" गणपती....कालचा आणि आजचा "
X
१९९७ /१९९८ चा काळ होता तो खेड्यापाड्यात विजेच्या तारांनी प्रवेश केल्यावर उजळलेल्या गावांनी क्रांतिची स्वप्नं पाहिली होती. माणसांचं डांबरीकरण न झालेल्या गावातल्या लोकांची मनं अगदी साफ होती. नेक होती माणसं त्याच नव्वदीच्या दशकात माझा जन्म झालेला. गुरुवारीच जन्मलो म्हणे मी. आई सांगत असते मला अधून मधून माझ्या जन्माचं हे गुपित. शेती, माती, नाती आणि शाळेतले छोटे सोबती. यांना बघत बघत मी मोठा होत गेलो. तेंव्हा गावात कदाचित एकाकडेच टू व्हीलर असायची. नाहीतर सगळा प्रवास हा बैलगाडीतूनच.
त्या बैलगाडीच्या चालीवर वाजणाऱ्या कितीतरी घुंगरांनी आपली गाथा इथल्या ओढ्यानाल्यानां ऐकवली असेल. तो काळ खूपच ग्रेट वगैरे होता. कळायला लागलं तसं शाळेत जातांना बापाने आणलेली राजा पाटी त्यावर काढलेला श्री गणेशा.....
बस्स....
तेंव्हा पासून त्या गणेशाचं नि माझं नातं दृढ होत गेलं.
गावी गणपतीचा सण खूप जोरात असायचा. सगळी माणसं गट तट विसरून मंडळाच्या गणपतीला आरतीला यायची. उकडलेले मोदक किंवा साखर, बर्फी कुस्करून वाटली जायची. त्याची चव आजच्या आधुनिक पदार्थाना नक्कीच नाही.
भल्या पहाटे डोक्यावर चिखली गणपती एका बुट्टीत घेऊन मंगोली या गावचा बाळू कुंभार आमच्या गावी यायचा. ज्यांच्या घरात रंगीत गणपती आहेत त्यांनी आदल्या दिवशीच गणपती घरी आणलेले असायचे.
आम्ही बारकी पोरं सकाळी लवकर उठून अंघोळ करून गणपतीला रात्रभर रंगवून तयार केलेल्या कपाटात बसवायचो. मग हरिटी (दुर्वा) आणि आघाडा आणायला देवळाकडे जायचो, देवबावीतल्या (मंदिराजवळची विहीर) पाण्यात आमच्या इवल्या हातांनी काढलेली दुर्वा आणि फुले आम्ही भरलेल्या तांब्यात टाकायचो. देवाला नमस्कार करून आमची स्वारी घरी यायची. मग गणपतीची पूजा आणि मग आरती,
आरतीला माझा मित्रवर्ग असायचा. सुखकर्ता दुखहर्ता म्हणतांना खड्या आवाजाची उंची वाढत जायची वातावरण अगदी भक्तिमय व्हायचं. वाजणाऱ्या घंटीचा आवाज घरभर घुमायचा. आवाजाने रडणारी पोरं गप्प बसायची. आरती झाल्यावर आम्हा पोरांना प्रसाद दिला जायचा. कधी चिरमुरे, कधी साखर तर कधी कुस्करलेल्या बर्फीचा तुकडा हातात पडायचा. याचं प्रसादासाठी आम्ही गावभरच्या गणपतीच्या आरतीला जायचो. प्रसाद मुबलक मिळायचा. पोट भरायचं आमचं मग फटाक्यांना उत यायचा मी तर ५ रु ला मिळणारी फटाक्यांची माळ पुरवून पुरवून वापरायचो न वाजणाऱ्या फटक्यातली दारू काढून त्याचा जाळ करण्यात आम्ही माहीर होतो न वाजलेल्या फटाक्यांच्या शोधात आम्ही गावभर भटकायचो.
सायंकाळी हातपाय धुवून आम्ही मंडळाच्या आरतीला जायचो.
मग घराघरात आरती व्हायची सगळा आनंदी आनंद असायचा. सासुरवाशीण लेकी बाळी माहेरी यायच्या तेंव्हा कुणाच्या तरी कडेवर एकतरी बाळ असायचं. गावी आलेल्या एखाद्या सासुर वाशिनीचं लग्नापूर्वी गावात एखादं लफडं जरी असलं. तरी तिच्या प्रियकराला आम्ही तिच्या नावाने चिडवायचो, मारही खायचो आणि घरी जाऊन लपूनही बसायचो.
मग संध्याकाळी गौरीची गाणी म्हणतांना वेगवेगळ्या घरच्या सासुरवाशिनी गल्लीभर जमायच्या. गौरीची गाणी म्हणताना त्यांच्या चेहेऱ्यावरचं दुःख,आणि त्यांचा सासरछळ त्या विसरून जायच्या.
नाच ग घुमा... नाचू मी कशी.
किंवा झिम्मा ग पोरी झिम्मा..
फुगडी फू.. हे सगळं खेळतांना त्या देहभान हरपून जायच्या.
प्रबोधनाचे कार्यक्रम व्हायचे नाटक, गाणी व्हायची, सांस्कृतिक कार्यक्रम व्हायचे, सगळा आनंदी आनंद.
पण.....
विसर्जनाला मात्र घरचा माणूस दूर जातोय असं वाटायचं डोळं भरून यायचे आमचे
कारण हा आनंद आता पुढल्या वर्षीच. शाळेच्या सुट्ट्या संपलेल्या असायच्या. मग पुन्हा जड पावलांनी आणि जड अंतकरणाने पुन्हा शाळा.
असं हे बालपण होतं. निखळ, निरागस, आनंदाने भरलेलं.
पण आता...?
पण आता त्यातल काही राहील नाही.
सत्राशे साठ गणपती मंडळं झालेल्या गावा गावात एकोपा नावाचा प्रकार आता पूर्वी सारखा राहिला नाही.
वर्गणी आता दादागिरी करून वसूल केली जाते.
प्रबोधन.....???
छे....
काय लिहितोय मी प्रबोधन आता पूर्वीसारखे कुठे राहिलंय.?
त्यांची जागा आता नाच गाण्यांनी घेतली. डॉल्बीच्या दणदणाटात आमची युवा पिढी दारू पिऊन जेव्हा नाचते ना.. तेंव्हा लोकमान्य टिळकांनी याचसाठी गणेशोत्सव साजरा करायला सांगितला का? हा प्रश्न पडतो कधी कधी.
फटाक्यांची जागा आता सायलेंसर काढलेल्या गाड्यांनी घेतली. सायलेंसर काढलेल्या गाड्यांच्या आवाजाने नुकत्याच जन्मलेल्या अर्भकाला किती त्रास होतो. हे त्या माय माऊलींनाच माहिती.
बीपी, शुगर असलेल्या लोकांची तर खूप वाताहत होते. अश्या गाड्यांवर आणि त्यांच्या चालकांवर सरकार कारवाई का करत नाही? हा प्रश्न पडतो.
शहरात कमी आणि गावागावात जास्त प्रमाणात युवा पिढी बिघडत चालली आहे.
गणपती समोर पत्ते खेळत बसणाऱ्या लोकांना काय म्हणावं?
पूर्वी हलगीच्या तालावर नाचणारी आमची पिढी आता विसर्जनाला बायका नाचवू लागली.
तेंव्हा खेड्याकडे चला म्हणणाऱ्या बापूंना मला प्रश्न विचारावासा वाटतो... कि खेड्याकडे का म्हणून जाव लोकांनी?
प्रश्न भक्तीचा जरी असला तरी त्याचं अवडंबर का करतोय आपण?
का नाही गावा गावातल्या मंडळांनी स्वछता मोहीम राबवली?
गरीब गरजू विद्यार्थ्यांना वर्षभराचा शिक्षण खर्च किंवा एखाद्या अनाथ आश्रम किंवा वृध्दाश्रमाला भेट देऊन त्यांना का नाही जवळ केल.
का?...का?...
असं म्हणतात कि देशाचं भवितव्य युवकांच्या हातात असतं.
पण याच युवा पिढीला राजकारणाच्या दलदलीत घुसवून; त्याचं कोणी मातेरं केल असेल तर ते आपल्याच माणसांनी केलय.
मंडळं राजकारणाच्या खुंटीला बांधून ठेवली आहेत आपण.
मग कोणीतरी म्हणतो....
टिळक तुम्ही पुन्हा जन्माला या.
अरे काय पुन्हा काशी करायला जन्माला यायचं का त्यांनी?
आपण केलेली घाण टिळकांनी का काढायची?
समाज सुधारणा आपल्यापासून झाली पाहिजे आणि हे आपण करू शकतो.
फक्त एका बदललेल्या विचारांची गरज आहे माझ्या देशाला.
गणपती मी हि मानतो, मनापासून मानतो.
पण त्याचं अवडंबर करत नाही मी.
मला माहित आहे हा लेख खूप जणांना झोंबेल.
काही काही शहाणे धार्मिक बोलतील. पण नक्की कोणता धर्म पाळतोय आपण? याच नीट निरीक्षण करता यायला हव आपल्याला.
सण हे आनंद देण्यासाठी असतात, दुःख देण्यासाठी नक्कीच नसतात.
मला वाटतं आयुष्यात कर्मकांड हि जरुरीचं आहे थोडं. पण माणूस माणसापासून दूर जाईल इतकं कर्मकांड आपण करू नये.
शेवटी काय हे सगळं आपल्यालाच करायचं आहे आणि भोगायच हि आहे आपल्यालाच.
पण एकदा...फक्त एकदा....
माणूस बनून जगून घेतलं तर.....?