Home > मॅक्स ब्लॉग्ज > गर्दीवर उपाय काय मायबाप सरकार, यावर विचार करा… - रवींद्र आंबेकर

गर्दीवर उपाय काय मायबाप सरकार, यावर विचार करा… - रवींद्र आंबेकर

गर्दीवर उपाय काय मायबाप सरकार, यावर विचार करा… - रवींद्र आंबेकर
X

मुंबईतील लॉकडाऊन अंशतः खुलं झाल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणाहून गर्दीचे फोटो-व्हिडीयो व्हायरल होत आहेत. बस मध्ये चढताना फिजिकल डिस्टंसिंग चं पालन न करणे, इथपासून कोलकाता चा बस मध्ये चढतानाच्या चेंगराचेंगरीचा व्हिडीयो ही मुंबईच्या नावाने खपून गेला आहे. मीरा-भायंदर मधली बसची रांग तर जीवघेणी वाटावी अशीच आहे. समस्या तर गंभीर आहे, यावर उपाय काय… समस्या सांगणं म्हणजे सरकारवर टीका करणं असा समज असलेलला नवीन भक्त समाज ही सध्या निर्म्ाण झालेला दिसतो. त्यामुळे काही उपाय योजनांवर ही बोलायला हवं.

मुळात फिजिकल डिस्टंसिंग मुंबई-पुणे-दिल्ली-चेन्नई-कोलकाता-सूरत तसंच अशाच गजबजलेल्या शहरांमध्ये शक्य आहे का हा सर्वांत मोठा प्रश्न आहे. या शहरांची रचनाच वेडीवाकडी झालेली आहे. रस्ते काटकोनात आहेत की नाहीत, यावरून शहराच्या रचनांचा अभ्यास सहसा केला जातो. मुंबईत अभावानेच अशी रचना बघायला मिळेल. जिथे अशी रचना आहे, तिथे ही गर्दी मुळे सगळं कोलमडलेलं बघायला मिळते.

मुंबईची लोकसंख्या अडीच कोटींच्या आसपास सांगितली जाते. या लोकसंख्येला आवश्यक दळणवळणाची संसाधनं मुंबईत नाहीत, त्यामुळे आहे त्या साधनांवर प्रचंड ताण नेहमीच असतो. ट्रेन मध्ये प्रवेश करणं हे एक शास्त्र आहे, ते सर्वांनाच जमेल असं नाही. मी स्वतः अनेक वर्षे झाली ट्रेन ने प्रवास करणं सोडलेलं आहे. शारीरिकदृष्ट्या कमकुवत असाल तर तुम्ही बस आणि ट्रेन मध्ये चढूच शकत नाही. या प्रवासासाठी तुम्ही मानसिकदृष्ट्याची कठोर असण्याची गरज असते. आपण चढताना दुसऱ्याची चिंता करायची नसते हे इथलं तत्व. एकदा चढल्यानंतर मग एक इकोसिस्टीम तयार होते. जे चढले आहेत त्यांना सहसा पडू दिलं जात नाही. Survival of the fittest च्या निकषा प्रमाणे जे चढले ते फिट आहेत, जे चढू शकले नाहीत त्यांची चिंता करायची नसते. जंगलाच्या कायद्याप्रमाणे जे फिट लोकं आत जाऊ शकले आणि सीट वर बसू शकले ते आपलं प्रभुत्व सिद्ध करायला भांडतात. त्यामुळे सीट वरून डब्याच्या आत भांडणं होताना दिसतात, दरवाज्यावर उभे असलेले एकमेकांना धक्का देतील जरूर पण सावरून ही घेतात. वरकरणी विषयांतर वाटेल, पण तसं नाहीय. मुंबई किंवा अन्य शहरं जंगलाच्या कायद्यावर चालतात, देशाच्या नाही.

physical distancing Courtesy: Social media

त्यामुळे कोरोना काळातल्या फिजिकल डिस्टंसिंग, सुरक्षित अंतर, वैयक्तिक स्वच्छता-आरोग्याच्या चांगल्या सवयी या लॉकडाऊन नंतर कायम राहतील का, या काळात आपल्या मनात जी आदर्श सिस्टीम तयार झालीय किंवा स्वप्नरंजन आहे ते टिकेल का असा प्रश्न ज्यांच्या मनात आहे त्यांना पहिल्या दिवसाची दृश्ये बघून धक्का बसला आहे. खरं पाहायला गेलं तर काल जे दिसलं तिच वास्तविकता आहे. कारण….

कारण स्पष्ट आहे. आपण नागरिकशास्त्राचं पालन करत नाही. आपल्याला आपलं नागरिकशास्त्र माहित नाही, शाळेतला तो एक कंटाळवाणा विषय होता. शाळेत शिकलेलं नेमकं काय आपल्याला आता कामाला येतंय, पण जे कामाचं होतं ते आपण शिकलेलोच नाही. तर कोरोना नंतरच्या जगात जगायचं असेल तर जंगलाच्या कायद्यातून बाहेर येऊन नागरिकशास्त्राच्या आधारे जगलं पाहिजे. गर्दीत जो फिट असेल तो पहिल्यांदा चढेल, चांगल्या व्यवस्थेत महिला, दिव्यांग, शारीरिकदृष्ट्या अक्षम लोकांनाही स्थान मिळेल. धक्काबुक्की होणार नाही. सर्वांना योग्य संधी मिळेल. यासाठी नागरिक शास्त्र शाळा पातळीपासून महाविद्यालयीन जीवनापर्यंत १०० मार्कांचा विषय असावा आणि त्यात ७५ टक्के प्रात्यक्षिकांवर भर असावा. शालेय जीवनानंतर नोकरीच्या ठिकाणीही पूर्वपरिक्षेत नागरिकशास्त्रासी संबंधित प्रश्न असावेत.

हा झाला दीर्घ कालीन उपाय, दुसरा उपाय काय आहे.. ? पृथ्वी कधीतरी बंद होईल असं कुणालाही वाटलं नव्हतं. मानवी अहंकार आणि व्यवहाराच्या पलिकडे जाऊन जगभर अनेक गोष्टी झाल्या, लोकांनी आपापल्या सरकार वर आपल्या जीवनाचा भार सोपवला आणि सरकारच्या उलट-सुलट निर्णयांनाही बिनबोभाटपणे स्विकारलं. त्यामुळे जान है तो जहान है या उक्तीप्रमाणे लोक आता सरकारचं ऐकायला तयार आहेत. अनलॉक करत असताना सरकारने जर नवीन जीवनप्रणाली न देता अनलॉक केलं तर मात्र सगळी गडबड होणार आहे. हे सांगत असताना नेमकं काय केलं पाहिजे हे ही सांगितलं पाहिजे. याक्षेत्रातल्या काही तज्ज्ञांशी आणि माझ्या वैयक्तिक अनुभवातून जे सुचतंय ते मांडण्याचा मी प्रयत्न करतोय. तज्ज्ञांनी अधिक अभ्यास करून यावर आपलं मत नोंदवायला हवं.

१) कार्यालयीन वेळांची पुनःआखणी करणे. मुंबईचे काही टप्पे करावेत, जसं चर्चगेट ते महालक्ष्मी, महालक्ष्मी ते दादर, दादर ते वांद्रे. या टप्प्यांमधल्या कार्यालयीन वेळेत अर्धा-पाऊण तासांचा फरक करावा. त्यामुळे सकाळचा पीक टाइम विभागला जाईल. मिनिटां-मिनिटांची लढाई तास-अर्धा तासावर जाईल.

२) सुट्यांचं नियमन - प्रत्येक विभागात ठराविक दिवशी सुट्टी देण्यात यावी. किंवा कर्मचाऱ्यांना ऑ़ड-इव्हन चा फॉर्म्युला लावत सुट्टी देता येऊ शकेल. शनिवार-रविवार हे सामूहीक सुट्टीचे दिवस ही संकल्पना हळूहळू बाद करावी.

३) पाळ्यांमध्ये कामकाज चालवणं, जेणेकरून कर्मचारी वर्गावर प्रवासाचा जास्त ताण येणार नाही. एकाचवेळी जवळपास संपूर्ण मुंबई कामावर निघते त्याएवजी ही गर्दी तीन पाळ्यांमध्ये विभागली जाईल.

४) गर्दीच्या झोन मध्ये कमी प्रवासी संख्या असलेल्या खाजगी गाड्यांना प्रवेश नाकारणे. यामुळे कार-पुलिंग ला चालना मिळेल. एकट्या माणसासाठी एक गाडी या संकल्पनेला छेद मिळेल आणि रस्त्यांवरचा वाहनांचा लोड कमी होईल.

५) दुकाने, मॉल रात्री ही खुली ठेवावित. हा निर्णय झालाच आहे. त्याची कडक अंमलबजावणी व्हायला हवी.

६) सार्वजनिक वाहतूकीच्या सुविधांचं जाळं केवळ शहरातच न पसरवता महानगर क्षेत्रात ( एमएमआर क्षेत्रात ) पसरवावं. त्यामुळे छोटी-मोठी कार्यालये, कमी कर्मचारी संख्या असलेली कार्यालये आपापल्या सोयीच्या परिसरातून ( कमी जागा, कमी भाडे, आसपासचं मनुष्यबळ ) कामकाज करू शकतात.

अशा काही उपाययोजना तातडीने अंमलात आणता येऊ शकतात. ज्यांना शक्य आहे त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम ची व्यवस्था आधीच केलेली आहे. याउपर कंपन्या-कार्यालये आपापल्या कामाच्या ठिकाणी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी विविध सुविधा ही देऊ शकतात.

तातडीने या उपाययोजना केल्या तर मला वाटतं एक नवीन मुंबई आकाराला येऊ शकते, मुंबईचं वर्क कल्चर बदलू शकतं. एकदा मुंबईचं वर्क कल्चर बदललं तर इतर शहरं ही त्याचं सहज अनुकरण करू शकतात.

कोरोनानंतरचं जग कसं असेल ही चर्चा कोरोना कायम राहणार आहे, आणि कोरोना सारखे आणखीही विषाणू येऊ शकतात इथपर्यंत आलेली आहे. अशा वेळी आपल्या जीवनपद्धती आणि कामाच्या पध्दतीत अमूलाग्र बदल घडू शकला नाही तर मात्र या महामारीतून आपण काही शिकलो नाही असं मानावं लागेल.

- रवींद्र आंबेकर

Updated : 12 Jun 2020 11:58 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top