Home > मॅक्स ब्लॉग्ज > हा माझा अवयव नव्हे!

हा माझा अवयव नव्हे!

आपण कधी असा विचार केलाय का की समजा आपला हात किंवा पाय आपल्या मनाविरूध्द वागतोय. तो अवयव आपला नाहीच असंच आपल्याला वाटत राहतं. कधीच झालं नसेल पण आपण काही लोकांसोबत असं घडताना मात्र नक्कीच पाहिलं असेल नाही का! कदाचित त्यावेळी ती भुताटकी वाटावी पण तसं नाहीये. मग हे नेमकं आहे तरी काय जाणून घेण्यासाठी वाचा डॉ. रूपेश पाटकर यांचा हा लेख....

हा माझा अवयव नव्हे!
X

आपण कधी असा विचार केलाय का की समजा आपला हात किंवा पाय आपल्या मनाविरूध्द वागतोय. तो अवयव आपला नाहीच असंच आपल्याला वाटत राहतं. कधीच झालं नसेल पण आपण काही लोकांसोबत असं घडताना मात्र नक्कीच पाहिलं असेल नाही का! कदाचित त्यावेळी ती भुताटकी वाटावी पण तसं नाहीये. मग हे नेमकं आहे तरी काय जाणून घेण्यासाठी वाचा डॉ. रूपेश पाटकर यांचा हा लेख....

खूप वर्षांपूर्वी, बहुतेक मी शाळेत असेन तेव्हा. एका आध्यात्मिक प्रवचनात मी ऐकलं होतं की देह म्हणजे तुम्ही नव्हे. देह हा नश्वर आहे. तुम्ही म्हणजे तुमचा आत्मा, जो अमर आहे. तुम्हाला तुमच्या देहापासून वेगळं होऊन विचार करता आला पाहिजे. देहापासून आपण वेगळे आहोत म्हणजे काय? तसा विचार करायचा म्हणजे काय करायचे? मी अशी एक कथादेखील वाचली होती की एका साधूला एक बाण लागला. त्याच्या शरीरात रुतलेला तो बाण काढू जावे तर त्याला खूप वेदना होई. काय करावे? कोणीतरी सांगितले की त्याने ध्यान लावले की तो इतका तल्लीन होतो की त्याला देहाचे भान उरत नाही, तेव्हा बाण काढावा. मी ध्यान करून पाहिले पण मला देहापासून दूर होण्याची अनुभूती येईना.

पुढे सायकीयॅट्रीमध्ये ज्युनियर रेसिडंट म्हणून जॉईन झालो तेव्हा कधीतरी 'एलियन हॅन्ड सिंड्रोम' हे शब्द ऐकले. हे शब्द ऐकले तरी ते नेमके काय हे सापडणे आजच्या इतके सोपे नव्हते. आज गूगल सर्च करून हवी ती माहिती मिळवता येते. पण तेव्हा कोणा सिनियरला विचारू जावे तर तोच उलट सांगे की तूच हे शोधून मला सांग. शेवटी एकदाचा त्याचा अर्थ काॅलेजची लायब्ररी धुंडाळल्यावर मिळाला. तो अर्थ वाचून तोपर्यंतच्या जीवनातला सर्वात मोठा धक्का बसला.





तुम्हीच विचार करा की समजा अचानक असे झाले की तुमचा डावा हात तुमचे ऐकायचे बंद झाला तर? आणि तो तुमच्या मनाला न जुमानता स्वतंत्रपणे कृती करू लागला तर? म्हणजे तुमचा उजवा हात तुमच्या शर्टाची बटणे लावतोय आणि डावा हात तुम्हाला न जुमानता बटणे काढतोय तर? किंवा तुमचा उजवा हात ड्राॅवर उघडतोय आणि डावा हात तुमच्या मनाचे न ऐकता तुम्हाला जणू त्रास देण्यासाठी ड्रावर बंद करतोय किंवा तुमच्याच डाव्या हाताने अचानक तुमच्या डाव्या कानशिलात लगावले तर? एलियन हॅन्ड सिंड्रोममध्ये चक्क असे घडते. तुमचा एक हात त्याला स्वतंत्र मन असल्यासारखा वागू लागतो. 'एलियन' या शब्दाचा अर्थ परका किंवा उपरा. वैद्यकीय वाङमयात या लक्षणांची नोंद सर्वात पहिल्यांदा 1908 मध्ये जर्मन डॉक्टर कर्ट गोल्डस्टाइन यांनी केलीय. हा आजार खूप दुर्मिळ आहे. पण असे मुळात घडते का? तुमचा एक हात जर त्याला तुमच्या मनाहून वेगळं मन असल्या सारखा वागत असेल तर हे भुताटकीसारखेच वाटेल. जणू आपल्या एका हातात अदृश्य शक्तीचा संचार झालाय. पण हे प्रकरण पूर्णपणे शारीरिक आहे. डॉ. गोल्डस्टाईन यांना जो पहिला पेशन्ट भेटला त्याला 'स्ट्रोक' आला होता. म्हणजे त्याच्या मेंदूची रक्तवाहिनी फुटून रक्तस्त्राव झाला होता. डोक्याला मार लागला किंवा मेंदूला गाठ आली (ट्यूमर) तरी ही लक्षणे दिसू शकतात.

फेपरे किवा इंग्रजीत ज्याला एपिलेप्सी म्हणतात, त्या आजारात पूर्वी एक उपचार मेंदूच्या डाव्या आणि उजव्या भागांना जोडणारा भाग ऑपरेशन करून कापून टाकीत. तेव्हा देखील अशा ऑपरेशन केलेल्या पेशंटात अशी लक्षणे दिसत. अशी लक्षणे असलेल्या पेशंटचा स्कॅन केला तरी त्याच्या मेंदूतील विरुद्ध बाजूचे मोटर काॅर्टेक्समध्ये वेगळेपण दिसते. म्हणजे समजा पेशन्टचा डावा हात विचित्र वागत असेल तर मेंदूच्या उजव्या भागातील शरीराच्या हालचाली नियंत्रित करणारा भाग वेगळा दिसतो. इथे ही गंमत लक्षात घेतली पाहिजे की मेंदूचा उजवा भाग शरीराच्या डाव्या भागाचे नियंत्रण करतो आणि डावा भाग शरीराच्या उजव्या भागाचे नियंत्रण करतो. यावर आधारित एक इंग्रजी सिनेमा आहे. त्यात असे लक्षण दाखवणारे एक पात्र आहे, डॉ. स्ट्रेंजलव्ह. त्यावरून या आजाराला डॉ. स्ट्रेंजलव्ह सिंड्रोम असेही एक नाव आहे.




या पेक्षा थोडी वेगळी केस डॉ. ऑलिव्हर सॅक्स यांनी सांगितली आहे. ती त्यांच्याच शब्दात सांगणे मला रोचक वाटते. अर्थातच त्याला मी केलेल्या अनुवादाची मर्यादा येईल.

डॉ. ऑलिव्हर लिहितात, "खूप वर्ष झाली या गोष्टीला. मी तेव्हा नुकताच न्यूराॅलाॅजी विभागात शिकावू डॉक्टर म्हणून रुजू झालो होतो. तो 31 डिसेंबरचा दिवस होता. सगळीकडे कार्निवल मूड होता आणि मी मात्र ड्यूटीवर होतो. फार वैताग आला होता. फारसे काम नव्हते त्यादिवशी. अ‍ॅडमिशन देखील मोजक्याच झाल्या होत्या. मी होस्टेलमधल्या माझ्या रूममध्ये काहीतरी वाचत पडलो होतो. थोड्या वेळाने मी संध्याकाळच्या राऊंडसाठी वॉर्डात जाणार होतो. इतक्यात फोन खणाणला. मी फोन उचलला. वॉर्डमधली नर्स बोलत होती, 'डॉक्टर, आज सकाळी एका तरुण मुलाला अ‍ॅडमिट करण्यात आलय. तो वॉर्डात अ‍ॅडमिट व्हायला आला तेव्हा एकदम ठीक वाटत होता. दिवसभर देखील तो ठीक होता. दुपारी जेवल्यानंतर तो शांतपणे झोपलादेखील, पण काही मिनिटांपूर्वी झोपून उठल्यापासून तो विचित्र वागतोय. तो अंथरूणातून बाहेर पडलाय आणि आता जमिनीवर बसलाय. त्याला काॅटवर बस म्हटलं तर आपल्या अंथरूणात जायला तो तयार होत नाहीये. तुम्ही येऊन त्याला समजवा.'

मी लगबगीने वॉर्डात गेलो. तो अजूनही त्याच्या काॅटवर गेला नव्हता. जमिनीवर बसुन तो आपल्या डाव्या पायाकडे टक लावून पहात होता. त्याच्या चेहर्‍यावर राग, भय आणि संभ्रमाचे भाव एकाचवेळी दाटले होते.

'तुम्ही प्लीज तुमच्या कॉटवर चला ना,' मी हसत म्हणालो. माझ्या बोलण्यामुळे तो अपसेट झाल्याचे मला जाणवले.

'काय झालं? तुम्हाला काही मदत हवीय का?' मी त्याच्या शेजारी उकीडवं बसत विचारलं.

'मी आज तुमच्या हॉस्पिटलला काही तपासण्या करून घ्यायला आलो तर तुमचे न्यूराॅलाॅजीस्ट म्हणाले की तुझा डावा पाय मंद वाटतो. हो, माझा डावा पाय लेझी झालाय असेच ते म्हणाले,' तो म्हणाला.

'हं' मी मान हलवली.

'इथं आल्यापासून दिवसभरात काहीच त्रास नव्हता.'

'मग?'

'दुपारी माझा डोळा लागला. मी उठलो तेव्हा छान फ्रेश वाटलं. पण मी जरा कुशीवर वळलो तर माझ्या लक्षात आलं की माझ्या अंथरुणात कोणा दुसर्‍याचा पाय आहे. फक्तं पाय. तोडलेला मानवी पाय. शी, किती किळसवाणी गोष्ट.'

'.....'

'मी काळजीपूर्वक बघितलं. तो पायच होता. मी हात लावून बघितलं. एकदम थंड आणि विचित्र.'

पुन्हा एकदा त्याच्या चेहर्‍यावरचे भय आणि किळस वाटल्याचे भाव गडद झाले. थोडे थांबून अचानक काही सुचल्यासारखे तो म्हणाला,'ओ हो. ही तर कोणीतरी माझी चेष्टा केलेली दिसतेय. अयोग्य असली तरी अगदी अस्सल चेष्टा!' त्याच्या चेहर्‍यावरचे भयाचे भाव थोडे कमी झालेले मला जाणवले.

मला या सगळ्याची संगतीच लागत नव्हती.





'ओ डाॅक, तुम्ही मंडळी भारीच दिसता बुवा. थर्टी फर्स्ट सेलिब्रेट करण्यासाठी पेशन्टची अशी चेष्टा करता.'

मी माझ्यासमोर उभ्या असलेल्या नर्सकडे पाहिले. तीदेखील माझ्याइतकीच आश्चर्याने पहात होती.

'कम ऑन डाॅक. आय विल टेल यू, वाॅट युवर स्टाफ मस्ट हॅव डन.'

तो सांगू लागला, 'तुम्ही डॉक्टरकी शिकताना प्रेताचे डिसेक्शन करता ना. त्या डिसेक्शन रूममधून तुमच्या कोणा नर्सने प्रेताचा पाय कापून आणला असणार आणि मी झोपलो तेव्हा गुपचूप माझ्या अंथरुणात ठेवला असणार, बरोबर ना?'

त्याच्या या स्पष्टीकरणाचा आता आम्हालाच धक्का बसला.

पण लगेचच त्याच्या चेहर्‍यावर पुन्हा संभ्रमाचे भाव डोकावले. तो म्हणाला, 'मी दोन्ही हातांनी गच्च पकडून ती घाणेरडी गोष्ट अंथरुणाबाहेर फेकली तर का कोण जाणे मीसुद्धा कॉटवरुन खाली पडलो. आणि आता तर तो पाय मलाच चिकटून बसलाय.' पुन्हा पाहिल्यासारखेच किळस आणि भीतीचे भाव त्याच्या चेहर्‍यावर आले.

'डॉक्टर, तुम्ही अशी अंगावर काटा आणणारी भयानक गोष्ट कधी बघितली होती का? मला वाटलं, हा पाय मेलेला आहे. तो पाय मला चिकटल्यासारखा वाटतोय.'

माझ्या पुढ्यात पुन्हा एकदा त्याने स्वतःचा डावा पाय आपल्या दोन्ही हातांनी गच्च पकडला आणि मोठ्या नेटाने शरीरापासून दूर करण्याचा प्रयत्न केला. 'डॅम इट' म्हणत त्याने आपल्या डाव्या पायावरच ठोसा लगावला.

'रिलॅक्स, शांत हो. सबुरीने घे. असा ठोसा मारू नकोस,' मी म्हणालो.

'का नको?' त्याने चिडून विचारले.

'कारण तो तुझाच पाय आहे. तुला तुझाच पाय ओळखता येत नाही का?' मी विचारले.

तो माझ्याकडे रोखून पाहू लागला. त्याच्या डोळ्यात आता अविश्वास आणि भय दाटले होते. मी कुठेतरी त्याची चेष्टा करतोय असा संशय देखील त्याला वाटत असावा.

'ओ डाॅक, तुम्ही तर मला शेंडी लावताय. तुम्ही त्या नर्सला सामील आहात. पेशन्टची अशी जीवघेणी चेष्टा करणं तुम्हाला शोभतं का?'

'मी चेष्टा केलेली नाहिये. तो तुमचाच पाय आहे,' मी म्हणालो.

त्याने माझ्या चेहर्‍याकडे पाहिले. मी गंभीर आहे हे त्याला जाणवले आणि त्याची भीती आणखी गडद झाली.

'डॉक्टर, तुम्ही म्हणता की हा माझा पाय आहे? पण माणसाला त्याचा स्वतःचा पाय कळत नाही असं की काय तुम्हाला म्हणायचंय?' त्याने विचारले.

'छे छे. माणसाला त्याचा पाय कळायलाच पाहिजे. मी कल्पनाच करू शकत नाही की माणसाला त्याचा स्वतःचा पाय जाणवत नाही. कदाचित तुम्हीच मघापासून आमची सर्वांची चेष्टा करत असाल,' मी म्हणालो.

'देवाशप्पथ, मी चेष्टा करत नाहिये डॉक्टर,' तो काकुळतीला येऊन म्हणाला. 'माणसाला त्याचं शरीर ठाऊक असतं. आपल्या शरीराचा भाग कोणता आणि कोणता नाही हे सहज कळतं, नाही का? पण हा पाय... खरा वाटत नाही हो. तो माझा असल्याचं वाटत नाही हो. माझा नाही हो तो...'

'तुझा असल्यासारखा वाटत नाही तर काय वाटतं? कशासारखा असल्यासारखा वाटतो?' मी विचारले.

'कशासारखा असल्यासारखा वाटतो?' माझेच हे शब्द मंद आवाजात त्याने पुन्हा उच्चारले.

काही क्षण थांबून तो म्हणाला, 'हा पाय जगातल्या कोणत्याच गोष्टीसारखा वाटत नाही. अशी विचित्र गोष्ट माझी कशी असेल? मला नाही माहित ती कुठून आली...'

तो खूपच घाबरलेला दिसत होता.

'ऐका, मला वाटतं तुमची तब्येत ठीक नाहिये. प्लीज, आम्हाला तुम्हाला तुमच्या कॉटवर नेऊ दे. पण मला तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारायचा आहे- जर हा तुमचा डावा पाय नाही तर तुमचा डावा पाय आहे कुठे?'

माझ्या प्रश्नावर तो आणखी भांबावला.

'मला ठाऊक नाही. मला खरंच ठाऊक नाही. तो गायब झाला. तो गेला. कुठेच सापडत नाहीये....' बोलता बोलता तो रडकुंडीला आला."

डॉ. ऑलिव्हरनी जेव्हा ही केस प्रकाशित केली तेव्हा त्यांना डॉ. मायकल क्रेमर या सुप्रसिद्ध न्यूराॅलाॅजीस्टचे पत्र आले. त्यात त्यांनी अशाच तर्‍हेची लक्षणे दाखवणारा पेशन्ट पाहिल्याचे लिहिले. डॉ. क्रेमरनी पाहिलेला पेशन्ट कार्डीओलाॅजी विभागात अ‍ॅडमिट करण्यात आला होता. त्याच्या रक्तात गाठ होऊन ती मेंदूच्या शीरेत अडकली होती व त्यामुळे त्याला अर्धांगवायू झाला होता. आणि तो रात्रीच्यावेळी वारंवार अंथरुणातून बाहेर पडत होता. जेव्हा डॉक्टर क्रेमर त्याच्याशी बोलले तेव्हा त्याला त्याचे अर्धांगवायू झालेला भाग स्वतःचा वाटत नव्हता.

या सगळ्याचा अभ्यास केल्यावर माझं मन अक्षरशः अचंबित झालं. 'माझं' हे माझं वाटण्यासाठी सुद्धा मेंदूत काही भाग असतो. काहींना हा भाग थोडा जास्त असावा, त्यामुळे दुसर्‍याचे देखील आपले वाटते. यासाठी देखील मेंदूत दोन वेगवेगळे भाग असावेत. एक भाग अख्खी दुनिया स्वतःच्या उपभोगाची प्राॅपर्टी आहे असे समजणारा असावा आणि दुसरा भाग दुसर्‍याच्या वेदनेने स्वतः कळवळणारा असावा.

......

डॉ. रुपेश पाटकर

Updated : 21 Aug 2022 11:07 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top