही..
हे सगळं आठवण्याचं कारण म्हणजे.. या वीस वर्षांपूर्वीच्या परिवर्तनवादी चळवळीमध्ये केंद्रस्थानी डॉ. राम ताकवले होते. ते पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू होते परंतु निवृत्त झाल्यानंतरही काम थांबत नसते असे सांगणारे अनेक मान्यवर त्यावेळेस समाजात होते त्यामुळे अगदी मरेपर्यंत काम सुरू ठेवायचं असा त्यांचा पॅटर्न होता. राष्ट्रकुल संघाच्या माध्यमातून ग्रामीण भागात शिक्षणासाठी सहज सोप्या पद्धतीने आधुनिक तंत्रज्ञान माहिती तंत्रज्ञानाच्या मदतीने टूल्स तयार करायची ती भारतासह आफ्रिकेसारख्या अविकसित देशांमध्ये वापरायची अशा फार मोठ्या प्रकल्पावर ते काम करत होते त्यातूनच शेती सॉफ्टवेअर ही संकल्पना देखील पुढे आली होती. अनेकदा भेटीचे संधी मिळाली सोबत काम करायला मिळाले.
ताकवले सर ज्येष्ठ शिक्षण तज्ञ आणि यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे पहिले कुलगुरू व राष्ट्रसेवा दल व समाजवादी विचारसरणीचे विचारवंत होते.मुक्त विद्यापीठाचे पहिले कुलगुरू, सोबतच पुणे विद्यापीठाचे कुलगुरू म्हणूनही त्यांनी कामकाज पाहिले होते. महाराष्ट्र ज्ञानमंडळाची स्थापना (एमकेसीएल)झाली त्यामध्ये संस्थापक संचालक म्हणून त्यांनी भूमिका बजावली होती. त्यांनी शिक्षकांसाठी बॅचलर ऑफ एज्युकेशन, मुक्त शिक्षण स्त्रोत निर्मिती आदी विविध प्रकारचे साहित्य लेखन केले होते.
दूर व मुक्त शिक्षणात त्यांचे भरीव काम होते. आंतरराष्ट्रीय पातळीवरील कॉमन वेल्थ ऑफ लर्निंग हा पुरस्कार त्यांना मिळाला होता. तसेच राष्ट्रीय स्तरावर देखील अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले होते.मुक्त विद्यापीठानंतर 1996 ते 1998 या काळात त्यांनी इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू पदाची जबाबदारी ही सांभाळली होती त्या ठिकाणी त्यांनी प्राध्यापकांना स्वातंत्र्य देऊन समाजाभिमुख शिक्षणक्रम साठी भरीव योगदान दिले होते.
शिवराय टेक्नॉलॉजीचे संजय बोरकर म्हणाले,
ताकवले सरांच्या बरोबर काम करायला मिळणे ही पर्वणी होती. शेती आणि माहिती तंत्रज्ञान या विषयात काम करण्याची ती सुरुवात होती. नेत्रा या संस्थेत परिवर्तन नेटवर्क या प्रकल्पात काम करताना आम्ही सरांच्या घरी असंख्य बैठका घेतल्या. सरांच्या संपर्कातून अतिशय मान्यवर संस्था आणि व्यक्ती यांच्या संपर्कात आलो. आयुष्यातला पहिला विमान प्रवास मी सरांबरोबर केला. भारावलेले दिवस होते ते. याला कारण होते ताकवले सरांची ऊर्जा, कामाप्रती आणि समाजाप्रती असणारी बांधिलकी, चिकाटी, धडपड. तरुण वयात असा झपाटलेला आणि कर्मयोगी माणूस गुरू आणि मार्गदर्शक म्हणून मिळणे यासारखे भाग्य नाही. नवीन तंत्रज्ञान शिकून त्याचा अवलंब करण्याची तीव्र इच्छेमुळे सरांनी निवृत्त झाल्यावर कॉम्प्युटर शिकण्याचा क्लास लावला आणि पुढे MKCL च्या Founder Director या नात्याने एक मोठी चळवळ निर्माण केली.
ज्यांच्यासोबत ५ वर्षे नेत्रा या संस्थेबरोबर काम करण्याची संधी मिळाली असे आमचे गुरू, मी पाहिलेले पहिले कर्मयोगी ताकवले सर यांना भावपूर्ण आदरांजली.
वैभव छाया Vaibhav Chhaya ज्याप्रमाणे सांगतो पोस्टट्रुथ कालावधीमध्ये खरंच खोटं चित्र उभं केलं जातं आज आजूबाजूला, बजरंग बळीचा नारा देऊन केरळ स्टोरी दाखवून जनमन प्रदूषित करण्याचं काम सुरू असताना पुरंदर तालुक्यातील हरगुड सारख्या ग्रामीण भागातून येऊन आकाशाएवढं काम करणाऱ्या अशा तळपणाऱ्या ज्ञान सूर्याचा अस्त झालाय..
ज्ञानाचा महामेरू, परिवर्तनाचा शिलेदार प्राध्यापक डॉ.राम ताकवले यांना विनम्र आदरांजली.
विजय गायकवाड
जय किसान
जय संविधान