बाबा, बलात्कार म्हणजे काय ? दत्तकुमार खंडागळे
गुन्हेगारी वृत्तांत मर्यादीत छापला व दाखवला तर हरकत नाही. पण ते बघून किंवा वाचून ती प्रवृत्ती वाढीस लागत असेल, लोकांच्या भावना चाळवल्या जात असतील, समाजमन अस्वस्थ होत असेल, निगरगट्ट होत असेल तर आपलं काहीतर चुकतय ? लहानशा बाळाला बलात्काराची कोणती व्याख्या समजावून सांगायची ? याविषयी सडेतोड मंथन केलं आहे वज्रधारीचे संपादक दत्तकुमार खंडागळे यांनी
X
परवा माझे तासगावचे पत्रकार मित्र दत्ता पाटील यांनी एक किस्सा सांगितला. तो किस्सा ऐकून मन अस्वस्थ झाले. त्यांनी मुलांना वर्तमान परस्थिती समजावी, जनरल नॉलेज वाढावे तसेच स्वत:च्या वाचनासाठी म्हणून घरी काही वर्तमानपत्र चालू केली आहेत. त्यांची लहान मुलं सदरची वर्तमानपत्रे वाचत असतात. परवा एका दैनिकात "शाळकरी मुलीवर बलात्कार !" अशी बातमी आली होती. सदरची बातमी दत्ता पाटील यांच्या लहान मुलाने वाचली व त्या चिकित्सक चिमुरड्याने प्रश्न केला, "बाबा बलात्कार म्हणजे काय ? मुलाच्या अचानक आलेल्या या प्रश्नाने दत्ताभाऊंना काय उत्तर द्यावे सुचले नाही. आपल्या लहान मुलाला नेमकं काय सांगाव ? हा यक्ष प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला. त्या लहानशा बाळाला बलात्काराची कोणती व्याख्या समजावून सांगायची ? बलात्कार म्हणजे काय ? हे कसे सांगायचे ? हा प्रश्न आजवर अनेक आई-बापांना पडला असेल. अनेक मुलांनी आई-वडीलांना हा प्रश्न केलाही असेल. त्यातल्या कुणी उत्तर दिले असेल असे वाटत नाही.
अपवाद सोडला तर लहान पोरांच्या या प्रश्नाला उत्तर द्यायचे धैर्य आई-बापांचे नक्कीच झाले नसेल. दत्ता भाऊंच्या मनाची घालमेल आजवर अनेकांनी अनुभवली असेल. वर्तमानपत्र किंवा माध्यमं ही समाजमनाचा आरसा असतात. समाजात घडणा-या ब-या वाईट घटना त्यांना छापाव्या लागतात, दाखवाव्या लागतात. पण त्या छापताना व दाखवताना त्याने समाजस्वास्थ धोक्यात येणार नाही याचा माध्यमांनी गांभिर्याने विचार करणे गरजेचे आहे. या घटना जरूर दाखवायला हव्यात पण त्या क्रुरकर्म्यांचे पितळ उघड पाडण्यासाठी, समाजाला त्या विरूध्द सजग करण्यासाठी, सरकारने किंवा प्रशासनाने त्याची दखल घेण्यासाठीच. हा उद्देश ठेवून जर गुन्हेगारी वृत्तांत मर्यादीत छापला व दाखवला तर हरकत नाही. पण ते बघून किंवा वाचून ती प्रवृत्ती वाढीस लागत असेल, लोकांच्या भावना चाळवल्या जात असतील, समाजमन अस्वस्थ होत असेल, निगरगट्ट होत असेल तर आपलं काहीतर चुकतय ? हे लक्षात घ्यावे लागेल.
आज अनेक किंवा बहूतेक माध्यमात गुन्हेगारी वृत्तांचा (बातम्यांचा) रतीब घातला जातो. काही माध्यमं निव्वळ याच बातम्या लावत असतात. त्यांची खासियतच ती असते. पोलिस टाईम्ससारखी काही माध्यम निव्वळ क्राईमच छापतात. पण पोलिस टाईम्स सारखी माध्यम घरा-घरात जात नाहीत. त्याचा जेवढा खास वाचक आहे तोच ते आवर्जून विकत घेतो आणि वाचतो. ते लहान मुलांच्या हातात जाण्याची शक्यता फार कमी आहे पण इतर जी माध्यम आहेत त्यांच्यामधून गुन्हेगारी वृत्तांत घरा-घरात जातो. या इतर माध्यमातील काही माध्यमांचे दुकानच गुन्हेगारीच्या बटबटीत बातम्यावर चालते. खूनाच्या, बलात्काराच्या एकदम भडक बातम्या लावल्या जातात. जेणेकरून जास्त खपले जावे, पाहिले जावे अशी मानसिकता या मागे असते. या विकृतीवरच आपला बाजार चालवण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू असतो.
प्रिंट मिडीयासोबत इलेक्ट्रॉनिक मिडीयातही क्राईमला महत्वाचे स्थान आहे. तिथेही अशा बातम्या देताना तारतम्य किंवा सामाजिक स्वास्थ्याचे भान ठेवले जात नाही. खरेतर माध्यमांनी हे तारतम्य ठेवायला हवे. माध्यमातले गुन्हेगारीच्या बातम्यांचे हे खुराक घरबसल्या गुन्हेगारीचे ट्रेनिंग देणारे, त्यासंबंधी जनरल नॉलेज वाढवणारे असते. माध्यमांनी याचे चिंतन करायलाच हवे. आपले पेपर चालतील, चँनेल्स चालतील पण ज्या समाजात आपण हे चालवणार आहोत त्याचेच स्वास्थ्य बिघडले तर त्याची झळ आपल्याला बसायला वेळ लागणार नाही. शेजा-याचे जळणारे घर पाहून विकृत आनंद घेत बसलो तर आपल्या घराला केव्हा आग लागेल हे कळणार नाही. त्यामुळे शेजा-याचेच जळते घर वाचवले तर आपले जळणार नाही. जाहिरातीच्या, खपाच्या आणि वाढीव दर्शकांच्या गंजेडी नशेत अडकलेल्या माध्यमांनी यावर गांभिर्याने विचार करायलाच हवा.
अनेक वाहिण्यांनी गुन्हेगारी घटनांचे स्पेशल कार्यक्रम तयार केले आहेत. यात क्राईम पेट्रोल, सावधान इंडीया, लक्ष्य सारखे काही कार्यक्रम आहेत. काही वाहिन्या असे कार्यक्रम करत नसल्या तरी गुन्हेगारीच्या उथळ बातम्यांना खुप स्थान देतात. त्यांना खुपच प्राधान्य व महत्व देतात. यात इलेक्ट्रनिक व प्रिंट अशी दोन्हीही माध्यमं आहेत. काही वर्तमानपत्रांच्या खपाचा मुलाधारच गुन्हेगारीच्या बातम्या आहेत. त्यांच्याकडे खून, बलात्काराच्या बातम्या रंगवून, मिठ-मसाला लावून लावल्या जातात. लोकांच्या भावना उद्दीपित होतील अशा पध्दतीची या बातम्यांची मांडणी असते. बलात्काराची बातमी वाचून बलात्कार करणा-याचा राग यायच्याऐवजी वाचणा-याच्याच भावना चाळवतील असे वृत्तांकन केले जाते. या बातम्यांचे समाजमनावर काय परिणाम होतात ? याचा विचार केला अजिबात केला जात नाही. याच्या पाठीमागे 'मागणी तसा पुरवठा' किंवा 'जे खपतय ते विकण्याची' मानसिकता असते. माध्यमांचे भांडवलदार मालक असाच विचार करतात. त्यांना गुन्हेगारी वृत्तांचे व कार्यक्रमाचे समाजमनावर, लहान लहान संस्कारक्षम वयाच्या मुलांवर काय परिणाम होतात ? याच्याशी देणेघेणे नाही. जे खपतय ते विकून किवा ज्याची मागणी आहे त्याचाच पुरवठा करत आपला गल्ला भरण्याची त्यांची मानसिकता असते. असे असेल तर या लोकांच्यात आणि कुंटनखाना व दारूचा गुत्ता चालवणारांच्यात फारसा फरक उरत नाही. आज माध्यमात असे अनेक सफेदपोश आहेत ज्यांची मानसिकता दारूचे गुत्ते व कुंटनखाने चालवणारांची मानसिकता एक सारखीच आहे.
समाजाचे काही व्हायचे ते होऊ दे आपली पोळी भाजली पाहिजे अशी ज्यांची मानसिकता असते अशी माणसं नेहमी समाज स्वास्थासाठी घातक असतात. अशी माणसं सामाजिक आजार असतात. भले ती माध्यम समुहाचे मालक असतील किंवा संपादक असतील. समाजाचा एक भाग म्हणून आपली काही जबाबदारी असते. समाजस्वास्थ आपल्याला व्यवस्थित करता येत नसेल तर किमान ते बिघडू नये याची काळजी प्रत्येकाने घ्यायला हवी. समाजातल्या प्रत्येक घटकाने ती जबाबदारी म्हणून घ्यायला हवी. माध्यमांना व ते चालवणा-या लोकांना समाजात खुप प्रतिष्ठा असते. मानाचे स्थान असते. हा वर्ग बुध्दीजीवी असतो. समाजाच्या हिताची काळजी घेणे, ते अबाधीत ठेवणे ही बुध्दीमान, विचारवंतांची नैतिक जबाबदारी असते. माध्यमांचे मालक, संपादक, पत्रकार याच वर्गात मोडतात. त्यांनी या सगळ्या घटनांचा विचार करणे फार गरजेचे आहे. आज देशातले बलात्काराचे आणि वाढत्या गुन्हेगारीचे प्रमाण तपासले तर डोळे पांढरे झाल्याशिवाय रहात नाहीत.
या वाढत्या गुन्हेगारीला व बलात्काराला काही अंशी आपण जबाबदार आहोत का ? असा अंतर्मुख करणारा सवाल आपण स्वत:लाच विचारायला हवा. उद्या आपल्याच घरातील लेकी-बाळीवर ही वेळ आली तर किंवा आपलाच मुलगा उद्याचा बलात्कारी निघाला तर ? हा प्रश्न आपल्या मनात यायलाच हवा. उशिर व्हायच्याआधी आपण याचा विचार करणे गरजेचे आहे. इस्त्राईलमध्ये अशा बातम्यांना कधीच वर्तमानपत्रांच्या पहिल्या पानावर छापले जात नसल्याची नोंद माजी राष्ट्रपती दिवंगत ए पी जे अब्दूल कलाम यांनी त्यांच्या एका पुस्तकात केली आहे. तिथे सकारात्मक बातम्यांना माध्यमात जास्त महत्व दिले जाते. भारतातही माध्यमांनी असा दृष्टीकोन ठेवला तर बरीच परस्थिती सुधारता येईल. समाजातली बरीच घाण स्वच्छ करता येईल.
दत्तकुमार खंडागळे संपादक वज्रधारी, 9561551006