हा पाऊस नेमका कुठे आणि कशामुळे ? हवामानतज्ञ माणिकराव खुळे
X
चक्रीय वाऱ्याची स्थिती आणि कमीदाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळं महाराष्ट्रात सर्वदूर आठवड्यातील काही दिवस जोरदार पाऊस वर्तवण्यात आला आहे, केदारनाथ यात्रेकरु आणि शेतकऱ्यांनी काय दक्षता घ्यावी याविषयी हवामानतज्ञ माणिकराव खुळेंनी केलेले शास्त्रीय मार्गदर्शन
मराठवाडा:
१-आज शुक्रवार दि.७ ऑक्टोबर पासुन संपूर्ण मराठवाड्यात रविवार दि. ९ पर्यन्त तीन दिवस जोरदार पावसाची तर सोमवार दि.१० पासुन १४ पर्यन्त मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता जाणवते.
मध्य व प.महाराष्ट्र :
खान्देश व नाशिकसह नगर पुणे सातारा कोल्हापूर सांगली सोलापूर पर्यंतच्या १० जिल्ह्यात आजपासुन पुढील ४ दिवस म्हणजे सोमवार दि. १०ऑक्टोबर पर्यन्त मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता जाणवते.
मात्र मंगळवार दि.११ ते १४ ऑक्टोबरपर्यंतच्या ४ दिवसात ह्या १० जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता जाणवते.
कोकण व विदर्भ:
३- मुंबईसह संपूर्ण कोकण तसेच विदर्भात मात्र आजपासुन आठवडाभर म्हणजे शुक्रवार दि.१४ ऑक्टोबर पर्यन्त जोरदार पावसाचीच शक्यता जाणवते.
४-सध्या अजुनही परतीच्या पावसात विशेष प्रगती नसुन त्याची उत्तर भारतातील सीमा आहे त्याच ठिकाणी म्हणजे उत्तरकाशी आग्रा ग्वाल्हेर ह्या शहरातूनच जात आहे.
५- बद्रीनाथ केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्री, सिमला कुलू मनाली, देहाराडून व सभोंवतालचा परिसरापर्यंत दिनांक ७,८,९ ऑक्टोबरपर्यन्तच्या ३ दिवसात गडगडाटीसह जोरदार पावसाच्या शक्यतेमुळे सकाळच्या दिर्घकाळ जाणवणारे धुके,रस्त्यावर कोसळणाऱ्या दरडी, भूस्खलन, ह्यातून निर्माण होणाऱ्या रस्ते प्रवासातील अडचणी असे सध्याचे वातावरण विशेषतः वरिष्ठ यात्रेकरुंना धोक्याचे ठरु शकते.
कोणत्या वातावरणीय बदलानुसार सध्या कोसळतोय महाराष्ट्रात हा पाऊस ?
६- (i)विदर्भ व तेलंगणाजवळील कमी उंचीवरील घड्याळाच्या काट्याच्या दिशेच्या विरुद्ध दिशेने वाहणाऱ्या चक्रीय वाऱ्याच्या स्थितीमुळे व तसेच
(ii)बं. उपसागरात आंध्रप्रदेशातील पूर्व किनारपट्टीवरील नेल्लोर ते मच्छलिपटणम ह्या शहरा दरम्यान समुद्रात पाण्यापासून उंच आकाशात साधारण २-३ किमी उंचीपर्यंतच्या चक्रीय वाऱ्याच्या स्थितीमुळे व तसेच
(iii)गुजराथच्या पश्चिमकडे अरबी समुद्रात असलेल्या चक्रीय वाऱ्याच्या स्थितीमुळे तसेच
(iv) वरील ( i व ii) ह्याच चक्रीय वाऱ्याच्या ठिकाणा पासून देशाच्या वायव्य दिशेने त्याच २-३ किमी उंचीवरून तयार झालेल्या व गुंतूर वरंगळ चंद्रपूर नागपूर सागर झाशी ग्वाल्हेर आग्रा मिरत हरिद्वार पर्यन्त(आग्नेय ते वायव्य दिशेने ) जाणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्या(आसा)मुळे देशाच्या इतर भागाबरोबरच सध्या महाराष्ट्रात 👆 वर सांगितल्याप्रमाणे आठवडाभर तसेच काही ठराविक दिवशी वीजा गडगडाटीसह जोरदार पावसाची शक्यता जाणवते.
ह्या व्यतिरिक्त आठवड्यात एकाकी काही बदल झाल्यास लगेचच लिहिले जाईल. शेतकऱ्यांनी कामाचे नियोजन त्यानुसार करावे असे वाटते. वर क्रं. ६ मधील माहिती हवामान साक्षरता प्रबोधनासाठीच दिली आहे असे समजावे.
माणिकराव खुळे,
Meteorologist (Retd.), IMD Pune.
ह. मु. वडांगळी ता. सिन्नर, जि. नाशिक.