धक्कादायक : आंतराष्ट्रीय शाळा उभारणारा, राष्ट्रपती पुरस्कार विजेता शिक्षक इथे निलंबित झालाय ......
हे मथळ्याचे वाक्य तुम्हाला अविश्वसनीय वाटले तसेच मलाही अविश्वसनीय वाटले..पण दुर्दैवाने हे खरे आहे.वाबळेवाडी येथील आंतराष्ट्रीय शाळा उभी करणारे शिक्षक दत्तात्रय वारे यांना पुणे जिल्हा परिषदेने निलंबित केले आहे... पुरोगामी महाराष्ट्रात एका कर्तव्य दक्ष शिक्षकाची परवड मांडली आहे हेरंब कुलकर्णी यांनी...
X
महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रात पुणे जिल्ह्यातील वाबळेवाडी शाळेने एक वेगळा इतिहास घडवला आहे. अवघ्या ३४ शाळेची पटसंख्या ९वर्षात ५३१पर्यंत नेऊन ती आंतरराष्ट्रीय शाळा महाराष्ट्रातील शिक्षकांचे प्रेरणास्थान झाली आहे.गावकऱ्यांनी स्वतःच्या कोट्यवधींच्या जमिनी दिल्या व यात्रा रद्द करून लोकसहभाग उभा केला.शाळेतील उपक्रम प्रेरणादायी आहेत.८ वेगवेगळ्या भाषा शिकवल्या जातात. १२ वी नंतरच्या स्पर्धा परीक्षांची तयारी ६ वी पासून केली जाते.भविष्यातील व्यवसाय कोणते असतील याचा परिचय,कोडिंग व प्रोग्रामिंग ,इंग्रजी संभाषण असे कितीतरी उपक्रम शाळेने राबवले.
एक लाखापेक्षा जास्त शिक्षक आणि शिक्षण प्रेमींनी या शाळेला भेट दिली आहे. या शाळेतील विविध भाषा शिक्षणाचे उपक्रम हे अनुकरणीय असून अनेक शाळा त्यांच्या प्रभावातून काम करत आहेत. या शाळेतील दत्तात्रय वारे यांना राष्ट्रपती पुरस्कार देऊन भारत सरकारने त्यांचे कौतुक केले आहे.
पण स्थानिक राजकारणाच्या चिखलातून अशा शिक्षकावर अत्यन्त हास्यास्पद आरोप करून नुकतेच निलंबित करण्यात आले. सकाळपासून रात्रीपर्यंत शाळेत थांबणाऱ्या या गुरुजींना कामात अनियमितता असा आरोप ठेवून निलंबित केले. गावकऱ्यांनी लाखो रुपये जमा केले कंपन्यांकडून निधी मिळवला, त्याचा हिशोब गावकऱ्यांनी ठेवला. मुख्याध्यापकांचा काहीच संबंध नाही परंतु ओढून-ताणून त्यांना या आर्थिक व्यवहारात जबाबदार धरून निलंबित केले आहे .
ही बातमी सुरुवातीला खरी सुद्धा वाटली नाही. विद्येचे माहेरघर म्हणवणाऱ्या पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेने या उपक्रमशील शिक्षकाला निलंबित करून तमाम प्रयोगशील शिक्षकांचा अपमान केला आहे अशीच माझी भावना आहे.
एकीकडे सरकार, सरकारी शाळा टिकल्या पाहिजेत म्हणून सातत्याने बोलत असते. अशा वेळी जिल्हा परिषदेची शाळा किती प्रभावी होऊ शकते ? खाजगी शाळेलाही मागे टाकत आंतरराष्ट्रीय दर्जा निर्माण करू शकते. अशा शाळेचे मॉडेल कौतुकाने शासनाने मिरवण्यापेक्षा या शाळेवर आरोप करून ग्रामस्थांना आरोपीच्या पिंजर्यात उभे करत त्या शिक्षकाला निलंबित करणे हे अत्यंत वेदनादायक आहे. आपल्याला खरेच सरकारी शाळा टिकवायच्या आहेत का ? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो आहे .
या सर्वात धक्कादायक शिक्षण विभागाचे मौन वाटले. स्थानिक राजकारणाच्या चिखलातून खोटेनाटे आरोप करून हा सारा प्रकार घडला आहे . गावाने लोकसहभागातून निधी उभा केला तो खर्च केला त्यात मुख्याध्यापकांचा काहीच संबंध नाही असे असताना सुद्धा खोटेनाटे आर्थिक आरोप करून राजकारण्यांनी जे करायचे ते केले आहे परंतु या सर्वांमध्ये शिक्षण विभाग गप्प का ?
जिल्हा परिषदेच्या शाळेत वेगळे प्रयोग करून प्रेरणादायक काम करत असताना वारे सरांचे कौतुक तर सोडाच परंतु त्या शिक्षकाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून निलंबित करण्यापर्यंत धाडस जिल्हा परिषद करत असताना शिक्षण विभागाने यात हस्तक्षेप करायला हवा. स्वतः शिक्षणमंत्री यांनी या गावाला भेट द्यायला हवी होती .
दत्तात्रय वारे यांची बाजू समजावून घ्यायला हवी. तरच महाराष्ट्रात उमेदीने काम करणाऱ्या शिक्षकांना आधार वाटेल. अन्यथा राजकारणाच्या चिखलात इथून पुढे कोणतेही शिक्षक असे वेगळे प्रयोग करायला धजावणार नाहीत. हा गंभीर धोका लक्षात घ्यायला हवा.
अशा प्रकारच्या ध्येयवादी शिक्षकांची मागे शासन ठामपणे उभे आहे असे राजकारण करणाऱ्यांना समज, शिक्षणमंत्री यांनी कृतीतून द्यायला हवी. ' तुम्ही जर वेगळे काम कराल, तुमचा दत्तात्रय वारे होईल ' असा वाकप्रचार आज शिक्षकांमध्ये पसरतो आहे हे मला अत्यंत धोक्याचे वाटते .दत्तात्रय वारे हे आज केवळ शिक्षक उरले नसून महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रातील उपक्रमशीलतेचे आणि सरकारी शिक्षणाचा चेहरा बनले आहेत. त्यांनाच आज अपमानित केल्यामुळे शिक्षकात निराशेचे वातावरण पसरले आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,शिक्षणमंत्री यांनी दत्तात्रय आवारे यांचे निलंबन रद्द होण्यासाठी योग्य तो हस्तक्षेप करावा व या शाळेच्या पाठीशी सरकार ठामपणे आहे असा संदेश द्यायला हवा
या गावातील गावकऱ्यांनी शाळेसाठी जमिनी पैसा देऊन सुद्धा आज त्यांना ज्याप्रकारे गुन्हेगार ठरवले जात आहे त्यानी गावकरी अतिशय व्यथित आहेत. आता आम्हाला जिल्हा परिषदेची शाळाच नको असे गावाने जिल्हा परिषदेला पत्र दिले आहे. गावकर्यांनी वैतागून तसे केले आणि खरोखर त्यांनी बांधलेल्या इमारतीत खाजगी शाळा सुरू केली, वारे सरांची (राजीनामा घेऊन) तिथे दुप्पट पगारावर नियुक्ती केली आणि हीच हजारो मुले उद्या खाजगी शाळेत शिकायला लागली तर सरकारला चालणार आहे का ?
सरकारला शेवटी हीच भाषा समजते का ?
असेच हे प्रकरण बघितल्यावर वाटायला लागते महाराष्ट्रातील सर्व शिक्षण प्रेमींनी या बाबत आता जाहीरपणे बोलायला हवे....
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या काळात
'उद्धवा,अजब तुझे सरकार हे गीत आठवले
जिथे फुलांना मरण जन्मता
दगडांना तर चिरंजीवता...
या ओळी
अशा रितीने जिवंत होतील असे खरेच वाटले नव्हते
हेरंबकुलकर्णी
8208589195
वारे सरांची हेरंब कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत
(दत्तात्रय वारे फोन 8668515224)