Hari Narke | फुले-आंबेडकरी चळवळीचा दुवा निखळला - किरण सोनावणे
जेष्ठ विचारवंत, अभ्यासक, समता परिषदचे नेते हरिभाऊ नरके यांच्या दुःखद निधनाने फुले-आंबेडकरी चळवळीला जोडणारा दुवा निखळला आहे. यावर मॅक्स महाराष्ट्र वरिष्ठ प्रतिनिधी किरण सोनावणे यांचा लेख...
X
फोन केल्यावर जयभीम किरणजी असा आवाज आता हरिभाऊचा ऐकू येणार नाही ते उपचारासाठी गुजरात की राजस्थान येथे गेले होते. त्यावेळी आणि नंतर तिथून आल्यावर एका मुद्द्याबाबत त्यांना फोन केला असता त्यांनी पुन्हा तब्बेत ठीक नसल्याचे सांगितल. त्यावेळी वाटले नाही की, अशी अचानक बातमी येईल. वाटले होतील बरे होतील...
महात्मा फुलेंची बदनामी जेव्हा सोबत साप्ताहिक मधून झाली त्याला सडेतोड उत्तर देऊन सोबतकाराचे दात घशात घालण्याचे काम हरिभाऊनी केले. तसा माळी समाज हा फुले-आंबेडकरी चळवळी पासून फटकून असे. म. फुले आणि सावित्रीमाई फुले पेक्षा संत सावता माळी यांची ओळख देण्यात अभिमान मानून सवर्णांच्या पालखीचे भोई होण्यात माळी आणि तत्सम ओबीसी समाज स्वतःला धन्य मानत होता. त्याला महात्मा फुले, सावित्रीमाई फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान आणि महत्त्व पटवण्याचे महत्वाचे काम हरी नरके यांनी केले. आज माळी समाज जो जागृत होऊन फुले विचारांची पालखी वाहतो आहे, त्यात श्रवण देवरे आणि हरी नरके यांचा मोलाचा वाटा आहे.
माझी पहिली ओळख मी हिंदुस्तान टाईम्स या इंग्रजी दैनिकात काम करत असताना माझ्या एका बातमी बद्दल आणि त्याच्या संदर्भाबाबत त्यांचा मेल आला आणि त्यानंतर बोलणं आणि मग अनेक कार्यक्रमात भेटी किंवा विषयाच्या निमित्ताने बोलणे होऊ लागले. माझ्या आग्रहावरून त्यांनी मॅक्स महाराष्ट्र साठी काही व्हिडीओ ब्लॉग पण केले. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून त्यांनी प्रचंड कष्ट घेतले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य प्रकाशन समिती तसे महात्मा फुले साहित्य प्रकाशन समिती मध्ये त्यांनी मोलाचे योगदान दिले. आज महात्मा फुले आणि सावित्रीमाई फुले यांचे जे अधिकृत फोटो दिसतात ते त्यांच्याच मुळे. पुण्यात गंज पेठे मध्ये महात्मा फुले यांच्या वाड:मयाचे स्मारक बनविण्यात त्यांचा पुढाकार होता.
हरिभाऊ हे तसे प्रभावी वक्ते नव्हते पण त्यांचा अभ्यास आणि ते देत असलेले संदर्भ यामुळे त्यांचे भाषण प्रचंड प्रभावी आणि अभ्यासनीय होत असे. त्यामुळे लाखो लोकं युट्यूब वर त्यांची व्याख्याने आजही ऐकतात. त्यांनी आरक्षणाचे समर्थन करणारे जे भाषण इंजिनियरिंगच्या विद्यार्थ्यां समोर केले होते ते आजही अभ्यासनीय आहे.
हरिभाऊंशी माझी शेवटची प्रत्यक्ष भेट ते अंबरनाथ येथे माळी समाजातर्फे आयोजित फुले जयंती उत्सवावेळी झाली होती. त्यावेळी ही भेट लक्षात राहण्याचे कारण त्यांच्या सोबत संगीता वहिनी होत्या, हरिभाऊ सोबत फोटो काढण्या ऐवजी मी आणि संगीता वहिनी यांनी सेल्फी काढली आणि वेळ मिळेल तेव्हा पुण्यात या असे आमंत्रण उभयतांनी दिले तीच अखेरची भेट.
सामाजिक योगदानासाठी स्वतःची टेल्को मधली नोकरी सोडून पूर्ण वेळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि म. फुले यांच्या साहित्य संपादन आणि प्रकाशन समितीच्या कामात झोकून देणे हा निर्णय खरे तर आर्थिक दृष्ट्या आतबट्याचा होता. मात्र, हरिभाऊ हे एक झपाटलेलं व्यक्तिमत्व होते. मात्र यासर्व दगदगी मध्ये त्यांनी आरोग्याकडे दुर्लक्ष केले प्रवास, व्याख्याने आणि संशोधन याच चाकोरीत त्यांचे आयुष्य फिरत होते. त्यामुळे मधुमेह, हृदय विकारासोबत अनेक शारीरिक तक्रारी सुरू झाल्या. त्याकडे त्यांनी वेळी लक्ष पुरविले नाही किंवा त्यांनी कामा पुढे शरीराची हेळसांड केली आणि त्याची ही दुःखद अशी परिणीती झाली.
हरीभाऊ नरके यांनी केलेले काम प्रचंड मोठे आणि मूलभूत आहे. त्या कामाच्या रूपाने ते कायम राहणार आहेतच मात्र त्यांचे इतक्या लवकर आणि हे वय काही जाण्याचे नव्हते, हरिभाऊ फार घाई केली. अजून व्यवस्था परिवर्तनाची लढाई खूप बाकी आहे. अशात तुमच्या जाण्याने आमचे वैयक्तिक नुकसान तर झाले आहेच, मात्र चळवळीचे फार मोठे नुकसान झाले आहे.