Home > मॅक्स ब्लॉग्ज > देवाले मोहफुल लागते, दारू त माणसायले लागते...

देवाले मोहफुल लागते, दारू त माणसायले लागते...

समाजाने पुरोगामी निर्णय घेतला तर त्यात अनेकवेळा अडथळा येतो धार्मिक प्रथा-परंपरांचा...गडचिरोली जिल्ह्यात जेव्हा दारुबंदी करण्यात आली तेव्हा, धार्मिक कामांसाठी दारु वापरण्याच्या प्रथेचा मुद्दा समोर आला. पण यावर कोणताही वाद न होता तिथल्या पुजाऱ्यांना मार्ग काढला आणि दारुबंदी पूर्णपणे लागू करता आली...आमचे प्रतिनिधी सागर गोतपागर यांचा खास रिपोर्ट

देवाले मोहफुल लागते, दारू त माणसायले लागते...
X

गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदीच्या चळवळीला अडसर होती ती धार्मिक कामातील दारू. पुजारी पुढे आले आणि या समस्येचे उत्तर त्यांनी कोणत्या पुस्तकातून नव्हे तर अनुभवातून शोधले.... आणि सुरू झाली दारू ऐवजी मोहफुलाचे पाणी शिंपडण्याची प्रथा....वाचा सागर गोतपागर यांचा लेख...

गडचिरोली जिल्ह्यातील मुक्तिपथने उभे केलेले दारूबंदीचे वारे अनेक गावापर्यंत पोहचत होते. पण गोंडी धर्म आणि दारू यांच्याशी जोडलेला धार्मिक संबंध यातून दारूबंदीचा मार्ग कसा काढायचा म्हणून मी माझे आदिवासी सहकारी भास्कर तो कड्यामी अनेक आदिवासी पुजाऱ्यांना भेटलो. आदिवासी नेते माधव गोटा, देवाजी तोफा, हिरामन वरखडे यांना सातत्याने भेटलो. गोंडी धर्म आणि मोह, मोहाची दारू यांच्या संदर्भाने सविस्तर चर्चा केली. या दरम्यान आम्हाला एक पुजारी भेटले. त्यांनी देव कामात दारूचे महत्त्व आहे असे सांगितलेच. पण त्यांना मान्य होते की दारूमुळे आदिवासी तरुणांच्या अनेक पिढ्या व्यसनाधीन होत आहेत. फासी टोला या गावातील भर बैठकीतच त्यांनी लोकांना या संदर्भातील निर्णय सांगितला. ते म्हणाले " मोहाची दारू लागते हे खरं आहे. पण मोहाची फुले पाण्यात बुडविली आणि ते पाणी शिंपडले तरीही ते मान्य होते. यासाठी दारूच कशाले लागते. मी मोहाचे फुल आणि शिंपडलेले पाणी सुद्धा मान्य करून घेतो".


या घटनेपासून धार्मिक कार्यक्रमातील दारूच्या वापराचा तिढा आपोआप सुटत गेला. तो कुणी आम्ही कार्यकर्त्यांनी अजिबात सोडविला. तो काही पुजाऱ्यांनीच सोडवला. काही गावात मोहाचे शिंपडलेले पाणी वापरण्याचा निर्णय झाला. दारूबंदी अंमलात आलेल्या काही गावात हा प्रश्न निर्माण झाला. लोकांनीच याचे उत्तर शोधले. कोणाचे देव काम असेल तर अगोदर समितीला कळवावे. देव कामासाठी तीन लिटर दारू काढण्याची परवानगी समिती देईल. पण कोणत्याही परिस्थितीत दारूचा व्यापार होणार नाही. मुलांना दारूचे वाटप होणार नाही. दारूचा पंप म्हणून कुप्रसिद्ध काकडयेली गावानेही असाच निर्णय घेतला आहे.



माधव गोटा यांनी गोंडी धर्म आणि दारूचा संबंध स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. आदिवासी समूहाचे श्रद्धास्थान आहे कुपारलिंगो.. त्यांनी मोहाच्या झाडाचा आश्रय घेतलेला होता. त्यानंतरच्या काळात हळूहळू मोहाच्या झाडाचे महत्त्व संस्कृतीमध्ये वाढले. मोहाच्या झाडाचे धार्मिक महत्त्व वाढण्यात या झाडाचे अनेक गुणधर्म देखील कारणीभूत आहेत. या झाडाच्या प्रत्येक भागाचा उपयोग होतो. दुष्काळाच्या काळात लोकांनी मोहफुले खाऊन आयुष्य काढले आहे. मोहाच्या दारूचे वाढते प्रस्थ यावर कुपारलिंगो यांनी त्या काळात कचारगड येथे झाडे तोडण्याची मोहीम सुरू केल्याची आख्यायिका देखील माधव गोटा सांगतात. नंतरच्या काळात या झाडाचे इतर महत्त्व लक्षात घेता ही मोहीम थांबविण्यात आली.

यानुसार आजही मोहाचे लाडू, मोहाची बिस्किटे, चॉकलेट , मोहाचा जाम यासह इतर खाद्यपदार्थ बनवणे या भागात सुरू आहे. तसेच यावर काही संशोधन देखील काही तरुण करत आहेत.

दारूबंदीसाठी अडसर बनत चाललेले धार्मिक भूमिका हळूहळू लवचिक होत गेली आणि ती बहुतांश गावात दारूबंदीच्या बाजूने झाली. मुरुमगावाचा दारूचा ऐतिहासिक लढा प्रसिद्ध आहे. इथे महिलांनी जीवावर उदार होत दारूबंदी केलेली आहे. काही महिलांना घरगुती हिंसेला सामोरे जावे लागले होतें. पण महिला मागे हटल्या नाहीत. त्यांनी दारूबंदी करून दाखवली. पोलिसांना जे जमले नाही ते या महिलांनी केले. दोन ट्रॉली दारू या बायांनी पकडली. दारू मोजताना पोलिसांना वेगळी कुमक आणावी लागली. दारूबंदीचे वातावरण इतके चांगले झाले की धार्मिक पुजारी दारूबंदीच्या बाजूने उभे राहिले. मुरुमगावात त्या वर्षी झालेल्या आंगा देव कार्यक्रमात आंगा देव अंगात येऊन त्यांनी या महिलांना दारूबंदीसाठी मदत करा असे सांगितले. एखाद्या प्रश्नाचे कृत्रिम उत्तर आपण समाजशास्त्राच्या, तत्वज्ञानाच्या पुस्तकातून शोधून समाज समूहात ते लागू करत असतो. पण धार्मिक परंपरेत असलेल्या दारूचा अडसर दूर कसा करायचा याचे उत्तर आम्हाला आदिवासींनी शोधून दिले होते. त्याची अंमलबजावणी देखील त्यांनीच केली होती. आज कुणीही दारूबंदीच्या सभेत आमच्या देवकामासाठी लागते ना जी दारू ? असा सवाल केला तर त्याचे उत्तर मुक्तीपथच्या कार्यकर्त्यांना द्यावे लागत नाही. त्यातीलच कुणीतरी उठून सांगते "देवाले कायले लागते दारू, दारू माणसायले लागते. देवाले मोहफुल भिजवून पाणी शिंपडले तरी बस होते".

Updated : 26 March 2022 7:22 PM IST
Next Story
Share it
Top