Home > मॅक्स ब्लॉग्ज > मानवाला दुसऱ्या प्राण्याचं अस्तित्व मान्य नाही का?

मानवाला दुसऱ्या प्राण्याचं अस्तित्व मान्य नाही का?

पृथ्वीवरील अन्नसाखळी मानवी हस्तक्षेपामुळं धोक्यात आली आहे का? मानवाला स्वत:च्या विकासापुढं इतर जीवाचं अस्तित्व मान्य नाही का? स्वतःला बौद्धीकदृष्ट्या सर्व सजीवांमध्ये श्रेष्ठ मानणारा मानवाने सजीवसृष्टी धोक्यात आली आहे का? वाचा शरद वाघमारे यांचा विचार करायला लावणारा लेख

मानवाला दुसऱ्या प्राण्याचं अस्तित्व मान्य नाही का?
X

human being and environment relationship analysis by sharad waghmare

पद्म पुरस्कार विजेते सुंदरलाल बहुगुणा यांच्या नेतृत्वाखाली पर्यावरण संवर्धनासाठी 1973 मध्ये झालेलं भारतातील पहिल अनोख आंदोलन "चिपको आंदोलन" म्हणून ओळखले जाते. या आंदोलनाची दखल जागतिक पातळीवर घेतली गेली होती. याच धर्तीवर आधारित 1983 मध्ये पांडुरंग हेगडेंच्या नेतृत्वाखाली कर्नाटकमध्ये झालेलं "अप्पिको आंदोलन" ते आरे जंगल वाचविण्यासाठी मुंबईतून सुरु झालेली आणि देशभर पसरलेली "आरे बचाव लोक चळवळ" अशा अनेक लोकलढ्यांचे पर्यावरण संवर्धनामध्ये अमुल्य योगदान राहिले आहे.

निसर्गाप्रती असलेले मानवाचे अतुट नाते आणि या नात्याची जाणीव ठेवणारी मानव आणि निसर्गांमध्ये असलेली परस्परावलंबी भौतिक जीवनक्रिया तसेच निसर्गातील प्रत्येक घटक स्वतःचे अस्तित्व टिकविण्यासाठी वर्षांनुवर्षे करत असलेला संघर्ष आणि यातून उत्क्रांत होत चाललेली सजीवसृष्टी अनपेक्षित बदलाला सामोरी जात आहे. पण स्वतःला बौद्धीकदृष्ट्या सर्व सजीवांत श्रेष्ठ मानणारा मानव प्राणी संपूर्ण सजीव सृष्टीचा पाया असणारी वनसंपत्ती विकासाचे मोजमाप लाऊन आपल्या क्रुर हाताने ओरबाडत आहे. ज्यामुळे आज फक्त मानवी हस्तक्षेपामुळे हजारो वनस्पती प्रजाती व त्या वनस्पतींवर उदरनिर्वाह करणारे अनेक जीव नामशेष झाले आहेत.

ब्रिटनस्थित बर्ड लाईफ इंटरनॅशनल या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या माध्यमातून जगातील संवेदनशील जैवविविधता क्षेत्रांचा अभ्यास करणार्‍या बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने "महत्त्वाचे पक्षी आणि जैवविविधता क्षेत्रे: निसर्ग संवर्धन आणि लोकलाभाकरिता जागतिक साखळी "(Important Birds And Biodiversity Areas : A Global Network For Conserving Nature And Benefiting People) या मथळ्याखाली ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे भरलेल्या जागतिक पार्कस् काँग्रेस मध्ये एक अहवाल प्रसिद्ध केला.

त्यानुसार भारतातील दहा जैवविविधता क्षेत्रे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत असे नमूद करण्यात आले होते. यामध्ये प्रामुख्याने समुद्र किनारपट्टी, पाणथळ जमिनी, गवताळ प्रदेश व मोठ्या जंगलांचा समावेश होता. निसर्गातील या घटकांचा नष्ट होण्याचा वेग संथ गतीचा आणि सहज लक्षात न येण्याजोगा असला तरी याचा धोका मात्र, खूप मोठा आहे. हे घटक हळूहळू नष्ट होत आहेत. यामध्ये मानवी हस्तक्षेप होत आहे.

विशिष्ट भौगोलीक ओळख व औषधी गुणधर्म असणार्‍या बारतोंडी, बिबा, गुळवेल, मुही, शेंगोळी, टिपडी, वागाठी यांसारख्या वनस्पती आणि याच जंगल सानिध्यात स्थानिक रहिवाशांच्या तस्करीला तोंड देत आपले अस्तित्व टिकवून राहिलेल्या पण सध्या दुर्मिळ झालेल्या खोकड, सायाळ, खवले मांजर यांसारख्या पशू-पक्ष्यांच्या विविध प्रजाती ग्रामीण भागातील डोंगरपायथ्याशी त्याचबरोबर पाण्याचा निचरा होणार्‍या खोर्‍यांमध्ये आढळतात. या नैसर्गिक साधनसंपत्तीच्या क्षेत्रांत अनिर्बंधित मानवी हस्तक्षेपामुळे येथील संपूर्ण परिसंस्थाच नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.

डोंगर उतारावर आढळून येणारी शुष्क, काटेरी व कमी ऊंचीची झुडपे आपल्या फलधारण पूर्व काळात मधुर फुलांनी बहरलेली असतात. ज्या फुलांवर तेथील स्थानिक परीसंस्थेचा घटक असणाऱ्या मधमाश्या अवलंबून असतात. त्याचबरोबर या मधमाश्या परागकण वहनाचे कार्य करतात. या या भागातील ग्रामीण लोक हा मध विक्रीचा व्यवसाय करुन आपल्या भाकरीचा प्रश्न सोडवतात. जर अशी झुडपे परीसंस्थेतील त्यांचे महत्त्व न समजून घेता तोडली तर यांवर अप्रत्यक्षपणे अवलंबून असणाऱ्या सर्वच घटकांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागेल. प्रत्येक वर्षी शासनाकडून कोट्यावधी रोपांची लागवड केली जाते. पण संबंधित भौगोलीक क्षेत्रातील हवामान, पाण्याची उपलब्धता, जमिनीची पाणी धरुन ठेवण्याची क्षमता या सर्व गोष्टी रोपांची लागवड करताना विचारात घेतल्या जात नाहीत. त्यामुळे अनेक वर्षांपासून चालत आलेली वृक्ष लागवडीची ही योजना अपयशी ठरत आहे.

शासनाने ग्रामीण भागातील भूमिहीन मजुरांना कसण्यासाठी जमिनी दिल्या. त्या प्रामुख्याने डोंगरपायथ्याशी व गाळ साचणार्‍या ठिकाणी आहेत. जिथे ही अमुल्य वनसंपदा आहे. कालांतराने या जमिनी कसणार्‍या शेतकर्‍यांच्या आर्थिक उन्नतीमुळे तो पिकांखालील जमिनीचे क्षेत्रफळ वाढवत आहे. परिणामी येथील जंगले नष्ट होत आहेत. याचबरोबर महसूल विभागाच्या परवानगीने अनेक ठिकाणी डोंगरात उत्खनन होते. डोंगर पोखरला जातो. ओढ्या काठांवर मोठ्या प्रमाणात वृक्षतोडीमुळे ओढ्याचे क्षेत्र कमी होत आहे. कमी झालेल्या क्षेत्रामुळे पावसाळ्यात पाण्याच्या प्रवाहाची तीव्रता वाढते आणि ओढ्याकाठांवरील मातीची धूप होते.

काही डोंगरभागामध्ये मोठ्या धनिकांच्या स्वतःच्या मालकीच्या जमिनी आहेत. या जमिनीवर खाण उद्योग सुरु आहेत. जे नियमांचे पालन न करता दिवस - रात्र चालतात. डोंगरभागामध्ये जिथे लगतच वन्यजीव वास्तव्य असते. अशा ठिकाणी खाणकाम उद्योगांना पर्यावरण विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळतेच कसे? हा ही अभ्यासाचा विषय आहे. या ठिकाणी मोठ मोठे ब्लास्ट केले जातात.

ज्यामध्ये बोर ब्लास्टिंग करून खोलवर उत्खनन केले जाते. परिणामी या ठिकाणी आढळणाऱ्या व नैसर्गिकरित्या सुरक्षित अधिवास असणार्‍या पशु - पक्षांना असुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे लागते. खाण उद्योगांतुन बाहेर पडणारी धूळ खुप मोठ्या जंगल क्षेत्रास विनाशकारी ठरत आहे.

शासनाने 'पाणी आडवा पाणी जिरवा' या योजनेअंतर्गत शेतकर्‍यांना मोफत जमिनीचे बांध घालून दिले. पण हे करत असताना पूर्वीच्या बांधावरील परीसंस्थाच नष्ट केली. ग्रामीण भागामध्ये आढळणारी ही वैविध्यपूर्ण जैवविविधता टिकवायची असेल तर संबंधित क्षेत्रातील लोकांना वनवैभवाचे आपल्या संस्कृतीशी असलेले विविधांगी महत्त्व पटवून देऊन त्यांना वनसंवर्धनासाठी जागरुक करण्याची नितांत गरज आहे.

महाराष्ट्राचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी बलाढ्य वृक्ष वाचविण्यासाठी जागृत पर्यावरणप्रेमी नागरिकांनी लढा उभा केला होता. याला माध्यमांनी साथ दिली. यामुळे या लढ्याची दखल पर्यावरण मंत्र्यांनी घेतली. उभारलेल्या लढ्याला प्रतिसाद देत रत्नागिरी - नागपूर राष्ट्रीय महामार्गाच्या कामात अडथळा ठरणारा भोसे ता. मिरज येथील हजारो वर्षे जुन्या वृक्षाला वाचविण्यासाठी महामार्गाची दिशा बदलायला लावली. हे झाड पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या सजग कार्यकर्त्यांमुळे वाचले. परंतु झाडाच्या समवयस्क कित्येक झाडे या महामार्गाच्या कामात नष्ट केली आहेत.

दुर्मिळ होत चाललेल्या या वनसंपदा टिकविण्यासाठी जन आंदोलन उभे राहायला हवे. परंतु दुर्दैवाने आपल्या विकासाचा रस्ता हा निसर्गाला तुडवत जात असतो. याबाबत धोरण तयार होणे गरजेचे आहे.

शरद वाघमारे

( खरशिंग, सांगली )

मो. 8605233509

Updated : 29 May 2021 1:31 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top