महिला आमदार फेसबुक पेजचा वापर कसा करतात?
X
सन २०१९ च्या विधानसभेत निवडून गेलेल्या सर्व २४ महिला आमदार विधिमंडळात मुद्दे मांडण्यासह समाजमाध्यमांतही उपस्थित आहेत. त्यांच्या या उपस्थितीची त्यांच्या मतदारसंघातील स्थिती, समस्या समजून घेण्यासाठी फारशी मदत होत नसल्याचे 'संपर्क' संस्थेच्या अभ्यासात दिसून आले आहे. आमदार महिलांच्या फेसबुक पेजेसवर दिनविशेष, जयंती-मयंती या प्रकारच्या पोस्ट्सची संख्या सर्वाधिक, म्हणजे ७१ टक्के तर मतदारसंघातील कामांविषयीच्या मजकूर ४.३१ टक्के इतकाच दिसतो.
सोशल मिडियावरच्या मजकुराचं व्यवस्थापन हा लोकप्रतिनिधींच्या कार्यालयीन कामाचा एक अविभाज्य भाग झाला आहे. आणि टाळेबंदीच्या काळात तर मतदारसंघांशी संपर्क साधण्याकरिता समाजमाध्यमांचा उपयोग करण्याचं प्रमाण वाढलं. धोरणअभ्यास आणि पाठपुरावा करणाऱ्या मुंबईस्थित संपर्क संस्थेने महिला आमदारांकडून संवेदनशील आणि प्रभावी अशा समाजमाध्यमी मंचाचा वापर कशासाठी व कसा केला जातो, याचा अभ्यास नागरिकत्वाच्या भूमिकेतून केला.
सन २०२० या कोव्हिड छायेतील वर्षातील सर्व महिला आमदारांच्या फेसबुक पेजेसवर प्रसिद्ध झालेल्या मजकुराच्या नोंदी ठेवत वर्गीकरण व विश्लेषण केले. यात महिला आणि बालकांसंबंधीचा मजकूर २ टक्क्यांहून कमी आणि शिक्षणविषयक मजकूर दीड टक्के आढळला. कोव्हिडकाळात रोजगाराचे आणि स्थलांतरितांचे प्रश्न बिकट झाले होते. मात्र, महिला आमदारांच्या पेजेसवर सर्वात कमी म्हणजे ०.०७२ इतक्या पोस्ट्स रोजगार या विषयाच्या आहेत. त्यांची टक्केवारी ०.०७२ इतकी आहे. स्थलांतरितांच्या प्रश्नांवरील पोस्ट्ची संख्या केवळ ०.२२ टक्के आहे. या काळात त्यांनी भरपूर कल्याणकारी कामे केली. त्यासंबंधीचा मजकूर ४.३१ टक्के आहे.
विधानसभेतील कामगिरीविषयक सर्वाधिक मजकूर सुलभा खोडके, त्या खालोखाल प्रतिभा धानोरकर यांचा आहेत. बालकांविषयीच्या पोस्ट्सची सर्वाधिक संख्या यशोमती ठाकूर आणि शिक्षणविषयक सर्वाधिक पोस्ट्सची संख्या वर्षा गायकवाड यांची आहे. त्या त्या विभागाची मंत्रीपदं त्या सांभाळत असल्याने हे उघडच आहे.
सरोज अहिरे या विधिमंडळाच्या महिला-बालकल्याण समितीच्या अध्यक्ष असूनही त्यांच्या पेजवर महिला-बालकांसंबंधीचा मजकूर नगण्य दिसतो. महिलांविषयीच्या पोस्ट्सची सर्वाधिक संख्या नमिता मुंदडा आणि त्या खालोखाल सीमा हिरे यांची, शेतीविषयक सर्वाधिक पोस्ट्स नमिता मुंदडा, त्या खालोखाल मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या आहेत. १ लाखावर पेज लाइक्स आणि फॉलोअर्स असलेल्या डॉ भारती लव्हेकर, श्वेता महाले आणि प्रणिती शिंदे या तीन आमदार आहेत. सर्वाधिक, ३ लाखांहून अधिक पेज लाइक्स आणि फॉलोअर्स डॉ भारती लव्हेकर, वर्सोवा मतदारसंघ यांना आहेत.
फेसबुक या समाजमाध्यम मंचावर विविध कार्यक्रम, सोहळे-समारंभ, मोहिमा यांना प्रसिद्धी देण्यावर आमदार महिलांचा अधिक भर दिसतो. यातून त्यांच्या मतदारसंघातील वास्तव किंवा समस्या याविषयी फारशी माहिती हाती लागत नाही. आणि त्यांनी महत्व दिलेल्या कार्यक्रमांत महिला, बालक, शिक्षण, कोविडकाळातील अन्य आरोग्यसमस्या हे विषय शोधूनही फारसे सापडत नसल्याचे पुढे येते. जनमानसावर प्रभाव टाकणार्या लोकप्रतिनिधींचा सोशल मिडियावरचा वावर अधिक माहितीसंपन्न व्हावा, या उद्देशाने 'संपर्क'ने हा अभ्यास केला होता.