पुन्हा एकवार हेही!
जम्मू काश्मिरातील पंडित लोक महाशिवरात्रीला रात्रभर दुधात शिजवलेलं बकऱ्याचं, डुकराचं मटण खातात. हे तुम्हाला माहिती आहे का? आहाराचा संबंध भोगोलिक परिस्थितीशी असतो की, सनातन्यांनी सांगितलेला धर्माशी वाचा डॉ. मुग्धा कर्णिक यांचा धर्म नावाच्या अफुच्या गोळी ची नशा उतरवणारा लेख
X
फॉर्च्युनच्या राईच्या तेलाची जाहिरात होती. बंगालमध्ये राईचं तेलच वापरलं जातं. त्या जाहिरातीत दुर्गापूजेच्या स्वयंपाकात मासे, मटण शिजवलेलं दाखवलंय. ज्यांचा मॅनिफेस्टोच मूर्ख बेडूकशाहीचा आहे. त्या सनातनवाल्या हिंदू जनजागृती वाल्यांनी लगेच धर्माचा बुडबुडा बुडला म्हणून फॉर्च्युनच्या उत्पादनांवर बहिष्कार घाला म्हणून हॅशटॅग चालवला. फॉर्चुनवाले तंतरले कारण ट्रोलआर्मी तशी कॉमन आहे सनातनवाल्यांत आणि भाजपांत. त्यांनी ती जाहिरात देशात इतरत्र बंद केली. पण बंगालमध्ये मात्र, दुर्गापूजेत मासे-मटण खातातच असं म्हणत बंगालमध्ये तशीच ठेवली. हे कळताच बंगाली दुर्गा आणि दुर्ग खवळले. आणि 'तुमच्या नवरात्राशी आमच्या दुर्गापूजेच्या उत्सवाचा काहीएक सोंबोंधो नाही' असं ठणकावायला सुरुवात केली.
शाकाहार हा पवित्र आणि उत्सवांत, सणासुदीला मांसाहार करू नये. हे मिथक या काही गटांनी गेली एक शतकं चालवत आणलंय. पण तरीही त्याला दाद न देणारे शहाणेसुर्ते लोक आहेत हे बरंय. काय चावटपणा आहे... जम्मू काश्मिरातील पंडित लोक महाशिवरात्रीला मटण खातात, बकऱ्याचं, डुकराचं मटण हाच शिवजींचा प्रसाद. तेही रात्रभर दुधात शिजवलं जातं आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत खाल्लं जातं. हेच शिवरात्रीचं सेलेब्रेशन. शिवशंकराने डुकराच्या शिकारीवरून अर्जुनाशी युद्ध केल्याची कथा सर्वांना माहीत असते. महादेवाने काय त्याला उगीच गंमत म्हणून मारलेलं? तो खाणाराच होता. अर्जुनानेही खाण्यासाठीच मारलेला. कृष्णार्जुनाने मृगयेसाठी काढलेल्या मोहीमांचे संदर्भ आहेत. यांचा लाडका राम काय हरणाच्या शिकारीला फक्त बायकोच्या चोळीसाठी कातडं आणायला गेलेला? इतका क्रूर नष्टर होता की काय तो. जीवहत्या ही फक्त भुकेसाठीच क्षम्य असते. हे पूर्वापार सर्व संस्कृतींत ओळखले जाते.
सगळ्या देवींना तर मांसाहार, मद्य यांचा नैवेद्य देण्याची पूर्वापार प्रथा सर्वत्र आहे. गेल्या चार शतकांत शाकाहारी ब्राह्मणांनी ती मोडली असली तरीही काही काश्मीर- बंगाल- गोवा प्रांतातील ब्राह्मण म्हणवणाऱ्या समाजांतही मांसाहार अजूनही होतोच. असे असताना आम्ही सांगू तोच श्रेष्ठ आचार, तोच श्रेष्ठ आहार हा फालतूपणा आहे. नसेल आवडत तर नका खाऊ. आवडत असेल तर खुशाल खा. इतकं सोपं आहे हे... आमच्या न खात्या दिवशी मांसाहाराचा उल्लेखही करू नका. म्हणणारी येडी, जैनांच्या पर्युषण पर्वातला कत्तलखाने बंद ठेवण्याच्या हट्टाग्रहाला मात्र, विरोध करतात. ही तर केवढी हास्यास्पद गोष्ट. ते ही तसलेच आणि तुम्हीही हे जरा लक्षात घ्या.
धार्मिकतेचा आणि आहाराचा खरेतर काहीही संबंध नाही. संबंध आहे तो केवळ मद्दडपणाचाच.पण खरं म्हणजे आहाराचा संबंध केवळ व्यक्तिगत आवडीनिवडीशी आहे. 'शेण' तेवढं कुणीच खाऊ नये. लक्षणार्थाने हो... 'गोमाय' म्हणतात ते शेणही आवडत असेल तर खावा खुशाल.
(डॉ. मुग्धा कर्णिक यांच्या फेसबुक भिंतीवरून)