राष्ट्रध्वज फडकवताना कोण-कोणते नियम लक्षात घ्यावे?
आपण सर्वजण आपल्या तिरंग्यावर जीवापाड प्रेम करतो मात्र तिंरगा फडकवताना राष्ट्र ध्वजाचा अपमान होऊ नये म्हणून कोणकोणती काळजी घ्यावी. तिरंग्यावर प्रेम असणाऱ्या प्रत्येकाने ही माहिती जाणून घ्यावीच..
X
आपल्या राष्ट्रध्वजाबाबत आपल्या सर्वांच्या मनामध्ये प्रेम, आस्था, आदर आणि निष्ठा या भावना निश्चितच आहेत. तरी सुद्धा आपला राष्ट्रध्वज लावण्यासंदर्भात काही प्रथा, पद्धती आणि कायदे आहेत. याबाबत भारताचा एक जबाबदार नागरिक म्हणून आपल्याला या सर्व गोष्टी माहिती असायला हव्यात. अनेकदा सर्व सामान्य नागरिकांबरोबरच सरकारी संस्था, संघटनामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना देखील माहिती नसते. आज आपण याच नियमाविषयी जाणून घेणार आहोत. कारण कळत नकळत या नियमांचा तुमच्या कडून भंग झाल्यास तुमच्यावर कडक कारवाई करण्यात येते.
भारत सरकारने वेळोवेळी जारी करीत असलेल्या कायद्याचे स्वरुप नसलेल्या आदेशांव्यतिरिक्त राष्ट्रीय ध्वज फडकवण्यासाठी (बोधचिन्ह व नावे) (अयोग्य वापराचा प्रतिबंध) कायदा, १९५० आणि राष्ट्रीय सन्मानाचा अवमान प्रतिबंध कायदा, १९७२ कायद्यातील तरतुदी आणि भारतीय ध्वजसंहिता २००२ अनन्वये कारवाई करण्यात येते. त्यामुळे आपल्या राष्ट्रीय ध्वजाच्या संदर्भात असणारे सर्व कायदे, प्रथा, पद्धती समजून क्रमप्राप्त ठरतं.
भारतीय ध्वसंहितेचे तीन भाग आहेत ते पुढील प्रमाणे...
१. राष्ट्रीय ध्वजाचे सर्वसाधारण वर्णन
२. लोकांनी, खाजगी संस्थांनी,शैक्षणिक संस्थांनी, राष्ट्रीय ध्वज कसा लावावा याचे नियम
३. केंद्र व राज्य सरकार आणि त्यांच्या संघटनांनी, संस्थांनी राष्ट्रीय ध्वज कसा लावावा याचे नियम
असा आहे आपला राष्ट्रध्वज
• आपला राष्ट्रध्वज तिरंगी आयताकृती असून त्यात सारख्या रुंदीचे तीन आयताकृती पट्टे किंवा उपट्टे आहेत. सर्वात वरील पट्ट्याचा रंग केसरी असून खालच्या पट्ट्याचा रंग हिरवा आहे. मधला पट्ट्याचा रंग हा पांढरा व त्याच्या मध्यभागी नाविक निळ्या (नेव्ही ब्लू) रंगातील २४ समान अंतरावरील आऱ्यांचे अशोक चक्र आहे. अशोक चक्र हे शक्यतोर स्क्रीन छपाई पद्धतीने किंवा इतर पद्धतीने, छाप्याने किंवा कशिदा करून ध्वजाच्या दोन्ही बाजूंनी पांढऱ्या पट्ट्याच्या मध्यभागी दिसले पाहिजे.
• भारताचा राष्ट्रध्वज हाताने कातलेल्या आणि विणलेल्या सुती, रेशमी, खादी कापडाचा असेल.
• राष्ट्रीय ध्वज आयताकृती असेल. लांबी व उंची (रुंदी) यांचे प्रमाण 3 : 2 असेल.
वाहनासाठी राष्ट्रध्वज तयार करताना पुढील बाबी लक्षात घ्यावे...
• अति महत्त्वाच्या व्यक्तींच्या विमानांसाठी – ४५० – ३०० मि. मी आकाराचा ध्वज
मोटारकारसाठी – १५०-१०० मि.मी मेजावर ठेवण्यासाठी अभिप्रेत आहे.
२. नागरिक, खाजगी संस्था, शैक्षणिक संस्था यांनी ध्वजारोहण करताना पुढील बाबींचा विचार करावा...
• बोधचिन्ह व नावे (अयोग्य वापरास प्रतिबंध) अधिनियम, १९५० चे उल्लंघन करून ध्वजाचा व्यापारी उद्देशासाठी वापर केला जाणार नाही.
• कोणत्याही व्यक्तीला किंवा वस्तूला आदर दाखविण्यासाठी ध्वज वाकवला जाणार नाही.
• सार्वजनिक इमारतीवर सरकारने दिलेल्या आदेशाव्यतिरिक्त ध्वज अर्ध्यावर उतरविण्यात किंवा अर्ध्यावर लावण्यात येणार नाही.
• ध्वजाचा वस्त्र म्हणून कोणत्याही स्वरुपात वापर केला जाणार नाही. यात खाजगी अंत्यदहनही अंतर्भूत आहे.
अनेक देशांमध्ये ध्वजाचा वापर वेष किंवा गणवेशाचा भाग म्हणून वापरण्यात येतो. परंतु आपल्या देशामध्ये वेष किंवा गणवेशाचा कोणताही भाग म्हणून ध्वजाचा वापर केला जाणार नाही, तसेच हातरुमाल, मोठे रुमाल व कपडे यांवर ध्वज छापला जाणार नाही किंवा त्याचे कशिदा काम केलं जात नाही.
• ध्वजावर कोणत्याही स्वरुपाची अक्षरे लिहिली जाणार नाहीत.
• ध्वजाचा पात्र म्हणून काही घेण्यासाठी, नेण्यासाठी, ठेवण्यासाठी किंवा देण्यासाठी वापर केला जाणार नाही. मात्र प्रजासत्ताक दिन किंवा स्वातंत्र्यदिन यांसारख्या राष्ट्रीय दिनी किंवा विशेष प्रसंगी समारंभाचा भाग म्हणून ध्वज फडकविण्यापूर्वी त्यात फुलाच्या पाकळ्या ठेवण्यास परवानगी आहे.
• अनेक वेळा पुतळ्याच्या अनावरण संमारभावेळी राष्ट्रीय ध्वजाचा वापर करायचा असेल ध्वज वेगळा व स्वतंत्रपणे लावला जाईल आणि पुतळा किंवा स्मारक यांवर घालण्यासाठी त्याचा वापर केला जाणार नाही.याची काळजी घेणं महत्तवाचं आहे.
• तसचं वक्त्याचे मेज किंवा पीठ यावर घालण्यासाठी ध्वजाचा वापर केला जाणार नाही.
• ध्वज जमिनीला लागेल किंवा पाण्यात जाईल, अशी व्यवस्था जाणीवपूर्वक टाळावी.
• वाहन, लोहमार्ग, गाडी, नौका किंवा विमान यांच्या टपावर, वरच्या बाजूच्या किंवा मागच्या बाजूवर आच्छादन घालण्यासाठी ध्वजाचा वापर केला जाणार नाही.
• ध्वज फडकवताना केशरी बाजू वर असेल. ध्वज उलटा फडकवला जाणार नाही याची काळजी घ्यावी.
• ज्यावेळी राष्ट्रीय ध्वज लावला जाईल. त्यावेळी त्याला मानाचे व वेगळे स्वतंत्र स्थान दिले जाईल.
• खराब झालेला किंवा चुरगळलेला ध्वज फडकवला जाऊ नये.
ध्वज फडकवताना घ्यावयाची काळजी
• ज्या वक्त्याच्या व्यासपीठावर ध्वज लावला जाईल, तो वक्ता श्रोत्यांकडे तोंड करून उभा राहिल्यास त्याच्या उजव्या बाजूस ध्वज फडकाविला जाईल किंवा वक्त्याच्या मागे व वर ध्वज फडकवला जाईल
• ज्यावेळी ध्वज भिंतीवर आडवा लावला जाईल, त्यावेळी केशरी रंगाचा पट्टा सर्वांत उजव्या बाजूला असेल (ध्वज बघणाऱ्याच्या डाव्या बाजूला )
• इतर कोणताही ध्वज राष्ट्रीय ध्वजापेक्षा उंच नसावा व राष्ट्रीय ध्वजाच्या लगत नसावा, तसेच ज्या ध्वजदंडावर राष्ट्रीय ध्वज लावला असेल त्यावर कोणतीही फुले, हार किंवा चिन्हे नसावीत.
• ध्वजाच्या सजावटीसाठी, फुलांसारखा आकार करुन किंवा इतर कोणत्याही पद्धतीने शोभेसाठी वापर करु नये.
• महत्त्वाच्या राष्ट्रीय, सांस्कृतिक किंवा क्रीडा प्रसंगी लोक कागदाचे ध्वज फडकावू शकतात. परंतु, कार्यक्रम संपल्यावर असे ध्वज जमिनीवर टाकून देऊ नयेत. शक्यतोवर खाजगीरित्या ध्वजाची प्रतिष्ठा राखून ते नष्ट करण्यात यावेत.
• जेथे ध्वज उघड्यावर लावला जाईल तेथे तो कोणतेही हवामान असले तरी शक्यतो सूर्योद्यापासून सुर्यास्तापर्यंत लावावा.
ध्वज खराब झाल्यास काय करावे?
• ध्वज खराब होईल अशा पद्धतीने लावू नये किंवा बांधू नये
• जर ध्वज खराब झाला तर तो खाजगीरित्या संपूर्णत: नष्ट करण्यात यावा. शक्यतो तो जाळावा किंवा ध्वजाची प्रतिष्ठा राखून इतर पद्धतीने नष्ट करावा.
४. केंद्र व राज्य सराकर आणि त्यांच्या संघटनांनी व संस्थांनी ध्वजारोहण कसे करावे?
• सरंक्षण आस्थापना/ राजनैतिक कार्यालये प्रमुख
• ज्या संरक्षण आस्थापनांचे राष्ट्रीय ध्वज लावण्याचे त्यांचे स्वतःचे नियम आहेत त्यांना या भागातील तरतुदी लागू होणार नाहीत.
• ज्या देशात राजनैतिक व परदेशी प्रतिनिधींनी त्यांच्या मुख्यालयावर व अधिकृत निवासावर ध्वज लावण्याची प्रथा आहे. तेथे मुख्यालयावर व मुख्य अधिकाऱ्याच्या निवासावर राष्ट्रीय ध्वज आणला जावा.
• अधिकृतरित्या ध्वज लावणे.
• सर्व अधिकृत समारंभात लावला जाणारा ध्वज हा भारतीय मानक कार्यालयाच्या निकषानुषार व त्यांचे बोधचिन्ह असलेलाच असेल. इतर प्रसंगीसुद्धा योग्य आकाराचे असे ध्वज लावणे गरजेचं आहे.