आदिवासींच्या सांस्कृतिक रूपांतराचे पाच टप्पे : सुदाम राठोड
जगातल्या प्रत्येक समाज समूहाच स्वतःचं एक सांस्कृतिक संचित असतं आणि त्या संचितातूनच त्या त्या समाजाची जडण घडण होत असते. आदिवासींचं सांस्कृतिक संचित काय आहे ?आजच्या आदिवासीची जडण घडण नेमकी कशी आहे आणि त्याचे प्रतिबिंब साहित्यात कसे उमटले आहे हे जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने निबंधाच्या माध्यमातून मांडले आहे लेखक सुदाम राठोड यांनी...
X
मी आदिवासींच्या सांस्कृतिक रूपांतराचे पाच टप्पे केले आहेत. पैकी पहिला जो टप्पा आहे, तो आर्यांच्या आगमनानंतरचा. आर्यपूर्व कालखंड शुध्द भारतीय संस्कृतीच्या उन्नयनाचा कालखंड होता. या कालखंडात आदिवासींची संस्कृती हीच इथली प्रधान संस्कृती होती. अर्थात आदिवासी म्हणून त्यांची आताच्या सारखी स्वतंत्र ओळख नव्हती. मात्र भारतात राहणाऱ्या वेगवेगळ्या आदिम जमाती याच संस्कृतीच्या वाहक होत्या.
आर्यांच्या आगमणानंतरच खऱ्या अर्थाने भारतात सांस्कृतिक संकराला सुरवात झाली. मूळ संस्कृतीला नंतर अनेक फाटे फुटत गेले. आर्यांनी जिंकलेल्या आणि गुलाम केलेल्यांची संस्कृती ग्राम आणि नागर क्षेत्रात वाढू लागली आणि राना वनात पळून गेलेल्यांची संस्कृती निसर्गाच्या सान्निध्यात वाढू लागली. ग्राम आणि नागर क्षेत्रात राहणाऱ्या मूळ भारतीय जमातींच्या संस्कृतीत वैदिक संस्कृती बेमालूम पणे मिसळली गेली. तिच्यावर अनेक सांस्कृतिक आक्रमणे झाली. म्हणूनच ते आज मरीआई सोबत सरस्वतीला देखील पूजतात आणि म्हसोबासोबत रामाची पण पूजा करतात. वरून अजून दर्ग्यात जाऊन पिरालापण नवस बोलतात.
त्यामुळे खरी भारतीय संस्कृती शुद्ध स्वरुपात आदिवासींनीच पहाडा जंगलात एकाकीपणे राहून जपली असे म्हणावे लागते. म्हणून आदिवासी संस्कृती हीच भारताची मूळ आणि खरी संस्कृती आहे. "शेकडो वषे हा आदिवासी समाज ग्रामीण जन जीवनापासून व गजबजलेल्या शहरांपासून दूर जीवन जगत आहे.त्यांनी जंगला- पहाडताच आपले नवे भाव- विश्व, कलाविश्व व जगण्याचे नवे तत्त्वज्ञान उभारले. श्रम, समूह व सहकार या तीन तत्त्वांच्या आधारावर आपली नवी दुनिया वसवली."१ या दुनियेत वर्ण व्यवस्था नव्हती, जाती व्यवस्था नव्हती,अन् धर्मव्यवस्थाही नव्हती. ते निसर्ग पूजक होते.निसर्ग हाच त्यांचा धर्म होता आणि निसर्ग हीच त्यांची जात होती. वैदिक हिंदू धर्माचा, वैदिक हिंदू धर्मातील जातींचा आणि आदिवासींचा काही एक संबंध नव्हता.
मात्र या मूळ भारतीय संस्कृतीचा प्रभाव इतका मोठा होता,की आर्यांना तो प्रभाव सहज सहजी नष्ट करणे शक्य नव्हते.ही संस्कृती पहाडा जंगलात अधिक निसर्ग सन्मुख होत शुद्ध स्वरुपात वाढत आहे याची जाणीव आर्यांना होतीच. म्हणून त्यांनी आदिवासींना राक्षस, दैत्य, पिशाच्च, असुर, नरभक्षक म्हणून वैदिक वाड्ःमयात चितारले.त्याचा परिणाम असा झाला,की आर्यांच्या सांस्कृतिक वर्चस्वानंतर भारतीय समाजाला आदिवासींबद्दल अजिबात सहानुभूती राहिली नाही.त्यांचे दर्शनही समाजाला भयावह व अमंगल वाटू लागले. इतकेच नाही तर भारतातली संपूर्ण व्यवस्थाच आदिवासींच्या विरोधात उभी राहिली. आज ही व्यवस्था समजून घेण्याची, त्याची चिकित्सा करण्याची दृष्टी ज्या आधुनिक शिक्षणाने दिली ती शिक्षण व्यवस्था भारतात रुजवणाऱ्या इंग्रजांनाही आदिवासींच्या सांस्कृतिक स्वातंत्र्याची चाड नव्हती. इंग्रजी शिक्षणामुळेच म.फुले घडले,डॉ.बाबासाहेब आंबेडकर घडले आणि त्यांनी आदिवासींबरोबरच सर्व शोषित वंचितांचा दडपला गेलेला इतिहास उकरून काढला. म.फुले आपल्या अखंडात म्हणतात,
"गोंडभिल्ल क्षेत्री होते मूळधनी | इराणी मागुनी आले येथे |
कोळी भिल्ल क्षेत्री शरांनी तोडिले| हाकलून दिले रानी-वनी ||"२
हे रानावनात हाकलून दिलेले गोंड भिल्ल या देशाचे मुलधनी आहेत. त्यांची संस्कृती या देशाची मूळ संस्कृती आहे ही दृष्टी म.फुलेंमुळे हळूहळू विकसित होऊ लागली. आदिवासींच्या सांस्कृतिक रूपांतराचा दुसरा टप्पा आहे तो युरोपियन वसाहतवाद्यांच्या आक्रमणानंतरचा. अठराव्या शतकाच्या अखेरीस आणि एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभी भारतावर इंग्रजाचे राज्य सुरु झाले. तेंव्हा त्यांच्या सोबत आलेल्या ख्रिस्ती मिशनर्यांचे आदिवासींकडे पहिल्यांदा लक्ष गेले. आदिवासी हे निधर्मी होते आणि त्यांच्या दृष्टीने मागास होते. म्हणून त्यांनी भूतदयावादी दृष्टीकोनातून आदिवासींचे सेवाकार्य हाती घेतले.मात्र ख्रिस्ती धर्माचा प्रचार हेच त्यांच्या सेवाभावाचे मुख्य उद्दिष्ट होते हे त्यांनी धर्मांतरासाठी केलेल्या साम, दाम, दंड, भेद या मार्गाच्या अवलंबावरून म्हणता येईल.
त्यांनी बहुसंख्य आदिवासींचे धर्मांतर घडवून आणले. बिहार, नागालॅंड, त्रिपुरा, आसाम, तामिळनाडू या राज्यात तर ही संख्या प्रचंड मोठी आहे. केवळ धर्मांतर हेच एकमेव कारण नव्हते. आदिवासी ज्या जंगलांमध्ये राहात होते त्यातील नैसर्गिक साधन संपत्तीवरही त्यांचे लक्ष होते. युरोपियन वसाहतवाद्यांनी या नैसर्गिक साधन संपत्तीसाठी आदिवासींवर अन्याय,अत्याचार सुरु केले,त्यांच्या कत्तली करून वंश विच्छेद-संस्कृती विच्छेद सुरु केले.त्यामुळे हजारो वर्षापासून सुरु असलेले आदिवासी जन जीवन पूर्णपणे ढवळले गेले.आदिवासींची संस्कृतीही ढवळली गेली. परिणामी जंगला जंगलातून प्रभू येशूच्या प्रार्थना घुमू लागल्या आणि सिमेंटच्या जंगलात स्थिरावलेल्या आदिवासींच्या घरा घरात ख्रिसमसची रोषणाई दिसू लागली.
तिसरा टप्पा आहे तो स्वातंत्र्यानंतरचा. स्वातंत्र्यानंतर झालेल्या शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणामुळे आदिवासींची पहिली पिढी शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी जंगला बाहेर पडली आणि त्यांचा नागर समाजाशी संपर्क आला. नागर समाजातील शिक्षण व्यवस्था,मूल्य व्यवस्था आणि एकूणच सामाजिक,सांस्कृतिक संरचना ही वैदिक आणि युरोपियन वसाहतवाद्यांच्या अंगाने विकसित झालेली होती.एकीकडे इतिहास म्हटलं कि वैदिक आणि वैदिकांच्या शाखेचा इतिहास समजला जात आणि दुसरीकडे आधुनिकता म्हटली तर युरोपियन वसाहतवाद्यांच्या नैसर्गिक साधन संपातींच्या अमाप लुटीवर उभी राहिलेली जीवनशैली समजली जात . अश्यात आदिवासींच्या जगण्याचे तत्वज्ञान, त्यांच्या जगण्याची शैली हे मागास ठरवले गेले. आदिवासिंसारखे भारतात असे बरेच छोटे मोठे जातीसमूह आहेत, की जे युद्ध, राजकरण,धर्मकारण यापासून दूर शांततेने आपलं जीवन जगत होते.
पण शासक जातींच्या युद्धखोर इतिहासाने आणि वर्चस्ववादी संस्कृतीने त्यांच्यात एक प्रकारचे न्यूनगंड निर्माण केले आहे. या न्युनगंडाची जाणीव अडाणी लोकांपेक्षा सुशिक्षितांमध्ये अधिकची दिसते. म्हणून ते बहुसंख्यांकांच्या धर्माशी, संस्कृतीशी स्वतःला जोडू पाहतात. त्याचा भाग बनू पाहतात. आणि तेच तर त्या त्या जाती धर्मातील लाभार्थ्यांना हवे असते. आपल्या उत्पादक जातींमध्ये त्यांना वाढ हवी असते.प्याद्यांची संख्याही वाढलेली हवी असते.आदिवासींच्या शिकून सुशिक्षित बनलेल्या या पिढीत हा सांस्कृतिक न्यूनगंड वाढत गेला. यादरम्यान आणखी एक गोष्ट घडली. १९५२ साली वनवासी आश्रमाची स्थापना झाली आणि त्याद्वारे आदिवासींचे हिंदुकरण करणे सुरु झाले. अर्थात ख्रिस्ती मिशनर्यांनी चालवलेल्या धर्मांतराची प्रतिक्रिया वनवासी आश्रमाद्वारे उमटली होती. परिणामी निधर्मी असणाऱ्या आदिवासींच्या संस्कृतीत मोठ्या प्रमाणात बदल व्हायला सुरवात झाली. कवी अनिल साबळे यांच्या कवितेतून हे बदल प्रतीत होताना दिसतात
रामलीला
डोक्यावर गाठोडे घेऊन आलेला राम आमच्या गावातल्या मुलांमध्ये एक. .एक पात्र शोधू लागलाय. हे गावातलं ऐसपैस पसरलेलं हानुमान मंदिर रामाला दूर कसं लोटू शकेल ह्या गावातल्या हनुमान मंदिराने छाती फाडून रामाला आत घेतलेय
..........................................
हा गरीब राम परक्या मुलुखांतला
तरी मराठी शिकलाय रामासोबत वनवासात जाण्यासाठी सीता हवीय पण आमच्या गावात एकसुध्दा मुलगी तयार होईना सीता म्हणून काम करण्यासाठी आणि सीता म्हणूनच वनवासात जाण्यासाठी जणू गावातल्या सगळ्याच मुलींना भीती वाटतेय अग्नीदिव्यांची एक कोवळं पहिलवान पोरगं सीता होण्यासाठी तयार झालंय त्याच्या कोवळ्या ओठांवर अजून मिश्या नव्हत्या हे बरं झालं
............................................
रावणाची लंका म्हणून
कडब्यांवैरणीची एक सुडी पेटवली तेव्हा सगळं गाव शेकत राहिलं काडीने विस्तू उकरत....उकरत कोरडया विहिरीत पडलेला साबण काढताना लक्ष्मण खोल विहिरीत कोसळला तेव्हा पुन्हा लक्ष्मणाचं पात्र बदलावं लागलं
रावणाचा वध करून रामलीला नव्या गावात निघालीय रामाचं काय कुठेही निभावून जाईल रावण मात्र पुन्हा. ..पुन्हा
दगडं फोडत नव्या खाणीवर जाईल "३
चौथा टप्पा आहे तो जागतिकीकरणानंतरचा. आज जागतिकीकरणाने भारतीय आदिवासींचे प्रश्न अधिक गुंतागुंतीचे बनले आहेत. जागतिकीकरणाने त्यांच्या शोषणाची असंख्य दारं खुली केली आहेत.आधुनिकतेच्या नावाखाली आदिवासींची स्वतंत्र ओळख , सांस्कृतिक वेगळेपण पुसले जात आहे.अन्न, वस्त्र,निवारा, शिक्षण आणि आरोग्य या मुलभूत गरजांची पूर्तता करण्यापेक्षा मोबाईल, टीव्ही,इन्टरनेटलाच विकास म्हणत विकासाच्या नावाखाली केवळ सूज दाखवली जात आहे . हे जीन्सला भूललेल्या अन् मोबाईल मध्ये रमलेल्या नव्या तरुणांना कळत नाही याचे पडसाद भुजंग मेश्राम यांच्या कवितेत अधिक्याने उमटताना दिसतात.
"उलगुलान! उलगुलान!! उलगुलान!!!
जे बनलं आहे आता सांस्कृतिक आंदोलन
खरच आम्हाला घाई झाली म्हटलं तरी चालेल
संस्कृतीकरणाला आमचा नकार आहे "४
भारताने तर गेल्या सहा हजार वर्षापासूनची आदिवासींच्या शोषणाची परंपरा तशीच कायम ठेवत नव्वद नंतर अधिक तीव्र केली आहे. पाचवा टप्पा आहे तो समाज मध्यामोत्तर कालखंडातला. व्हाटसप, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम या समाज माध्यमांनी आधुनिक पिढीतल्या नव तरुणांवर भांडवलसहीने जन्माला घातलेल्या चंगळवादी संस्कृतीचा प्रचंड मारा केला. त्याचा परिणाम असा झाला कि, एकीकडे आदिवासी अस्मितेचे मेसेज फॉंरवर्ड करणारे हे तरुण दुसरीकडे पिझ्झा बर्गर, न्युडल्स या पाश्चात्य खाद्य संस्कृतीला बळी पडले. समाज माध्यमांनी व्यक्त होण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली पण व्यक्त होण्याची प्रगल्भता आणि पद्धत दिली नाही.
त्यामुळेच दिनकर मनवर यांच्या कवितेत "पाणी आदिवासी मुलीच्या जांभळ्या स्तनासारखे असते" या ओळीवर याच समाज माध्यमातून प्रचंड गदारोळ माजवला जातो. आदिवासी अस्मितेच्या नावाखाली झुंडशाही उभी करून अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणली जाते. मात्र त्याच वेळी नक्षलवादाच्या नावाखाली आदिवासींचा चाललेला वंश विच्छेद, आदीवासी तरुणींचे लैंगिक शोषण यावर मात्र काहीच बोलले जात नाही. समाज माध्यमांनी आदिवासींना जितकी हिम्मत दिली तितकीच भीतीही दिली. त्यामुळे समाज मध्यामोत्तर काळात आदिवासींच्या सांस्कृतिक मुळांनच हादरे बसले आणि त्यातली नैसर्गिक मुल्ये हरवली कि काय अशी परिस्थिती आहे.
संदर्भसूची :-
१. १. संपा.डॉ. गोविंद गारे,आदिवासी साहित्य संमेलन अध्यक्षीय भाषणे, आदिवासींच्या सामाजिक सशक्तीकरणातील गतिरोध : शोध आणि बोध – डॉ विनायक तुमराम, सुगावा प्रकाशन, पुणे,प्र.आ.२००५,पृ.७३
२. २. संपा. दादा मोरे, महात्मा जोतीबा फुले यांची कविता :निवडक अखंड रचना, प्रतिमा प्रकाशन, पुणे , प्र.आ.१९९७,पृ.५२
३. ३. अनिल साबळे, नावाक्षर दर्शन, अक्टो-नोव्हें-डिसें २०१७ (नियतकालिक) पृ.६३
४. ४. भुजंग मेश्राम, उलगुलान, लोकवाङ्मयगृह प्रकाशन, मुंबई ,प्र.आ.१९८६ पृ.४२