आशयाचं 'डिमॉनटायझेशन'!
चहू बाजूंनी सर्जनशील आशयावर घाला होत असताना आपण समूह म्हणून कसे तगणार? समुहाला विचारांची गरज असते. विचारांचं पीक उगवण्याचं काम कलाकार करतो. मात्र, जागतिकरणाच्या या जगात कलाकार अडचणीत सापडलाय का? वाचा लेखक श्रीरंजन आवटे यांचा वस्तुस्थितीवर भाष्य करणारा लेख
X
विल्यम डेरसिवस यांचं 'द डेथ ऑफ द आर्टिस्ट' नावाचं पुस्तक अगदी अलीकडेच प्रसिद्ध झालं आहे. तंत्रकौशल्यावर आधारित उभ्या असलेल्या बड्या कंपन्या आणि अब्जाधीश उद्योगपतींच्या राज्यात कलाकार कसे तग धरण्याचा प्रयत्न करत आहेत, हे मांडण्याचा डेरेसिवस यांनी प्रयत्न केला आहे. पूर्ण वेळ कवी-लेखक/ चित्रकार/संगीतकार आदी म्हणून जगणं कसं अवघड होत चाललं आहे, यावर पुस्तकात मांडणी केली आहे. आपल्याकडे तर पूर्ण वेळ अशा प्रकारचा कलाकार म्हणून जगणं ही एक फॅंटसीच आहे.
सिलिकॉन व्हॅलीची नवी संस्कृती सर्जनशील उत्पादनांवर आर्थिक आणि गुणात्मक बाबतीत प्रभाव पाडते, याचं विवेचन काही कलाकारांशी केलेल्या संवादातून डेरेसिवस यांनी मांडलं आहे. बाजारकेंद्री अर्थव्यवस्थेतून कलाकारांचं आर्थिक नुकसान झालंच पण सोबतच आशयाचं डिमॉनटायझेशन झालं असं नोंदवलं गेलं आहे.
या पुस्तकाविषयी लिहिताना रॉबर्ट डायब म्हणतातः
Creators need to cater to the market's demand for constant and immediate engagement, for "flexibility, versatility, and extroversion." As a result, "irony, complexity, and subtlety are out; the game is won by the brief, the bright, the loud, and the easily grasped."
हे अक्षरशः तंतोतंत खरं आहे. सार्वत्रिक आहे. अर्थात या आधीही स्कॉट टिम्बर्ग यांच्या 'कल्चर क्रॅशः द किलिंग ऑफ द क्रिएटीव्ह क्लास' आणि जोनाथन टिपलिन यांच्या 'मूव्ह फास्ट ॲण्ड ब्रेक थिंग्सः हाउ फेसबुक, गुगल ॲण्ड अमेझॉन कॉर्नर्ड कल्चर ॲण्ड अंडरमाइंड डेमॉक्रसी' पुस्तकांमधून हे वास्तव समोर आलेलं आहे.
एका बाजूला सा-या कलाविष्कारांसाठी जणू शेकडो प्लॅटफॉर्मसच्या माध्यमांमुळे जणू सुकाळ आहे, अशी मांडणी होत असताना हे सारं आभासी आहे की काय, असा प्रश्न पडतो. चहू बाजूंनी सर्जनशील आशयावर घाला होत असताना आपण समूह म्हणून कसे तगणार हा खरोखरच खूप गंभीर आणि व्यापक मुद्दा आहे.
- श्रीरंजन आवटे