Home > मॅक्स ब्लॉग्ज > एकच प्याला ते ड्रिंकला मिळालेली वर्गीय प्रतिष्ठा, सरकारला व्यावहारिक तोडगा काढावा लागणार : प्रा. हरी नरके

एकच प्याला ते ड्रिंकला मिळालेली वर्गीय प्रतिष्ठा, सरकारला व्यावहारिक तोडगा काढावा लागणार : प्रा. हरी नरके

सुपर मार्केटमध्ये वाईनला परवानगी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याला अनेक स्तरातून विरोध होतो आहे. तर अनेकांनी या निर्णयाचे समर्थन देखील केले आहे. यासर्व पार्श्वभूमीवर प्रा. हरी नरके यांनी आपल्या शैलीत या मुद्द्याचे विश्लेषण केले आहे.

एकच प्याला ते ड्रिंकला मिळालेली वर्गीय प्रतिष्ठा, सरकारला व्यावहारिक तोडगा काढावा लागणार : प्रा. हरी नरके
X

महाराष्ट्र की मद्यराष्ट्र? शेतकरी हितच हवे तर गांजा पिकवायची परवानगी द्या, वाईन म्हणजे दारू नव्हे, असा नुसता भडीमार सुरू आहे. सात्विक व्यसनमुक्तीवादी ते आंबा पैदाशी किडे गुरुजी, संघीय विचारवंत ते पुरोगामी असा निव्वळ दंगा चालुय. महात्मा फुले म्हणाले होते, "थोडे दिन तरी मद्य वर्ज्य करा! तोच पैसा भरा ग्रंथासाठी! ग्रंथ वाचताना मनी शोध करा! देऊ नका थारा वैरभावा!"

तथागत गौतम बुद्ध ते महात्मा गांधी-डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगेबाबा असे अनेक महामानव स्वतः निर्व्यसनी होते. मादक पदार्थांचे सेवन करण्याविरुद्ध होते. गुजरातमध्ये आजही अधिकृतपणे दारुबंदी आहे. अर्थात दारू सर्वत्र मिळते,फक्त जास्त पैसे मोजावे लागतात.

प्राचीन काळापासून दारू होती, आहे. नावं बदलली असतील पण दारू होतीच. दारूच्या व्यसनामुळे अनेक कुटुंबं उद्ध्वस्त होतात, गुन्हेगारी आणि हिंसा वाढते. म्हणून अनेक भागातील महिला दारु दुकानांना विरोध करणारी चळवळ चालवतात. बंग ते गोस्वामी अनेकजण यात पुढे आहेत. तर दारुबंदी उठवण्यासाठी पुढाकार घेणारे काही मंत्रीही आहेत.

गोव्यात, मध्यप्रदेश, कर्नाटक या भाजपशासित राज्यात जे खुले आम चालते, त्याला संघ, बीजेपी आणि त्यांचे आश्रीत विचारवंत महाराष्ट्रात विरोध करतात हा निव्वळ ढोंगीपणा आहे. दारू वाईट म्हणणारेही असंख्य लोक गुपचूप पितातच. आजकाल या व्यसनाला इतकी प्रतिष्ठा प्राप्त झालेली आहे की दारू विरोधी आवाज हे भर चौकातील अरुण्यरुदन ठरावे. याचा अर्थ सगळे विरोधक वा समर्थक यांना एकाच मापाने मोजावे असे नाही. त्यातही अनेक गुंतागुंतीचे मुद्दे आहेत. समाज माध्यमावर बाटल्या,ग्लास आणि पितानाचे फोटो टाकणारात कुणीच मागे नाहीत.

बंदी घातली की सरकारचा महसूल तर बुडतोच पण चोरून होणारी विक्री आणि पोलिसी हप्तेबाजी यांना उत येतो. अर्थात बंदी यशस्वी होत नाही म्हणून अनेक गैरप्रकारांवरील बंदी उठवावी किंवा त्यांना मान्यता द्यावी असे म्हणणे हेही गैरच. बेकायदेशीर आणि समाजहिताच्या विरुद्ध असलेल्या कित्येक बाबींना अटकाव करावाच लागतो.

सोमरस, दारू, वाईन, द्राक्षासव यातले फरक सांगून दारुचे समर्थन किंवा सरसकट विरोध ह्या खूप आदर्शवादी आणि अव्यवहारीक गोष्टी वाटतात. सरकार चालवताना जनमत आणि महसूल, कायदा आणि जनहित यांचा मेळ घालावाच लागतो. एकच प्याला ते ड्रिंकला मिळालेली वर्गीय प्रतिष्ठा ही वाटचाल बघता सरकारला व्यावहारीक तोडगा आणि सुवर्णमध्य साधावा लागणार!

कुणीतरी लिहिलं होतं, "दारू वाईट आहे. जगातली सगळी दारू नष्ट करायला हवी. चला तर मी निम्मी पितो. उरलेली तुम्ही प्या!" पिणारे काय ते बघून घेतील, आपण न पिणारांनी त्यात पडा कशाला?


प्रा. हरी नरके यांच्या फेसबुक वॉलवरुन साभार

Updated : 29 Jan 2022 4:50 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top