Home > मॅक्स ब्लॉग्ज > TB टीबी समुपदेशकांची उणीव कशी भरून काढणार ?

TB टीबी समुपदेशकांची उणीव कशी भरून काढणार ?

सध्याच्या आरोग्य व्यवस्थेच्या मर्यादा आणि कर्मचाऱ्यांवर असलेला कामाचा ताण यामुळं समुपदेशकांच्या उणीवेचा मूळ प्रश्न सुटेल का ?TB उपचारा सोबतच कौटुंबिक, आर्थिक, सामाजिक प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी रुग्णाच्या घरापर्यत पायपीट करणाऱ्या, रुग्णाशी विश्वासाचं नात निर्माण करणाऱ्या समुपदेशकाची भूमिका २०२४ नंतर कोण निभावणार? २०२५ पर्यत टीबी मुक्त भारत होईल का ?अशा गंभीर प्रश्न उपस्थित करणारा आरोग्य विषयक पत्रकार शैलजा तिवले यांचा रिपोर्ताज...

TB टीबी समुपदेशकांची उणीव कशी भरून काढणार ?
X




मुंबईच्या उच्चशिक्षित कुटुंबातील तरुण प्राध्यापकाला ड्रग रेझिस्टंट टीबी (डीआर टीबी) म्हणजेच काही औषधांना दाद न देणाऱ्या गंभीर स्वरुपाच्या टीबीची लागण झाल्याचं निदान झालं. त्यानं लगेचच उपचार सुरु केले. परंतु पूर्ण औषधं घेण्याऐवजी इंटरनेटवरील माहितीच्या आधारे टीबीच्या जीवाणूला मारणाऱी एकच गोळी त्यानं खायला सुरूवात केली. औषधाचा योग्य परिणाम व्हावा, संभाव्य दुष्परिणाम टाळण्यासाठी टीबीच्या औषधांमध्ये या गोळीसोबतच आवश्यक आणखी काही औषधे दिली जातात. परंतु या तरुणानं इतर औषधं न घेतल्यानं त्याच्या मानसिक आरोग्यावर दुष्परिणाम झाला. टीबीची सर्व औषध एकत्र घेणं का आणि कसं गरजेच आहे हे मुंबईतील टीबीच्या समुपदेशक (काउन्सिलर) प्रेरणा सणस वारंवार त्याची भेट घेऊन समजावत होत्या. परंतु तो काही ऐकायला तयार होईना. मनावर नियंत्रण राहत नसल्यानं तो हिंसक वागू लागला. त्याची मानसिक स्थिती दिवसेंदिवस ढासळत असल्यानं त्यानं मानसिक आजारांचे उपचार घेणं का गरजेच आहे, हे प्रेरणाताईंनी कुटुंबियांना समजावलं. कुटुंबातीलही कोणाचं तो ऐकेना. त्याच्याशी संवाद साधणं अवघड झालं. एक दिवशी तर त्यानं प्रेरणा ताईंना खुर्ची फेकून मारली. पण तरीही त्या खचल्या नाहीत. मानसिक आजाराचे उपचार घेण्याबाबत समजूत काढत राहिल्या. अखेर तो उपचार घेण्यासाठी तयार झाला. मनावर नियंत्रण येताच त्याला आपली चूक लक्षात आली. त्यानंतर टीबीची पूर्ण औषधे वेळेवर घेऊ लागला आणि तो टीबी मुक्त झाला. त्याचा हा प्रवास प्रेरणाताईंनी मला पाच ते सहा वाक्यांमध्ये सांगितला असला तरी प्रत्यक्षात तो दोन वर्षांहूनही जास्त आहे.



मागील काही वर्षांमध्ये टीबीचं रौद्र रुप निर्माण झालं असून हा जीवाणू नियमितच्या औषधांना दाद देईनासा झाला आहे. यालाच काही औषधांना दाद न देणारा म्हणजे ड्रग रेझिस्टंट टीबी – डीआर टीबी म्हटलं जातं. बहुतांश वेळा टीबीची औषधं वेळेत घेतली नाही किंवा अर्धवट घेतली की हा जीवाणू अधिक घातक बनतो आणि डीआरटीबीचं रुप धारण करतो. साध्या टीबीच्या रुग्णांच्या तुलनेत डीआर टीबीच्या रुग्णांचे प्रश्न, समस्या अधिक गंभीर आणि जटिल आहेत. तीव्र स्वरुपाच्या डीआर टीबीपर्यत पोहचल्यावर अनेकांची जगण्याची आशा संपते. याचं मूळ कारण म्हणजे औषधांना दाद देत नसल्यानं उपचारामध्ये होणारे वारंवार बदल, नऊ महिने ते दोन वर्षांपर्यतचा उपचाराचा कालावधी, नवीन औषधांचे प्रयोग आणि विशेष म्हणजे या औषधांचे गंभीर दुष्परिणाम, यामुळं जीव वैतागून जातो. शरीर तर साथ देतच नसतं, मन देखील दुष्परिणामांमुळं स्थिर राहत नाही. या सर्व शारीरिक आणि मानसिक वेदनांमधून जाण्याइतकी सहनशीलता नसल्यास किंवा कुटुंबाचा भक्कम पाठिंबा नसल्यास रुग्ण वैतागून उपचार सोडून देतात किंवा अधूनमधून घेतात. त्यामुळं मग आजाराची तीव्रता आणखीच वाढते. या कठीण काळात उपचारांच्याही पलिकडे जात केवळ रुग्णालाच नव्हे तर कुटुंबालाही आधाराची, प्रोत्साहनाची गरज असते. हा आधार, मार्गदर्शकाची भूमिका सध्या प्रेरणाताईंसारखे टीबी समुपदेशक बजावत आहेत.

टीबी समुपदेशकाची संकल्पना

वस्तीवस्तीत, गावागावातील टीबी रुग्णाशी संवाद साधणारा 'टीबी समुपदेशक' ही संकल्पना टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स (टीआयएसएस) संस्थेनं सक्षम प्रवाह कार्यक्रमाद्वारे मुंबईत पहिल्यांदा सुरू केली. डीआर टीबी केंद्रावर टीबी समुपदेशक होते, परंतु त्याचं काम केंद्रात उपचार घेणाऱ्या रुग्णांपुरतंच मर्यादित असे. 2012 पासून मुंबईत डीआर टीबीच्या निदानावर विशेष भर दिल्यानं रुग्णसंख्या आणि मृतांची संख्याही वाढत होती. त्यावेळी डीआर टीबीचे दरवर्षी सुमारे दोन हजार नवे रुग्ण आढळत होते. यावर उपाययोजना करण्याच्या दृष्टीनं टीआयएसएसनं २०१४ साली प्राथमिक अभ्यास हाती घेतला. तत्कालीन टीबी नियंत्रणाचा संपूर्ण कार्यक्रम औषधे आणि उपचार यावर केंद्रित होता. यामध्ये रुग्णांचे सामाजिक, आर्थिक आणि मानसिक प्रश्न दुर्लक्षित राहिल्यानं उपचारावर याचा परिणाम होत असल्याचं अभ्यासात दिसून आलं. औषधांच्या गंभीर दुष्परिणामांमुळं होणाऱ्या त्रासानं रुग्ण मानसिक आणि शारिरीकदृष्ट्या खचून जात होते. कौटुंबिक प्रश्न आणि टीबीबाबत असलेला स्टीग्मा यावरही लक्ष देणं गरजेचं असल्याचं प्रकर्षानं जाणवलं. यातूनच मग टीआयआयएसएसनं ग्लोबल फंडस फॉर एड्स, टीबी अन्ड मलेरिया संस्थेच्या आर्थिक पाठबळानं सक्षम प्रकल्पाअंतर्गत रुग्णांना प्रोत्साहन, पाठबळ देणारे आणि आवश्यक ती मदत करणारे टीबी समुपदेशक कार्यरत केले.

टीबी समुपदेशकाचं कामकाज

टीआयएसएसनं समुपदेशन, सामाजिक कार्य या क्षेत्रातील व्यक्तींची डीआर टीबी समुपदेशक म्हणून नियुक्ती केली गेली. समुपदेशकाचं मुख्य काम हे टीबीच्या रुग्णांशी संवाद साधणं आणि त्यांचे प्रश्न समजून घेणं हे होतं. परंतु हळूहळू या कामाची व्याप्ती वाढत गेली आणि केवळ हे प्रश्न समजून न घेता यावर उत्तर शोधण्याची जबाबदारीही समुपदेशकांनी उचलली.



डीआर टीबीचा रुग्ण आढळला की, त्याची माहिती समुपदेशकापर्यत पोहचवली जाते. मुंबईत हे काम विभागवार चालतं. अन्य ठिकाणी जिल्हा टीबी नियंत्रण विभागातून ही माहिती त्यांना मिळते. यानंतर या रुग्णांची संपूर्ण माहिती शोधणं हे समुपदेशकाचं पहिलं काम. टीबी हा शब्द परिचित असला तरी निदान झाल्यावर रुग्ण, त्याचं कुटुंब यांच्या मनात अनेक शंका असतात. त्याचं निरसन करण्यासाठी रोजच्या ओपीडीमुळे डॉक्टरला पुरेसा वेळ नसतो ना टीबीच्या कर्मचाऱ्यांना. म्हणूनच समुपदेशक प्रथम रुग्णाची भेट घेतात. शक्य असल्यास ही भेट घरीच घेतली जाते, जेणेकरून त्याच्या घरची आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक पार्श्वभूमी याचा आढावा घेतला जातो. आजाराबाबत स्टीग्मा असल्यास रुग्णाची भेट घराबाहेर घेतली जाते. डीआर टीबी म्हणजे काय, कसा पसरतो, औषधं पूर्ण आणि कशी घेणं गरजेच आहे, आहार, झोप यासह स्वत: ची काळजी कशी घ्यायला हवी ही प्राथमिक माहिती त्याला, त्याच्या कुटुंबाला समुपदेशक देतात. यासोबतच औषधं घ्यायला सुरू केल्यावर काय त्रास होऊ शकतात, ते का होतात आणि यावर मात कशी करायची हे देखील समजावतात. त्यानंतर रुग्णाचे उपचार पूर्ण होईपर्यत दर महिन्याला त्याची विचारपूस करण्याचं समुपदेशकाचं हे काम अखंडपणे सुरूच असतं, असं टीआयएसएसच्या सक्षम प्रकल्पाच्या वरिष्ठ प्रकल्प अधिकारी श्वेता बजाज सांगतात.

रुग्ण आणि कुटुंबाशी नातं

टीबीच्या रुग्णांचं निदान करण्यापासून ते उपचार पूर्ण करण्यापर्यत अशा अनेक पातळींवर आरोग्य व्यवस्था कार्यरत आहे. आरोग्य व्यवस्थेच्या मर्यादा, उपचार पूर्ण न करण्यामागची कारण समजून त्या सोडविण्याइतपतचा पुरेसा वेळ आणि कौशल्यांचा अभाव यामुळं रुग्णाच्या आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक समस्यांना प्राधान्य दिलं जात नाही. इथं समुपदेशकाचं खर काम सुरू होतं. रुग्ण उपचार पूर्ण न करण्यामागं टीबीबाबतचा स्टीग्मा अजूनही दाट असल्याचं बऱ्याचदा जाणवतं. हे प्रमाण मुलींच्या किंवा लग्न झालेल्या महिलांच्याबाबत तुलनेनं जास्त आहे. काही वेळेस मुलीच किंवा मुलाच लग्न जुळत असल्यास रुग्ण उपचार सोडून देतो. मग अशावेळी औषधं घरापर्यत पोहचविणं, घरापासून दूरच्या दवाखान्यात उपचार सुरू करणं, हे पर्याय आम्ही उपलब्ध करून देतो. घऱामध्ये पुरुषच एकटा कमावत असेल आणि त्याला टीबीची बाधा झाली तर कुटुंबावर आर्थिक संकट कोसळतं. अशावेळी उपाशी पोटी किंवा अपुऱ्या जेवणावर औषधं घेतली की जास्त त्रास होतो. अशा कुटुंबातील रुग्णाला पोषण आहार मिळवून देणं, त्याला सरकारी योजनांमधून आर्थिक मदत मिळवून देणं, आर्थिक पाठबळ मिळण्यासाठी घरातील बाईला किंवा मुलं मोठी असतील तर त्यांच्यासाठी काम शोधून देणं, गंभीर दुष्परिणाम झाल्यास पुढचे उपचार कुठे मिळतील याची माहिती देऊन ते उपचार मिळत असल्याची खात्री करणं आणि योग्य उपचार मिळण्यात येणाऱ्या समस्या सोडवणं, अशा प्रत्येक अडचणींवर मात करून उत्तर शोधणं आणि त्यांना उपचार घेण्यास सक्षम करणं हेच आमच प्रमुख काम. यासाठी फोनवर तर आम्ही २४ तास उपलब्ध असतो. आता काय करायचं या त्यांच्या प्रत्येक प्रश्नावर आम्ही उत्तर शोधणारं ही खात्री रुग्णाला झाल्यानं रात्री-अपरात्रीही ते आम्हाला मदतीसाठी हक्कानं फोन करतात, आणि हेच आमच यश आहे, असं टीबी समुपदेशक प्रेरणाताई सांगतात. यामुळं समुपदेशकाचं रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांशी उपचारांपलिकडेही एक वेगळं नात जुळलेलं पाहायला मिळतं

ग्रामीण भागात समुपदेशकाचा आधार

डीआर टीबीचा प्रसार आता शहरांपाठोपाठ ग्रामीण भागातही वाढत आहे. कुपोषण, बालमृत्यू या समस्यांनी वर्षानुवर्ष पाय रोवून असलेल्या मेळघाटातही डीआर टीबीचं प्रमाण हळूहळू वाढत आहे. शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीणमध्ये विशेषत: आदिवासी बहुल मेळघाटमधील डीआर टीबीच्या रुग्णांच्या समस्यांचं स्वरुप वेगळं असल्याचं अमरावती ग्रामीण विभागाचे टीबी समुपदेशक लोकप्रिय मेश्राम यांच्यासोबत इथल्या गावांमध्ये फिरताना प्रकर्षान जाणवलं.टीबी की गोलिया अगर आप दिनभर मे थोडे थोडे टाईम के बाद खाओगे तो एक गोली मे दोन घंटे का अंतर हो जाएगा. इससे अपने शरीर मे जो टीबी के जंतू है वो सिर्फ बेहोश होके सोए पडेंगे. हमे उन्हे बेहोश नही, तो नष्ट करना है. नष्ट कब होंगे जब उनपे एकदम से हमला करेंगे. तो सभी गोलिया एक साथ खाना जरुरी है.

राणीगावातल्या सुनीलला समुपदेशक लोकप्रिय समजावत होते. राणीगाव म्हणजे मेळघाटचं अगदी शेवटचे टोक. सद्राबर्डी तालुक्यामधील (टीबीचे रुग्ण या भागात जास्त प्रमाणात असल्यानं या भागाला तालुक्याचा दर्जा देण्यात आला आहे) डोंगराच्या टोकावर असलेल हे गाव. इथून अमरावती म्हणजे सहा तासांचा पल्ला. २७ वर्षीय सुनीलला (नाव बदलंल आहे) चार महिन्यांपासून डीआर टीबीसाठीचं बेडाक्युलीन औषध सुरू आहे. हे औषध कसं घ्याव हे अमरावतीच्या डॉक्टरांनी सांगितलं असलं तरी औषधांमुळं होणाऱ्या त्रासाला कंटाळून सुनीलनं दिवसभरात जमेल तसं औषध घेण्याचा पर्याय निवडल्याचं आम्हाला चर्चेमध्ये समजलं. त्याच्या तब्बेतीवर याचा फारसा परिणाम अजून तरी झालेला नसला तरी त्याच नेमक काय चुकतय याचा पत्ता टीबीचे अधिकारी किंवा टीबी सुपरवायझरला देखील लागलेला नव्हता. धूपकाले मे खाना नही जाता, गोलिया खानेपर पेट मे आग होती, बेहोश जैसे लगता इसलिए दवाईया एक साथ नही लेता था. ये सर आते तो समझाते, तो अच्छा लगता, असं सुनील आम्हाला सांगत होता.





मेळघाटातल्या टिटंबा गावच्या २७ वर्षाचा मुकेशला(नाव बदलंल आहे) चार वर्षापासून टीबी आहे. उपचार अनेकदा अर्धवट सोडल्यानं त्याला डीआर टीबीची लागण झालीयं. आमच्याशी बोलताना त्याचे वडील म्हणाले 'हम अमरावती के अस्पताल मे भर्ती थे लेकिन वहाँ डॉक्टर साहब को भीड कि वजह से इतना कहा टाईम रहता. बाकी बाई लोग को कुछ पूछने जाए तो सभी पेशंट को वही समझा समझा के चीड जाती है . तो हम किससे कुछ नही पूछते. जब ये सर मिलते तो सभी बाते बता देते. कोई भी परेशानी होने पर हम सर को ही फोन करते.' मुकेशला गेल्या काही दिवसांपासून औषधांमुळं सारख्या उलट्या होतात आणि जेवण अजिबात जात नसल्याचं आम्हाला त्याच्याशी बोलताना समजलं. डीआर टीबीच्या या उपचारांसाठी अमरावतीला जाण्याशिवाय पर्याय नाही, आणि अमरावतीला जायचं म्हणजे गाडीभाडं, पुढच्या काही दिवसांची मजुरी बुडीत. शिवाय त्याच्यासोबत कुणी तरी राहायला हवं. हे सार कस जुळवायचं असा प्रश्न त्याच्या वडिलांसमोर निर्माण झालायं.

मेळघाटातील आदिवासी समाजात टीबीबाबतचा स्टीग्मा फारसा नाही. परंतु हातावरचं पोट असणाऱ्या आदिवासी समाजामध्ये आरोग्याबाबत असलेल्या जनजागृतीचा मोठ्या प्रमाणात अभाव, गरीबी, रस्त्याची दुरावस्था, आरोग्य सेवा पोहचण्यात येणाऱ्या अडचणी, पोषण आहाराची कमतरता यामुळं इथल्या रुग्णांच्या गरजा वेगळ्या आहेत. इथल्या आदिवासींना पोट भरण्यासाठी बाहेरगावी कामाला जाण्याशिवाय पर्याय नाही. त्यात घरातील पुरुषाला टीबी झाल्यास धड खायलाही मिळणं मुश्कील. काही रुग्ण फक्त मोहाचा लाडू खाऊन औषधं घेत असल्याचं आम्ही पाहिलयं. रुग्णांना केवळ औषध घेण्याचा भडीमार करून उपयोग नाही हे जाणून सामाजिक संस्थाच्या मदतीनं प्रोटीन पावडर, पोषण आहार देण्याची व्यवस्था आम्ही करतो. कुटुंबाना सरकारी योजनांमधून आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रसंगी कागदपत्रे घेऊन पायपीटही करतो. इथं रुग्णाला दररोज अंड खाणं परवडणार नाही. त्यामुळं मग मूग, मटकी, हरभऱ्याची डाळ असे उपलब्ध पर्याय जेवणात जास्तीत जास्त कसे आणता येतील याबाबत साक्षर करतो. काही कुटुंबांनी तर यातून परसबागेत भाजीपाला करण्यासही सुरुवात केलीयं, असं लोकप्रिय सांगतात.

अमरावतीच्या इतर ग्रामीण भागातही हीच स्थिती आहे. नवरा संशय घेत असल्यामुळं डॉक्टरांशी बोलण्याची भीती आणि दुसरीकडे औषधांचे गंभीर दुष्परिणाम यामुळं वैतागलेल्या चाळीश वर्षांच्या सुषमाताई(नाव बदलले आहे) सांगतात, मला तर या रोगानं जगावसचं नाय वाटे. सारखं ही बिमारी बरी होणारच नाही असचं वाटे. मन खराब होई तेव्हा मी सरला फोन करून सगळं विचारते. रात्री पण फोन केले आणि घंटाभर बोलून त्याले हैराण केलं. पण जोपर्यत माझं मन शांत होत नाही तोवर ते बोलत राही. कधीच त्यानं कंटाळा नाही केला. बाई आमच्याशी बोलत होत्या. दूरूनच नवऱ्याच्या मोटारसायकलचा आवाज येताच त्या पटकन उठून आत गेल्या आणि पुन्हा बाहेर आल्याच नाहीत. त्यांच्या नवऱ्याशी थोडा वेळ बोललो आणि आम्ही पण लगेचच घराबाहेर पडलो. 'बाई नको असली तिचं सगळचं जड होतं, माहेरचा आधार आणि सरांनी दिलेल बळ यामुळंच मी बरी होत आले, हे सुषमाताईंचे शब्द पुन्हा पुन्हा डोळ्यासमोर येत होते.

अमरावतीच्या हणवत खेडा गावातील एक जोडपं मूल होत नाही म्हणून त्रस्त होतं. त्यात पत्नीला डीआर टीबीची लागण झाली. सासरच्यांनी तर आधार सोडलाचं पण नवरा देखील दुसरं लग्न करायला तयार झाला. लोकप्रिय यांनी वेळोवेळी मध्यस्थी करून कुटुंबाची, नवऱ्याची समजूत काढली. शेवटी नवऱ्याला त्याची चूक कळली. त्यानंतर त्यानंच बायकोची काळजी घेतली. 'हिला दवाखान्यात घेऊन फिरल्यावर काम कुठलं करणार. पैसा नाही. औषध मोफत होती, पण खायला, तपास करायला पैसा लागतो. दागिनं सगळ गहाण ठेवलं पण तिचं उपचार केलं. आता ही पूर्ण बरी झाली. पण आता मूल राहत नाही. टीबी झाल्यावर मूल होण्यात काय अडचण येते का हो सर?' असं विचारत हे जोडपं लोकप्रिय यांच्याकडं मोठ्या आशेनं पाहत होतं. लोकप्रिय यांनी या प्रश्नाचं उत्तर त्यांना समजेल अशा सोप्या शब्दात दिलं, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरील शंकाचं जाळ ओसरलं. हे समुपदेशक नसते तर आपल्या मनातल्या शंका या जोडप्यानं कुणाकडं मांडल्या असत्या या प्रश्नानं माझ्या मनात घर करायला सुरुवात केली. ग्रामीण भागात अशी अनेक उदाहरणं दिसतात. या रुग्णांसाठी समुपदेशक आरोग्य व्यवस्थेतील दुवा बनल्याच पदोपदी जाणवतं.


डीबीआर टीबीचं वाढते गांभीर्य

• देशभरात डीआर टीबीच्या रुग्णांची संख्या २०१६ ते २०१९ या काळात जवळपास दुपटीनं वाढून सुमारे ३४ हजारांहून सुमारे ६८ हजारांवर गेली आहे. निदानावर भर दिल्यामुळं हे प्रमाण वाढलं होते, परंतु २०२० आणि २०२१ मध्ये करोनाच्या साथीमुळे निदान प्रक्रियेवर परिणाम झाला आणि नव्यानं आढळणाऱ्या डीआर टीबी रुग्णांच्या संख्येत पुन्हा घट झाली. हे प्रमाण सुमारे ५० हजारांपर्यत खाली आल्याचं केंद्रीय आरोग्य विभागाच्या क्षयरोग अहवाल २०२२ मध्ये दिसून आलं आहे. महाराष्ट्राबाबत हे चित्र आणखीनंच गंभीर आहे. २०२० च्या केंद्रीय आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, देशभरात आढळणाऱ्या एकूण डीआरटीबी रुग्णांपैकी १९ टक्के रुग्ण राज्यात आढळतात. राज्यात दरवर्षी सुमारे आठ हजाराहून अधिक डीआर टीबी रुग्णांची नव्याने भर पडत आहे. यामध्ये सुमारे ५२ टक्के रुग्ण हे मुंबईत आढळतात.

समुपदेशकांचा विस्तार

टीआयएसएसनं सुरुवातीला मुंबईत आणि हळूहळू राज्यभरात ही समुपदेशकांची फळी उभारली आहे. सध्या महाराष्ट्रासह गुजरात, कर्नाटक आणि राजस्थान असं चार राज्यांमध्ये २१४ समुपदेशक या प्रकल्पाअंतर्गत काम करत आहेत. आरोग्य व्यवस्थेला समांतर व्यवस्था निर्माण न करता त्याच व्यवस्थेला सक्षम करणं हाच टीआयएसएसचा उद्देश्य. समुपदेशकांची गरज अधोरेखित झाल्यानंतर आता सक्षमने हा प्रकल्प २०२४ पासून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा पहिला टप्पा म्हणजेच मुंबईतील ५० समपुदेशकांची संख्या आता २५ झालीय. याचे परिणामही आता आरोग्य व्यवस्थेमध्ये दिसायला सुरुवात झाली आहे.

मुंबईतील समुपदेशकांवरील वाढता ताण

समुपदेशकांची संख्या निम्म्यानं कमी झाल्यानं आता उपलब्ध समुपदेशकांवरील कामाचा ताण वाढला आहे. काही समुपदेशकांकडे सध्या सुमारे अडीचशे तर काही जणांकडे सुमारे चारशे डीआर टीबी रुग्ण आहेत. महिनाभरात या सर्वांचा पाठपुरावा कसा करावा, प्रत्येकाशी महिन्यातून एकदा तरी संवाद कसा साधणार असा प्रश्न यांच्यापुढं निर्माण झाला आहे. एकावेळी इतक्या मोठ्या संख्येने रुग्णांच्या गरजा, त्यांचे प्रश्न यांना न्याय देण्यात अनेक आव्हानं सध्या येत असल्याचं समुपदेशकांनी व्यक्त केलं.


इतर जिल्ह्यांनाही फटका

अमरावतीमध्ये सध्या शहरात आणि ग्रामीणमध्ये प्रत्येकी एक समुपदेशक आहे. पुढच्या टप्प्यात जिल्ह्यासाठी एक समुपदेशक असणार आहे. जिल्ह्यामध्ये ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये मिळून डीआरटीबीचे ४३ रुग्ण आहेत. अमरावती जिल्ह्यात १५ तालुके असून यातील सर्व डीआरटीबी रुग्णांची जबाबदारी एकाच समुपदेशकाच्या खांद्यावर दिली तर रुग्णांशी संवाद, घर भेटी देणं शक्य आहे का असा प्रश्न निर्माण होत आहे. राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही हेच चित्र हळूहळू दिसत आहे. अमरावतीचे टीबी नियंत्रण अधिकारी डॉ. रमेश बनसोड सांगतात की, ग्रामीण भागासाठी टीआयएसएसचा एक समुपदेशक उपलब्ध आहे. परंतु अमरावती जिल्ह्याची भौगोलिक स्थिती लक्षात घेता आणखी एक समुपदेशकाची आवश्यकता आहे. हे उपलब्ध करून दिल्यास मेळघाटासह दुर्गम भागातील रुग्णांचा पाठपुरावा करणं सोईचे होईल.

याबाबत अधिक माहिती देताना राज्याचे आरोग्य विभागाचे तत्कालीन सहसंचालक (क्षयरोग नियंत्रण विभाग) डॉ. रामजी अडकेकर सांगतात, समुपदेशकांच्या कामाचा आढावा घेऊन याबाबत काय करता येईल याची उपाययोजना आरोग्य विभाग करेल.आरोग्य हा राज्याचा विषय असला तरी टीबी नियंत्रण कार्यक्रम हा केंद्रामार्फत राबविला जात असल्यानं निधीसाठी राज्य सरकार केंद्रावर अवलंबून आहे. त्यामुळं केंद्र सरकार काय भूमिका घेणारं याची राज्य सरकार वाट पाहत आहे.


केंद्रीय आरोग्य विभागाच्या पुढाकारानं सक्षम आणि इतर काही शैक्षणिक संस्थांच्या मदतीनं टीबी कार्यक्रमातील सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचे समुपदेशनाचे प्रशिक्षण लवकरच सुरु करण्यात येईल. त्यामुळं आता सर्व कर्मचाऱ्यांना समुपदेशनाची कौशल्ये शिकविली जातील. यामुळं रुग्णांशी कर्मचाऱ्यांचा होणार संवाद, पाठपुरावा यामध्ये याचा निश्चितच फायदा होईल, असा विश्वास टीआयएसएसच्या श्वेता बजाज यांनी व्यक्त केला.

२०२५ पर्यत टीबी निर्मूलनाच्या दिशेनं पावलं टाकताना केंद्रीय आरोग्य विभागानं टीबीच्या सर्व कर्मचाऱ्यांमध्ये समुपदेशनाची कौशल्ये विकसित करण्यासाठी पुढाकार घेतली ही बाब चांगलीच आहे. परंतु सध्याच्या आरोग्य व्यवस्थेच्या मर्यादा आणि कर्मचाऱ्यांवर असलेला कामाचा ताण यामुळं समुपदेशकांच्या उणीवेचा मूळ प्रश्न सुटेल का याबाबत साशंकताच अधिक आहे. केवळ उपचारावर भर न देता रुग्णाच्या कौटुंबिक, आर्थिक, सामाजिक प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी रुग्णाच्या घरापर्यत पायपीट करणाऱ्या, रुग्णाशी विश्वासाचं नात निर्माण करणाऱ्या समुपदेशकाची भूमिका २०२४ नंतर कोण निभावणार, रुग्णांच्या या अडचणींना दुर्लक्षित करून २०२५ पर्यत टीबी मुक्त भारत करता येईल का हे प्रश्न आरोग्य व्यवस्थेमध्ये सध्या अनुत्तरितच आहे.

...

-शैलजा तिवले

[email protected]


Updated : 29 Jan 2023 10:38 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top