...आणि पुन्हा एकदा संसार सुरु झाला
लॉकडाऊन मध्ये अनेकांचे संसार उद्वस्थ झाल्याचं समोर आलं आहे. मात्र, नवरा-बायको दोघेही समजदार असतील तर काय होतं. याची प्रचिती सामाजिक कार्यकर्त्या सत्यभामा सौंदरमल यांनी आपल्याला आलेल्या अनुभवातून शेअर केली आहे नक्की वाचा...
X
आज धारूर तालुक्यातील एका गावात कौटुंबिक हिंसाचारातील तरुणी पाच वर्षाच्या मुलाला घेऊन भावासोबत माहेरी निघुन आली होती. लग्न झाले तेव्हापासून दोघेही पुण्यालाच रहात होते. परंतु या लाँकडाऊनमुळे गावाकडे आले. यामुळे बरेच वांधे झाले. सासू सासरे तसे समजदार आहेत. दोनदोघालाअनचिपटंराघुला म्हणत टिकुबा भिकुबा रहाणाऱ्या आईवडिलांवर जास्तीची जबाबदारी पडल्याने सासऱ्याने साल धरले. तर सासू मुंगीवानी मिळवत असल्याचे सांगत. यामुळे एकमेकांवर माणसं पडतात आणि याचा ताण साहजिकच सुनेवर पडतो. असं सासुने सांगितले; परंतु बायको सून घरातून मुकाट्या निघून जाणं.
यामुळे त्यांनी तिला न नांदवण्याचा निर्णय घेत लहान मुलाला वापस घेऊन आले. नंतर भरलेला संसार मोडतो की काय? या भितीने मुलगी नांदायला जाण्यासाठी तयार झाली. यासाठी मुलगी तिची आई आणि सोयरीक जमवणारे एक काका आम्ही तिघे जण संबंधित गावी गेलो. मुलीच्या सासू ने चहापाणी केला पण मूलीचा नवरा घरी नसल्याने मुलगी मी ठेऊन घेऊ शकत नाही. तो आल्यानंतर मूलीला घेऊन या असं बोलल्या.
मग गावचे प्रथम नागरिक सरपंच यांना बोलावून घेतले आणि त्यांची हा प्रश्न सोडवण्यासाठी मदत घेतली. त्यांनी ही संबंधितांना समजावले.
नंतर मुलीच्या नवऱ्याशी फोनवर बोलणं झालं. मुलगा अतिशय समजदारीने बोलला. माझी बायको नेहमी मला न विचारता घरातुन मुकाट्या निघुन जाते, लोक मला काय म्हणतील? असं म्हणत काही जरी अडचण असल्यास रुसुन जाणं, पळुन जाणं योग्य नाही .तिलाही समजून सांगा. मी त्रास देत नाही. असं म्हणत जेवणं करून जा असं बोलला. आणि आज संबंधित मुलगी तिच्या पाच वर्षाच्या मुलाला भेटली. सासू सासऱ्यांनी तिला घरी ठेऊन घेतले यामुळे आनंदी झाली.
अशा प्रकारे पोलीस ठाणे, कोर्टात न जाता एक संसार पुन्हा सुरळीत झाला. आणि आम्ही उपाशी पोटी असणारे गरम बाजरीची भाकर,छाल्याची मुगाची डाळ वड्याची भाजी खाऊन घरी परतलो.
(कधीकधी कार्यकर्त्यांवर हाणामारीचे, चोरीचे गुन्हे दाखल होऊ शकतात, प्रकरण चव्हाट्यावर गेले म्हणून महिलेचा कायमचा संसार मोडू शकतो. यामुळे अशा प्रकरणात गावचे सरपंच हे महत्त्वाची भुमिका जबाबदारीने पार पाडत मदत करू शकतात. यामुळे संसार जुळवताना संवादाचं कायदेशीर, स्त्रीवादी उत्तम कौशल्य आपल्याकडे असणं महत्त्वाचे ठरते.)
सत्यभामा सौंदरमल
नीर्धार सामाजिक सेवाभावी संस्था
बीड
एम.ए.एम.एस.डब्ल्यू