तामिळनाडूच्या मंत्र्यांना प्रतिक्षा सिंड्रेलाची...चपलेचा फोटो टाकून आवाहन
X
सध्याच्या काळात देशाचे राजकारण अत्यंत टोकाला गेल्याची अनेक उदाहरणं पहायला मिळतात. नेतेही त्यांच्या टीकाकारांना ज्या पद्धतीने उत्तर देतात ते पाहता एकप्रकारे भीतीदायक वातावरण निर्माण झाल्याचे दिसते. पण आजही अनेक राजकारण्यांमध्ये त्यांच्याविरोधातील आंदोलन, घोषणाबाजी किंवा कार्यकर्त्यांची नाराजी याबद्दल विनोदबुद्धीने प्रतिक्रिया नोंदवण्याची वृत्ती कायम आहे. याच पार्श्वभूमीवर सध्या तामिळनाडूचे अर्थमंत्री डॉ. पी त्यागराजन यांचे कौतुक होते आहे. याला कारण ठरले आहे त्यांची एक पोस्ट....याबाबत अनंत घोटगाळकर यांनी एक फेसबुक पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी काय म्हटले आहे ते पाहा...
" तामिळनाडूचे अर्थमंत्री डॉ. पी त्यागराजन यांच्या कारवर काल एक चप्पल भिरकावली गेली. सुंदर लेडीज चप्पल होती. त्यांनी आज त्या चप्पलचा फोटो ट्विटरवर टाकलाय आणि म्हटलंय जुन्या विमानतळाच्या टर्मिनलमध्ये सुरक्षा भेदून जिला पक्ष कार्यकर्त्यांसह कित्येक मीटर आत येऊ दिलं त्या "सिंड्रेला" ला आपले चप्पल परत हवे असेल तर तिने ते येऊन घेऊन जावे. माझ्या कर्मचाऱ्यांनी ते तिच्यासाठी जपून ठेवलंय. ही असली तीक्ष्ण विनोदबुद्धी राजकारण्यांकडे आजकाल क्वचितच पहायला मिळते. महावीर त्यागी, मधू दंडवते यांच्या पंक्तीतला माणूस वाटला हा.
महुआ मोईत्रा उत्तरादाखल त्यांना म्हणाल्या " भलतेच हजरजबाबी आणि चटकदार होत आहात सर तुम्ही. खूपच आवडलं. आपल्या गटात तुमचे हार्दिक स्वागत!" यावर राजन म्हणतात, " तुमचीच प्रेरणा , मॅम. तुम्ही तर यातील रॉकस्टार!" फार फार दिवसांनी राजकारण्यांनी असला उच्च प्रतीचा आनंद दिला. सलाम!
-- अनंत घोटगाळकर