Home > मॅक्स ब्लॉग्ज > 'माती'तून उगवलेला 'बुद्ध'... म. गांधी !!!

'माती'तून उगवलेला 'बुद्ध'... म. गांधी !!!

महात्मा गांधी यांना कुणी राष्ट्रपिता म्हणुन नाकारेल, कुणी त्यांना महात्मा म्हणुन नाकारेल पण त्यांच्या नेतृत्वाखाली देशातील सर्वसामान्य जनता स्वातंत्र्युध्दामध्ये एकवटली हे कुणालाही नाकारता येणार नाही. गांधींनी काँग्रेससोबत इतर विरोधी पक्षांनाही कसं आपलंसं केलं होतं हे जाणून घ्यायचं असेल तर वाचा ज्ञानेश वाकुडकर यांचा हा सुरेख लेख...

मातीतून उगवलेला बुद्ध... म. गांधी !!!
X

'गांधीं'ना प्रात:स्मरणीय म्हणत म्हणत, 'गोडसे झिंदाबाद' करणारे जसे आहेत; तसेच, 'बुद्धा'चं नाव घेत घेत इतरांच्या नावाने द्वेषाच्या ओकाऱ्या करणारेही कमी नाहीत...

कुणाला आवडो, न आवडो, कोणी मान्य करो वा न करो, पण गांधींच्या नेतृत्वात या देशाला स्वातंत्र्य मिळालं आहे, हे वास्तव आहे!

देश स्वतंत्र झाला म्हणून या देशात लोकशाही आली. स्वातंत्र्य मिळालं म्हणूनच देशाचे स्वतंत्र संविधान आले. बाबासाहेबांनी संविधानामध्ये स्वतःचा जीव ओतला. वंचितांना, उपेक्षितांना विशेष अधिकार मिळालेत... याचं भान आम्ही ठेवायला हवं. तुम्ही स्वातंत्र्याच्या लढाईत सहभागी नव्हता..? ओके! तुमचे नेते सहभागी नव्हते..? ओके? पण हजारो, लाखो, करोडो लोक स्वातंत्र्याच्या लढाईत सहभागी होते, याचं भान आपण ठेवलं पाहिजे.

अनेकांनी स्वातंत्र्यासाठी लाठ्या खाल्ल्या, स्वतःची डोकी फोडून घेतली, रक्त सांडलं, जेलमध्ये गेलेत, स्वतःच्या घरादारावर तुळशीपत्र ठेवलं, अनेकांची बायका पोरं उघड्यावर पडली. अनेकांचे संसार स्वातंत्र्याच्या यज्ञकुंडात भस्म झालेत, तेव्हा कुठं हे स्वातंत्र्य मिळालं!

स्वातंत्र्य घरात बसून मिळालं नाही. त्यात सर्वच जाती धर्माचे लोक सामील होते. पुरुष होते, महिला होत्या. तरुण होते, म्हातारे होते. गरीब होते, श्रीमंत होते. अशिक्षित होते, तसेच अनेक बॅरिस्टर होते, डॉक्टर होते, प्राध्यापक होते.. साऱ्याच क्षेत्रातील लोक होते. त्या सर्वांच्या त्यागातून देशाला स्वातंत्र्य मिळालं... आणि त्या लढाईचे सर्वोच्च नेते होते बॅरिस्टर मोहनदास करमचंद गांधी! जात, पात, धर्म विसरुन सारा देश या फाटक्या माणसाच्या नेतृत्वात एक झाला होता. काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत आणि कलकत्त्यापासून मुंबई पर्यंत सारा देश या माणसाला आपला नेता मानत होता.

विरोधकांचा मोठेपणा मान्य करायला जेवढं मोठं मन असावं लागते, तेवढीच स्वतःची उंचीही मोठी असावी लागते! खुजी माणसं आयुष्यभर स्वतःच्या सावलीलाच घाबरत असतात. स्वतंत्र भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळाची यादी घेऊन नेहरू जेव्हा गांधीजीकडे गेले, तेव्हा "हे सरकार काँग्रेसचं आहे की, देशाचं?" ...असा थेट प्रश्न विचारुन विरोधी पक्षात असणाऱ्या बाबासाहेबांना मंत्रिमंडळात घ्यायला सांगणारे गांधीच होते! नेहरु मंत्रिमंडळात राहूनही त्यांच्याच विरोधात बोलणाऱ्या 'डाॅ. बाबासाहेब आंबेडकरां'ना सहन करण्याचा मनाचा मोठेपणा हाही गांधीमुळेच पं. नेहरुंमधे आला होता! गांधींच्या किचनमध्ये प्रत्यक्षात 'भंगीकाम' करणारी व्यक्ती स्वयंपाकी म्हणून काम करायची, हे किती लोकांना माहीत आहे? दुसऱ्या कोणत्या नेत्याने ही हिंमत दाखवली? गांधी स्वतः संडास साफ करायचे! कुष्ठ रोग्यांच्या जखमा धुवायचे, हे भारताच्या इतिहासात आणखी कोणत्या नेत्यांनी केलं आहे? अनेक उच्चविद्याविभूषित, श्रीमंत तसेच उच्चवर्णीय लोक देखील गांधींच्या प्रभावामुळे सार्वजनिक संडास साफ करायचे हे दुसऱ्या कोणत्या नेत्याने किंवा त्यांच्या अनुयायांनी केलं आहे?

एका अस्पृश्य कुटुंबाला आश्रमात ठेऊन घेण्याच्या वादावरुन बाकी सहकारी तर सोडाच; पण, खुद्द कस्तुरबा गांधी आश्रम सोडून जायची वेळ आली होती, तरीही गांधी झुकले नाहीत!

...आणि तरीही गांधी दलित विरोधी? तरीही गांधी वर्णवादी?


वैचारिक मतभेद असू शकतात; पण, गांधींचा मोठेपणा समजून घेण्यासाठी जात, पात, धर्म, पंथ, पक्ष अशा डबक्यातून आधी बाहेर यावं लागते! निदान चळवळीशी नातं सांगणाऱ्या लोकांनी तरी, आपल्या मनातला गांधीद्वेष दूर केला पाहिजे! गांधी हे रसायनच वेगळं आहे! गांधी म्हणजे कोरडी फिलॉसॉफी नव्हे, गांधी म्हणजे प्रत्यक्ष जगणं आहे! गांधी म्हणजे चमत्कार आहे! गांधी म्हणजे मातीतून उगवलेला 'नैसर्गिक बुध्द' आहे!


ज्ञानेश वाकुडकर

लेखक

Updated : 2 Oct 2022 10:21 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top