Home > मॅक्स ब्लॉग्ज > इंधन दरवाढ, नवा दृष्टीकोन

इंधन दरवाढ, नवा दृष्टीकोन

इंधन दरवाढ, नवा दृष्टीकोन
X

कोरोना संकट काळात रोजच्या इंधन दरवाढीने सामान्य माणूस त्रस्त आहे. अशा काळातही मास्टरस्ट्रोक टाइप पोस्ट टाकून भक्तगणांनी उच्छाद मांडला आहे. इंधन दरवाढीचा थेट फटका सामान्य माणसाला बसतो. पेट्रोल-आणि डिझेल यांचा वापर प्रामुख्याने प्रवासी तसंच मालवाहतुकीसाठी होतो. डिझेलचा वापर मोठ्या प्रमाणात उद्योगांमध्येही होतो. त्यामुळे या इंधनदरवाढीमुळे सामान्य माणसाच्या एकूणच अर्थव्यवस्थेचं पेकाट मोडलंय. यापुढे जाऊन यातील एक नवा दृष्टीकोन मला इथे चर्चेला आणायचा आहे. या नव्या दृष्टीकोनातून या इंझन दरवाढीकडे पाहिलं तर हळूहळू आपण कशाचं समर्थन करत आहोत याचं भान जागृत व्हायला लागेल.

आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमती किती, केंद्र सरकारचं थेट नियंत्रण दरवाढीवर नाही, राज्य सरकार किती टॅक्स लावतं ते बघा, वाढलेल्या किंमती मधून लोकोपयोगी कामंच होणार आहेत इ.इ. भक्तीय नॅरेटीव्ह च्या बाहेर येऊन पाहिल्यास लक्षात येतं की ही दरवाढ खरं तर देशविरोधी आहे. आज कोरोना संकट काळात देश अडचणीच्या स्थितीत आहे. अर्थव्यवस्था जीवंत ठेवणारे झरे आटले आहेत. अशा वेळी महसूल तर लागणारच आहे, त्यासाठी सर्वांत सोपा उपाय कर आकारणी हाच असतो. शेवटी लोकांच्या खिशातून पैसे काढणं हात एक सोपा उपाय कुठल्य़ाही सरकार समोर असतो. थोडीशी देशभक्तीची नशा दिली की लोक खिशात हात घालायला लागतात. याचाच फायदा उचलत सरकारने इंधन दरवाढ करायला सुरूवात केली. या दरवाढीचं टायमिंग पाहिलं तर एक लक्षात येतं की, संपूर्ण देश लॉकडाऊन आहे. कोणीच सामान्य माणूस घराच्या बाहेर पडत नाहीय. मग वाढलेले दर चुकवतोय कोण, कोणाला पडलाय हा भुर्दंड..

हे ही वाचा..

तर आज देशात फक्त कोरोना वॉरीअर्स येजा करतायत. जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा पडू नये म्हणून अवजड वाहनं वाहतूक करतायत, डॉक्टर, पोलीस, राजकारणी, पत्रकार, स्वयंसेवी संस्था, अत्यावश्यक सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांची वाहतूक करणाऱ्या बसेस, पाणी-कचरा व्यवस्थापन करणाऱ्या गाड्या, शेतीची कामे करणारे शेतकरी, फार्मा कंपन्या इ.इ. लोक या वाढीव दरांचा भूर्दंड सहन करतायत. हे सर्व कोरोनाशी लढणारे फ्रंटलाइन योद्धे आहेत. या सर्वांच्या खिशाला या दरवाढीच्या निर्णयांमुळे भगदाड पडलं आहे. जीवावर उदार होऊन कोरोनाशी लढणाऱ्या या योद्ध्यांची क्रूर चेष्टाच तेल कंपन्यांच्या मदतीने सरकारने चालवली आहे.

इंधन दरवाढीचा थेट परिणाम जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतींवर झाला आहे. गेली तीन महिने कुठल्याही उत्पन्नाशिवाय घरी बसलेल्या सामान्य लोकांना या महागाईची झळ पोहोचली आहे. अशा वेळी तक्रा करायची तरी कशी, कारण राजकीय पटलावर आणि माध्यमांमध्ये चीनशी लढाई सुरू आहे. सामान्य लोकांच्या या जीवन-मरणाच्या लढाईचं कुणाला काहीच पडलेलं नाही.

Updated : 4 July 2020 8:30 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top