गुजराती ठगांची कामगिरी फत्ते; राहुल गांधींची खासदारकी का गेली?
इंदिरा गांधींच्या (Indira Gandhi) पंतप्रधान पदासह राजकारणाच्या कारकिर्दीची शेवट करण्यासाठी जी चूक जनता पक्षाच्या माध्यमातून लालकृष्ण अडवाणींनी (LK Adwani) केली. तीच चूक 'गुजराती ठग' करत आहेत.
X
जून १९७५ मध्ये इंदिरा गांधींच्या पंतप्रधान पदासह राजकारणाच्या कारकिर्दीची शेवट करण्यासाठी न्यायव्यवस्थेतील भ्रष्ट घटकांना हाताशी धरुन एक कट रचला गेला. त्या कटानुसार १९७१ मध्ये झालेल्या निवडणूकांत गैरप्रकार करण्याबद्दल अलाहाबाद न्यायालयाने निवडणूकीचा निकाल रद्द केला. शिवाय इंदिरा गांधी यांना ६ वर्षांसाठी कोणतेही सार्वजनिक पद स्वीकारता येणार नाही असा निकाल दिला.
इंदिरा गांधींचे प्रतिस्पर्धी राज नारायण यांनी १ लाख मताधिक्याने पराभव झाला म्हणून अलाहाबाद न्यायालयात तक्रार दाखल केली होती. आरोपांत सरकारी नोकर व वाहने या यंत्रणेचा गैरवापर केल्याचे म्हटले होते. खरंतर हे आरोप फुटकळ होते. यावर 'लंडन टाईम्स' ने मत व्यक्त करताना म्हटले, 'हा प्रकार म्हणजे गाडी चालवताना नियम तोडूनहदंड झाला म्हणून एखाद्या पंतप्रधानाला त्याच्या पदावरुन हटवण्यासारखं आहे.'
इंदिरा गांधी कोर्टाच्या निर्णयाचा सन्मान करुन नैतिकता म्हणून चक्क राजीनामा द्यायला तयार झाल्या होत्या. तेव्हा सिध्दार्थ शंकर राय हे पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री आणि इंदिरा गांधींचे विश्वासू सहकारी होते. एच. आर. गोखलेंच्या मदतीने त्यांनी इंदिरा गांधीना हायकोर्टात अपीलात जायला प्रवृत्त केले. कारण जेपी (जयप्रकाश नारायण) देशाला अनागोंदीत बुडवायला चालले होते. असे त्या दोघांचे मत होते. त्यानुसार इंदिरा गांधी अपिलात गेल्या. पुढे हा निकाल टिकू शकला नाही.
मात्र या प्रकरणावरुन तसेच आणीबाणीतील चुकांमुळे इंदिरा गांधींचा दणकून पराभव झाला. मग राजकारणातील इंदिरा अध्यायाचा शेवट करण्यासाठी फुटकळ आरोप लावून ३ ऑक्टोबर १९७७ रोजी इंदिरा गांधीना एका रात्रीसाठी अटक केली. दुसऱ्याच दिवशी कोर्टाने खटलाच रद्द केला.
१९७९ मध्ये संजय गांधीना शहा आयोगाच्या अहवालावरुन ६ वेळा तुरुंगात टाकले. पण न्यायालयाने प्रत्येक वेळी ४-५ आठवड्यात खटल्यांची हवा काढून टाकली. त्यामुळे इंदिरा गांधींनी राजकारणातून संन्यास घेण्याचा विचार सुरु केलेला असतानाही कर्नाटकातील चिकमंगळूर मतदारसंघातून निवडणूक लढविली आणि जिंकून परत संसदेत गेल्या.
संसदेतील इंदिरा गांधीना रोखण्यासाठी, पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखालील संसदेने तयार केलेल्या 'प्रिव्हिलेज कमिटी' या समितीने सरकारी कर्मचार्यांवर पंतप्रधान काळात दबाव आणला म्हणत इंदिरा गांधींच्या विरोधात ठराव सादर केला. त्यावर न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वीच इंदिरा गांधी यांना तुरुंगवास व संसदेचे सदस्यपद रद्द करण्याचे संसदीय फर्मान काढले.
डिसेंबर १९७८ मधे इंदिरा गांधीना परत तुरुंगात टाकले. पंतप्रधान पदावरुन मोरारजी देसाई पायउतार होवून चौधरी चरणसिंग आल्यावर इंदिरा गांधी तुरुंगातून बाहेर आल्या. त्यांचे सरकारही जेमतेमच टिकले. शेवटी १९८० मध्ये संसद बरखास्त करुन नव्याने लोकसभा निवडणूका झाल्या आणि इंदिरा गांधी पुनश्च बहुमताने इंदिरा गांधींनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली.
आता वर्तमानात येऊया... सोनिया गांधी किंवा राहुल गांधी यांनी घरातील दोन पंतप्रधानांचे बलिदान व्यर्थ जाऊ नये म्हणूनच काँग्रेस पक्षात काम केले. देशात धार्मिक विखार आणि उन्माद नको म्हणून लोकशाहीवादी सरकार युपीएच्या माध्यमातून चालवले. या कालखंडात त्यांनी लोकसभा सदस्य वगळता मंत्रीमंडळातील पदे उपभोगली नाहीत. सोनिया गांधींनी तर पंतप्रधान पदाकडे पाठ फिरवून आपल्या भारतीय सून असण्याची जाहीर सिध्दता दिली.
आजही राहुल पक्षाची कामगिरी पक्षातील सदस्यांकडे सोपवून देशातील धार्मिक विखार संपवण्यासाठी भारत जोडो सारखा उपक्रम राबवत आहे. मात्र तरीही '२ गुजराती ठगांनी' राहुल गांधी या नावाची धास्ती जनता पक्षाच्या लालकृष्ण अडवाणींनी घेतली होती तशीच घेतली आहे. त्यासाठीच राहुलवर भंपक आरोप लावून गुजरात न्यायालयातून त्याच्यावर २ वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.
राहुल अपीलात जाईलच! मात्र या माध्यमातून राहुलचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यासाठीचा प्रयत्न सुरुच राहतील. संसदेच्या माध्यमातून सदस्यत्व रद्द करता येत नसल्याने हा शकुनीनितीचा पर्याय ठगांनी शोधलेला आहे. कारण आजीप्रमाणेच नातू उत्तरेतील विखार जास्त असल्याने दक्षिणेतील केरळच्या वायनाडमधून संसदेत आला असून पंतप्रधानांच्या कुकर्माचे जाहीर वाभाडे संसदेत काढत आहे.
पण लक्षात ठेवा... देशाच्या धर्मनिरपेक्षतेसाठी शरीराची चाळण झालेल्या आजीचा तो नातू आहे. देशाची अखंडता टिकवण्यासोबतच अंतर्गत आतंकवाद संपवण्यासाठी देहाच्या चिंध्या झालेल्या बापाचा तो मुलगा आहे. अंर्तआत्म्याचा आवाज ऐकून पंतप्रधान पदाकडे पाठ करुन लोकांना सांविधानिक अधिकार असलेले कायदे बहाल करणाऱ्या मातेचा तो मुलगा आहे.
तुम्ही त्याच्यावर जितकी शिक्षा लादाल, जो जो अपमान कराल. तो तुमच्यावर उलटेल. तुम्ही त्याचा आवाज दाबू शकत नाही! कारण तो घाबरत नाही. लोकशाहीसाठी, आयडिया ऑफ इंडियासाठी तो बोलतो आणि बोलत राहणार आहे!!
- तुषार गायकवाड