तरुणाईची कमाल: श्रमदानातून दुष्काळमुक्त केलं 'किरकसाल' गाव
नोकरीसाठी बऱ्याचदा गावातले तरुण शहरी भागाकडे स्थलांतर करत असतात... मात्र माणदेशातील किरकसाल गावातल्या तरुणांनी शहरीभागाकडे न जाता गावाला दुष्काळमुक्त करण्याचं ध्येय उराशी बाळगलं आणि समाजापुढे एका आदर्श गावाची निर्मिती केली. डोंगरी भागात असलेलं किरकसाल गावातील पाण्याचीटंचाई पाहता तरुणांनी शाश्वत पद्धतीने गाव दुष्काळमुक्त करण्याचा निर्धार केला... एकंदरित श्रमदानातून तरुणांनी कशी केली दुष्काळावर मात? जाणून घेण्यासाठी वाचा डॉ. सोमिनाथ घोळवे यांचा महत्त्वपूर्ण लेख....
X
सातारा जिल्हा "शुगर बेल्ट" मधील जिल्हा म्हणून ओळखला जात असला तरी खटाव-माण तालुके अतिशय कमी पर्जन्यमान असलेली आहेत. सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांमधील दुष्काळी तालुक्यांना माणदेश म्हटले जाते. या माणदेशातील किरकसाल (ता. माण) या गावातील गावकऱ्यांनी लोकसहभाग, लोकजागृती, श्रमदानाच्या या त्रिसूत्रीच्या माध्यमातून दुष्काळाला पराभूत करण्याचा यशस्वी आगळावेगळा लढा दिला. हा लढा माणदेशातील गावांना आदर्श आणि मार्गदर्शक ठरलेला आहे. या लेखात या गावाने श्रमदानातून दुष्काळावर कशी मात केली आहे याचा आढावा घेतला आहे.
गावचे एकूण क्षेत्रफळ 1802 हेक्टर यापैकी 650 हेक्टर वन विभागाकडे, 859 हेक्टर खरीप वहीती क्षेत्र, 604 हेक्टर रब्बी क्षेत्र, 293 हेक्टर पडीत क्षेत्र, 2011 च्या जनगणनेनुसार लोकसंख्या 1476, कुटुंबसंख्या 993, कष्टकऱ्यांचे प्रणाम 48.78 टक्के, त्यात शेतकरी 70.97 टक्के, शेतमजूर 25.69 टक्के, सीमांत कामगार 3.34 टक्के, केवळ 398 मिलीमीटर सरासरी पर्जन्यमान, 90 टक्के क्षेत्रफळ कोरडवाहू, गावाची अर्थव्यवस्था पूर्णपणे शेतीवर अवलंबून. गावात सामाजिक अंगाने डोकावले असता, 75 टक्के मराठा समाज, याशिवाय गुरव, चर्मकार, नवबौद्ध, मातंग, धनगर, रामोशी या सर्व समाजाची प्रत्येकी चार-दोन घरे. मात्र गावातील वैशिष्ट्य असे की, प्रत्येक समाजाकडे शेती. त्यामुळे शेती हा घटक व्यवसाय आणि उपजीविकेचा साधन राहिलेला आहे. अशा स्वरूपाची वैशिष्टे असलेले किरकसाल हे गाव आहे.
माणदेशातील परिसरात उरमोडी प्रकल्पाचे पाणी काही गावांना कॅनॉलद्वारे आले. त्यामुळे किंचित बागायती क्षेत्र वाढले. पण अनेक गावे या कॅनॉलच्या पाण्यापासून वंचित राहिली. त्यापैकी किरकसाल एक. गावकऱ्यांना शेती शिवाय इतर काहीच पर्याय नाही. इतर व्यवसाय करायचा म्हटले तर सोयी, सुविधा नाहीत. परंपरागत गावकरी अतिशय कोंडमाऱ्यांच्या स्वरूपात जीवन जगत होते. शेतीशिवाय इतर कोणताही उद्योग-धंदा, व्यवसाय करायचा म्हटले तर शहरी भागात स्थलांतर करावे लागत असे.
गावाच्या ग्रामपंचायतमध्ये परंपरागत दोन गट. मात्र गेल्या २५ ते ३० वर्ष एकाच गटाकडे गावची सत्ता राहिलेली. 2016 मध्ये झालेल्या निवडणुकीत प्रथमच तरूणाई राजकारणात आली. त्यात पुढाकार घेतला तो अमोल काटकर यांनी. उच्च शिक्षण (सिव्हिल इंजिनियर) असूनही नोकरी न स्वीकारता, गावाला पूर्ण वेळ देण्याचे व्रत अंगी घेऊन 2012 पासून राजकारणात उतरले. त्याचा प्रभाव गावकऱ्यांवर झाला. परिणामी दोन गट अमोल काटकर यांच्या नेतृत्वाखाली एक झाले. गावात प्रथमच गेल्या 35 ते 40 वर्षात एकोपा झाल्याचे पाहण्यास मिळाले.
गावाची जलसंधारणाची वाटचाल : -
किरकसाल हे गाव दुष्काळी आणि कमी पर्जन्यमान असलेल्या परिसरातील असल्याने पाण्याची परिस्थिती खूपच भयावह होती. गावाच्या शिवारात जलसंधारणाची कामे नसल्याने जास्त पाऊस झाला, तरी दुष्काळी स्थिती राहत होती. ऑक्टोबर महिन्यापासूनच गावाला पाण्याची टंचाई सुरू होत असे. गावात केवळ दोन बंधारे झालेले, तेही पाणी साठवण करतील अशा स्थितीत नव्हते. किरकसाल गावाचा भौगोलिक शिवार हा खूपच उंचीवर आणि डोंगराळ असल्याने पावसाचे पडलेले पाणी पूर्ण वाहून जात होते. शेतकऱ्यांकडून केवळ खरीप पिके पाऊस चांगला झाला तर घेतले जात होते. गावकऱ्यांच्या मतानुसार जानेवारी महिना सुरू झाला की, महिलांच्या डोक्यावर पाण्यासाठी हंडा-घागरी येत असतं. पाण्याची शोध ऐवढ्या प्रमाणावर चालू राहत असे की पूर्ण दिवस वाया जात असे. जानेवारी ते जून हा कालावधी केवळ पाणी मिळवण्यासाठी गावकऱ्यांचा वाया जात होता. 2015-16 मध्ये गावात टँकर चालू होईपर्यंत पाण्यासाठी गावकऱ्यांनी खूप हाल सोसले. मात्र टँकर चालू झाल्यानंतरही टँकरची वाट पाहण्यात गावकऱ्यांचा दिवस वाया जाऊ लागला. त्यामुळे पाण्याअभावी गाव सोडावे का? हा विचार गावातील प्रत्येकांच्या मनामध्ये येत असे. असे किती दिवस चालणार हा प्रश्न गावकऱ्यांना पडला होता. त्याच काळात गावातील तरुणांमध्ये गावातील पाणी समस्या सोडवण्यासाठी काहीतरी करावयाचे हा विचार येऊ लागला. याच विचाराने काही तरुण एकत्र येत गट तयार केला.
या गटाचे नेतृत्व उच्च शिक्षित अमोल काटकर यांच्याकडे देण्यात आले. या गटाने प्रथम राळेगणसिद्धी, हिवरे बाजार, निढळ, लोढवडे या दुष्काळावर मात केलेल्या गावांना भेटी दिल्या. तेथील जलसंधारणाच्या कामाचा इतिहास-वारसा समजून घेतला. या गावांना भेटी दिल्यानंतर पुढाकार घेणारे सरपंच अमोल काटकर सांगतात, किरकसाल या गावामध्ये कामे कशी करता येतील आणि ती यशस्वी कशी होतील याचा विचार तरुणांमध्ये प्रथम करण्यात येऊ लागला. यासंदर्भात गावाच्या पारावर बैठका घेत असू. पुढे सांगतात खुल्या बैठका, चर्चा, विचार-विनिमय होत असे, पण या सर्वाचा शेवट गावातील सर्वांनी श्रमदान केले, तरच गावात पाणीसाठे उपलब्ध होतील या मुद्यावर होत असे.
किरकसाल गावचे वैशिष्ट्ये असे की माणदेश परिसरात सर्वात उंचीवरील गाव. त्यामुळे पाणी स्त्रोत कोणत्याही प्रकारे बाहेरून येणार नाही, याची गावकऱ्यांना जाणीव असलेली. जरी उंचीवर पाणी आणावयाचे ठरवले तर ते शेतकऱ्यांना परवडणारे नाही. त्यामुळे आपले हक्काचे (पावसाचे) पाणी आपणच का थांबवायचे नाही? हा सकारात्मक विचार गावकऱ्यांनी एकत्र येत केला. या पूर्वी असा विचार कधीही करण्यात आला नव्हता. 2012 साली, गावातील तरुणांनी एकत्र येत पोपटराव पवार (आदर्श गाव हिवरे बाजार), अविनाश पोळ (श्रमदानाचा मंत्र), माजी सचिव प्रभाकर देशमुख (लोधवडे गाव दुष्काळमुक्त), माजी आयुक्त चंद्रकांत दळवी (निढळ गाव पाणीदार केले) यांचे जलसंधारणाच्या संदर्भातील मार्गदर्शन घेतले. हीच जलसंधारणाच्या कामांची सुरुवात गावकऱ्यांकडून मानण्यात येते. त्यानंतर याच तरुणांनी गावामध्ये जलसंधारणाच्या कामांविषयी प्रबोधन, जागृती, जलसाक्षरता, पाणीसाठे निर्मीतीची आवश्यकता इत्यादी कामे करण्यास सुरुवात केली. जलयुक्त शिवार अभियान या योजनेत 2016 -17 साली गावाची निवड झाल्यानंतर, गावकऱ्यांनी संबधित प्रशासकीय कर्मचाऱ्यांच्या संयुक्त विचाराने आणि मदतीने कामांचे नियोजन आणि आराखडा तयार करावयाचे नियोजन केले. त्यासाठी पाणी तज्ज्ञांचे आणि गावातील जाणकारांचे मार्गदर्शन घेण्यात आले. सर्व गावकऱ्यांनी शिवारफेरी करून शास्त्रीय आधारावर आराखडा तयार केला. त्यास ग्रामसभेत खुली चर्चा करून मान्यता घेतली.
श्रमदानाची सुरुवात सरपंच यांनी स्वतःपासून केली. प्रथम 25 ते 30 तरुणांनी एकत्र घेत एप्रिल महिन्यातील (२०१६ साली) चार रविवारी शिवारातच, गावापासून दूर गावशिवावर (5 कि.मी अंतरावर) श्रमदान केले. मात्र गावकऱ्यांचा या तरुणांच्या श्रमदानाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक झाला नाही. पण शांत राहतील ते तरुण कसले, तरुणांनी पुढील श्रमदानासाठी गावातील स्वच्छतेचे काम हाती घेतले. मात्र ग्राम स्वच्छतेच्या कामाचा परिणाम गावकऱ्यांवर झाला. गावकरी तरुणांबरोबर श्रमदान करण्यास येऊ लागले. त्याचवेळी गावातील गुटखा, मावा, दारू यावर बंदी आणली. त्यानंतर गावाच्या शिवारात पाणी पातळी कमी करणाऱ्या बोअरवेलवर बंदी आणण्यात आली. ही बंदी 100 टक्के यशस्वी केली. चराई बंदी 90 टक्के, कुऱ्हाड बंदी 90 टक्के यशस्वी केली. अशा विधायक कामांमुळे गावकऱ्यांचा तरुणांवरील विश्वास वाढला.
''पाणी फाऊडेंशनच्या "वॉटर कप" स्पर्धेत सहभागी होऊन पाहिले बक्षीस मिळवून गावातील हनुमान मंदिर बांधायचे'' या भुकिकेतून श्रमदान करण्यासाठी गावकऱ्यांना प्रेरणा मिळाली. वॉटर कप स्पर्धेत गावकऱ्यांनी 2018 साली सहभाग घेतला. मात्र 10 लाखाचे उत्तेजनार्थ बक्षिस मिळाले. पण श्रमदानातून केलेल्या कामाचे महत्त्व पाणीसाठे निर्मितीनंतर गावकऱ्यांच्या लक्षात आले. स्पर्धेपेक्षा श्रमदानाचे मूल्य कितीतरी पट्टीने अधिक असल्याची जाणीव गावकऱ्यांना होती. गावकरी म्हणतात वॉटर कप स्पर्धा श्रमदानासाठी निमित्त होते. श्रमदानाची संकल्पना मांडून स्वतः पुढाकार घेतला तो सरपंच आणि त्यांचे सहकारी तरुणांनी. श्रमदानासाठी गावकऱ्यांना तयार करणे खूप जिकरीचे काम होते. सकाळी 8 ते 12 ही श्रमदानाची वेळ. सुनील काटकर यांच्या मते, सकाळी 8 वाजता सर्वजण श्रमदानाचा ठिकाणी हजर राहून काम करत होते, गाव श्रमदान करत आहे हे गावाबाहेर गेलेले व्यापारी, नोकरदार, बिगारी काम करणारे मजूर, शिक्षणासाठी गेलेले विद्यार्थी यांना कळल्यानंतर या सर्वांनी परत गावामध्ये येऊन श्रमदानाच्या कालावधीत श्रमदान केले.
श्रमदानात कामाचे आणि जबाबदारीची विभागणी करण्यात आली होती. कामाचे मूल्य कमी-जास्त नाही ही भावना गावकऱ्यांच्या मनात रुजवली. शिवाय हस्तक्षेप होणार नाही ही खबरदारी घेतली गेली. शालेय विद्यार्थ्यांची देखील मदत घेण्यात आली. ती म्हणजे कामाच्या ठिकाणी मार्गदर्शन, प्रबोधन, जागृतीसाठी. विद्यार्थ्यांनी गावाच्या शिवाराला भूगोलाची प्रयोगशाळा बनवली. शालेय विद्यार्थी गावकऱ्यांना पाणी साक्षरतेचे प्रयोगाचे प्रात्यक्षित श्रमदानाच्या ठिकाणी करून दाखवू लागले. परिणामी पाणीसाठे निर्मितीची गोडी गावकऱ्यांना लागली. दररोज 800 ते 900 गावकरी श्रमदान करत होते. श्रमदानाचे वैशिष्टे असे की श्रमदानात महिलांचा पुढाकार मोठ्या संख्येने होता.
उद्धव काटकर यांच्या मते, पाणीटंचाईची झळ प्रामुख्याने महिलांना बसत असल्याने गावातील महिलांनी पुढाकार घेवून पुरुषांनाही श्रमदान करण्यास प्रवृत्त केले. उन्हाळ्यातील ४५ दिवसांत महिला घरी न थांबता, आजारी न पडता, माहेरी न जाता, श्रमदान करत होत्या. अर्थात महिलांचा पुढाकार महत्त्वपूर्ण ठरला. प्रत्येकाच्या हातात पाटी, घमेले, खोरे, कुदळ, फावडे असे साहित्य श्रमदानाचा वेळी दिसून येत असे. श्रमदानाच्या ठिकाणी चहा-नाष्टा याची सोय करण्यात आली होती. श्रमदान केलेल्या कामासाठी शासकीय अंदाजानुसार अडीच ते तीन कोटी रुपये खर्च आला असता. गावातील दत्तोबा गुरव सांगतात, 14 वर्षावरील सर्वच गावकऱ्यांनी श्रमदान केले आहे. गावात श्रमदानाचे तुफान २०१६ ते २०१९ या चार वर्षाच्या दरम्यान पाहण्यास मिळाले.
केलेली कामे:
गावचे क्षेत्रफळ 1802 हेक्टर आहे. यापैकी जवळजवळ 1750 हेक्टरवर बांध बंदिस्ती करण्यात आली आहे. डीप सीसीटी, बंधारे, अनघड दगडी बांध, पाझर तलावातील गाळ काढणे, गावशेजारील नाला आणि त्या नाल्यावरील उपनाल्या यांचे रुंदीकरण-खोलीकरण-सरळीकर केले. पाझर तलावातील सांडवा दुरुस्ती, पाझर तलावाचे लिंकेज काढणे, शेततळी, विहीर पुनर्भरण, ठिबक सिंचन, तुषार सिंचन, गावात शोषखड्डे तयार करणे, चर खोदणे, नाला बांध घालणे, माती परीक्षण करणे. इत्यादी चौफेर कामे केली. जेवढे श्रमदानावर शक्य आहे, ती सर्व कामे केली. जेथे शक्य नाही ती कामे मशिनच्या सहाय्याने केली. पण कामे करण्यासाठी मनुष्याच्या श्रमदान यावर जास्त भर होता. कामे करताना शास्त्रीय आधार तंतोतंत पाळला गेला. श्रमदानाची सुरुवात ही माथ्याकडून करण्यात आली. माथ्याची कामे पूर्ण झाल्याशिवाय पायथ्याची कामे हाती घेतली नाहीत.
जलयुक्त योजनेतून केवळ सिमेंट बंधारे बांधणे, पाझर तलावाचा सांडवा दुरुस्ती, साठवण बंधारा ही मोजकीच कामे केली. बाकी सर्व कामे श्रमदानातून करण्यात आली. या संदर्भात सरपंच यांच्या मते, लोकसहभाग, श्रमदान, लोकवर्गणी, विविध संस्थांकडून मिळालेला निधी आणि गावकऱ्यांची पाणीसाठे निर्माण करावयाची लागलेली आस ह्या सर्वांमुळे जलसंधारणाची कामे यशस्वी करता आली.
आर्थिक निधीची उभारणी :
आदर्श गाव योजना, दरवर्षी होणाऱ्या यात्रेला पूर्णविराम दिला, जमा होणारा निधी, तमाशा, ऑर्किस्टोवर होणारा निधी असा सर्व निधी जलसंधारणाच्या कामाकडे वळवला. गावातून स्थलांतर करून शहरात गेलेले नोकरदार, व्यापारी, हमालकाम करणारे आणि गावकऱ्यांची लोकवर्गणी, शासकीय निधी, भारतीय जैन संघटना, ड्रीम सोसल फाउंडेशन, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन आणि संचालक मंडळ यांच्या मदतीने बँकेचा निधी, सिद्धनाथ (माण) या संस्थेने दिलेला निधी, शासनाने उपलब्ध करून दिलेला मशिन्स या सर्वांच्या एकत्रित समन्वयाने निधी उभारणी केली. या सर्व मिळणाऱ्या निधीच्या खर्चावर ग्रामसभेचे नियंत्रण होते. सर्व व्यवहाराचे निर्णय पारावर बसून बैठकीच्या माध्यमातून घेतले गेले त्यामुळे निधी खर्चामध्ये पारदर्शकता होती.
पाणी व्यवस्थापन आणि पीक पद्धतीत बदल याबाबी देखील हळूहळू गावकऱ्यांनी करून घेतल्या आहेत. गावचे सरपंच यांनी स्वतः पाणी उपलब्ध झाल्यानंतर ऊस या पिकांकडे वळण्याऐवजी ठिबकद्वारे द्राक्ष फळलागवड केली. इतर पिके हंगामी पाणी लागवडीची घेणे सुरू केले. ऊसापेक्षा फळबागांचे उत्पन्न जास्त निघते हे स्वतः प्रयोग करून गावकऱ्यांना दाखवून दिले. ऊसाचे वर्षातून एकदाच पीक निघते, मात्र इतर तीन पिके निघतात हे प्रयोगाने सिद्ध केले. हे गावकऱ्यांना पटले. शेती क्षेत्रातील आदर्श निर्माण केला. परिणामी गावकरी ऊस पिकांकडे न वळता, बागायती फळझाडे लागवड, हंगामी भाजीपाला, फळभाज्या, स्वीट मका, मिरची अशा स्वरूपातील पिकांकडे वळले. निवृत्ती काटकर यांनी तर खडकाळ जमिनीवर आंबा फळबाग फुलवली. तरकरी, भूसारी, भाजीपाला, जनावरांचा चारा आणि कडधान्य ही पिके घेण्याकडे गावकरी कल देत आहेत.
गावातील शेतकरी किमान पातळीवर आधुनिक शेती करण्यास तयार झाले आहेत. काही मोजके पिके पारंपरिक पद्धतीने करावयाचे वगळले तर मोठ्या प्रमाणावर ठिबक - तुषार सिंचनाचा वापर करत आहेत. पीक लागवडीत शेतकरी आधुनिकता अवगत करण्याचा प्रयत्न करत आहेत. थोडक्यात गावातील शेतकरी, पाणी बचत, पाणी व्यवस्थापन आणि पीक पद्धतीमध्ये बदल ह्या बाबी शेतकऱ्यांकडून हळूहळू होत आहेत.
सारांश रूपाने, गावामध्ये जलसंधारणाच्या कामे जेवढी करता येतील तेवढी केली आहेत. गावकऱ्यांच्या मते, कितीही मोठा पाऊस झाला तरी पाण्याचा एकही थेंब गावशिवाराच्या बाहेर वाहून जाणार नाही ऐवढी काळजी घेतली आहे. त्याचा परिणाम तात्काळ पाणी पातळीतील वाढ झाल्याने दिसून आला. हिवाळ्यातील विहिरीची पाणी पातळी ३० ते ३५ फुटावर होती. ती १५ ते २० फुटावर आली. तर बोअरवेल पाणीपातळी ३०० ते ३५० होती. ती १०० ते १२५ फुटावर आली. कामे होण्यापूर्वी हिवाळ्यात विहिरी आणि उन्हाळ्यात बोअरवेल कोरड्या पडल्या होत्या, त्या आता पाणीदार झाल्या आहेत. हे जलसंधारणाच्या कामाचे यश आहे. गावकरी समाधानाने सांगतात, आमच्या हक्काचे पाणी आम्ही आडवले आहे. दुसरे असे की, कामे श्रमदानातून झाल्याने टिकाऊ आणि शास्त्रीय पद्धतीने झाली आहेत. कामाची देखरेख, निगा राखणे हे गावकऱ्यांच्या श्रमदान करण्याच्या जबाबदारीवर आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी दुष्काळाला पराभूत केलेले आहे. पुन्हा दुष्काळ डोके वर काढणार नाही ही पाणी व्यवस्थापन, नियोजन, पीक पद्धतीतील बदल अशा माध्यमातून दक्षता देखील घेतली आहे. थोडक्यात गावचे सक्षम नेतृत्व, गावकऱ्यांची श्रमदान, लोकसहभाग, लोकवर्गणी, जागृती अशा बाबीमुळे दुष्काळावर शाश्वत स्वरूपात मात केली. परिसरात दुष्काळावर विजय मिळणारे एक आदर्श गाव म्हणून माणदेश किरकसालकडे पाहू लागला आहेत. हे गावकऱ्यांनी दिलेल्या लोकसहभाग आणि श्रमदानामुळे शक्य झाले.
"द युनिक फाउंडेशन, पुणे" या संस्थेकडून "जलयुक्त शिवार अभियान योजनेचे मूल्यमापन : गावे दुष्काळमुक्त झाली का?" हा संशोधन अभ्यास प्रकल्प २०१६ ते २०१९ या कालावधीत राबवलेला होता. या अभ्यास प्रकल्पासाठी जमा केलेल्या माहितीचा वापर लेख लिहिण्यासाठी केला आहे. संबधित संशोधन अहवाल डिसेंबर २०१९ मध्ये प्रकाशित झाला आहे.
लेखक : डॉ.सोमिनाथ घोळवे, हे शेती, दुष्काळ, पाणी प्रश्नांचे अभ्यासक असून 'द युनिक फाउंडेशन, पुणे' येथे वरिष्ठ संशोधक आहेत. ([email protected])