Home > मॅक्स ब्लॉग्ज > गांधी द्वेष्ट्यांनो स्वातंत्र्ययुध्दात तुमचं योगदानच काय? – सुनिल सांगळे

गांधी द्वेष्ट्यांनो स्वातंत्र्ययुध्दात तुमचं योगदानच काय? – सुनिल सांगळे

गांधी जयंती असली किंवा पुण्यतीथी असली एक मोठा वर्ग कायम गांधींचा द्वेष करतो आणि नथुराम गोडसेचा जयघोष करतो. पण अशा गांधी द्वेष करणाऱ्या हिंदुत्ववाद्यांना गांधी मुळात समजलेच नाहीत. त्यामुळे सध्या स्वातंत्र्यात जगणाऱ्या या सर्व गांधी द्वेष्ट्यांना लेखक सुनिल सांगळे त्यांचं स्वातंत्र्य युध्दातील योगदानच विचारतात. आणखी जाणून घेण्यासाठी वाचा हा माहितीपुर्ण लेख!

गांधी द्वेष्ट्यांनो स्वातंत्र्ययुध्दात तुमचं योगदानच काय? – सुनिल सांगळे
X

आज महात्मा गांधी आणि त्यांचे शिष्य लाल बहादूर शास्त्री यांची जयंती! गेल्या काही वर्षात महात्मा गांधी आणि त्यांचे अहिंसक आंदोलन यांची खिल्ली उडविण्याची एक सुनियोजित मोहीमच समाजमाध्यमांवर हाती घेण्यात आली आहे. जे लोक या मोहिमेत सहभागी आहेत त्यांच्याकडे अहिंसक आंदोलनाचीही नाही व क्रांतिकारकांची देखील परंपरा नाही. त्यामुळे भगत सिंग आणि इतर महान क्रांतिकारकांची उदाहरणे देऊन गांधी-नेहरूंमुळे स्वातंत्र्य कसे आले आले नाही हे सिद्ध करण्याचा त्यांचा आटापिटा चाललेला आहे. अर्थात असे करतांना, भगत सिंग हे कम्युनिस्ट आणि नास्तिक होते, ही गोष्ट हे कम्युनिझमचा आत्यंतिक द्वेष आणि कडव्या धार्मिकतेचा उदोउदो करणारे लोक चलाखीने लपवतात. त्याचप्रमाणे भगत सिंग हे नेहरूंना भविष्यातील भारताचा द्रष्टा नेता मानत होते आणि पंजाबातील तरुणांना ते नेहरूंकडे मार्गदर्शक म्हणून पहा हे सांगत, हे तर मग टॉप सिक्रेटच आहे, ते हिंदुत्ववादी लोकांना कसे सांगणार? आज बऱ्याच मोठ्या प्रमाणात प्रजा वाचन न करणारी असल्याने व व्हाट्सअप विद्यापीठावर पोसलेली असल्याने या गांधींचा खोटानाटा इतिहास पसरविण्याच्या मोहिमेला यशही मिळते.

महात्मा गांधींची अहिंसक चळवळ आणि तथाकथित हिंदुत्ववाद्यांचा हिंसक मार्गाचा फक्त तोंडी आग्रह या विषयावर थोर विचारवंत प्राचार्य नरहर कुरुंदकर "शिवरात्र" या पुस्तकात काय म्हणतात ते बघा!

"जे इंग्रजांच्या विरुद्ध लढत नव्हते, ज्यांना सरहद्द प्रांतात मुस्लिम लीगशी हातमिळवणी करून काँग्रेसचा पाडाव करण्यात संकोच कधीच वाटला नाही, जे जनतेची चळवळही करत नव्हते, हिंसेच्या मार्गाने लढतही नव्हते, ते फक्त हिंसेच्या आवश्यकतेवर व्याख्याने देत होते; ही क्रियारहित माणसे फक्त गांधीजींची विरोधक होती. गांधी स्वतः इंग्रजांच्या विरुद्ध अहिंसेच्या शस्त्राने लढत होते; पण ज्यांना शस्त्रच हाती घ्यावयाचे होते त्यांना ते ही मार्ग मोकळे होते. ज्यांना निःशस्त्रही लढायचे नव्हते, सशस्त्रही लढायचे नव्हते, ज्यांना मुळात लढायचेच नव्हते, त्या सर्व मंडळींनी फक्त गांधींची चेष्टा करण्यावर भर दिला. हिंदुत्ववाद्यांनी इंग्रजांच्या विरुद्ध एकही सशस्त्र उठाव केला नाही. स्वातंत्रवीर सावरकरांचे कार्य १९१० पूर्वीचे होते."

........."इंग्रजांविरुद्ध एकही हिंदुत्ववादी कधी लढ्यात उतरलाच नाही. लढले गांधीजी! लढा करणारे किती बावळट आहेत याची मिटक्या मारत वर्णने केली हिंदुत्ववाद्यांनी! निदान हैद्राबादचा लढा हा तर मुस्लिमविरोधी होता. हिंदुत्ववाद्यांनी या लढ्यात तरी काय भाग घेतला? निजामावर बॉम्ब फेकणारा गांधींचा जयघोष करणाराच होता! हिंदुत्ववाद्यांच्या पिस्तुलांना कधी कासीम रिझवी दिसला नाही, निझाम, जिना दिसले नाहीत. या पिस्तुलातील गोळी १९२० नंतर इंग्रजाच्याही विरोधी झाडली गेली नाही."

"मुसलमान फाळणी करून देशाचा वेगळा तुकडा मागत होते, त्यांचा फारसा द्वेष हिंदुत्ववाद्यांना वाटलं नाही. त्यांचा सगळा तिरस्कार अखंड भारत टिकवण्यासाठी सतत मुसलमानांना सांभाळून घेणाऱ्या गांधींच्या विरुद्ध उफाळून आला... हिंदू एक स्वयंभू राष्ट्र असून, मुसलमान हे आपल्यापेक्षा पृथक राष्ट्र आहे, हेच तर हिंदुत्ववाद्यांचे कायमचे तुणतुणे होते! जर मुसलमान हे वेगळे राष्ट्र असतील तर त्यांची बहुसंख्या असणारा प्रदेश हिंदुस्थानच्या बाहेर जाणारच, ही गोष्ट सूर्यप्रकाशाइतकी स्वच्छ होती."

"गांधी अखंड भारत टिकविण्यात अयशस्वी झाले. गांधींचे अपयश मान्य केले तरी अखंड भारत टिकविण्याची लढाई ते सर्व सामर्थ्यानिशी खेळले होते; पण ज्यांनी लढा दिलाच नाही, ज्या मंडळींनी मुस्लिम लीगचा द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत मान्यच करून टाकला, त्यांचे वर्णन कसे करावे? हिंदुत्ववाद्यांनी नेमके हेच कार्य केले. अखंड भारताचा तोंडाने जयघोष करत या मंडळींनी द्विराष्ट्रवाद मान्य केला आणि अखंड भारत टिकविण्यासाठी लढण्याऐवजी युद्धापूर्वीच पळ काढला! पराक्रमी जखमी वीराला तो पराभूत झाला म्हणून सज्जात बसून चकाट्या पिटणाऱ्यांनी हिणवावे अशातलाच हा प्रकार होता,"

आचार्य अत्रेंच्याच भाषेत सांगायचे झाले तर, आचार्य कुरुंदकरांच्या या तर्कशुद्ध विश्लेषणाच्या ताजमहालाला आपण कोणी आपली वीट लावायचा प्रयत्नही करू नये. जे आहे तसे इतरांच्या समोर ठेवावे एव्हढेच पुरेसे आहे.


सुनिल सांगळे

लेखक

Updated : 2 Oct 2022 1:21 PM IST
Next Story
Share it
Top