सामान्य मुस्लिमाच्या पाठीवर दहशतवादाचं ओझं किती काळ लादणार?
बॉम्बहल्ले, गोळीबार म्हणजेच दहशतवाद आहे का? देशभरात झुंडींनी केलेल्या हत्या किंवा बाबरी पतन हा दहशतवादाचा भाग नाही का? दहशतवाद खूप सोफेस्टिकेटेड पद्धतीने बॉम्बहल्ले आणि गोळीबार न करताही निर्माण केला जातो का? फ्रान्स हल्ल्याच्या निमित्ताने लेखक श्रीरंजन आवटे यांचा लेख
X
फ्रान्समधील हल्ला हे माणुसकीला काळिमा फासणारं कृत्य आहे. अस्मितेचं टोक गाठल्यावर आणि धर्मांधतेचं विष प्यायल्यावर याहून वेगळं ते काय होणार! जगभर अशा मूलतत्त्ववादी शक्तींनी थैमान निर्माण केलं आहे. त्याला पोषक असं सारं राजकारण आकाराला आलं आहे. हे सारं निषेधार्ह आहे, हे निस्संशय. मात्र, खापर सारं फोडायचं मुस्लिमांवर. सरसकट. हे अतिशय आक्षेपार्ह आहे.
सध्या सोशल मीडियावर एक मीम व्हायरल होत आहे...
पहिला म्हणतोः एक जोक सांग ना. दुसरा म्हणतोः इस्लाम शांततेचा धर्म आहे.
या मीमशी मी सहमत नाही. मतमतांतराच्या पलीकडे हे मीम अधिक आक्षेपार्ह आहे.
मुस्लिम नावाचा एक शत्रू उभा करण्याचा जो महाकाय प्रकल्प युरोप अमेरिकेपासून ते भारतातल्या विद्यमान सत्ताधारी वर्गाच्या प्रवृत्तीने निर्माण केला आहे. त्याचं ओझं सामान्य मुस्लिमाला सतत वाहावं लागतं.
त्याला/ तिला आपण पुरेसं मानवतावादी, अहिंसक आहोत, हे सतत सिद्ध करावं लागतं. उद्या आशिष यांनी याच प्रकारे हिंदुत्ववाद्यांच्या दहशतवादी कारवायांवर मीम केलं तरीही एक सामान्य हिंदू म्हणून मला मी अहिंसक आहे किंवा दहशतवादाला माझं समर्थन नाही, हे सिद्ध करावं लागत नाही. बहुसंख्य समाजामध्ये अल्पसंख्य धर्मावर अशा प्रकारे आरोप करणं याचे गंभीर परिणाम आपण पाहतो आहोत.
अशा वेळी एखादा धर्माचं मुळ हिंसक आहे, असं म्हणणं याचे गंभीर परिणाम संभवतात. त्यातून 'मूलतत्त्ववादी' 'संहारक' 'घातक' असे इस्लामचे रंगवलेले चित्र अधिक गडद होते.
दहशतवादाकडे आपण ज्या प्रकारे पाहतो. त्यातच मुळी गफलत आहे. राज्यसंस्था पुरस्कृत हिंसा हा दहशतवादाचा भाग आहे. असं आपल्याला वाटत नाही. अशा हिंसेला अधिमान्यता मिळते. एक प्रकारची स्वीकारार्हता असते.
उदाहरणार्थ देशभरात झुंडींनी केलेल्या हत्या किंवा बाबरी पतन हा दहशतवादाचा भाग आहे, हेच आपल्या पचनी पडत नाही. दहशतवाद म्हणजे बॉम्बहल्ले, गोळीबार अशी काहीशी समजूत आहे. दहशतवाद खूप सोफेस्टिकेटेड पद्धतीने बॉम्बहल्ले आणि गोळीबार न करताही निर्माण केला जातो. ती गुंतागुंतीची प्रक्रिया समजून घ्यायला हवी.
धर्माची मूळ शिकवण मानवतेची आहे, शांततेची आहे, प्रेमाची आहे. तिचे चुकीचे रुप आज सर्वव्यापी होत असताना सार्वजनिक चर्चेत हस्तक्षेप करताना आपण काळजीपूर्वक मांडणी करायला हवी, असं माझं मत आहे.
- श्रीरंजन आवटे