पूजेला, आशीर्वादाला हिजडा लागतो तर तो स्वतःच्या पोटी का नको ?
आशीर्वादाला हिजडा लागतो, पूजेला हिजडा लागतो, तो घरात पाय फिरवून गेला तर घरात बरकत येते. हिजड्याने ओटी भरली तर लेकरं बाळं होतात. पण हिजडा जन्माला येऊ नये कुणाच्या पोटी. हिजडा जर एवढा चांगला आहे तर मग त्याला स्वतःच्या पोटी का बरे मागत नसतील कुणी? वाचा रमाई चळवळीच्या दहाव्या साहित्य संमेलनाध्यक्ष दिशा पिंकी शेख यांचे संपुर्ण अध्यक्षीय भाषण.
X
दहावे रमाई चळवळीचे साहित्य संमेलन : २७ मे २०२३
(अहमदनगर)
- दिशा पिंकी शेख
(संमेलनाध्यक्ष)
अध्यक्षीय भाषण
माणसाला माणसांच्या रांगेत बसवणार्या सगळ्या महामानवांना त्रिवार अभिवादन. तसं भाषण लिहिणं हा काही माझा पिंड नाही. उत्स्फुर्त गर्दी समोर बघून बोलणं किंवा माणसांना बघून बोलणं त्या दिवशीच्या घडामोडींना आपण बोलतो त्या तत्वांमध्ये दाखला म्हणून वापरणं ही माझी शैली. त्याच्यामुळे भाषण लिहून कसं काढतात याचं कौशल्य माझ्याकडे नाही. तरीसुद्धा रमाई मासिकाच्या संपादक डॉ. रेखा मेश्राम यांच्या घरी आणि मोबाईलच्या सहाय्याने, खूप कष्टाने आणि थोडंफार बळजबरीनेच म्हणा हे भाषण लिहून निघतं आहे. आणि तेही मी लिहित नाही मी फक्त रेकॉर्ड करून दिलं आणि लिहिण्याचे कष्ट अमरदीप वानखडे यांनी घेतले. त्याबद्दल त्यांचे आभार. सलग बोलणारी मी. कुठं पुर्णविराम द्यावा, कुठं कॉमा आणि व्याकरणिकदृष्ट्या माझी समज कमी आहे. त्यामुळे अमरदीप यांची खूप गोची झाली असेल त्याबद्दल त्यांच्यासाठी सहानुभूतीपूर्वक आभार व्यक्त करते.
मंचावर उपस्थित संमेलनाच्या उद्घाटक विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या अध्यक्ष प्रा. प्रतिमा परदेशी, स्वागताध्यक्ष रमाई फाऊंडेशनच्या ललिता खडसे, रमाई मासिकाच्या संपादक व संमेलनाच्या मुख्य संयोजक डॉ. रेखा मेश्राम, उपस्थित सर्व मान्यवर आणि समोर बसलेल्या माझ्या सर्व भीमअनुयायांना माझा क्रांतीकारी जयभीम.
आज अहमदनगर जिल्ह्यामध्ये रमाईच्या १२५ व्या जयंती निमित्त आणि सावित्रीमाई फुलेंच्या १२५ व्या स्मृती दिनानिमित्त रमाई फाउंडेशन, रमाई मासिक, रमाई प्रकाशन आणि सूर्यपूत्र भय्यासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानच्या वतीने ‘दहावे रमाई चळवळीचे साहित्य संमेलन’ होत आहे. ज्या रमाईला बघून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना संघर्षाचा हुरूप येत असे त्या रमाईच्या नावाने होत असलेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद या सर्व संघटनांना मला द्यावेसे वाटले. त्यासाठी मी त्यांचे आभार आहे. कारण मी फार इन्फार्मल आहे. भाषणाच्या शेवटी त्यांची नाव घेता येतील की नाही याची शाश्वती नसल्याने सुरूवातीलाच त्यांचा उल्लेख करणे मी महत्वाचे समजते.
मुळात कार्यक्रमात असे असते की, तुमच्या आधी बोललेल्या वक्त्याचेचे मत, त्या दिवशीचा असलेला हॉट टॉपिक, वृत्तपत्रांनी दिलेल्या हेडलाईन यावरून एक अंदाज बांधून आपण बोलत असतो. पण लिखित स्वरूपाचे भाषण असल्यामुळे हे भाषण ज्या दिवशी तुमच्या हातात येईल त्यादिवशीचे हॉट इश्शु काय असतील? त्या दिवशीचे तृतियपंथी समूहाचे काय प्रश्न असतील? तृतियपंथीयांपेक्षा मी त्यांना पारलिंगी असे म्हणेन. ते वेगळे असू शकतात. असो.
मला असे वाटते की, या निमित्ताने एखाद्या साहित्य संमेलनामध्ये मोठ्या प्रमाणात पारलिंगी हा विषय घेऊन एकंदर त्याला वंचितांची जोड देत सर्वंकष चर्चेचे आयोजन हे पहिल्यांदा होत आहे. आणि याचे मी सर्व प्रथम स्वागत करते. कारण असे उपक्रम होणे खूप गरजेचे आहे. आता काही दिवसांपूर्वी निवडणूक विभागाने पुन्हा दोन दिवसांची परिषद घेतली होती. तो शासकीय कार्यक्रम होता. बाहेर साहित्य विश्वामध्ये अशा पद्धतीने जी चर्चा व्हायला पाहिजे होती, ती होताना दिसत नाही आणि मला असे वाटते की, साहित्य संमेलनाच्या निमित्ताने या चर्चेची दारे आज उघडी होत आहेत आपण त्यांच स्वागत केलं पाहिजे. त्यामुळेच या संमेलनाचे अध्यक्षपद मला मिळाले याचा मला विशेष आनंद वाटतो.
आता लिखित स्वरूपात भाषण देत असताना त्याचे काही विभाग केले पाहिजे. त्यामध्ये एक पारलिंगी समुदायाचा इतिहास, माझा त्याच्याशी संपर्क, पारलिंगी समुदायाचे वर्तमान, त्यांचे आंबेडकरी समुदायासोबत असलेले नाते आणि भविष्य या सर्व अंगाने बोलले पाहिजे असे मला वाटते. तसं पारलिंगी समुदाय हा फार विषमतेला तोंड देत आलेला आहे. जसं इथल्या शुद्र आणि दलितांना हरिजन म्हणून त्यांच्या शोषणाचं दुःख कमी न करता त्यांच्या उल्लेखाचं दुःख कमी करण्याचं काम एकप्रकारे इथल्या व्यवस्थेने केले. त्याच पातळीवर समता मानणार्या या देशामध्ये संविधानाने चालणार्या या देशामध्ये समतेवर आधारित ओळख अजून पारलिंगी समुदायाला मिळालेली नाही. अजूनही लोक त्यांना तृतियपंथी म्हणतात. पण जेव्हा तृतियपंथी म्हणतो तेव्हा साहजिकच कुणीतरी प्रथमपंथी आहे, कुणीतरी द्वितीयपंथी आहे आणि मग कुणीतही तृतियपंथी आहे. हे साहित्यात काम करणार्या लोकांच्याही इतक्या दिवसांत लक्षात आलेलं नाही. पण आता त्याची चर्चा होते आहे आणि ‘पारलिंगी’ शब्द नव्याने रूजू पाहतो आहे. तरी लोकांना पारलिंगी म्हटल्यानंतर लवकर समजत नाही आणि माझ्याही नेनिवेमध्ये कुठेतरी तृतीयपंथी या शब्दाने भर घातली आहे, त्याला डिलर्निंग करायला मला थोडा वेळ लागणार आहे. तेव्हा माझ्या लिखानामध्ये कुठुन चुकुन जर तृतियपंथी शब्द आला तर मला समजून घ्या.
परिवर्तनवादी लोक पारलिंगींना दैवी स्वरूपाने घोषित करतात. ते फार त्यांच्यावर आस्था असल्यासारखं दाखवतात. त्यांच समाजात विशेष स्थान आहे असं सांगतात. पण खरंच तसं आहे का? जर महाभारतामध्ये किंवा रामायणामध्ये या समूदायाचे उल्लेख आहेत असे सांगितले जाते. रामायणामध्ये १४ वर्षे रामाची वाट पाहिली आणि मग राम आला आणि खुश झाला. त्याने सांगितले की, कलियुगामध्ये तुमचे आशिर्वाद लोकांना लागतील. माझं म्हणणं तेव्हाही हेच होतं आताही तेच आहे. मी रामाची खूप वर्ष पूजा केलेली आहे. मी त्याच्यावर भक्ती केलेली आहे. मी एका हिंदु कुटुंबात जन्माला आलेली व्यक्ती आहे. मला हनुमान चालिसा पूर्ण पाठ होती हा डायलॉग राजकीय आहे. आजही पाठ आहे, काही शेवटचे एक-दोन कडवे मागेपुढे होतील एवढंच. पण तरीही मला त्या प्रिय रामाला विचारायचे आहे की, १४ वर्ष माझ्या बापजाद्यांनी, आईजाद्यांनी तुझी वाट बघितली आणि १४ वर्षानंतर जेव्हा तू परत आलास तेव्हा किमान एखादा सोनाचा कंठा गळ्यातला तोडून द्यायचा असतास, किंवा नदी किनारी ज्या जागेवर आम्ही बसलो ती जमीन आमच्या नावावर करून द्यायची असतीस, किंवा मासे पकडायचा व्यवसाय आमच्या वाट्याला द्यायचा असतास, मातीतून मडकी बनविण्याचा व्यवसाय तू आमच्या वाट्याला द्यायचा असतास. तू आमच्या पायात चाळं बांधली आणि आमच्या खांद्यावर ढोलकं दिला जो आम्हाला आज हजारो वर्षांनंतरही उतरवता येत नाही आहे. यातून आमचं काय भलं झालं? आम्ही समाजाच्या मनोरंजनासाठी आणि समाजाच्या अंधारातल्या उपभोगासाठीच वापरल्या गेलोत ना? जर आम्ही एवढे शूर होतो की महाभारताच्या युद्धात रणांगणामध्ये शस्त्र घेऊन शिखंडी भीष्म पितामहाच्या समोर उभा होता, किंवा उभी होती. तर त्या शिखंडीने भीष्म महापितांना शह देत हरवत महाभारताची नायक, नायिका का झाली नाही? अर्जुनासाठी तिचा वापर एका खांद्यासारखा का करण्यात आला? म्हणजे अर्जुनाने तीच्या किंवा त्याच्या खांद्यावर बाण ठेवून भीष्म पितामहांना संपवले हा तिचा, त्याचा वापर नाही का? आणि हा प्रश्न साहित्यात हजारो वर्ष ज्ञान घेणार्या लोकांना का पडला नसावा? मग अहिरावनांचं प्रकरण आलं. अहिरावनांसोबत एका रात्रीची सुवासिनी होण्याचा मान तुम्ही आमच्या वाट्याला टाकून दुसर्या दिवशी आम्हाला रंडकं करून दिलंच ना? तर समाजातील कुणालाच का वाटलं नसेल जर ह्या एका दिवसाच्या सौभाग्यवती होऊ शकतात तर ह्या आयुष्यभराच्या साथीदार किंवा जोडीदार का होऊ शकत नाहीत? सांगितले जाते की, आमच्या आशिर्वादाने लोकांना लेकरंबाळं होतात. किंवा ओटी भरली जाते. तर मला सांगा माझ्या आशिर्वादाने जर ओटी भरली जात असेल तर तर गायनॉकॉलाजिस्ट जे दवाखाने आहेत ते का सुरू आहेत? ते का बंद पडत नाहीत? हा सर्व इतिहास झाला दैवीकरणाचा.
आता आपल्याला मोठा इतिहासाचा पल्ला सापडतो तो म्हणजे मोगलाईच्या आधीच्या काळातला. त्याची सुरूवात अलाउद्दीन खिलजीपासून होते. अलाउद्दीन खिलजी आणि त्याची प्रेमिका व त्यांचे प्रेमप्रकरण अलिकडेच एका सिनेमामध्ये अश्लिल पद्धतीने दाखविण्यात आले. पण ती पारलिंगी व्यक्ती त्या राजाची सेनापती होऊ शकते. मग ती किती क्रुर होती की चांगली होती या भानगडीत मी आता पडत नाही. कारण हरणीचा इतिहास जोपर्यंत हरणी लिहून काढत नाही तोपर्यंत तिच्या शिकार्याची शौरगाथा पूर्ण होऊ शकत नाही. तसंच हिजड्यांचा इतिहास आजपर्यंत पुरूषांनीच लिहिला आहे. त्यातल्या त्याच अप्पर क्लास, अप्पर कास्ट पुरूषांनी लिहिला आहे. त्यामुळे हिजड्यांच्या शौर्याच्या कथा त्यात येणं हे काही मला अपेक्षितच नाही. त्याची मला आशाही नाही. परंतु आता ते लिहायला लागले आहेत. ते आता दबक्या पावलांनी येऊन वाघाची शिकार करताहेत. शिकार करणे याचे समर्थन मी काही करीत नाही. मी स्वतःचा इतिहास लिहावा, स्वतःच्या शौर्यगाथा सांगाव्यात, त्यासाठी संघर्ष करावा, इथपर्यंत माझं समर्थन आहे. अलाउद्दीन खिलजीपासून सुरूवात झाल्यानंतर मग आलेल्या मुस्लिम राजांनी लक्षात घेतलं यांच्याकडे ताकद खुप आहे, कारण हे सर्व राजेपण शत्रुंच्या मुलांना पकडून मुखनवीस करीत होते. त्यांना गुलाम बनवित होते. त्यामध्ये पारलिंगी हे मिक्स झाले. मुगल साम्राज्याला अश्रित झाले. अर्थात त्यांनी फार काही उद्धार केला अशी काही परिस्थिती नव्हती. परंतु आधी जी काही वाईट परिस्थिती होती. त्यातल्या त्यात किमान त्यांना बेसिक गोष्टी मिळाल्या त्यामध्ये भटारखाण्यामध्ये ते आचारी झाले, राण्यांच्या दरबारामध्ये हुजरे झाले, राण्यांचे अंगरक्षक झाले त्यासोबतच त्यांना हेरगिरीचे खाते मिळाले, बर्याच ठिकाणी असे उल्लेख आहेत की, ते सारा वसुलीचे काम करीत होते. त्याचे बर्याच पारलिंगींकडे आजही ताम्रपत्र आहेत. राजाने त्यांना सारावसूलीसाठी ताम्रपत्र तयार करून दिले होते़ पण हा सारा जोपर्यंत धान्यामध्ये येत होता, तो सारा गोळा करण्यासाठी जोपर्यंत कष्ट लागत होते तोपर्यंत तो पारलिंगी समूदायाच्या हातात होता. ज्यावेळी ह्या सार्याला मुद्रेचे स्वरूप आले, ओझं कमी झालं आणि त्या-त्या गावचा सारा एका गाठोड्यात यायला लागला तेव्हा मात्र या सारा वसूलीच्या क्षेत्रातून, हेरगिरीच्या कामातून या समूदायाला वगळण्यात आले. आणि ती जागा मुघलकालीन दिल्या गेलेल्या पदव्या तुम्हाला माहिती आहेत. ज्या आज फार डिमांड घेऊन मिरवल्या जातात. देशपांडे, कुलकर्णी, देशमुख, पाटील खरं पाहिलं तर त्यांची त्यांचा इतिहास तपासून पाहावा. ही त्यांची मूळ अडनावे नसून ही त्यांना मोगलांनी दिलेली जबाबदार्या , पदव्या होत. मुसलमान नकोत पण मुसलमानांनी दिलेल्या पदव्या मात्र त्यांना आजही हव्या आहेत. मला असं वाटतं याचा रितसर इतिहास आपण अभ्यासला पाहिजे. मी तर अडाणी बाई आहे, तुम्ही मात्र इतिहास चाळून घ्या. तर हा एक मोठा इतिहास मुघल काळातील आहे. हा इतिहास पारलिंगींच्या बाबतीत चांगला मानल्या जातो.
पारलिंगींच्या वाट्याला काही शौर्यकथा आल्या, सुफीसंतांच्या बैठकांना त्यांना बसता आले. जसं की, ख्वाजा गरीब नवाज यांची मुलगी ख्वाजा फराह आहे. सुफींमध्ये बसणे-उठणे असल्यामुळे खुप सारे कल्चर आहे. गंगा-जमूना तहजूबला घेउन काम करणारं आहे. या सर्व संस्कृतीमुळे हा समाज प्रवाही झाला होता. मग इंग्रज आले. इंग्रजांच्या लक्षात आले की, या समुदायाची निष्ठा ही त्या प्रादेशिक राजांच्या राज्यांशी आहे. ते काही आपले प्रामाणिक होणार नाहीत म्हणून मग इंग्रजांनी यांना आरोपी ठरवले. गावकुसाबाहेर टाकले, अगदी ठिकाणी शुट अॅड साईट चे ऑर्डर दिले. म्हणजे दिसल्याबरोबर गोळी झाडा, त्यांना संपविण्याची भाषा इंग्रजांनी केली. त्या काळात हा समूह खूप सुप्त आणि लुप्त पद्धतीने काम करीत होता, जगत होता. कालांतराने देश स्वातंत्र्य झाला. परंतु या समूदायाचे पूर्नवसन किंवा सामाजिक पूर्नबांधणी पाहिजे त्या पद्धतीमध्ये झाली नाही. १९४७ ला देश स्वातंत्र्य झाला. देशाचं संविधान आलं. १९४९ ला संविधान लागू करण्यात आले आणि २६ जानेवारी १९५० गणतंत्र दिवस साजरा झाला. त्या दिवशी या देशातील स्त्री-पुरूष या देशातील रितसर नागरीक झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळे तुम्हाला पहिल्या निवडणुकीत मतदान ओळखपत्र मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला नाही. अगदी तुम्ही जर संविधान सभेतील चर्चा ऐकल्या तर तुमच्या लक्षात येईल. तर मतदान करण्याचा कुणाला अधिकार द्यावा यावरून बरेच मतभेद होते. इथले प्रस्तापित नेते सांगत होते की, इथल्या श्रीमंतांना मतदानाचा अधिकार असला पाहिजे, चांगलं शिकलेल्या लोकांना मतदानाचा अधिकार असला पाहिजे. त्यावेळी फक्त बाबासाहेब सांगत होते की, या देशातील चांगल्या, वाईट, गरीब, श्रीमंत कुठल्याही जात, धर्म, वर्ग, वर्णाच्या व्यक्तीला मतदानाचा अधिकार असायलाच हवा. म्हणुन इथे जन्माला आलेल्या प्रत्येक स्त्री-पुरूषाला तेव्हाच मतदानाचा अधिकार मिळाला. पण माझा समूदाय त्याबाबतीत वंचित होता. वंचित हा शब्द मी वारंवार वापरते कारण मी वंचितांची प्रतिनिधी आहे. आणि आजचे साहित्य संमेलन जर तुम्ही पाहिलं असेल, भाषण वाचतांना किंवा एकंदर पत्रिका वाचतांना जर पाहिलं असेल तर हे सर्व वंचित बहुजन आघाडीशी संबंधित आहे. म्हणून माझ्या बोलण्यातून आणि लिहिण्यातून वंचित हा शब्द वारंवार येतो. जरी तो हिंदीतील असला तरी तो आता मा. बाळासाहेब आंबेडकरांनी इतका रूळवला आहे की, चांगल्या-चांगल्या राजकारण्यांनाही त्या शब्दाच्या पलिकडे जाता येत नाही आणि हा समूह प्रत्येक जण आपल्याकडे ओढण्याचे काम करत आहे. इथल्या वंचित समुदायातील मी असूनसुद्धा स्त्री-पुरूषांना मतदान कार्ड मिळालं होतं मला मात्र मिळालं नव्हतं. तो अधिकार मिळवण्यासाठी नव्वदोत्तर कालखंडात जेव्हा एलजीबीटीच्या अधिकाराअंतर्गत चळवळी उभ्या राहिल्या त्यांना तीस वर्ष प्रयत्न करावे लागले. तेव्हा कुठे २०१४ ला नालसा जजमेंट आलं, त्यानंतर बरीचशी उलाढाल झाली, मोर्चे, आंदोलने, जंतरमंतरवर जाऊन धिंगाने असं सर्व झालं आणि मग त्यानंतर २०१४ ला ऑदर हा कॉलम सुरू झाला. तेव्हा मी भारताची नागरीक झाले. म्हणजे २०१४ पर्यंत दिशा पिंकी शेख ही भारताची नागरीक सुद्धा नव्हती. मला मिळालेले पहिले भारताचे नागरीक असल्याचे नियमबद्ध प्रमाणपत्र २०१४ ला मिळाले. आता मला सांगा ज्या समुदायाला २०१४ मध्ये नागरिकत्व मिळाले असेल त्या समुदायाची आर्थिक, सामाजिक, राजकीय प्रतिनिधीत्वाची संख्या आणि व्याप्ती काय असेल? याचा विचार इथल्या प्रस्तापित आणि परिवर्तनवादी म्हणणार्या चळवळींमध्ये अगदी २०१० पर्यंत होताना दिसत नव्हता. खूप क्वचित लोक होती. नेमके काही बोलायला लागली होती. पण तरीही मोठ्या प्रमाणात २०११ नंतरच त्या सगळ्यांमध्ये बदल होतांना दिसतो. त्यामध्ये सगळ्या चळवळी आल्या. त्यामध्ये आंबेडकरी चळवळ, डावी चळवळ, स्त्रीवादी चळवळ यांमध्ये २०१० नंतर सक्रिय हस्तक्षेपाला सुरूवात झालेली असल्याचे दिसते. हा सगळा माझ्या लेखी उजळणी किंवा धावता आढावा म्हणा, जो मी आपल्यापुढे मांडला आहे. या सर्वांमध्ये आंबेडकरी चळवळ आणि पारलिंगी हा महत्वाचा मुद्दा मला वाटतो. जो एकदंर पारलिंगी समुदायाने समजून घेणं फार महत्वाचे आहे.
माझी कविता आहे नामदेव ढसाळांवर लिहिलेली, ‘नामा मला फार जवळचा वाटायला लागला इतपत की, माफ करा आजकाल परिस्थिती एवढी बिकट होत चालली आहे की, कुणाला ऐकेरी बोलायचे की, नाही मग त्यामागील भाव काय आहे? हे लोक पाहत नाहीत. आमच्या आदर्शस्थानाला ऐकेरी कसे बोललात? म्हणून लोक धावून येतात. पण नामा मला जवळचा वाटतो. कारण तो माझ्या बहिणींचे प्रश्न माझ्यामध्ये येऊन सोडवतो.
१९७२-७३ चा मोर्चा आहे तो देशातील पहिला मोर्चा आहे ज्याला कुठलाही निधी नव्हता. ज्याला कुठलीही राजकीय अस्मितेची लढाई वगैरे असे काही नव्हते. फक्त जसं सर्वसामान्यांच्या भूकेला जस दोन घास मिळतात तसं सेक्स वर्कर महिला आणि रेड लाईट एरियातील पारलिंगी आहेत त्यांना दोन घास सन्मानाचे मिळावेत म्हणून रेशन कार्डासाठी काढलेला तो मोर्चा होता. आणि या पहिल्या मोर्चामध्ये १०० रेशनकार्ड मिळाले होते. ही आमच्या नामाची पहिली कमाई. म्हणजे मला असे वाटते की, या देशात सन्माचा पहिला घास बाबासाहेबांचा हात धरत नामाने आम्हाला भरवला, असे म्हणणे वावगे ठरवणार नाही. आता याला बर्याच जणांचे आक्षेप आहेत आणि मी त्या आक्षेपांचा रिस्पेक्ट करते. कारण मला असं वाटते मानसं बदलत राहतात. जी मानसं आता चांगली आहेत ती उद्या बिघडतात, जी आज बिघडलेली आहेत ती उद्या बदलतात. बुद्ध तेच तर सांगतो अनित्यवादामध्ये. त्यामुळे स्थायी असे काहीही नाही. नामाचेही काही निर्णय चुकले असतील. तो वयाने माझ्यापेक्षा खूप मोठा होता, माझ्या बापाच्या वयाचा असेल. परंतु तरीही तो मला जवळचा वाटतो. माझा लढवय्या वाटतो. जास्त बोलले तर त्याच्या विरोधकांना वाटेल हे काय चालले? तरीही आंबेडकरी चळवळीमध्ये पारलिंगी समुहाचा सक्रिय सहभाग नोंदविण्यासाठी नामदेव ढसाळांचे नाव घेतल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. त्यासाठी १९७२-७३ चा मोर्चा हा मैलाचा दगड आहे. त्यामुळे एलजीबीटी समूदायाने हे समजून घेतले पाहिजे की, बाबासाहेब आणि आपलं नातं काय आहे? याचं एक आणखी उदाहरण आहे. नामदेव ढसाळांनी ही लढाई सुरू करण्याच्याही आधी १९३० ला र.धो. कर्वे एक साप्ताहिक चालवायचे. त्याच नाव ‘समाज स्वास्थ’ असे होते. या साप्ताहिकामध्ये लैंगिकतेबद्दल प्रश्नांची उत्तर दिले जात होती. आणि त्यामधून लैंगिकतेबद्दल लोकांच्या मनात असलेले गैरसमज ते दूर करत होते. त्यांना ते फार नैसर्गिकरित्या उत्तर देत होते. आणि अशाच एका समलैंगिक संबंधावर आलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना त्यांनी सांगितले की, जर ते करीत असतांना तुम्हाला काही त्रास होत नसेल आणि तुम्हाला तो सहवास हवाहवासा वाटत असेल तर त्यात काहीही अनैसर्गिक नाही. आणि या उत्तरावर आक्षेप घेत पुण्यातील समकालीन संस्कृती रक्षकांनी र.धो. कर्वेवर गुन्हा दाखल केला. त्यांना कोर्टात ओढले आणि त्यावेळी कर्वेची केस लढायला कोणीही तयार नव्हते. त्यावेळी या लढाईमध्ये एक व्यक्ती समोर आली ती म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. त्यांनी र.धो. कर्वेची केस लढली. ती केस बाबासाहेब हरले परंतु तरीही या देशामध्ये एलजीबीटीच्या हक्क, अधिकारासाठी पहिले वकिल म्हणून उभे राहिले ते म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. तेव्हा पारलिंगी समुदायाने लढत असताना लक्षात ठेवलं पाहिजे की, भारताच्या परिपेक्षात तुमच्या न्याय-हक्कासाठी सर्वांत पहिले तुमचे बोट कुणी धरले असेल तर ते म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर होत. त्यामुळे आंबेडकरांशिवाय तुम्हाला गत्यंतर नाही.
हा झाला ऐतिहासिक, पौराणिक आणि त्यातल्या त्यात चळवळीच्या अंगाने मी तुम्हाला एक इतिहास सांगितला. अर्थातच हा इतिहास आपणही पडताळून पाहावा. कारण डोळेझाक कुणाच्या तरी पाठीमागे उड्या मारायचा आपला वारसा नाही. आपण आंबेडकरवादी आहोत, आपण परिवर्तनवादी विचारांचे वाहक आहोत. त्यामुळे आपण ते तपासले पाहिजे. याचे तुम्हाला संदर्भ मिळतील, गुगलद्वारे सर्च करून तुम्ही ते वाचू शकता. आता महत्वाच्या इतिहासावर मी बोलणार आहे. ते म्हणजे इथल्या पारलिंगींचा राजकीय इतिहास. या देशामध्ये आम्हाला पारलिंगी म्हणुन ओळखच नव्हती. ती ओळख आम्हाला २०१४ ला मिळाली कारण आमच्या आईधार्या, वरिष्ठ होत्या त्यांनी त्यासाठी जी लढाई लढली ती अत्यंत निष्ठेने लढली होती. शबनम मोची नावाच्या आमच्या एक वरिष्ठ, वयस्क आहेत. ज्यांनी भोपाळ राज्यातून आमदारकी लढवली. त्या अपक्ष निवडून आल्या. निवडून आल्यानंतर त्यांना असं वाटलं की, आपल्याला पक्षाची गरज आहे. आणि मग त्यांनी मध्यप्रदेशात काँगेस कमिटीची भेट घेतली. त्यावेळी काँग्रेसचे भोपाळ येथील अध्यक्षानी ‘हमारे पास मर्दो की कमी नही है...!’ असे म्हणत त्यांना काँग्रेसमध्ये प्रवेश नाकारला. मग त्यांनी दुसर्या एका पक्षामध्ये प्रवेश घेवून आपले राजकीय प्रतिनिधीत्व केले, हा भाग वेगळा.
परंतु देशावर ७० वर्षे राज्य करणारी काँग्रेस जी स्वतःला खूप सेक्युलर, सर्वसमावेशक म्हणवून घेते त्या कॉंग्रेसने एका निवडून आलेल्या आमदाराला अशा प्रकारचे उत्तर देणं, वागणूक देणं हे लिंगभेद मानणारं आहे. याच दरम्यान, म्हणजेच साधारणतः ९० च्या दशकात माझी आजी, ज्या आज या साहित्य संमेलनाला उपस्थित असतील कदाचित. त्या काजल गुरू नगरकर आणि महत्वाचे म्हणजे त्या अहमदनगरच्या आहेत. त्या त्याकाळात भारिप बहुजन महासंघाबरोबर महिला आघाडीमध्ये कार्यरत होत्या. पक्षाची बांधणी करणे, जिल्हाभर महिला मेळावे घेणे, आंदोलने, मोर्चे इ. त्यांचा महत्वाचा आणि सक्रिय सहभाग राहिलेला आहे. ऐकीकडे काँग्रेस निवडून आलेल्या एका आमदाराला सांगत होती की, आमच्याकडे पुरूषांची कमी नाही त्याच काळात बाळासाहेब आंबेडकर या समूहाला राजकीय प्रतिनिधीत्व देत होते. आज या संमेलनाच्या निमित्ताने एक मला जो पुरस्कार दिल्या जातो की, महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय असलेली पहिली तृतियपंथी वैगेरे मला असं वाटतं हा पुरस्कार माझ्या आधी काम करणार्या कितीतरी पारलिंगींना मिळायला पाहिजे होता. त्यातल्या एक आमच्या आजी ज्या समोर बसल्या आहेत. त्यांनी त्या काळात राजकीय सहभाग नोंदविला आणि आज राजकीय सहभाग नोंदविताना काय-काय अडचणी येतात याची मला जाणिव आहे. तर त्या काळात म्हणजेच नव्वदीमध्ये राजकीय सहभाग नोंदवितांना काय अडचणी आल्या असतील याचा मी अंदाज लावू शकते. म्हणून वंचितांच्या सोबत मा. बाळासाहेब आंबेडकर आणि त्यांच भारिप बहुजन महासंघ असो की आताचं वंचित बहुजन आघाडी असो हे तेव्हापासून सोबत आहेत, हे सांगण्यासाठी हा राजकीय इतिहास मी आपल्यासमोर मांडला आहे. त्याही पुढे जावून मी असं म्हणेल की, काँग्रेसने आता आता ऐश्वर्या रेड्डी नावाच्या आमच्या एका मैत्रिणीला राष्ट्रीय महासचिव केले होते. परंतु त्यांचे फार काही स्टेटमेंट ऐकायला मिळाले नाही किंवा त्यांना कृती करायला फार काही संधी मिळाली नाही त्यामुळे त्यांनी कॉंग्रेस सोडले आणि त्या दुसर्या कुठल्यातरी पक्षात सद्या कार्यरत आहेत, असं ऐकायला मिळातं आहे. म्हणजे परत मला तुम्हाला हे लक्षात आणून द्यायचं आहे की, भारतीय जनता पक्ष तर विरोधात आहेच, तो काही आम्हाला राजकीय सहभाग देणारच नाही. दिला तरी दैवीकरण करून देईल. कारण की, भाजपाला आम्हाला देव म्हणूनच बघायचं आहे, दाखवायचं आहे. तुम्ही आम्हाला आशिर्वाद द्या, आमच्या बायकांच्या ओट्या भरा, आमच्या डोक्यावर वरदहस्त ठेवा, रथातून आम्ही तुमची मिरवणूक काढू, आम्ही तुमच्या पाया पडू, तुम्ही एक रूपया दाताखाली चावून द्या, आम्ही तुम्हाला सोन्याचे अलंकार देवू, आम्ही तुम्हाला लेकरंबाळं झाल्यानंतर लाखोनी पैसा देवू, आम्ही तुम्हाला गाड्या देवू, आश्रमांना जागा देवू सगळं देवू परंतु समाजात सन्मानाचे स्थान किंवा मुख्य प्रवाही होणारा स्वाभिमान देणार नाही. ही त्यांची आधीचीच भूमिका असल्यामुळे आणि त्यांची हीच मानसिकता असल्यामुळे त्यांना बोलण्यात काही अर्थ नाही. पण जे खोटं लेबल घेवून फिरतात ना की आम्ही खूप परिवर्तनवादी आहोत, सर्वसमावेशक आहोत, भूमिका मांडणारे आहोत त्यांना मला हे सांगायचं आहे की, तसं नाही आहे. तुमचं दिखाव माल, फसाव धंदा आहे. तर अब हम इसमें नही फसेंगे. आम्ही जागे झालेलो आहोत. नेहमीच आमचा म्होरक्या हे आंबेडकर राहिलेले आहेत. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर किंवा बाळासाहेब आंबेडकर असो. त्यांनीच आमचं नेतृत्व केलेलं आहे. तर हे झालं राजकीय.
आता मी माझं सांगते. माझं नाव दिशा पिंकी शेख. मी माझ्या गुरूच नाव लावते. वडिलांचे नाव लावत नाही, कारण त्यांनी वडील असल्याची जबाबदारी पार पाडली नाही. म्हणून मी त्यांना माझ्या नावामध्ये वडिलांची जागा देणं नाकारलं. माझी गुरू माझ्यापेक्षा एका वर्षाने लहान आहे. परंतु तरीही तिने माझा बाप असण्याची भूमिका बजावली आहे. म्हणून मी माझ्या बापाच्या जागी त्यांचे नाव लावते. आम्ही गुरू-शिष्य परंपरेत राहतो. मी ह्युमूंदू जनजातीत भटक्या-विमूक्त घरामध्ये जन्म घेतला. आता मी माझ्या गुरूकडे राहते. हे सर्व करीत असताना मी झोपड्यामध्ये राहत असताना काही विचारांचा वारसा घेवून झोपड्यांमध्ये दिवे घेवून फिरणारी लोक माझ्याही झोपडीपर्यंत आली होती. सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचे कार्यकर्ते आमच्या झोपडपट्टीत यायचे. त्यातला एक कार्यकर्ता आवडत होता मला. ते वय होतं तसं. क्रश असतात ना प्रत्येकाचे? आणि प्रेम ही गोष्ट अशी आहे ना की ती तुम्हाला मुळासकट बदलते. आणि तुम्हाला तुमच्या प्रेमाच्या योग्य होण्यासाठी आत्मविश्वास देते. तुम्ही व्हाल नाही व्हाल हा भाग वेगळा पण तुम्ही स्पर्धा करू लागता त्या योग्यतेशी. आणि मी ही ते करत होते. माझ्या प्रियकराला म्हणजेच ज्याला मी लाईक करत होते त्याला तर माहितही नव्हते. त्याला वीस वर्षानंतर मी सांगितले की, तू मला आवडत होतास. पण तोपर्यंत बरंच पाणी पुलाखालून गेले होते. तर त्याला आवडतं म्हणून मी बाबासाहेब वाचायला लागले, त्याला आवडतं म्हणून मी अण्णाभाऊ साठे वाचायला लागले मग त्याने अंजूम परदेशी सरांशी ओळख करून दिली. मी हे नेहमी सांगत असते की, मला बाबासाहेब हे कम्युनिस्टांकडून मिळाले, परंतु मी डावी नाही. कारण मला असं वाटते की, माझ्या क्षमतेला हवा असलेला मार्क्स बाबासाहेबांनी त्यांच्या भाषेतून मला दिला आहे. त्याच्यामुळे मला मार्क्सकडे जायची गरज नाही, मला बाबासाहेबांकडेच गेले पाहिजे. या विचाराची मी आहे. कोण एवढा अवघड अभ्यास करत बसणार? कोण एवढी ती पुस्तकं चाळत बसणार? बरं ते परदेशातील वर्गवाद, आपल्या इथला वर्ग वेगळा आहे तिथला वर्ग वेगळा. आपल्या इथल्या वर्गाच्या भाषा निवडल्या तर त्या आणखी वेगळ्या. त्यामुळे मी त्या फंदात पडत नाही. मी बाबासाहेबांच्या मार्गाने जाणार आहे. यासाठी मला कुणी बाबासाहेबांची भक्त म्हटलं तरी मला काही फरक पडणार नाही. कारण बाबासाहेबांनी आमचं आयुष्यंच बदललं. घिसाडी जरी राहिले असते तरी कोळशाच्या खाणीत कुठेतरी पडले असते आणि हिजडा म्हणून राहिले असते़ कुठेतरी टाळ्या पिटत पैसे मागितले असते. आजही मागतेच म्हणा परंतु कुठेतरी सिग्नलवर आयुष्य काढलं असतं. पण बाबासाहेबांचे बोट धरले आणि या साहित्य संमेलनाची अध्यक्ष झाली एवढं मात्र निश्चित.
हे सगळं जरी असलं तरीही मी माझ्या अंतरिक लढाईशी झुंज देत होते कारण की बाह्य स्वरूपामध्ये माझे शरीर जरी पुरूषी असलं तरीही आंतरिक वाढ ही माझी बाईसारखी होत होती आणि या सगळ्यांत मी काय आहे. मला जे वाटते ते चूक आहे की बरोबर आहे. माझी जी लैंगिक ओढ आहे म्हणजे मी सामाजिक दृष्टिकोनातून पुरूष अशी जी मानसिकता होती. असं असताना मला एखादा पुरूष आवडणं हे कितपत योग्य आहे़ तेव्हा मी फार धार्मिक होते. मला असं वाटायचं की हे पाप आहे हा कसला काहीतरी पूर्वजन्मीचा श्राप आहे. आपण या सगळ्यातन निघालं पाहिजे. आपण हे असलं काही केलं नाही पाहिजे हा विचार आला नाही पाहिजे आणि या सगळ्यांत मी फार डिस्टर्ब झाले. मधल्या काळात या सगळ्यांची उत्तरे चळवळींतही सापडत नव्हती. कारण की लोकं स्त्री पुरूष समानता म्हणत होते. लिंगभावावर कुणी बोलतच नव्हतं त्या काळात म्हणून मी बहुतेक चळवळीतन तुटले त्यातन बाहेर पडले स्वतःच्या शोधासाठी. हा शोधाचा प्रवास खूप मोठा राहिला आहे माझा. ते आत्मचरित्रामध्ये सगळं सविस्तर लिहिन. या मधल्या काळात मी स्ांन्यास घेवून पाहिला. मी मधल्या काळात एकटं राहून पाहिलं. मी दोनदा आत्महत्येचे प्रयत्न केले. मी वेगवेगळया लोकांमध्ये राहणं, जगणं करून पाहिलं पण मग एका सरटन लेवलला मला माझी ओळख पटली. आणि मी कम्युनिटी जॉइन केलं.
कम्युनिटी जॉइन केल्यानंतर माझी आत्मशोधाची लढाई थांबली होती. मला हे कळालं होतं की मी एक स्त्री आहे. मला लोक काय म्हणतात त्याच्याशी मला काही फरक पडत नाही. मी एक बाई आहे आणि मला बाईसारखं जगायचं आणि ती लढाई थांबल्यामुळं माझं मानसिक स्थैर्य यायला लागलं. मानसिक स्थैर्य आल्यानंतर मी परत चळवळीकडे वळायला लागले. मला असं वाटलं की माझे जे इशू आहेत हे माझे मी बाई असण्याशी जुळलेले इशू आहेत. मी साडी घालते. पण मी कुठल्या पुरूषाची प्रॉपर्टी नाही. म्हणून मला कुणीपण छेडतं. एखाद्या बाईला छेडणं हे त्या बाईला छेडणं नसतं त्या बाईशी जोडलेल्या सगळ्या पुरूषांच्या अस्मितेशी छेडणं असतं की बापाच्या भावाच्या नवर्याच्या, नातेवाईकांच्या, गल्लीच्या, गावाच्या, राज्याच्या, देशाच्या, प्रांताच्या असल्या सगळ्या अस्मितांना धक्का लागतो. मला छेडल्यानंतर मात्र या कुठल्याच अस्मिता दुखावल्या जात नाही. मग का दुखावल्या जात नाही याचा शोध मी जेव्हा घेत आले तेव्हा लक्षात आलं की हे सगळं री- प्रोडक्शनच्या भोवती फिरतं विषयशुध्दीच्या भोवती फिरतं. मग जात फॅक्टर कळायला लागला. क्लास फॅक्टर कळायला लागला. कास्ट कळायला लागली की कसं तिने बायकांवर कंट्रोल ठेवण्यासाठी जातींची निर्मिती झाली. कसं संपत्तीचा वाटा हा आपल्या रक्ताच्या शिवाय दुसरा कोणाकडे जावू नये. म्हणून एक कल्चर डेव्हलप झालं त्याला विवाह संस्था म्हणतो आपण. आमच्या बायका आम्हीच उपभोगणार इतरांनी उपभोगू नये म्हणून मग जात आणि वर्ग या संदर्भ आले हे जेव्हा मला कळायला लागलं तेव्हा लक्षात आलं की इथली जी मानसिकता आहे ती मुळात बायकांकडेच बघण्याची मानसिकता चुकीची आहे. आणि त्यामुळे आपल्या वाट्याला हे दुःख येत. कारण की पुरूषी असणं काहीतरी गौरव असतं असं समजलं जातं. आपल्याकडे बायकी असणं हे अपमानास्पद आहे हे आजही आहे आपल्या समाजामध्ये आणि मग मी बायकी होते म्हणून माझ्या वाट्याला हे अपमान येत आहेत याची मला ओळख व्हायला लागली. या संदर्भाने मी युटयुबवर वेगवेगळ्या भाषणांमध्ये बोलली आहे. पण याची जेव्हा मला उकल व्हायला लागली तेव्हा मला असं वाटलं की आपण स्वतःला चळवळीशी जोडले पाहिजे. आपला मुद्दा हा चळवळीशिवाय कुणीही सोडवू शकणार नाही. आपल्याला जर आत्मसन्मान हवा असेल कारण की मी पैसा हा बाजारात रग्गड कमवू शकत होते; पण मला त्याच्यात समाधान नव्हतं. कारण त्यात आत्मसन्मान नव्हता. दोन रूपये हातावर ठेवणारा बेवडा ज्याची काहीही योग्यता नाही आहे तो माणूस माझं तळहात खाजवत होता. मला असं वाटायचं की ते खरं शोषण आहे. त्याच्या विरोधात उभं राहिलं पाहिजे. आणि मग याच्या विरोधात उभं रहायचं आहे तर मग कसं उभ राहणार? माझ्या समोर एक मॅपिंग होत. ते मॅप असं होत की चार्तुवर्ण्य व्यवस्था जी आहे ती अशी आहे की ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शुद्र, शुद्रातील अतिशुद्र नारी आणि नारी पेक्षाही शुद्र आम्ही होतो. हे जर गावकुसात पाहिले तर तुमच्या लक्षात येईल की गावाच्या मधोमध ब्राह्मण राहतो त्याच्या आजूबाजूला त्याच्या संरक्षणासाठी क्षत्रिय असतात. आपल्याला असं वाटतं तेच राज्य करतात. त्यांना सेवा पुरविणारे वैश्य, त्यांच्या बाजूला मग शुद्र, शुद्रांच्याही गावकुसाबाहेर आमचं एखादं घर मग मी बाजारांत भीक मागायला जात असेल तर पहिल्यात कुठली घरं लागणार मला तर ती शुद्रांची. आणि बर्याच पातळीवर शूद्र आणि आम्ही समदुःखी होतो. ही गोष्ट तेवढी खरी होती की मी शुद्रांकडूनही शोषित होते. तो भाग वेगळा तरीही त्यातल्या त्यात त्यांच्याकडून कमी प्रमाणांत शोषण वाट्याला येत होत. म्हणून ते मला जास्त जवळचे वाटत होते. म्हणून असं ठरवलं की जर केंद्राकडे हल्ला चढवायचा आपल्याला तर बाह्य स्वरूपात आपल्याला आपली टीम बनवावी लागेल. ती टीम बनविण्यासाठी मी बाबासाहेबांकडे आश्रित म्हणून आले. बाबासाहेबांनी संविधानिक मार्गाने माझ्यासाठी दीपस्तंभाचे काम केले. माझ्या डोळ्यांना झेपेल इतकी तरी वाट किमान मी त्या उजेडाकडे बघते. तो प्रकाश फार मोठा आणि लख्ख आहे. इथे बसलेल्या सर्व विचारवंतांना तो बहुतेक कळेलही पण मी त्या बाबतीत फार अडाणी म्हणून मला जेवढा झेपेल त्या उजेडामध्ये मी चालली आहे वाट़ माझं म्हणणे अंतिम आहे असंही माझं म्हणणं नाही. याच्यात सुध्दा सुधारणा करतील माझ्या येणार्या पिढ्या किंवा मीच करेल बहुतेक़पुढच्या भाषणांत माझं मत वेगळं असू शकेल. आज तरीही बाबासाहेबांना झेपणं माझ्या तरी क्षमतेच्या बाहेर आहे असं मला वाटतं. अशी माझी सुरूवात झाली. मग मी इथल्या शोषित वंचित समुहासोबत स्वतःला जोडून घ्यायला लागले. चळवळीत यायला लागले.
मुळात या अनुषंगाने मला एक गोष्ट सांगायची आहे की, याच्या विरूध्द दिशेला मी गेले असते तर माझं आयुष्य फार सुखकर असतं. अगदी एखाद्या देवाच्या नावाचा भंडारा लावला असता मी तर लोकांनी पाय धूतले असते. त्याचं तीर्थ पिलं असतं. माझ्या एका रूपयाच्या बदल्यात मला गुलाबी दोन हजाराची नोट दिली असती. माझ्या अंगावरून उतरलेले एखादं फुल लोकांनी प्रसाद म्हणून वर्षानूवर्ष जपून ठेवले असते. जे मला मानणारे लोक आहेत किमान त्यांच्या घरात तरी माझा एखादा फोटो असता लोक त्याला अगरबत्ती लावत असते की मेरे दिशा अम्माका फोटो है। उसको हम अगरबत्ती लगायेंगे। मी एखाद्या रथात कुंभमेळ्यात फिरले असते तेही चांदीच्या मस्त रथामध्ये, मलाही कुठेतरी आश्रम टाकायला मस्त जागा मिळाली असती सरकारकडून आणि लोकांनी ओटी भरण्याच्या मोबदल्यात मला भरपूर पैसा दिला असता. हे सगळं दैवीकरण नाकारून मी बाबासाहेबांच बोट धरलं. कारण की मला आत्मसन्मानाची किंमत कळते. ती या सगळ्यांच्या पुढे आहे. आणि म्हणून मी इकडं आले. बर्याच आमच्या मैत्रिणी आहेत ज्या आधीच्या संघर्षाने थकलेल्या आहेत. त्यांना आता नवीन संघर्ष नको आहे. बरेच लोक वैचारिक तत्वज्ञ म्हणतात की, त्यांनी पण बाबासाहेब स्वीकारला पाहिजे पण तस नसतं त्यासाठी खूप मोठी किंमत मोजावी लागते. आधी स्वतःच्या आयडीन्टडीटीचा लढा, त्यानंतर आई-बाबांसोबतचा लढा त्याच्यानंतर समाजासोबतचा लढा आणि त्या लढ्यातन तुम्ही जेव्हा स्टेबल होता. तेव्हा या तिघांकडून होणारे शोषण त्याचा प्रतिकार आणि त्यातून जिवंत राहून तुम्ही जर परत परिवर्तनाची लढाई लढा म्हणत असाल तर फार अवघड आहे, सगळ्यांचं बदलणं शक्य नाही. काही जी चार-दोन परिवर्तनवादी असतील मी कुठे तरी वाचलं होतं, बदलाव करणेवाले हमेशा अल्पसंख्यांक होते है! तशीच ही गोष्ट आहे. परिवर्तनाची भाषा करणारे आम्ही अल्पसंख्यांक पारलिंगी आहोत. अल्पसंख्यांक हिजडे आहोत जे या वाटेवर चालतो आहोत. बाबासाहेबांचे बोट धरून चालतो आहोत. कारण त्यांनी बोट धरलं असतं तर चौका-चौकात दिशा उभी असती. चौका-चौकातल्या दिशांना त्यांनी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद दिलं असतं. पण तसं नाही. मी माझ्या परिनं बाबासाहेबांकडे प्रवास करते आहे. मी माझ्या गुणवत्तेने ते सिद्ध केले आहे. अर्थात ती गुणवत्ता कम्पिट आहे, असंही माझं म्हणणं नाही. तो प्रवास सुरू आहे. पण मला हे म्हणायचे आहे की, एकतर्फा लेनदेणं नही होता है, दोनो तरफ से कुछ ना कुछ तो गिव्ह अॅण्ड टेक चलता है! दुसरी गोष्ट अशी की, याच्याशी जोडलेला जो नैतिक-अनैतिकतेचा संबंध आहे जो पितृसत्ताकतेशी तो ही आता आपण खोडून काढायला हवा. कारण स्त्रियांशी जोडलेली नाते संबंध ही नैतिकतेशी जोडलेली आहेत. हिजडा समुदाय आणि त्यांचे लैंगिक संबंध हे कुठलेही शुद्धीकरणाचे मापदंड पाळत नाही, ते ओलांडतात म्हणून त्यांच्या लैंगिक संबंधांना, त्याच्या जोडीदाराला, त्यांच्या साथीदाराला, त्यांच्या पार्टनरला हे लोक नैतिक नातं म्हणून स्वीकारत नाहीत. आता सुप्रीम कोर्टात जी एलजीबीटी मॅरेज अॅक्टची लढाई सुरू आहे. ती तुमच्या नजरेत आणून द्यायचा मी या निमित्ताने प्रयत्न करते आहे. की, काय लढा आहे हा? बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की, या देशात प्रत्येकाला आपला जोडीदार निवडण्याचा अधिकार आहे. कोण-कोणाच्या बेडरूममध्ये राईट टू प्रायव्हसिच्या अंतर्गत काय करते हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. जोपर्यंत कुणी कुणाला हिंसा करत नाही तोपर्यंत बाजूच्यांना हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही. हे स्वतः बाबासाहेबांचे संविधान सांगते. तरीही लोकांना आमच्या नातेसंबंधांमध्ये ढवळाढवळ करायची आहे. म्हणजे आम्ही बेडवर कसे आहोत? कोण कोणता रोल करते आहे? आमच्या नात्यातून लेकरं जन्माला येतात का? नाही येत तर मग का येत नाहीत? जर आले तर ते नाते अनैतिक कसे आहे? यावर फार लोक भर देतात. परंतु मला असे वाटते की, तुम्हाला एखाद्या व्यक्तीचा सहवास हवाहवासा वाटतो, ती व्यक्ती आजारी असताना तुम्हाला तिची काळजी वाटते, किंवा तुम्ही आजारी असताना त्या व्यक्तीला तुमची काळजी वाटते. तुमच्या वाढदिवसाला ती व्यक्ती एक्साईटेड आहे म्हणजे एकदम आयुष्यातील छोट्या-छोट्या गोष्टी ज्याला तुम्ही नवरा बायकोचं नातं म्हणता ते नातं जर दोन पुरूषांमध्ये, दोन महिलांमध्ये किंवा एका पारलिंगी पुरूषामध्ये असेल किंवा कुणाहीमध्ये असेल, दोन व्यक्तींमध्ये हे नात असेल तर आपल्याला काय हरकत आहे. आपल्याला मेथीची भाजी आवडते म्हणून अख्या जगाला मेथीची भाजी आवडली पाहिजे हा जो अट्टाहास आहे तो आपण सोडला पाहिजे. आणि ज्यांना मेथीची भाजी नाही आवडत त्यांच्या व्यक्तीस्वांतत्र्याचा आणि रूची स्वातंत्र्याचा आपण आदर केला पाहिजे. त्यांच्या हक्कासाठी सुप्रीम कोर्टावर दबाव आणला पाहिजे. की यांचे प्रकरण लवकरात लवकर मार्गी लागले पाहिजे. खरं तर मी एलजीबीटी विवाहाच्या विरोधातच आहे. पण तरीही सरकार देत आहे म्हणून ते मिळणेही गरजेचे आहे. कारण खाल्यानंतर ते खराब आहे म्हणणं वेगळी गोष्ट आहे आणि न खाता खराब आहे म्हणून सोडून देणं चुकीचं आहे. त्यामुळे आम्हाला विवाह संस्था हवी आहे, एकदा भेटल्यानंतर मग आम्ही तीला नाकारू. खरं म्हणजे विवाह संस्था हीच मुळात शोषणावर डिपेंड आहे. कम्युनिटीला एकदा विवाह संस्था मिळाली पाहिजे. यातून प्रतिगाम्यांचचं भलं होणार आहे, हे नाकारून चालणार नाही. कारण यामुळे विवाह संस्था बळकट होतील आणि हजारो मुला-मुलींसोबत जो छळ सुरू आहे ना हॅड्रोसेक्शोअल तो ही थांबेल. म्हणजे बघा जर एखादा गे आहे त्याला मुली आवडतचं नाही त्याच्या घरचे जबरदस्ती त्याचे लग्न लावून देतात. मग त्या मुलीला तो सांगू शकत नाही की मी गे आहे म्हणून. परंतु तुम्ही तुमच्या सोकॉल्ड मुलाला सुधरवण्यासाठी त्या मुलीचं आयुष्य खराब करता. किंवा एखाद्या लेस्बिन मुलगी असेल तिला मुलं आवडतचं नाही. त्या मुलीचं जर तुम्ही एखाद्या मुलासोबत लग्न लावून दिलं तर त्या मुलीसाठी प्रत्येक रात्र ही बलात्काराची रात्र आहे. तिचा नवरा काय तिची रोज परमिशन घेत बसणार नाही. आणि हा बलात्कार समाजमान्य बलात्कार आहे. या समाजमान्य बलात्काराचे सगळे आई-बाप समर्थक आहेत. तुमची मुलं ही तुम्ही आजपर्यंत त्याच्यावर केलेल्या उपकराच्या दबावाखाली येऊन तुम्ही पाहिलेल्या मुलीला किंवा मुलाला होकार देतात. आणि तुम्ही त्याला होकार समजता. कारण प्रत्येकावर एक नैतिक प्रेशर असतं की, आई-बाबांनी लहानाचं मोठं केलं, तुम्हाला आता त्यांचं म्हणणं पाळलं पाहिजे. आणि त्या नैतिक दबावापोटी दिलेला होकार सामाजिक बलात्काराची अधिकृत पावती आहे. ज्याच्यामध्ये बाप स्वतः हजार-पाच हजार लोकांना बोलावतो आणि त्यांच्यासमोर आपली मुलगी तिला न आवडणार्या मुलासोबत पाठवतो. आणि त्यानंतर तिच्यासोबत जे होतं त्याला माझ्या तरी व्याख्येत समाज स्वीकृत बलात्कार आहे. आणि ह्या समाज स्वीकृत बलात्काराला माझी लोक नाकारतात, माझी हिजडा कम्युनिटी नाकारते. म्हणून आम्ही गावकुसाच्या बाहेर आहोत. आम्ही तुमचं रक्तशुद्धीचं मापदंड नाही सांभाळत, आम्ही तुमचं योनीशुद्धीचं मापदंड नाही सांभाळत, आम्ही तुमचं वंश, वारसा, रूढी-परंपरा, संस्कृती, संस्कार या सगळ्यांना आम्ही आमच्या पद्धतीने नाकारायला सुरू केली, सुरूंग लावायला सुरूवात केली म्हणून तुम्हाला आम्ही नको आहोत. आणि म्हणून आम्ही त्यातून बाहेर पडलो आहोत. याचा परिणाम म्हणून काय झाले आमच्यासोबत? आमचे जे बेसिक अधिकार होते अन्न, वस्त्र, निवारा, चांगला मृत्यू हे सुद्धा इतिहासात काढून घेण्यात आलेले आहेत. म्हणजे बघा खायचे तर हाल होतेच, राहायचे पण हाल होते. कारण का आमच्याकडे जमिनी नव्हत्या. मग ज्याच्या जमिनीवर राहायचं तो कधी पण येणार काही पण करणार. समजा एखाद्या देवळात देवीची देवदासी म्हणून राहीलं की तिथे ही कोणीतरी उपभोग घेणार याचा इतिहास साक्षीला आहे. एखाद्या राजाच्या राजवाड्यात राहीले तर ते ही काय करत होते ते ही जगजाहीर आहे. शोषण अटळ होत आणि या शोषणाला बळी पडलेली आमची ही पिढी पुढे-पुढे येत आता कुठे तुमच्यासमोर बोलायला लागली आहे. स्मशानसुद्धा नव्हतं आमच्याकडे स्वतःचं. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरसुद्धा स्मशानभूम्या एक झालेल्या नाहीत. या समाजाची स्मशानभूमी वेगळी, त्या समाजाची स्मशानभूमी वेगळी तर मग विचार करा, पन्नास-साठ वर्षापूर्वीची काय परिस्थिती असेल? मग हिजडा समुदाय जो संख्येने एक, दोन, पाच, दहा असा असणार गावामध्ये, शहरामध्ये यांना यांच्या हक्काची स्मशानभूमी कोण देणार? आणि आजही हिजड्यांच्या हक्काची स्मशानभूमी कुठेच नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या धडाची विटंबना करता येणार नाही असा कायदा करून ठेवला म्हणून आम्हाला सन्मानपूर्वक जाळायला किंवा पुरायला आता जागा मिळायला लागली आहे. मी म्हणते तुम्ही तुमच्या आईच्या गर्भामध्ये एक महिन्यापासून असताना तर तुमच्या मेल्यानंतर तुमच्या राखेला सुद्धा कोणीही लाथ मारू शकत नाही, त्याला सुद्धा विटंबना मानलं जातं. इथपर्यंत बाबासाहेब आंबेडकर तुमच्यासोबत खंबीरपणे उभे आहेत. तुमच्या येण्यापासून ज्याण्यापर्यंत बाबासाहेब तुमचं लिगल प्रोटेक्शन करतात. तुम्हाला आत्मसन्मान आणि सुरक्षा देतात आणि ती लढाई खरं तर आमची आजही सुरू आहे. बाबासाहेबांनी दिलं. बाबासाहेबांना मानणारी लोक देत नाहीत बर्याचवेळा, आणि बाबासाहेबांना न मानणारी लोक तर त्यांच्याकडून अपेक्षाच नाही. त्यांच्याकडे तर काही घेणं-देणं नसतं. किंवा जिथे चर्चा होईल तिथं तरी आपण हे बोलू शकतो कारण की आपल्याकडेही पितृसत्ता आहे.
आपण आजही बायकांकडे कसं बघतो याच आत्मपरीक्षण या रमाई साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आपण करायला हवं आम्हाला कुठली रमाई आवडते मग ‘नांदण नांदण असं रमाचं नांदण’ हीच रमाई आम्हाला आवडते. जरी होती गरीबी आणि मग गरिबीत हाल काढणारी रमाई, मग ती वाट बघणारी रमाई आवडते. पण मला रमाई आवडते ती वरळीच्या बाजारात गोवर्या नेवून विकणारी रमाई. जी स्वतःच्या नवर्याच्या शिक्षणासाठी १४ रूपयाची मनीऑर्डर करते. आणि स्वतः आर्थिक स्वावलंबनाचं बायकांस्ामोर उदाहरण ठेवते ती रमाई आवडते. मला ती रमाई आवडते जी बाबासाहेबांना आमची काळजी करू नका. इकडं मी सर्व सांभाळते अशी बिनधडक सांगते. तेवढी नीडर, व्यवहारी, सक्षम आणि संघर्ष करणारी स्त्री रमाई आपण केव्हा स्वीकारणार आहोत. जी आपण स्वीकारली आहे ती आपल्याला स्वीकारायला जड जाणार आहे. कारण की ती आपल्या मेल इगोला हर्ट करते. आणि त्या मेल इगोला हर्ट करते म्हणून ती आपल्याला नको. तर आजच्या या दिवसानिमित्त किमान आपण त्याच्यावर आत्मपरिक्षण कराल ही अपेक्षा.
आता हे झालं ट्रान्सजेंडरचे जगणं काय आहे. तर वर्तमान काय आहे हे मी तुम्हाला सांगते. २०१४ ला मान्यता मिळाल्यानंतर ट्रान्सजेंडर वेलफेअर बोर्डाची स्थापना झाली. २०२० मध्ये तृतीयपंथीय हक्काचे संरक्षण आणि कल्याणकारी मंडळ स्थापन झाले. नाव फार मोठं आहे. यांच्या नावाच्या कितपत काम झालं आहे हा भाग वेगळा. या मंडळाची स्थापना होवून आत्ता २०१४ ला बातमी आली होती. तीन वर्षापूर्वी याची स्थापना झाली. २०१७-१८ लाच झाली बहुतेक लॉकडाऊनच्या काळामध्ये यांनी आमचं फार मोठ नुकसान केलं. आम्हाला महिला बाल विकासामधून काढलं आणि समाजकल्याण मध्ये टाकलं. समाज कल्याणमध्ये टाकलं. अधिकारी हुशार आहेत पण त्यांच्याकडे धोरणं नाहीत त्यांना धोरण दिले नाहीत. सरकारने किंवा त्यांनी जे वरती धोरणं पाठविले ते पास करून मिळाले नाही. त्याचा परिणाम असा झाला की लॉकडाऊनमध्ये जिथे सारं जग मोठ्या संकटाला तोंड देत होत. सरकारने रिक्क्षावाल्यांना पैसे दिलेत. माथाडी कामगारांना पैसे दिलेत. फार मदत नव्हती ती फार किरकोळ मदत होती. तरीही मदत मिळाली त्यांना. फक्त ट्रान्सजेंडर समूह होता त्यांना कोणतीही शासकीय मदत मिळाली नाही. कारण की राज्याकडे ट्रान्सजेंडरचा समूहाचा कोणताही आकडा नाही, त्यांच्यासाठीचे धोरण नाही. पहायला गेलं तर नव्वदीपासून राज्यामध्ये ट्रान्सजेंडर धोरणात्मक पातळीवर मागच्या ट्रान्जेडर वेलफेअर बोर्डाच्या स्थापनेनंतर किती धोरणं आली. तर विचार करा, एक बीज भांडवल योजनेचे धोरण आलं. ज्याची कुठलीही परिभाषा शासनालाच स्पष्ट नव्हती. की हे बीज भांडवल कुणाला देणार? किती देणार? त्याच्यासाठी शिक्षणाची पात्रता काय? त्याच्यासाठी बेसिक काय? जमीन पाहिजे की दुसर्या गोष्टी पाहिजे. हे काही स्पष्ट नव्हते. त्यामुळे एकाही पारलिंगीला बीजभांडवल मिळालेलं नाही. त्यामुळे आलेला पाच कोटी रूपयांचा निधी परत गेला. नंतर पुन्हा पाच कोटी रूपयांचे बील आले त्यामध्ये शासनाने सहा संस्थांना ते पैसे दिले. आणि सहाही संस्थांचा पारलिंगींशी काहीही एक संबंध नव्हता. पारलिंगींशी नसला तरी पदाधिकारी व आमदार-खासदारांशी होता हा भाग वेगळा. आम्ही वेलफेअर बोर्डाच्या राज्य कमिटीवर असताना आम्हालाही माहिती नव्हते की पैसे नेमके कुणाला दिले. आठ महिन्यांनंतर थेट कागद हातात आला. तिसरी गोष्ट अशी की मतदान यादीमध्ये फक्त चार ते साडेचार हजार पारलिंगींचेच मतदान आहे. तर कम्युनिटीशी चर्चा देखिल शासनाने केली नाही, ज्याच्याबद्दल आम्ही वारंवार आग्रही होतो. की एक सेfिन्सटीव्हीटी प्रोग्रॅम करा ज्याच्यामध्ये लोकांमध्ये जावून लोकांना सांगणे मतदान करणे गरजेचे का आहे? भारतीय नागरिकत्वाची गरज काय आहे? त्याला आपण कसे जोडून घेतले पाहिजे. एनआरसी, सीएएचा कायदा आला. त्यावेळेस कम्युनिटीला माहिती नव्हतं की या कायद्यामुळे आपले काय नुकसान होणार आहे. पण जेव्हा आसाममध्ये दोन हजार पारलिंगींचे नाव एनआरसी सीएएच्या यादीमध्ये आले त्यावेळी मी आणि माझ्या काही मैत्रिणी आम्ही वेड्यासारख्या या आंदोलनात उतरलो. पार दिल्ली, कलकत्ता, महाराष्ट्रातील कानाकोपरा जितका शक्य होता. कारण आम्ही काही नोकरीला नाही. भीक मागायचे अन् फिरायचं. जेवढं शक्य होतं तेवढं आम्ही फिरलो. ही सगळी राजकीय धोरणं मी तुम्हाला सांगते की जी पूर्णतः अंध आहे. ही अंधारात पूर्णतः चाचपडत फिरणारी योजना आमच्यापर्यंत कधीच येणार नाही. यांना आम्ही डोळे देवून देवून थकलो पण यांना आम्हाला घ्यायचं नाही. आम्हाला ते टेक्निकल अडचणींमध्ये अडकवतात. शिक्षणाच्या बाबतीत यांचे कुठलेही राजकीय धोरण नाही. आम्ही तीन चार नव्हे तर २०१४ पासून मी सरकारला सांगते आहे की, महाराष्ट्राने पारलिंगींकरीता वेगळं शैक्षणिक धोरण आखलं पाहिजे. ज्याच्यामध्ये पारलिंगी जसे की मी, माझं दहावीपर्यंत वेगळं नाव होतं. नंतर मला पुढचं नाव वेगळं ठेवायचं होत. त्यासाठी राजपत्र करा, आम्हाला पुढची प्रक्रिया माहिती नाही. यासाठी वन विंडो प्रोग्रॅम असायला हवा. केरला स्टोरीजच्या नावाखाली तुम्ही वेगळं काय काय दाखवताय परंतु हे पण सांगा की, केरळमध्ये वनविंडो प्रोग्रॅममध्ये पारलिंगींना त्यांच्या कागदपत्रांमध्ये लगेच आठ दिवसांमध्ये नाव बदलून कसे मिळतात. आणि त्यांना कसे स्टेबल केल्या जातं. त्यांना उद्योगासाठी लगेच लोन दिलं जातं, जागा दिली जाते. तसं आपल्याकडे काही नाही आहे. तर हा वनविंडो प्रोग्रॅम आपल्याकडे आला पाहिजे त्या संदर्भाने आपण बोलतो आहोत. एक शैक्षणिक धोरण असले पाहिजे. ज्यामध्ये होस्टेल प्रâी मिळाले पाहिजे. शैक्षणिक कालखंडामध्ये उदरनिर्वाहासाठी स्कॉलरशिप/फेलोशिप मिळाली पाहिजे. आणि ते हॉस्टेल वेगळे हिजड्यांस्ााठी नको आहे आम्हाला. आम्हाला संयुक्त, एकत्रित हवे आहे कारण आम्हाला प्रवाही व्हायचे आहे ना? मेनस्ट्रिममध्ये यायचे आहे. तर आम्हाला वेगळं हॉस्टेल देणार म्हणजे लोकांना माहिती आहे ते हिजड्यांचे हॉस्टेल आहे. चला दगडफेक करू, किंवा अर्ध्या रात्री जावून आक्रमण करू. आत्ताच दिल्लीच उदाहरण तुम्हाला सांगते. जिथे गरिमागृह आहे त्या गरिमागृहावर स्थानिक गुंडांनी अर्ध्या रात्री आक्रमण केले. आणि तिथल्या हिजड्यांना बेदम मारहाण केली. तर आम्हाला असे वेगळे अड्डे का करून देत आहात तुम्ही? तसे न करता समाज कल्याणच्या हॉस्टेलमध्ये काही जागा हिजड्यांसाठी राखीव असाव्यात. म्हणजे त्यांना सामाजिक सुरक्षापण मिळेल आणि ते मेनस्ट्रीममध्येही राहतील. जेवायला, बसतांना, उठतांना त्यामुळे सामाजिक मैत्रीभाव वाढेल असे मला वाटते. परत एक गोष्ट आहे जी महत्वाची आहे आणि मी वारंवार सांगते असते ती म्हणजे, आरक्षणाची. आरक्षणासाठी काय काय कॅटेगरी लागतात? तर तुम्ही आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या दुर्बल असले पाहिजे. तुम्ही संख्येने अल्पसंख्यांक असले पाहिजे. या सगळ्या पातळ्यांवर पारलिंगी समूह बसतो. कारण ते आर्थिक, शैक्षणिकदृष्ट्या मागासलेले आहेतच यासोबतच ते सामाजिकदृष्ट्या आजही अस्पृश्य मानले जातात. जरी लोक आशीर्वाद घेत असले तरी सामाजिक अनटचेबीलीटी आहे.
कुणीही देवाला नवस करत नाही की माझ्या घरामध्ये हिजडा जन्माला यावा म्हणून. आशीर्वादाला हिजडा लागतो, पूजेला हिजडा लागतो, तो घरात पाय फिरवून गेला तर घरात बरकत येते. हिजड्याने ओटी भरली तर लेकरं बाळं होतात. पण हिजडा जन्माला येऊ नये कुणाच्या पोटी. हिजडा जर एवढा चांगला आहे तर मग त्याला स्वतःच्या पोटी का बरे मागत नसतील कुणी? कुणी एखाद्या देवीला गुडघ्याने चालून नवस का करीत नाही? मुलगा मागतात, मुलगी मागतात हिजडा का मागत नाहीत? हा एक मला पडलेला प्रश्न आहे. असो,
शैक्षणिक धोरण नाही. राजकीय आरक्षण नाही. राजकीय, आर्थिक, शैक्षणिक या सर्व प्रकारचे आरक्षण पारलिंगी समुहांना मिळाले पाहिजे. जर महिला धोरणात तुम्ही घेत नसाल तर याच्या संदर्भाने वेगळं धोरण महाराष्ट्र शासनाने जाहीर करावे. ज्यामध्ये पारलिंगी समुहाच्या सर्वसमावेशक उत्थानाच्या भूमिका स्पष्ट असतील. आता यासोबत सिग्मा आणि डिस्टिनेशनचा मोठा पल्ला आपल्याला अभ्यासावा लागेल. शिकलेल्या ट्रान्सजेंडर्सना नोकर्या आहेत का? बरं ज्यांना नोकर्या आहेत त्यांना कामाच्या ठिकाणी असलेलं धोरण बरं आहे का? कारण की बर्याच वेळेला ज्यांच्या सोबत काम करायचे आहे त्यांना ट्रान्सजेंडर म्हणजे काय? हे माहिती नसल्यामुळे त्यांचे कामाच्या ठिकाणी शोषण आणि त्यांची बदलती मानसिकता आणि यातून त्यांना सोडावे लागणार्या नोकर्या यांची मोठी संख्या आहे. याची काही उदाहरणे तर मलाच माहिती आहेत की, आमची एक मैत्रिण वूमन्स स्टडी सेंटर मधून शिकली त्यानंतर ती कामाला लागली. आणि त्यानंतर तिने ते काम सोडलं. तर ती जी मानसिकता कामाच्या ठिकाणी येणार्या ट्रेसला कसं मेन्टेन करायचं, लोक त्यांच्याकडे कसं बघतात तर यासंदर्भाने शासनाचे काही धोरण आहे का?
जसं एक महिला सुरक्षा समिती असते. त्याच्यामध्ये पारलिंगी सुरक्षा समिती आहे का? किंवा पारलिंगींचा त्यामध्ये समावेश केलेला आहे का? हे शासनाने तपासून पहायला हवे. हे झालं आरक्षण आणि सुरक्षिततेच्या बाबतीत. आर्थिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक या संदर्भाने मी बोलले. आता एक महत्वाचा मुद्या मला बोलावासा वाटतो तो म्हणजे गृहीतके, रूपके आणि साहित्य. आपण साहित्य संमेलनामध्ये बोलतोय त्यामुळे हे विषय फार महत्त्वाचे आहेत. हिजडा समुहाबद्दल साहित्यिकांची गृहीतके काय आहेत? ते त्याच्याकडे कसं बघतात? कारण की चांगलं बघत असते तर त्यांच्या कथा, कविता, कादंबर्यांमध्ये हिजडा शिवी म्हणून आला नसता. तो अगदी सन्मानाचा शब्द म्हणून आला असता. या निमित्ताने मला तुम्हाला सांगायचे आहे की, हिजडा म्हणजे हिङ्का आणि राड हा एक अरबी भाषेतील शब्द आहे. त्यातून हा शब्द तयार झाला आहे. ज्याचा अर्थ होतो वाट्याळ्या किंवा समुहातून बाहेर निघालेला किंवा समुहातून बाहेर काढलेला किंवा समुहातून बाहेर पडून वेगळी वाट निवडणारा. आता बघा तुम्ही समुहातून वेगळी वाट निवडणारे किती तरी लोक आहेत, ज्यांना आपण परिवर्तनवादी म्हणतो. मग हिजड्यांचाच अपमान का? तर साहित्यिकांनी या गृहितके आणि रूपकांच्या बाबतीत गांभिर्याने विचार केला पाहिजे. जुन्या साहित्यामध्ये जर असे उल्लेख असतील तर आपण त्याचा स्वीकार आणि आदर केला पाहिजे़ कारण त्या काळात पारलिंगींची स्थिती वेगळी होती. परंतु आता ती रूपकं तशाच पद्धतीने वापरायची का? पारलिंगींच्या संदर्भाने तसंच आग्रही राहायचे का? की परिवर्तन करायच? एक छोटसं उदाहरण सांगते की, वामनदादा कर्डक यांचे एक गाणे आहे त्यामध्ये ते म्हणतात की,
ढोल ढपुले पुरूष आपले,
बांगडीत गुंतले गं’’
पुढारी आपले सारे गुंतले,
बाळ्या बुगड्या मधी गं’’
तर वामनदादांचे हे वाक्य आमच्या एका मित्राला खटकले. कारण ते बायकांशी जोडले आहे. त्याने ते बदलून त्या गाण्यामध्ये दुरूस्ती केली. आता तो जेव्हा गाणं म्हणतो तेव्हा दुरूस्त केल्याप्रमाणे म्हणतो. आता ही दुरूस्ती त्या गाण्यातील मूळ गाभ्याशी छेडखानी आहे का? तर नाही. त्या गाण्यातील एक शब्द जो वामनदादांनी आपल्या आकलन क्षमतेप्रमाणे लिहितांना जरी बरोबर लिहिला असला, त्याकाळात जरी तो लागू पडत असला तरी आता आपण लिंग भेदभावाबाबत जागृत झालो आहोत म्हणून आता आपण ते बदलले पाहिजे. बरेच असे उदाहरणे आहेत ज्यामध्ये पूर्वजांनी त्याच्यामध्ये हिजडा हा शब्द किंवा बायकांची उपमा ही फार दुय्यम अशी दिलेली आहे. त्याला आपण बदलले पाहिजे आणि आपण लिहिताना अशा प्रकारच्या उपमा कुणालाही देणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे. हे झालं साहित्यिक स्वरूपामध्ये.
दुसरं आहे शैक्षणिक साहित्यामध्ये काय ढवळाढवळ चालली आहे यावर आपण लक्ष ठेवले पाहिजे. म्हणजे बघा स्वयंपाक करणे ही केवळ बायकांची जबाबदारी आहे. हा जो काही पिढ्यान्पिढ्या चालत आलेला रूढीवादी दृष्टीकोन आहे. तो पुसण्याचे काम आताच्या स्त्रीवादी महिला करताहेत. विज्ञानाच्या सातवीच्या पुस्तकामध्ये कढईत पुर्या तळणारी एक महिला दाखविण्यात आली. ती बदलावी म्हणून काही स्त्रीवादी संघटनांनी पाठपुरावा केला. महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण विभागाला सांगितले की, हे चित्र येथे बरोबर नाही. स्वयंपाक करणे ही काही कुठल्या जेंडरची मक्तेदारी नाही. किंवा कुठल्याही जेंडरवर हे लादलेलं नाही. त्यामुळे बाईचे चित्र का दखवत आहात? तुम्ही यामध्ये बदल करावा, हे चित्र काढून टाकावे. तर शासनाने, शिक्षण विभागाने काय केलं. तिथून ती बाई हटवली, कढई मात्र ठेवली. त्या कढईमध्ये झारा धरलेला हात दाखवला आणि त्या हातामध्ये बांगडी दाखवली. तर ही जी मानसिकता आहे, चित्रांमधून ज्या पद्धतीने जेंडर जातं, कथांमधून ज्या पद्धतीने जेंडर जातं, कवितांमधून ज्या पद्धतीने जेंडर जातं म्हणजे मला असं वाटतं की, मी सकारात्मक रूपकं वापरलेला हिजडा हा शब्द पहिल्यांदा नामदेव ढसाळ यांच्या कवितेमध्ये पाहिला ते म्हणजे की, ‘हिजड्यांनी झगे वर केले, हिजडे आभाळ झालेत’ म्हणजे हिजड्यांना आभाळाची उपमा देणारा नामदेव ढसाळ मला फार जवळचा वाटतो. हे याआधीही मी मांडले आहे. तर साहित्यिक, शैक्षणिक, राजकीय भाषेत जे एकमेव मला असं वाटतं की अॅड. बाळासाहेब आंबेडकर आता आणि पूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भाषणं जर तुम्ही पाहिली तर हे कुणाच्या आईचा, बहिणीचा उद्धार करताना तुम्हाला दिसत नाहीत. कुणाला लिंग आणि त्याच्या लिंगसापेक्ष भावनांना दुय्यम लेखण्याचे काम कुठेही करताना दिसत नाहीत. बाबासाहेबांनी तर त्यांच्या एवढ्या पुस्तकांमध्ये एकाही विरोधकाच्या विरोधामध्ये क्रोधित शब्द वापरलेला नाही. ज्याच्यातून ते आई-बहिण किंवा पितृसत्ता झळकेल असा एकही शब्द त्यांच्या एवढ्या ग्रंथामध्ये तुम्हाला सापडणार नाही. बरेच लोक आता म्हणतात की, संविधानामध्ये राष्ट्रपती हा शब्द आहे. मग तो पुरूषी आहे. म्हणजे मला असे वाटते की, ते समकालीन आणि त्या सभागृहात जे लोक होती त्या सगळ्यांशी चर्चा करून प्रातिनिधीक स्वरूपात ते आलं. परंतु आज जर बाबासाहेब असते तर त्यांनी त्या शब्दांना सुद्धा पर्याय नक्की दिले असते.
आता या सगळ्या गोष्टी लक्षात आल्यानंतर वंचितांची दिशा कुणीकडे गेली पाहिजे. याच्यावर आज दिवसभर तर चर्चा होणारच आहे. परंतु तरीही मला असं वाटते की, वंचितांची दिशा हा शब्द बोलत असताना आपण या हिजडा, पारलिंगी समुहाला वंचित या व्याख्येत समाविष्ट करू शकलो तरी आपल्या परिने लिंगभाव समानतेच्या दिशेने टाकलेलं हे महत्वाचं पाउल आहे. असं मला वाटतं. त्याचसोबत डोळे उघडे ठेवून शैक्षणिक, राजकीय, सामाजिक आणि साहित्यिक भाषेवर लक्ष ठेवणं, त्यात लिंगभावाच्या नेनिवेला अभ्यासून शब्दांची तपासणी करणं, चुकीच्या शब्दांना चूक म्हणायला शिकणं मला असं वाटतं की मोठी क्रांती ठरेल. राज्य शासनाच्या निष्क्रियतेला त्या समुहाची संख्या उत्तर विचारण्याला कमी ठरू शकते. पण आपण आंबेडकरी म्हणून या समुदायाच्या आंदोलनांमध्ये सहभागी होऊन वेळीच नेतृत्व करून या समुदायाच्या प्रश्नांना सोडवलं पाहिजे. जसं की, आज महाराष्ट्रामध्ये फार महत्वाचा विषय सुरू आहे.
आज महिलांसाठी हाफ टिकिटाची सुविधा शासनाने सुरू केलेली आहे. बरेच कंडक्टर तृतीयपंथी महिलांना ही सुविधा लागू नाही, म्हणून बसमध्ये चार चौघात तृतीयपंथीयांचा अपमान करतात. जर साधारण पन्नास टक्के सूट असलेल्या तिकिटामध्ये बायकांच्या ठिकाणी तृतीयपंथीयांना तुम्ही संधी देवू शकत नाही तर मग पोलिस भरतीसारख्या महत्वाच्या विषयामध्ये तृतीयपंथीयांची स्पर्धा बायकांशी कशी लावू शकता? कारण जेव्हा पारलिंगी आणि हिजडा समुदायाची आमची एक मैत्रिण निकिता पोलीस भरतीत फार्म भरायचं म्हटलं तर तिला सांगण्यात आले की, तुम्ही महिलांच्या जागेवरून फार्म भरू शकत नाही. बाजारात किंवा जत्रा, यात्रांमध्ये नाचणारा एक हिजडा दोन-दोन रूपये जमा करून तिने कोर्टात याचिका दाखल केली. कोर्टाने महाराष्ट्र शासनाला ऑदरचे कॉलम सुरू करण्याचे आदेश दिले. मॅटने तो निर्णय दिला. देवेंद्र फडणविसांचे गृहखाते त्या निर्णयाच्या विरोधात हायकोर्टात गेले. तेथे ही या मागणार्या हिजड्याने न्यायाची लढाई लढली. आणि सरकारवर दबाव आणून प्रवेश प्रक्रियेमध्ये ऑदरचा कॉलम सुरू केला. उद्या पेपर आणि आदल्या दिवशी हॉलतिकिट मिळालं. शारीरिक चाच्ाणीचे निकष, उद्या मैदानात जायचं. आदल्या दिवशी रात्री निकष मिळाले. अशा परिस्थितीत ५८ मुली प्रवेशपात्र ठरल्या. पण महाराष्ट्र शासनाने मात्र फार्म भरताना ऑदरचा कॉलम लावायचा म्हणून लागवला. मेरीट मात्र पुरूषांमध्ये लावले किंवा महिलांमध्ये लावले. पारलिंगींचे वेगळे मेरीट लावले नाही. ज्याच्यामुळे महाराष्ट्रातील एकही पारलिंगी प्रवेशास पात्र ठरत नाही. यासाठी आम्ही किती दिवस मागणी करतोय, आंदोलन करतोय, पण हा समुदाय संख्येने कमी असल्याने आंदोलन मोठ्या संख्येने होत नाही. जर तुम्हाला आम्हाला बायकांच्या सुविधा द्यायच्या नाहीत तर आमचं मेरीट सुद्धा वेगळं असलं पाहिजे. आमची स्पर्धा ही आमच्या सोबत असली पाहिजे. एक समांतर आरक्षणाची मागणी या समुदायासाठी आपण आंबेडकरी म्हणून केली पाहिजे, असं मला वाटतं. या सोबतच मित्र म्हणून, शेजारी म्हणून, समाज म्हणून पारलिंगींसोबत प्रेम, आपुलकी, जिव्हाळा हे तर असलेच पाहिजे पण यासोबत एक आत्मसन्मान देणारी मैत्री फार महत्वाची आहे. आपण आपल्या वागण्यातून, बोलण्यातून, लिहिण्यातून एखाद्यापुढे येऊ पाहणार्या पारलिंगीला डिमोरलाईज तर करत नाही आहोत ना? त्याला जेंडर कार्ड खेळते किंवा खेळतो म्हणून आपण त्यांना परत बॅकफुटवर तर नेत नाही आहोत ना? एक प्रतिगामी संघर्ष करून हे परिवर्तनाच्या वाटेवर आलेले वाटसरू, आपण वावरात आलेल्या पाखरांना गुल्लेराने दगड मारून भिरकावून लावावं तसं परत यांना भिरकावून तर लावत नाही ना? परत पाठवत तर नाही ना? याचा विचार आपण केला पाहिजे. आणि यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. पारलिंगींसाठी अभ्यासवर्ग घेतले पाहिजे. ते काही सहजासहजी तुमच्या क्लासला येऊन बसणार नाहीत. त्यासाठी तुम्हाला तारेवरची कसरत आणि सातत्याने संघर्ष करावा लागणार आहे. शिक्षित आणि सक्षम पारलिंगी शोधावे लागतील आणि त्यांचे अभ्यासवर्ग घ्यावे लागतील. प्रातिनिधी स्वरूपामध्ये प्रतिनिधीत्वाचे राजकारण समजून घेत लोकांना क्वॉलिटीच्या नाही तर किमान कॉन्टिटीच्या लेवलला सर्वप्रथम प्रतिनिधीत्व द्यावं लागेल. आणि मग त्यानंतर गुणवत्तेच्या बाता आपण करू शकू. पण सर्वप्रथम प्रतिनिधीत्व मिळणं गरजेचे आहे. ही सगळी धोरणं फेसबुकमधील पोस्टीमध्ये किंवा आपण लिहिलेल्या एका रिसर्चच्या पुस्तकातच न राहता. आपण काम करतो त्या जागेच्या कृती आराखड्यात यायला हव्यात. असं मला वाटतं. मी फार आशावादी आहे आणि म्हणून मी फार जास्त अपेक्षा ठेवते. त्यातल्या त्यात आंबेडकरी समुदाय हा माझा समुदाय आहे. मी निवडलेली वाट आहे. या वाटेवरचे वाटसरू हे माझे कुटुंब आहे. कुटुंबात माणसं भांडतात, हट्टाने एकमेकांकडे काहीतरी मागतात, तुम्हाला माणूसपण मिळून ७५ वर्षे झाली. बाबासाहेबांनी जे आपल्याला दिले ते माझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी २०१४ उजडावं लागलं. त्याअर्थी लोकशाहीमध्ये माझा जन्म फार उशिरा झालेला आहे़ तुम्ही माझी मोठी भावंड आहात. चुकीच्या ठिकाणी कान धरला तर मला छान वाटेल पण माझ्या रडण्याकडे लहान मुलाचे रडणे म्हणून दुर्लक्ष करू नका. कारण मी सूचक रडायला शिकली आहे. ही बाबासाहेबांची करामत आहे. या सूचक रडण्याचा टाहो होईल, त्यातून क्रांती होईल आणि त्या क्रांतीचे परिवर्तन पाहण्यासाठी आपण सर्व असू या आशेसोबत थांबते,
जयभीम...!