Home > मॅक्स ब्लॉग्ज > कसा बनला भारताचा तिरंगी ध्वज?

कसा बनला भारताचा तिरंगी ध्वज?

भारताच्या पाच तिरंगी ध्वजाबद्दल तुम्हाला माहिती आहे का? भारताचे पाच तिरंगी ध्वज नेमके कधी होते? त्यात कसे बदल झाले आणि अखेर भारताचा आता असलेला तिरंगी ध्वज कसा तयार झाला? याविषयी जाणून घेण्यासाठी वाचा रेणू भालेकर यांचा रिपोर्ट.....

कसा बनला भारताचा तिरंगी ध्वज?
X

खरं पाहिलं तर भारताचा पहिला तिरंगा ध्वज तयार करण्यात आला तो 1906 मध्ये....

तारीख होती 7 ऑगस्ट 1906. या दिवशी कलकत्त्याच्या पारसी बागान स्क्वेअरमध्ये भारताचा पहिला तिरंगी ध्वज फडकाविण्यात आला. या तिरंगी ध्वजात लाल, पिवळा आणि हिरवा असे तीन रंगाचे पट्टे होते. तसेच मध्यभागी वंदे मातरम् असे शब्द लिहीले होते. त्याबरोबरच लाल पट्ट्यावर चंद्र-सूर्य तर हिरव्या पट्ट्यावर 8 कमळाची फुलं असा हा झेंडा होता.

दुसरा तिरंगा ध्वज 1907 मध्ये फडकविण्यात आला. हा ध्वज मादाम भिकाजी कामा यांनी जर्मनीमध्ये फडकिवला. मादाम कामा यांनी जर्मनीच्या स्टुटगार्डमध्ये 19007 मध्ये आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषदेत भारताचा दुसरा तिरंगा ध्वज फडकाविला. त्या भारताबाहेर राहून भारतातील ब्रिटीश राजवटींविरोधात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांपैकी एक होत्या. त्यांनी फक्त 1907 मध्येच नाही तर 1936 साली त्या भारतात परत आल्या तेव्हा त्यांनी हा ध्वज भारतात आणला. या झेंड्याचा वरचा पट्टा हिरवा, मधला पट्टा पिवळा तर खालचा पट्टा केशरी होता.

केशरी पट्ट्यावर चंद्र आणि सूर्य होते, तर हिरव्या पट्टयावर 8 तारे होते. जे भारताच्या तेव्हाच्या आठ प्रांतांचं प्रतीक मानले जात. पहिल्या ध्वजाप्रमाणेच मधल्या पट्ट्यावरही 'वंदे मातरं' ही अक्षरं होती.

हे दोन तिरंगी ध्वज पाहिल्यानंतर आपण पाहूयात तिसरा तिरंगी ध्वज जो 1917 साली लोकमान्य टिळक आणि डॉ. अॅनी बेझंट यांनी सुरू केलेली होमरुल चळवळीत फडकाविला. या झेंड्यावरचे रंग आणि पट्टे काहीसे बदलले होते. या झेंड्यावर पाच लाल आणि चार हिरवे पट्टे एका आड एक या पद्धतीने होते.

यापूर्वीच्या झेंड्यांप्रमाणे यावर कमळं नव्हती, उलट यावर 7 तारे होते, हे सात तारे आकाशात दिसणाऱ्या सप्तर्षींच्या आकृतीप्रमाणेच झेंड्यावरही काढले होते.

लोकमान्य टिळक आणि एनी बेझंट यांनी होमरुल चळवळीमध्ये फडकविलेल्या ध्वजानंतर चौथा तिरंगी ध्वज 1921 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या विजयवाडा अधिवेशनादरम्यान फडकाविण्यात आला. हा तिरंगी ध्वज पिंगली व्यंकय्या यांनी तयार केला होता. पिंगली व्यंकय्या हे दक्षिण आफ्रिकेत लष्करात असताना त्यांची आणि गांधीजी यांची भेट झाली होती. त्यानंतर हे महात्मा गांधी यांच्या विचाराने प्रभावित झाले. त्यामुळे ते भारतात आल्यानंतर काँग्रेसचे कार्यकर्ते बनले. त्यांनी तयार केलेल्या झेंड्यात लाल आणि हिरवे असे दोन रंगाचे पट्टे होते. हे दोन पट्टे हिंदू आणि मुस्लिम धर्माचं प्रतिक म्हणून वापरण्यात आलं होतं. मात्र महात्मा गांधी यांनी इतर धर्मांचं प्रतिनिधित्व असावं म्हणून त्यात पांढऱ्या रंगाचा पट्टा समाविष्ट करायला सांगितला. त्यानंतर देशाची प्रगती दाखविण्यासाठी त्यामध्ये चरख्याचं चिन्हही समाविष्ट करण्यात आलं. मात्र हा झेंडा फडकाविण्यात आला तो म्हणजे 1923 च्या मे महिन्यात नागपूरमध्ये ब्रिटीश सत्तेविरोधात शांततामय मोर्चे निघाले तेव्हा...

यावेळी हजारो मोर्चेकरी हाच तिरंगी झेंडा घेऊन चालत होते. यावेळी शेकडो निदर्शकांना अटक केली गेली होती.

हा स्वातंत्र्यलढा असाच सुरु होता. तेव्हा भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचं नेतृत्व पूर्णपणे काँग्रेसकडे होतं. 1929 साली काँग्रेसच्या लाहोर अधिवेशनात 'पूर्ण स्वराज'चा ठराव संमत झाला होता. त्याच अधिवेशनानंतर 1931 साली आज आपण पाहत असलेल्या झेंड्यात असलेली रंगांची रचना अस्तित्वात आली.

काँग्रेस पक्षाने केशरी, पांढरा आणि हिरवे पट्टे असलेला आणि त्यावर मध्यभागी चरखा असलेला झेंडा एक ठराव संमत करून स्वीकारला. हाच काँग्रेस पक्षाचाही झेंडा होता.

आतापर्यंत झेंड्यातील रंगांकडे विविध धर्मांचं आणि गटांचं प्रतीक म्हणून पाहिलं जात होतं.पण या ठरावाने या रंगांचा धर्मांशी असलेला अर्थ काढून टाकला.

अखेर पाचवा तिरंगी ध्वज अस्तित्वात आला तो 1947 मध्ये...

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर घटना समिती स्वतंत्र भारताच्या कारभारासाठीचा व्यापक आराखडा तयार करत होती. स्वतंत्र भारताचा झेंडा कसा असावा हा प्रश्नही घटना समितीत चर्चेला आला होता. 1931 साली स्वीकृत झालेला झेंडा या समितीने फक्त एक बदल करून स्वीकारला. चरख्याच्या जागी सारनाथच्या अशोकस्तंभावर असलेलं धर्मचक्र आलं.

परदेशांत भारताच्या स्वातंत्र्याची मागणी करताना, भारतात ब्रिटिशांविरोधात आवाज उठवताना आणि प्रत्यक्षात 15 ऑगस्ट 1947 ला दिल्लीच्या लाल किल्ल्यावर भारताच्या स्वातंत्र्याची ग्वाही देताना भारतीयांनी झेंडा अभिमानाने फडकवला.

पण 26 जानेवारी 2002 ला भारताच्या ध्वज संहितेत बदल करून सर्व नागरिकांना आपल्या घरांवर, कार्यालयांवर किंवा कारखान्यांवर वर्षाच्या कुठल्याही दिवशी झेंडा फडकवण्याची परवानगी देण्यात आली. त्यानंतर झेंड्याचा अवमान होऊ नये, एवढीच अट झेंडा फडकाविण्यासाठी ठेवण्यात आली. तर आता स्वातंत्र्यदिनाच्या निमीत्ताने सलग तीन दिवस राष्ट्रध्वज फडकाविण्यात यावा यासाठी हर घर तिरंगा या अभियानाची पंतप्रधान मोदी यांनी घोषणा केली आहे.

Updated : 14 Aug 2023 3:10 PM GMT
Next Story
Share it
Top