Home > मॅक्स ब्लॉग्ज > विचारधारा हरवलेला पक्ष

विचारधारा हरवलेला पक्ष

विचारधारा हरवलेला पक्ष
X

जगातील सर्वांत मोठा पक्ष सध्या तडफडतोय. विस्तारवादी भूमिका घेतलेल्या भारतीय जनता पक्षाने आता इतर पक्षांवर आपला दावा सांगायला सुरूवात केली आहे. भारतीय जनता पक्षाने क्षेत्रीय पक्षांसोबत युती-आघाड्या करून विविध राज्यांमध्ये आपलं बस्तान बसवलं. आज देशभरात निष्ठावंत भाजपा नेत्यांना बाजूला सारून भारतीय जनता पक्षाने आयात केलेल्या नेत्यांना, पक्षांना रेड कार्पेट ट्रीटमेंट देण्याची भूमिका स्विकारली आहे. महाराष्ट्रात ही काही वेगळी स्थिती नाही.

महाराष्ट्रात स्वबळाबर सत्तेत येण्याची भारतीय जनता पक्षाची इच्छा पूर्ण झाली नाही. २०१४ ला आधी राष्ट्रवादीचा बाहेरून पाठींबा आणि त्यानंतर शिवसेनेसोबतचं सरकार भाजपाने चालवलं. पण भाजपाने सत्तेमध्ये शिवसेनेला फार भाव दिला नाही. केंद्रात मोदी सरकार असल्यामुळे पुन्हा सत्ता येईल असा ठाम विश्वास भाजपाला होता. २०१९ च्या निवडणुकांमध्ये भाजपा-शिवसेना युतीच्या सरकारला जनमतही मिळालं, मात्र भाजपाची डाळ आता मित्रपक्षांशिवाय शिजणार नाही अशी स्थिती निर्माण झाली. सत्तावाटपाच्या ५०-५० फॉर्म्युल्याचा मुद्दा काढत शिवसेनेने भाजपला सोडचिठ्ठी दिली आणि इथूनच महाराष्ट्राच्या राजकारणातला प्रतिशोध चित्रपट सुरू झाला.

भाजपने २०२२-२३ मध्ये लागोपाठ ४०-४० आमदार असलेले दोन पक्ष फोडले आणि आपलं बहुमत २०० च्या वर पोहोचवलं. आता २८८ सदस्यसंख्या असलेल्या विधानसभेत २०० च्या वर सदस्य असूनही भाजपाची स्थिती अतिशय केविलवाणी आहे. १०६ आमदार असलेल्या भाजपाला सत्ता वाटपात दुय्यम स्थान घ्यावं लागलं. ४० आमदारांचे धनी असलेल्या शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद देत उपमुख्यमंत्रीपद पदरात पाडून घ्यावं लागलं. पाठोपाठ आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार यांना ही उपमुख्यमंत्रीपद द्यावं लागलं. या सगळ्या कसरतीत श्रम, वेळ, पैसा खर्च करून भाजपच्या हाती जे लागलंय त्याबद्दल भाजपच्या आमदारांमध्ये प्रचंड असंतोष मात्र आहे.

सध्याच्या मंत्रिमंडळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ९ मंत्री आहेत. शिवसेनेने ज्यांना मंत्रिपद दिलंय त्यातही पाच मंत्री हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून आलेले आहेत. भाजपच्या आठ मंत्र्यांपैकी दोन कॅबिनेट आणि एक राज्यमंत्री आयात केलेल्यांपैकी आहेत. अशा वेळी ज्यांच्यावर कधी काळी भ्रष्टाचाराचे आरोप केले होते, त्यांना जेल मध्ये टाकलं होतं, दाऊदचे हस्तक म्हटलं होतं त्यांच्यासोबत सत्ता स्थापन करण्याची भूमिका घेतल्याने भाजपमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरलेली आहे.

गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना आधी आरोप करून चौकशा लावायच्या आणि नंतर पक्षात आणून प्रतिष्ठा द्यायची अशी भाजपची नवी रणनिती असल्याने आता हा पक्ष काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या कब्जात गेला आहे. महाराष्ट्र भाजपमध्ये ज्यांना देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय समजलं जातं, त्यातील बहुतांश लोक हे आयातीत आहेत. त्यामुळे लाड-दरेकर-वाघ यांच्यासारख्या तैनाती फौजांच्या साह्याने भाजपची वाटचाल सुरू आहे. एक मात्र खर की देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या कौशल्याने सर्व आमदारांना पक्षात आणण्याची किंवा सोबत घेण्याची अनोखी किमया साधली आहे, मात्र जे सत्तेसाठी किंवा कारवाईच्या भीतीने सोबत आले ते किती काळ सोबत राहतील हा मोठा यक्षप्रश्न आहे. सध्या तरी सत्ता हीच विचारधारा या तत्वावर भाजपा काम करत असल्याने इतर लोकं ही सत्ता असेपर्यंत टिकतील. निष्ठावंतांसाठी मात्र आपली नेहमीची संतरंजी आहेच..


Updated : 7 July 2023 10:21 PM IST
Next Story
Share it
Top