प्रत्येक ठिकाणी अस्मिता जागवण हा मूर्खपणा - संजीव चांदोरकर
हल्ली सगळीकडे प्रांतवाद वाढत चालला आहे. इतका की तो प्रत्येक क्षेत्रात लोकांना दिसू लागला आहे. अगदी गरजेच्या गोष्टींमधे देखील... पण हा प्रांतवाद, अस्मिता कधी कधी व्यावसायिकांना कशी घातक ठरू शकते. जाणून घेण्यासाठी वाचा संजीव चांदोरकर यांचा लेख...
X
काय उकडायला लागलंय राव ! ऑक्टोबर मध्ये फक्त कॉटनचे शर्ट्स घालणार मी आता ; चांगले दोनतीन कॉटन शर्ट्स विकत घेणार आहे सर , कॉटन शर्ट्स विकत घेणार असलात तर मार्केट मध्ये बरेच ब्रँड आहेत पण फक्त "कॉटन किंग" ब्रॅण्डच विकत घ्या ,
का बाबा ?
"कॉटन किंग" आपल्या मराठमोळ्या प्रदीप मराठे यांचा आहे ; आणि आपण मराठी माणसांनी मराठी उद्योजकांना त्यांचा माल विकत घेऊन प्रोत्साहन दिले पाहिजे या मतावर मी पोचलो आहे; गुजराती , मारवाडी आणि अशाच नॉन मराठी उद्योजकांनी दादागिरी करून मराठी माणूस , मराठी उद्योजक मुंबईतुन आणि आता महाराष्ट्रातून हद्दपार केला आहे / करत आहेत
हि तुझी भावना मला कळते ; प्रोत्सहन म्हणून एखाद्या मिशनला देणगी देणे समजू शकतो , पण मालाची क्वालिटी चांगली आणि किंमत वाजवी असेल तरच कोणीही तो माल स्वतःहून विकत घेईल असे नाही तुला वाटत ; कॉटन किंग चांगला असेल तर मी नक्की घेईन , तो मराठी उद्योजकाने बनवला म्हणून नक्कीच नाही
________
योगायोगाने प्रदीप मराठे यांची दादर मध्ये गाठ पडली आणि हा विषय निघाला
ते म्हणाले मुंबईत / महाराष्ट्रात कोणी कॉटन किंग चे मराठी उद्योजकाने बनवलेला शर्ट म्हणून जाहिरात करत असेल तर ते आमच्या कंपनीच्या फायद्याचे आहे हे मी कसे नाकारू
हि बातमी मुंबई / महाराष्ट्रापुरती मर्यादित कशी ठेवायची हा माझा प्रॉब्लेम आहे ; कारण मी तामिळनाडू , कर्नाटक , आंध्र , तेलंगणा , केरळ मध्ये मोठ्या प्रमाणावर विक्री केंद्रे उघडत आहे / उघडणार आहे , कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक आहे
आणि तेथे अनुक्रमाने तामिळ , कन्नड , तेलगू , मल्याळी भाषिकांनी हे हत्यार बुमरँग केले तर ? त्यांनी असा प्रचार केला कि मराठी लोक फक्त कॉटन किंग शर्ट घेतात तर आपण का नाही फक्त तामिळ , कन्नड , तेलगू , मल्लू उद्योजकाचे शर्ट्स घ्यायचे
_______
यात शर्ट्सच्या ऐवजी अजून कोणते प्रोडक्ट घाला , प्रदीप मराठे यांच्या ऐवजी अजून कोणत्याही मराठी उद्योजकाचे नाव घाला आणि पुन्हा एकदा पोस्ट वाचा
प्रॉब्लेम प्रदीप मराठ्यांचा नाहीये ; अर्थव्यवस्थांच्या इतिहासाकडे तोंड करून बसलेल्या लोकांचा आहे एकदा का भावनिक ,या अस्मिता असे चष्मे लोकांना विकले कि प्रत्येक प्रश्नाकडे लोक त्याच चष्म्यातून बघणार ना भाऊ ; आणि मराठीच का महाराष्ट्रातील जाती निहाय , प्रांत निहाय उद्योजक प्रोत्साहन दिले पाहिजे इथपर्यंत जाणार
हि तीच लोक आहेत प्रदीप मराठे शर्ट बनवताना कापड , धागा , बटणे , पॅकिंग , मशिन्स , मानवी श्रम , वित्त / कर्ज / भांडवल पुरवणारे कोणत्या भाषिक , जाती , धर्माचे असे अडचणीचे प्रश्न त्यांना पडतच नाहीत
हि तीच लोक आहेत ज्यांचा जागतिकीकरणाचा अभ्यास नाही , कुवत अंगी बाणवली नाही कि चिनी मालावर बहिष्कार वगैरे मांडणी करतात हि तीच लोक आहेत जी आपल्या जन्मगावापासून नोकरी / कामधंद्यासाठी स्वतःची मुळे उपटून कोठेही गेलेली नाहीत ; त्यांना कसलेच एक्सपोजर नाही , स्वतः कधीही स्थलांतरण केलेले नसल्यामुळे सर्व प्रकारच्या स्थलांतरितांना शत्रू मानतात खरेतर याना बहकवणारे लोक चांगले शिकलेले / सगळे काही समजणारे हुशार पण धूर्त लोक आहेत ; पण त्यांना ते काहीही शिकवणार नाहीत
कारण सतत भावनिक करता येणारी , छू म्हणताच अंगावर जाणारी माणसे त्यांना त्यांच्या संकुचित समाजकारणाची / राजकारणासाठी हवी आहेत