डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची प्रासंगिकता आणि समकालीन प्रभाव
डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा सद्यकालीन परिस्थितीवर असणारा प्रभाव आणि त्याची प्रासंगिकता यांचे सखोल विश्लेषण केले आहे. प्रा. सचिन गरुड यांनी..
X
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेची ऐतिहासिकता आणि समकालीन संदर्भात त्याचे उपयोजन व मूल्यांकन करण्याच्या द़ृष्टीने काही पैलूंवर मी माझे काही विचार आपल्यासमोर ठेवतो आहे.
1.बाबासाहेबांच्या प्रतिमा व प्रतीकाचे सापेक्ष विश्लेषण करणे गरजेचे आहे. भारतीय जातीसमाजात त्यांची असलेली प्रतिमा पुढील तीन प्रकारात पाहिली जाते.
1) एका अस्पृश्य जातीचे म्हणजे महार जातीचे,
2) अस्पृश्य जातीसमुहाचे
3) भारताला राष्ट्र-राज्य म्हणून घडविण्यासाठी योगदान करणारे राष्ट्रीय नेते
1990-2000 च्या कालखंडात जागतिकीकरणानंतर ही प्रतिमा विश्व महामानवाची झाली आहे. ते आता एका राष्ट्राचे महामानव म्हणून राहिले नाहीत. वैश्विक झाले आहेत. त्यामुळेच त्यांना एका अस्पृश्य जातीच्या वा अस्पृश्य जातीसमुहाच्या मुक्तीसंघर्षाचे नायक म्हणुन पाहणे चुकीचे आहे. जातीसमाज नसलेल्या युरो-अमेरिकन-ऑस्ट्रेलियन जनसमाजात आंबेडकरांच्या विचारधारेबद्दल सामाजिक चळवळी व अकादमिक स्तरावर आकर्षण व आस्था सतत वाढत असताना दिसते आहे. जगभरातील शोषितशासीत वंचित जनसमुहाच्या मुक्ती संघर्षाचे नायक म्हणुन त्यांची प्रतिमा साकारत आहे. बुध्द, जीजस, मार्क्स या महामानवांच्या पंक्तीत त्यांना आता स्थान दिले जावू लागले आहे. ब्रिटिश वसाहतवादयांनी व भारताने हेतूत: गांधींची प्रतिमेचे वैश्विकीकरण केले. वास्तविक आंबेडकरांपुढे गांधींच्या मर्यादा उघड झाल्या आहेत. या तुलनेत आंबेडकर आता जागतिकस्तरावर समजावून घेतले जात आहेत. आणखी एक मुद्दा असा आहे की, आंबेडकरांना प्रखर राष्ट्रवादी नेता म्हणूनही प्रोजेक्ट केले जात असते. पण त्यातील गफलत लक्षात घेतली पाहिजे. बाबासाहेब हे नॅशनलीस्ट नसून लोकशाही-समाजवादी आहेत. भारतीय राष्ट्रवाद व राष्ट्र -राज्य घडणीच्या प्रक्रियेत त्यांचा चतंगपे अर्थात संव्यवहार वर्ग, जाती, लैंगिक विषमतेच्या निराकरणार्थ मानवी मुक्तीच्या बाजूने होता. हे प्रकर्षाने लक्षात घेतले नाहीतर ही अशी चर्चा राष्ट्रवादाच्या गारुडाच्या सापळ्यात सापडण्याची शक्यताच जास्त !
2.बाबासाहेबांच्या एकूण चरिषात्मक व वैचारिक साहित्याचे कालानुक्रमिक टप्पे करुन सापेक्षत: चर्चा केली तरी समग्रद़ृष्टीची आवश्यकता आहे. 1980पर्यंत धनंजय कीर व चांगदेव खैरमोडे यांच्या लिखित चरिषाच्या आधारावर मराठी विश्वात जे आकलन साकारले त्याची व्यापक समीक्षा केली गेली नाही. कीरांनी आंबेडकरांना सावरकरीय विचारांच्या प्रभावात मार्क्सविरोधी व गांधीशषु म्हणून रेखाटले आहे. या चरिषाव्दारे मराठी दलित व दलितेतर अभ्यासक व कार्यकर्त्याचे आकलन 1980 पर्यंत घडवले होते. असाही विचार केला जात आहे की, 1970 ते 75 पर्यंत दलित पँथरच्या नेत्या-कार्यकर्त्यांपुढे बाबासाहेबांचे किती व कोणते साहित्य उपलब्ध होते. याची उकल करावी लागेल. त्यावेळी उद्भवलेल्या बुध्द, मार्क्सविषयक वादचर्चेत त्यांना कोणते संदर्भ उपलब्ध होते. पँथरच्या चळवळीचा प्रभाव सातत्याने समकालीन आंबेडकरवादी चळवळीवर राहिला आहे.1979 नंतरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर रायटिंग अॅण्ड स्पीचेसचे खंड क्रमााक्रमाने यथावकाश प्रकाशित झाले आहेत. बाबासाहेबाच्या काही विचारकृतींबद्दल संदिग्धता व वादंग सतत होत राहिले आहे. 'बुध्द अॅण्ड हिज धम्म'ची प्रस्तावना किंवा 'बुध्द अॅण्ड मार्क्स' की 'बुध्द अॅार मार्क्स' या टायटलची वादचर्चा याची उदाहरणे आहेत. बाबासाहेबांच्या कोणकोण्त्या वैचारिककृतींचा कोणत्या अभ्यासक विचारवंतांनी व कार्यकर्त्यानी चळवळीत कसाकसा अर्थ लावला आहे?याचा शोध घेणे आवश्यक आहे. लिखित साहित्याखेरीज जनसमुहात जलसा,गाणी,नाटय,स्षीगीते, ओव्या, घराघरात भिंतीवर लावल्या गेलेल्या फोटोप्रतिमा, चिषपेंटिग्ज, शिल्पपुतळे जनकलासंस्कृतीप्रकार इ.त आंबेडकर, आंबेडकरप्रतिमा व आंबेडकरविचार कसेकसे रुजले याचाही आढावा त्याबरोबरीने घ्यावा लागणार आहे. मौखिकपरंपरेने किंवा आंबेडकरी जलश्यांच्या आशयाच्या अथवा वामनदादा कर्डकांच्या गीताच्या अनुषंगाने असा अभ्यास करता येर्इल. युरो-अमेरिकन जगतात ज्याप्रमाणे अनेक थोरव्यक्तींची विश्लेषक चरिषे लिहिली गेली आहेत तशी बाबासाहेबांविषयीचे मराठी व इंग्रजी व इतर भाषेत चरिषलेखन करणे अधिक महत्वाचे आहे.
3.आंबेडकरांच्या विचारधारेविषयी चर्चा करताना नक्की आंबेडकरी विश्लेषणपध्दती-मेथॉडॉलॉजी काय आहे? तिचे स्वरुप व व्याप्ती काय आहे? हे ठोसपणे अधोरेखित करावयास पाहिजे. यासंबंधी अनेक मतमतांतरे आहेत. 1970 नंतर आंबेडकरवादाची चर्चा अधिक सघनपणे सुरु झाली.
बौध्दतत्वज्ञान (महायानपरंपरा वर्ज्य करुन), राज्यसमाजवाद, राजकीय लोकशाही यांमधून आंबेडकरवाद साकारला आहे. आंबेडकरवादात कालौघात नासिक व पुना असे दोन स्कुल निर्माण झाले आहेत. आंबेडकरांच्या समग्र मांडणीत 'थॉटस्','इझम',' फिलॉसफी',' अॅण्टी-फिलॉसफी' असे परस्परविरोधी व्दंव्दही दिसून येतात. तरीही त्यातील संगती लक्षात घ्यावी लागतेच.काही अभ्यासक आंबेडकरांना तत्वज्ञ नसल्याचे सांगतात. ते केवळ विचारवंत आहेत. त्यामुळे आंबेडकरवाद ही विचारसरणी आहे, ते तत्वज्ञान नाही असे म्हटले जात आहे. तत्वज्ञान,सौंदर्यशास्त्र, राजकीय अर्थशास्त्र आदी अंगाने आंबेडकरवादाची मांडणी होणे आवश्यक आहे. जर आंबेडकरवादाची सापेक्ष व्याप्ती जातीपितृसत्ताक व्यवस्थेविरोधी नवरचनेची असेल तर जातीसमाजाबाहेरील भारतीयेतर राष्ट्र व समाजसमुहांना ही विचारधारा नेमके काय देवू शकते? तिची वैश्विकता नेमकी काय आहे? वर्गेतर समाजातील शोषणमुक्ती व समताक्रांतीसाठी बाबासाहेबांची विचारसंपदा जागतिकस्तरावर प्रेरक ठरत आहे.
व्यक्तीस्वातंष्य आणि समुहस्वातंष्य सयुक्तिक असणा-या सामाजिक लोकशाहीचे त्यांनी महत्वपूर्ण सिध्दांतन केले आहे. वर्गीय व जातीय विषमतेच्या मुक्तीलढयाबरोबरच लिंग, धर्म, वंश, जमात अशा बहुविध विषमतेच्या व शोषणाच्या नि:पात्तासाठी आंबेडकरांचे सिध्दांत आणि प्रत्यक्ष चळवळ प्रेरणादायी बनले आहे. जातीपितृसत्तेच्या अनुषंगाने त्यांनी 'बहुस्तरीय शोषणात्मक असमानते'चे अनन्यसाधारण सिध्दांकन केले आहे. आणि तिच्या निराकरणार्थ मार्क्सवादी तत्वप्रणालीशी विधायक मतभेद स्पष्ट करीत बौध्दतत्वज्ञानाचे आधुनिकीकरण केले आहे. हे त्यांचे जागतिकस्तरावर दखल घेण्याजोगे योगदान आहे. अनेक परिस्थितीत, अनेक संदर्भात वेगवेगळया हितसंबंधाच्या गरजेतून तत्वज्ञान/विचारप्रणाली/ विचार/प्रतीके यांच्यात समन्वय वा संयोग साधण्याचा प्रयत्न सुरु असतो.आंबेडकर+सावरकर+हेडगेवार अशी समरसता मोहिम सुरु आहे. ही आंबेडकरवाद नष्ट करण्याची व्यूहरचना आहे.
आंबेडकर+गांधी असाही समन्वय साधण्याचा प्रयास चालू आहे.गांधीवाद मूलत: जातवर्गसमन्वयवादी आहे.त्यातील धारणा काहीप्रमाणात सुधारणावादी धारणा आहेत. दलित आदिवासींच्या सुधारणांना पूरक असे सवर्ण व्यक्ती व समुहाचे मानसिकपरिवर्तन घडविण्यासाठी गांधीमार्गाचा कल्पक विनियोग करता येवू शकतो. या गांधीमार्गाची वरच्या मधल्या जातीथरांना मानसिक-भावनिकद़ृष्टया विधायक प्रतिसाद देण्याबाबतची एक आवाहकक्षमता आहे.पण गांधी-आंबेडकर विचासरणीमध्ये समन्वय नेमका का व कशासाठी आणि कोणत्या तत्वांमध्ये केला जात आहे याची चिकित्सा करताना चिकित्सेचे निकष काय असतील हेही तपासले पाहिजे. आंबेडकर+मार्क्स असाही समन्वय वा संयोग केला जात आहे. आंबेडकरवादाच्या समाजक्रांतीकारी तत्वसरणीशी मार्क्सवादाची सांगड घालताना चिकित्सेचे हेच निकष कटाक्षाने लक्षात ठेवले पाहिजेत. भारतातील मार्क्सवादयांनी जातीमुक्तीच्या प्रश्नाकडे कायम दुर्लक्ष केले आहे. त्यांनी आंबेडकरांचे 'बुर्झ्वा विचारवंत व समाजसुधारक' म्हणून चुकीचे मूल्यांकन केले आहे. कम्युनिस्ट व मार्क्सवादयांची आंबेडकरांच्या योगदानाला व जातीप्रश्नाला बेदखल करण्याची भुमिका प्रत्यक्षाप्रत्यक्षपणे जातीयगंडाची म्हणजेच ब्राहमण्यग्रस्त असल्याने भारतातील कम्युनिस्ट व मार्क्सवादी चळवळीच्या सैध्दांतिक आणि व्यावहारिक अंगाने चिकित्सा करीत असताना मार्क्सवादी विचारसंपदेचा वैश्विक वारसा आंबेडकरवादात समाविष्ट करणे मुळीच गैर नाही. मार्क्सवाद हे वर्गसमाजक्रांतीचे तत्वज्ञान आहे. तसे जातीसमाजक्रांतीचे तत्वज्ञान आंबेडकरवाद आहे. दोन समाजक्रांतीकारी तत्वज्ञानांमध्ये समाजपरिवर्तनाच्या निकडीपोटी सांगड घातली जावू शकते. पण वैरभावी तत्वांची सांगड घालणे धोक्याचे असते. तव्दत् ब्राहमण्यवादी व भांडवली विचार-व्यवहाराशी आंबेडकरवादाची सांगड घालता येणार नाही. अशी मांडणी करणे व त्यानुसार व्यवहार करणे म्हणजे शत्रूने आंबेडकरवाद गिळंकृत करण्यासाठी रचलेल्या व्यूहयोजनेला बळी पडण्यासारखे असेल!
मार्क्सवादाप्रमाणेच स्त्रीवादी धारेशी आंबेडकरवाद जोडणे अनिवार्य आहे.जातीव्यवस्था, स्त्री-पुरुषसंबंध, पितृसत्ता यांचा जैवसंबंध बाबासाहेबांनी उकलून दाखविला आहे.गो-या स्त्रीवादाची मर्यादा काळया स्त्रीवादयांनी स्पष्ट केल्या तश्या भारतातील तथाकथित स्त्रीवाद हा शहरी, पांढरपेशा, ब्राहमणी वळणाचा राहिल्याने फुले-आंबेडकरांच्या मांडणीच्या आधारे दलित स्त्रीवाद व अब्राहमणी स्त्रीवादाने त्यांच्याही मर्यादा दाखवून समग्रता वाढवली आहे.आंबेडकरीचळवळ भारतातील स्त्रीमुक्तीची चळवळ का होवू शकली नाही, या प्रश्नाच्या दिशेनेही आपल्याला अधिक चिंतन करायला पाहिजे.
प्रा. सचिन गरुड,
क.भा.पा.कॉलेज, इस्लामपूर (सांगली)