Home > मॅक्स ब्लॉग्ज > आपल्याच कवटीत विराजमान मेंदूचरणी हात जोडून प्रार्थना!

आपल्याच कवटीत विराजमान मेंदूचरणी हात जोडून प्रार्थना!

आपल्या देशात सध्या कोणाचे अच्छे दिन आले आहेत? मिमिक्री करणाऱ्यांचे आणि जात, धर्म, प्रादेशिक मुद्दयांवर प्रक्षोभक भाषण देणाऱ्याचे? का झालं असं? वाचा गणेश कनाटे यांचा Sunday Special लेख

आपल्याच कवटीत विराजमान मेंदूचरणी हात जोडून प्रार्थना!
X

गेल्या काही वर्षांत स्टँड अप कॉमेडीला चांगले दिवस आलेत. त्याचप्रमाणे जात-धर्म आणि प्रादेशिकतेच्या मुद्द्यांवर प्रक्षोभक भाषणे करणाऱ्यांनाही चांगले दिवस आलेत. या देशातल्या जनतेला एकतर सवंग मनोरंजन तरी भावतंय किंवा भावना भडकविणारी भाषणं तरी आवडताहेत.

कोण म्हणेल की कधीकाळी या देशात ज्ञानी, व्यासंगी आणि सेवावृत्तीने जनतेच्या भल्याची चिंता करणारी माणसं या देशाचे नेते व्हायचे म्हणून? सतत विरोधी पक्षांतल्या नेत्यांवर सवंग टीका करताना त्यांची मिमिक्री करणारी माणसं सर्वच पक्षांत विकृत वक्तृत्वाच्या भरवश्यावर नेतृत्वपदी पोहोचायला लागली आहेत. लोक सभांना आता जात नाहीत, पोहोचवली जातात. तिथे जाऊन ते जे ऐकवलं जातं ते ऐकतात आणि टाळ्या वाजवून घरी परत जातात. निवडणुका आल्या की हीच माणसं जातीच्या, धर्माच्या आणि प्रादेशिक अस्मितांच्या आधारावर मतदानाचे एकदिवसीय, प्रासंगिक लोकशाहीसाठीचे कर्तव्य पार पाडून येणारी पाच वर्षे दोन पायांत हात दाबून झोपा काढतात.

कोण म्हणेल की या देशाचे पूर्वीचे अनेक पंतप्रधान हे उच्चविद्याविभूषित होते म्हणून? कोण म्हणेल की विद्येची महती सांगणारे महात्मा फुले हे आमच्या समाजातील सुधारणेच्या प्रक्रियेचे नेते होते म्हणून? कोण सांगेल की अक्षरशः डझनावारी मूलभूत चिंतन मांडणारी पुस्तके लिहिणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर या देशात निवडणुकीच्या राजकारणात यश न मिळवताही या देशाच्या संविधान सभेचे नेतृत्व करत होते म्हणून? कोण सांगेल की एक कृश देहयष्टीचा म्हातारा केवळ आपल्या आत्मबळावर नोआखालीच्या दंगली संपवायला कोणतीही सेना सोबत न घेता एकटाच गेला आणि दंगली शमवूनच परत आला?

कोण सांगणार हे सगळं?

किती उच्चविभूषित नेत्यांची आपण फक्त आठवणच काढायची? की आपण नेत्यांच्या भाषणांतून फक्त मिमिक्री बघायची आणि टाळ्या वाजवायच्या?

आजतरी आपण हेच करतोय कारण आपण समाज म्हणून ज्ञानाची, व्यासंगी, विद्येची, सेवेची आणि सेवावृत्तीची टिंगल करायला लागलो आहोत. आपण विचारवंतांना विचारजंत म्हणायला शिकलो आहोत. आपण पुरोगामी हा शब्द आता फुरोगामी असा लिहायला शिकलो आहोत. 'अभ्यासोनी प्रकटावे' हे आता कधीतरी, कुणीतरी एखादया वाक्यात सुभाषितासारखे लिहायला/बोलायला लागलंय.

साहित्य, संस्कृती, कला, समाजकारण, अर्थकारण आणि राजकारण या सर्वच क्षेत्रांत आपण 'सुमारांच्या सद्दीचा' काळ आणलाय. आपल्याला त्यातच लोकशाहीचे दर्शन घडतंय. आज अख्ख्या भारतात एक व्यक्ती जिला तत्त्वज्ञ म्हणावं अशी आपल्या अवतीभवती नाही, याचे आपल्याला वाईट वाटत नाही. ज्ञान, व्यासंग ही जणू काही अभिजनांची चंगळ आहे, असा आपला ग्रह तर झाला नाही ना? तपासून पाहिले पाहिजे.

नाहीतर आपण रोज नव्या मिमिक्रीचे प्रयोग भाषणं म्हणून ऐकू, आपापल्या क्षुद्र अस्मितांना कुरवाळत बसू आणि आपल्याला नको असलेल्या, आपण ज्यांचा राग करतो त्या जातीधर्माच्या लोकांच्याविरुद्ध स्वतःच्या डोक्यांत राख घालून घेऊ.

येणारा काळ कठीण आहे, इतके तरी आपल्याला लवकर कळावे, ही तुमच्या आमच्या सगळ्यांच्या कवटीत विराजमान मेंदूचरणी हात जोडून प्रार्थना!

Updated : 3 April 2022 7:21 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top