मोदींना हरवायची रीत मला ठाऊक आहे:~ महुआ मोईत्रा
नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीमधे पश्चिम बंगालचा निकाल लक्षवेधी ठरला. देशपातळीवर आणि जागतिक माध्यमांनी ही त्याची दखल घेतली.स्त्रीद्वेष्ट्या राजकारणाचा पराभव कसा करता येऊ शकेल? याविषयी तृणमूल खासदार महुआ मोइत्रा यांच्या न्यूयॉर्क टाईम्सच्या 5 मेच्या अंकात प्रकाशित झालेल्या लेखाचे अनंत घोटगाळकर यांनी केलेले भाषांतर....
X
अनंत घोटगाळकर
मी भारतीय लोकसभेची एक सदस्य आहे. रविवारी अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस या माझ्या पक्षाने पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पक्षाचा पराभव केला. आजमितीला भारतातील एखाद्या राज्याच्या एकमेव महिला मुख्यमंत्री असलेल्या माझ्या आणि आमच्या पक्षाच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी मोदींच्या विभाजनवादी आणि स्त्रीद्वेष्ट्या राजकारणाचा पराभव कसा करता येतो हे दाखवून दिले आहे.
प. बंगालच्या विधानसभेत एकंदर 292 जागांपैकी श्री मोदी आणि त्यांच्या पक्षाला 77 जागा मिळाल्या. आम्हाला 213 जागा मिळाल्या. पण आम्ही काही केवळ एका राज्यात सरकार स्थापण्यासाठी ही निवडणूक लढवत नव्हतो. भारताची निधर्मी संघराज्यात्मक व्यवस्था नष्ट करुन तिचे रुपांतर निरंकुश हिंदू राष्ट्रात करु पाहणारा मोदींचा केंद्रीकरणवादी आणि एकाधिकारशाहीवादी विजयरथ अडवण्यासाठी आम्ही प्राणपणाने लढत होतो.
देशाने आजवर अतिशय पवित्र आणि विश्वासार्ह म्हणून जपलेल्या घटनात्मक संस्था श्री मोदी आणि त्यांचे गृहमंत्री अमित शहा या दोघांनी मिळून पद्धतशीरपणे पोखरल्या आहेत. जनतेच्या मनात एकेकाळी अत्यंत आदराचे स्थान असलेल्या, राज्यातील आणि देशातील निवडणुकांचे संपूर्ण आयोजन करणाऱ्या कथित स्वायत्त संस्थेचे - भारताच्या निवडणूक आयोगाचे रूपांतर आपला राजकीय कार्यभाग साधण्यासाठी नेमलेल्या हरकाम्या पोरात त्यांनी कसे केले हे पश्चिम बंगालच्या ताज्या निवडणुकीत मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेय.
26 फेब्रुवारीला कोविड 19 ची दुसरी लाट फैलावत असताना या आयोगाने पश्चिम बंगालच्या निवडणुकीचे प्रत्यक्ष मतदान 27 मार्च ते 29 एप्रिल अशा प्रदीर्घ कालावधीत एकूण आठ टप्प्यात घेण्यात येईल अशी घोषणा केली. बंगालबरोबरच आणखीही चार राज्यात मतदान होणार होते. ते मात्र एकदोन टप्प्यातच घेण्यात आले.
बंगाल निवडणुकीचे वेळापत्रक असे आखून मोदींना राज्यभर सर्वत्र फिरुन प्रचार करता येईल अशी सोय आयोगाने केली. भारताची निवडणूक म्हणजे जोशपूर्ण, उत्सवी आणि प्रचंड गर्दी जमवणारा सोहळा असतो. म्हणून आमच्या पक्षाने याविरुद्ध निषेध नोंदवला आणि कोविड-19ची दुसरी लाट भरात असल्याने ही निवडणूक कमी टप्प्यात घेण्याची आयोगाकडे विनंती केली. आयोगाने कानावर हात ठेवले.
श्री मोदी आणि देशातील आपत्ती व्यवस्थापनाची प्रमुख जबाबदारी खांद्यावर असलेले त्यांचे गृहमंत्री शहा यांनी प. बंगालमध्ये सभांचा सपाटा लावला. या मेळाव्यात अनेकदा या दोघांच्या चेहऱ्यावर मास्कचा पत्ता नसे. मेळाव्याला उपस्थित हजारो लोक आणि टेलिव्हिजनच्या चॅनेल्सवर सर्वत्र होत असलेले त्याचे थेट प्रक्षेपण पहात असलेले लाखों लोक यांचापुढे हे एक भयानक उदाहरणच प्रस्तुत केले जात होते.
देशाच्या उत्तरेला असलेल्या उत्तराखंड या राज्यातील हरिद्वार येथे कुंभमेळ्याच्या उत्सवात गंगास्नान करण्यासाठी लाखो लोक जमतात. अशा धार्मिक गर्दीला प्रतिबंध करण्यासाठी मोदी सरकारने काडीची उपाययोजना केली नाही.
17 एप्रिल रोजी देशातील कोविड 19 ने बाधित रुग्णांचा एका दिवसाचा आकडा अडीच लाखापुढे जात असताना कुठे मोदींनी कुंभमेळ्यातील यात्रेकरूंना एक सौम्य आणि संदिग्ध आवाहन केले. ते त्यांना म्हणाले की आता घरी परत जाण्याचा विचार त्यांनी करावा आणि उत्सवाचे स्वरुप प्रतीकात्मक ठेवावे. पण त्याच दिवशी दुपारी उशीरा श्री मोदी प. बंगालमध्ये पन्नास हजारांहून अधिक लोकांच्या सभेला उपस्थित राहिले.
" जेथवर माझी नजर जाते, माणसेच माणसे मला दिसत आहेत." ते तृप्त , फुशारकीच्या स्वरात उदगारले.
ही निवडणूक आता बेफाम वेगाने कोरोना व्हायरस पसरवणारी ठरु लागली होती. या दुसऱ्या लाटेने भारताची आरोग्य व्यवस्था खिळखिळी होत असताना आमच्या सततच्या विनंत्यांकडे निवडणूक आयोग दुर्लक्ष करत राहिला. भेकडपणाने केलेली ही कर्तव्यातील कसूर पाहून शेवटी मद्रास हायकोर्टाला असे म्हणणे भाग पडले की या आयोगावर बहुधा आता खुनाचा गुन्हा नोंदवला पाहिजे.
देशवासीयांच्या जीवनाऐवजी राजकीय सत्ताप्राप्तीसाठीच्या खटाटोपाला मोदींनी अग्रक्रम दिला. एप्रिल महिन्यातील पहिले तीन आठवडे अतिशय महत्त्वाचे होते. या काळात पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रीमंडळातील सहकाऱ्यांनी आरोग्यविषयक पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी, आपत्तीजनक स्थिती निर्माण होऊ नये म्हणून राज्य सरकारांबरोबर समन्वय साधण्यासाठी कंबर कसून कामाला लागायला हवे होते. परंतु हा महत्त्वाचा काळ निवडणूक प्रचारात वाया गेला.
मोदींची प. बंगालमधील प्रचारमोहीम सगळ्या भारतीय स्त्रियांच्याही नीट लक्षात राहील ती त्या मोहिमेतील महिलांबद्दलचा निगरगट्ट तुच्छतापूर्ण दृष्टिकोन आणि विखारी पुरुषी वृत्तीच्या विकट दर्शनामुळे. माझ्या पक्षाच्या नेत्या आणि राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना बंगालची जनता मोठ्या प्रेमाने दीदी म्हणते. एप्रिलच्या पहिल्या तारखेला राज्यातील हावडा जिल्ह्यातील उलुबेरिया शहरातील जाहीर सभेत ममताजींना उद्देशून मोदींनी दीsदी ओs दीssदी असा तुच्छतादर्शक पुकारा केला तेव्हा समोर जमलेल्या पुरुषांनी एकच जल्लोष केला. त्यानंतर हे शब्द याच सुरात ते इतरही सभांत पुनःपुन्हा वापरु लागले.
हे शब्द आणि उच्चारण्याची ही पद्धत माझ्या कानाला मात्र गल्लीतला एखादा टपोरी मुलगा समोरुन जाणाऱ्या मुलींची छेड काढतो तशी भासली. आपल्या अभिरुचीला मुळीच न रुचणाऱ्या आचाराला असे उघड उघड प्रोत्साहन देणाऱ्या माणसाच्या हाती आपल्या राज्याचे भवितव्य सोपवण्याची कल्पना बंगाली मध्यमवर्गीय लोकांना भयावह वाटली. पश्चिम बंगालमध्ये स्त्री मतदारांची टक्केवारी 49.1 इतकी आहे. या महिला ही आरोळी ऐकून हबकल्या. त्यातील बहुसंख्य स्त्रियांनी आम्हाला मते दिली. असल्या महिलाविरोधी राजकारणाला त्यांनी त्या दिवशी जिंकू दिलं नाही.
संस्कृतीला महत्त्व हे असतेच. बंगाली अस्मितेची हिंदु संस्कृतीशी सांगड घालून आपण जिंकू असं मोदींना आणि भाजपला वाटत होते. त्यांच्या लक्षात ही गोष्ट आली नाही की बंगाली संस्कृती काही अशी एकारलेली नाही. निधर्मीपणा, मांसमच्छीप्रेम आणि प्रवाहाविरुद्ध पोहण्याची सहजप्रवृत्त ओढ अशा साऱ्याचा मिलाफ तिच्यात झालाय.
आम्ही गंमतीने म्हणतो की सुशेगात मध्यमवर्गीय बंगाल्याला आयुष्यात तीन गोष्टी मिळाल्या की पुरे- आपल्या मुलांचे शिक्षण, शनिवार दुपारचा सिनेमा आणि रविवार दुपारी मटणाचा रस्सा!
कमीत कमी एक गोष्ट नक्की. आपण खावे काय, प्रेम कुणावर करावे आणि कपडे कुठले वापरावेत यावर कोणी बंधन घालू म्हणेल तर बंगाली माणूस त्याला ठेंगा दाखवणारच!
बंगालच्या अनुभवाने असे दाखवून दिलेय की भारतीय जनता पक्ष मुळीच अजिंक्य नाही, बहुसंख्यांकवादी हिंदू राष्ट्राची कल्पना सगळ्या भारतीयांना मुळीच आकृष्ट करु शकत नाही आणि श्री मोदी आणि श्री शहा दर्शवले जातात तसे निवडणूक नीतीतले प्रभू चाणक्य मुळीच नाहीत.
प्रचंड आर्थिक स्रोत, प्रतिस्पर्ध्यांना लक्ष्य करण्यासाठी केंद्रीय अन्वेषण संस्थांचा विधिनिषेधशून्य दुरुपयोग आणि विरोधीपक्षीय राजकारण्यांना विकत घेत असल्याचा सततचा आरोप या साऱ्या गोष्टी विरोधात असल्या तरी आजही आपली मुळे आणि आपली निधर्मी ,सर्वसमावेशक विचारसरणी घट्ट पकडून ठेवत आपल्या ध्येयावरील नजर न हटवणारा एखादा प्रादेशिक पक्ष भाजपचा पराभव नक्कीच करु शकतो.
हिंदू राष्ट्रापेक्षा ऑक्सिजन सिलिंडरची गरज आपल्याला जास्त असते ही गोष्ट अगदी मोदीजींच्या पाठीराख्यांच्याही लक्षात येण्यासाठी असली प्रचंड विनाशकारी महामारी यावी लागली. आणि एखाद्या विषाक्त आणि गर्वोद्धत नरपुंगवाची आपल्याला मुळीच आवश्यकता नाही हे उर्वरित भारताला उमगायला बंगालमध्ये निवडणूक व्हावी लागली. आज भारताला हृदय संवेदनशील आणि कणा ताठ असलेल्या नेत्याची खरी गरज आहे.
- महुआ मोईत्रा
भाषांतर: अनंत घोटगाळकर
मूळ लेखाची लिंक :https://www.nytimes.com/2021/05/05/opinion/india-west-bengal-modi.htm