Home > मॅक्स ब्लॉग्ज > डॉ अलीम वकील सरांच्या सोबत ग्रेट भेट : एक अद्भुत अमृतानुभव

डॉ अलीम वकील सरांच्या सोबत ग्रेट भेट : एक अद्भुत अमृतानुभव

डॉ अलीम वकील सरांच्या सोबत ग्रेट भेट : एक अद्भुत अमृतानुभव
X

२०१९ साली सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या एका कार्यक्रमात मध्ययुगीन कालखंडातील वारकरी आणि सूफी परंपरेचा तौलनिक अध्ययन असा विषय घेऊन पीएचडी करणारा एक विद्यार्थी मला भेटला. त्या चर्चेत मराठीत इस्लाम आणि सूफी तत्वज्ञान मांडणाऱ्या डॉ अलीम वकील सरांचे नाव मला कळले.‌ सूफी तत्वज्ञान आणि गीतांचा चाहता असणाऱ्या माझ्यासारख्या माणसाला ही ग्रेट ओळख वाटली. एकदा मोबाईल वर सरांच्या सोबत बोलणे झाले होते पण चांदवड ला जाऊन सरांना भेटणे मला शक्य झाले नाही. परवा १९ सप्टेंबर रोजी मालेगाव येथील काम आटोपून वकील सरांना नक्की भेटायचे ठरविले आणि फोन करून सरांना येत आहे म्हणून सांगितले. चांदवड येथील घरी जाऊन भेटून मनसोक्त गप्पा मारल्या आणि विविध विषयावर दिलखुलास चर्चा केली आणि या भेटीमुळे धन्य झालो. सर म्हणाले वकील ह्या शब्दाचा मूळ अर्थ प्रतिनिधी. हा शब्द मूळचा अरबी आहे. अरबी मधून पर्शियन भाषेत आला आणि पर्शियन मधून मराठीत आला. अलीम सरांचे मूळ नाव अलीमुल्ला खान. सरांचे वडील कलीमुल्ला खान हे शासकीय सेवेत रजिस्ट्रार होते. संस्कृत भाषेचे विद्वान आणि सुफी गीतांचे गायक होते. चोपडा येथील अभ्यंकर गुरूजी कली मुल्ला खान यांचे अभिजात संगीतातील गुरू, वकील सरांचे आजोबा शायर होते त्यांच्या काळात खान आडनावाचे तखल्लूस वकील झाले. पाचोरा येथील जी. एस. शाळेतील एस जी जोशी गुरूजींमुळे वकील सरांना मराठीची गोडी लागली आणि पुढील अध्ययनातून मराठी भाषेवर प्रभुत्व मिळवले.‌ सरांना रसाळ मराठीतून ऐकतांना वेगळा आनंद मिळतो.

महात्मा गांधी आणि विनोबा भावे, मौलाना आझाद यांच्याबद्दल सरांनी मांडणी केली आहे. वर्धा येथे झालेल्या ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी डॉ अलीम वकील सरांच्या नावाची चर्चा झाली होती. पण प्रसिध्दी पासून कोसो मैल दूर असणाऱ्या वकील सरांची महामंडळाने दखल का घेतली नाही माहीत नाही. सुरवातीला अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयात सरांनी अध्यापन केले. सरांनी संगमनेर येथील महाविद्यालयात ३३ वर्षे राज्यशास्त्र विषयाचे अध्यापन केले आहे. परभणी येथे झालेल्या १४ व्या महाराष्ट्र राज्य राज्यशास्त्र परीषदेचे अध्यक्षपद भूषविले आहे तसेच पुण्यात झालेल्या १२ व्या अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी सर होते. महाराष्ट्र राज्य उर्दू अकादमी, बालभारती, नागरिकशास्त्र समिती तसेच इकाॅनाॅमिक स्टडी कोलकाता जर्नल संपादक मंडळात सदस्यपद भूषवले आहे.

१९९१ साली महात्मा आणि बोधिसत्व हे पुस्तक खूप गाजले. सरांची आजपर्यंत १९ पुस्तक प्रकाशित झाली आहेत. एका पथावरील दोन पंथ भक्ती आणि सुफी, "गांधीजी वसाहतवाद विरोधापासून विभाजन वादापर्यंत", "भगवत गीता आणि कुराण यामधील कर्मयोग" इत्यादी पुस्तके प्रकाशित झाली आहेत. "सुफी संप्रदायाचे अंतरंग" या पुस्तकाला रा. भी. जोशी, पद्मश्री विखे पाटील फाऊंडेशन आणि महाराष्ट्र राज्य तत्वज्ञान पुरस्कार मिळाला आहे. मौलाना आझाद : धार्मिक आणि राजकीय विचार या ग्रंथाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा शि. मी. परांजपे पुरस्कार आणि मराठवाडा साहित्य परिषदेचा म. भी. चिटणीस पुरस्कार मिळाला आहे. असे विद्वान अभ्यासक डॉ अलीम वकील यांच्या सोबत चर्चा करणे हा एक अमृतानुभव होता.

चांदवड गावात आपल्या कुटुंबासोबत सर रमले आहेत. अविरतपणे वाचन आणि लेखन सुरू आहे. संस्कृती आणि सभ्यता यांचा नेमका झगडा काय आहे ? क्रूसेड, आयडेंटिटी क्राईसीस, सुफी साहित्य, महाराष्ट्रातील साहित्य विश्व, वाढता विभूती वाद तसेच सद्यस्थितीत भारतीय समाजासमोरील आव्हाने अशा अनेक विषयांवर तब्बल तीन तास आम्ही अखंड चर्चा करीत होतो. सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय परिस्थितीवर डॉ अलीम वकील सरांना मी ऐकत होतो. वरील परीस्थितीवर अतिशय परखड भाष्य करणारा माणूस आणि कुठल्याही गटातटाच्या राजकारणात न पडता आपला अभ्यास आणि लेखन यात आनंद घेत जगणाऱ्या कलंदर व्यक्तीमत्वाची माझी भेट खरंच ग्रेट भेट ठरली.

आजच्या द्वेषमूलक अस्वस्थ काळात महाराष्ट्राने डॉ अलीम वकील नावाचे व्यक्तीमत्व जपले पाहिजे. दखल घेतली पाहिजे. डॉ अलीम वकील सर महाराष्ट्राचे वैभव आहेत. हसत खेळत टाळ्या देत गंभीर विषयांवरील चर्चा आटोपून आणि चहापान घेऊन सरांचा निरोप घेतला तेव्हा मनात ऋणानुबंध निर्माण करणाऱ्या या भेटीचे समाधान तरळत होते. अलीम सर म्हणाले भारतीय संस्कृती हा आपणा सर्वांचा सामुहिक वारसा आहे, सर्वांनी जपला पाहिजे. सोनटक्के, तुम्ही अहिल्याबाई होळकर यांचा चांदवड मधील रंगमहाल पाहण्यासाठी पुन्हा चांडवडला या, परत चर्चा करू, चांदवड चा भैरवनाथ पेढा अवश्य खरेदी करा असे सरांनी सांगितले आणि ८० वर्षीय अलीम सरांचे पुन्हा चांदवड ला येण्याचे निमंत्रण घेऊन मी सरांचा निरोप घेतला.

लोकमित्र संजय काशिनाथ सोनटक्के

संयोजक : सहजीवन मिशन

Updated : 2 Oct 2024 4:08 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top