आत्महत्याग्रस्त कुटुंबातील शेतकरणींची शाश्वत शेतीकडे वाटचाल, उत्पादन खर्च कमी करत अन्नसुरक्षेसाठी मिश्र शेतीचा प्रयोग
X
एकीकडे सातत्याने बदलणारे वातावरण आणि केवळ पावसावर अवलंबून असलेली शेती तर दुसरीकडे बियाणे, रासायनिक खतांचा वाढता भरमसाट खर्च आणि हमीभावाची साशंकता. शेतीतील या अशाश्वत परिस्थितीला आत्महत्याग्रस्त कुटुंबातील शेतकरणी मोठ्या धीराने तोंड देत आहेत. या शेतकरणींसाठी खरतंर एकट्यानं शेती करणं अधिक आव्हानात्मक आणि खडतरही. त्या डगमगतात, रडतात, घाबरतात पण पदर खोचून पुन्हा कामालाही लागतात. परंतु हा जोर कुठवर टिकणार ? यातून काही तरी मार्ग काढायला हवा या आशेने आता या महिलांनी शाश्वत शेतीच्या मार्गाकडे पावले वळवली आहेत. कापूस, तूर, सोयाबीन या नगदी पिकांसोबतच उडीद, मूग, चवळी, भाजीपाला अशी मिश्र पिके घेण्याचा प्रयोग त्या करत आहेत. अन्नसुरक्षा आणि उत्पादन खर्च कमी या दृष्टीने सुरू करण्यात आलेल्या प्रयोगाचे हे तिसरे वर्ष सततच्या सभोवतालच्या बदलत्या परिस्थितीमुळे अजून यश-अपयशाच्या निष्कर्षांपर्यंत पोहचता येणार नाही. परंतु काहीतरी वेगळं करू पाहणाऱ्यांमध्ये या एकट्या शेतकरणी खांद्यावर कर्जाचे डोंगर असूनही जोमाने उतरल्या आहेत आणि शेतीचे निर्णय खंबीरपणे घेत आहेत हेच अधिक समाधानकारक आहे.
...
यवतमाळ जिल्ह्यातील झाडगाव गावातील वर्षाताईंच्या नवऱ्याने शेतीवर दोन लाख कर्ज झाल्याने २०१४ साली आत्महत्या केली. ही घटना त्यांच्यासाठी धक्कादायक तर होतीच परंतु याही पलिकडे आता कसं जगावं हा प्रश्न त्यांच्यापुढं होता. सासरच्यांनी घर आणि जमीन यातलं काहीच दिलं नाही. पोटाशी लहानग्या तीन मुली घेऊन त्या शेतावर मजुरी करायला लागल्या. नवऱ्याने वाट्याने केलेला शेतातला माल विकून त्यांनी सावकाराच कर्ज भागवलं. परंतु बचत गटातून काढलेलं कर्ज अजूनही डोक्यावर होत. मजुरी करून दोन वर्षात सर्व कर्ज त्यांनी फेडलं. मजुरीचा पैसा कुठवर पुरणार म्हणून आईकडची तीन एकर जमीन कसायला घेतली. शेती करून हातात चार पैसे हातात राहतील अस त्यांना वाटलं होतं. पण शेतीला लागणारा भरमसाठ खर्च आणि शेतमाल विकून हातात येणारी रक्कम याची हातातोंडाशी जुळणी करताना फारच मुश्किली होत असल्याचे त्या सांगतात. त्या पुढे म्हणतात, “ मग पुन्हा कर्ज घ्यावे लागते. आत्ता पण डोक्यावर एक लाखापेक्षा जास्त कर्ज आहे. कर्ज घेऊन नाही राहिल घेतलं तर शेतात पेरायचं काय आणि खायच काय? तांदूळ, गहू रेशनवर मिळतो. पण तेल, मीठापासून सार विकत आणावे लागते. माझी एकट्याची शेती पुरते का? ”
यवतमाळ जिल्ह्यातील भुलगड गावातील कोलाम समाजातील सुनिताताईंच्या नवऱ्याने आजारपण आणि शेतीवर झालेल्या कर्जामुळे आत्महत्या केली. एकीकडे कर्जाचा डोंगर तर दुसरीकडे कधीही घराच्या बाहेरही न पडलेल्या सुनिताताईंना एकटीनं शेती कशी करायची हा मोठा पेच होता. दहा वर्षाच्या मुलाला हाताशी धरून त्यांनी शेती कसायला सुरुवात केली. गेली नऊ वर्षे शेती करणाऱ्या सुनिताताईंना एकवर्षी चांगल पिक दुसऱ्या वर्षी नुकसान असचं चक्र सुरू आहे. “डोक्यावरचा कर्जाचा भार काही उतरत नाही. शेतीसाठी इतकं घालावं लागत की त्यातून मिळणाऱ्या पैशातून यंदा घेतलेल कर्ज तरी भागेल का हीच चिंता लागलेली असते.” असं सुनिताताई म्हणतात.
शेतीतील अशाश्वत परिस्थिती सोबत झगडणाऱ्या या दोन एकल शेतकरणींची ही व्यथा. आत्महत्याग्रस्त कुटुंबातील एकट्या शेतकरणी मोठ्या धीराने शेती करायला लागल्या खऱ्या पण त्यांच्यापुढील अडचणींचा पाढा संपतच नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. यातील बऱ्याच शेतकरणींना नवऱ्याच्या माघारी सासरच्यांनी जमीन न दिल्यानं स्वत:च्या मालकीची जमीन मिळालेली नाही. त्यामुळे दुसऱ्याची जमीन वाट्याने घेऊन कसण्याची वेळ आली आहे. काहींना जमीन मिळाली असली तरी अस्थिर वातावरण, बियाणे आणि खतांचा भरमसाट खर्च यामुळे शेतीत घातलेला पैसादेखील परत मिळत नसल्याने दरवर्षी डोक्यावरील कर्जाचा भार वाढतच आहे.
करोना काळात टाळेबंदीमध्ये या अडचणींमध्ये आणखीनच भर पडली. मराठवाडा आणि विदर्भात कापूस, तूर आणि सोयाबीन ही प्रमुख पिके. टाळेबंदीच्या काळात शेतीवर आणि अन्नसुरक्षेवर झालेल्या परिणामामुळे विविध अन्नधान्यांची शेती करण्याबाबतचा विचार शेतकरणी बोलून दाखवत होत्या. त्यांच्या या विचाराला दिशा देत सोपेकॉम आणि महिला किसान अधिकार मंचाने (मकाम) सेंद्रिय पद्धतीने मिश्र शेतीचा प्रयोग या शेतकरणींसोबत राबवायला २०२१ पासून सुरुवात केली. शेतीतील अशाश्वतता कमी करून अन्नसुरक्षा मिळणे आणि शेतीचा उत्पादन खर्च कमी करणे या दृष्टीकोनातून या प्रयोगाची वाटचाल सुरू झाली.
मिश्र शेती
वर्ध्यातील चेतना विकास संस्थेच्या मार्गदर्शनाखाली शेतीतीला काही भागामध्ये सेंद्रीय पद्धतीने मूग, उडीद, चवळीसारखी कडधान्ये, ज्वारी, मक्यासारखी अन्नधान्य, १६ प्रकारचा भाजीपाला, हळद आणि तीळ अशा विविध प्रकारच्या पिकांची मिश्र शेती शेतकरणींनी करायला सुरुवात केली आहे. सुरुवातीला शेतकरणींनी अर्धा एकर शेतामध्ये हा प्रयोग सुरू केला असून सेंद्रिय कापूस, तूर, सोयाबीनसोबतच ही इतर पिके घेतली जात आहेत. ही शेती पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने केली जात असून यामध्ये पारंपरिक आणि स्थानिक बियाण आणि शेणखताचा वापर केला जातो आणि ह्याची मदत सोपेकॉमकडून या महिलांना केली जात आहे.या शेतामध्ये रासायनिक खते, फवारणी, आधुनिक बियाणे यांचा वापर अजिबात केलेला नाही. शेणखताचा वापर वर्षातून एकदा जमीन आलट-पालट करताना केलेला आहे. बीड, हिंगोली, अकोला, परभणी, यवतमाळ आणि नागपूर अशा सहा जिल्ह्यांमध्ये हा प्रयोग सध्या सुरू आहे. यामध्ये बहुतांश शेतकरणी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील तर काही लहान अल्पभूधारक, ऊसतोडीसाठी स्थलांतरण करणाऱ्याही आहेत.
शेतकरीण निर्णय घेते तेव्हा....
“माझ शेत आहे पण मला त्यातून काहीच खायला मिळत नाही. शेती करून पण आम्ही उपाशीच”, अशी खंत यवतमाळच्या निलिमाताईंनी व्यक्त केली. वर्षाच्या शेवटी कापूस निघतो. तो विकल्यावर त्यांना चार पैसै मिळतात पण ते ही अनेकदा पुरेसे असतातच असे नाही. कर्ज फेडण्यामध्येच हा पैसा निघून जातो. भाजीपाला विकत आणून खायची ऐपत नाही. निलिमाताई पुढे सांगतात, “नवरा असेपर्यत पैशाचा व्यवहार सारा तोच पाहत असे. त्यामुळे किती पैसा लागला, किती आला यात मी कधीच लक्ष घातलं नाही. शेतात राबायच एवढच माहीत होत”. नवऱ्याच्या माघारी जसा त्या व्यवहार करायला लागल्या तस खर्चच भारी होतोय आणि मिळणार उत्पन्न तर फारसं नाही असं त्यांच्या लक्षात यायला लागलं. म्हणून त्यांनी मिश्र शेती करण्याचा निर्णय घेतला. निलिमाताईंप्रमाणे अनेक एकल शेतकरणींनी ही शेती करायला पुढाकार घेतला आहे. त्यामुळे जवळपास १०० हून अधिक एकल शेतकरणी आज मिश्र शेती करत आहेत.
मिश्र शेतीचा फायदा किती झाला याचा निष्कर्ष या टप्प्यावर काढणे अवघड आहे. परंतु या शेतीतून काही शेतकरणींना अन्नधान्य मिळाल्याचे दिसून आले आहे. निलिमा ताईं तीन एकर शेतातील अर्धा एकर शेतामध्ये गेल्या दोन वर्षापासून मिश्र शेती करत आहेत. पहिल्या वर्षी त्यांना ४५ किलो मूग, २० किलो उडीद आणि १ क्विंटल तूर झाली. गेल्यावर्षी अतिपावसामुळे शेताच नुकसान झालं. त्यामुळे काहीच उत्पन्न झालं नाही. यावर्षी पुन्हा ताईंनी शेतामध्ये तूर, मूग, उडीद, चवळी, ज्वारी, मका यासोबतच प्रयोग म्हणून पराटी म्हणजेच कापूसदेखील लावला आहे. निलिमाताई सांगतात, “बाजूला असलेल्या पराटीला दोन रासायनिक खते दिली. सेंद्रिय शेतीतल्या पराटीला वेगळ असं खत दिलेलच नाही तरीपण दोन्ही पिक सारखीच दिसतायत. आता बघू हे पिक पुढ कस राहतयं” निलिमाताईंसारख्या अनेकजणीं सध्या या प्रयोगामध्ये बऱ्याच नवीन बाबी शिकत आहेत, समजून घेत आहेत आणि स्वत:च्याच शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करत आहेत. त्यासाठी अथक कष्ट उपसण्याची पण त्यांची तयारी आहे हे प्रामुख्याने जाणवतं.
वर्षाताईंना पहिल्या वर्षी दोन पोती मूग झाला. त्यांनी मूगाच्या वड्या केल्या, डाळ केली. त्याचवर्षी १० किलो उडीद त्यांनी घेतला. पण हे सार त्यांनी विकल नाही. तर घरातच खायला ठेवलं. “माझ्या पोरींना मूगाची खिचडी खूप आवडते. गरीबी कारणानं विकत घेऊन खाण कधीच झालं नाही. परंतु आता आपल्याच शेतात होत असल्यानं पोरीपण पोटभरून खातात याच समाधान. भाजीपाला तर दररोज खाल्ला. इतक आम्ही विकत आणून खाल्ल असत का? या वर्षाताईंचा प्रश्न बाई जेव्हा शेतीचे निर्णय घेते तेव्हा कुटुंबाच्या पोषणाचा विचार प्रामुख्याने कसा करते हे प्रकर्षाने जाणवते. वर्षाताईंना दुसऱ्या वर्षी पावसामुळे नुकसान झालं. पहिल्या वर्षी झालेल्या डाळी घरात डबे भरून होत्या. त्यावर त्यांच दुसरं वर्ष निभावून गेलं.
मिश्र आणि सेंद्रिय शेतीतील अडचणी
अर्धा एकर भागात मिश्र शेती करण्याचा प्रयोग अगदीच सोपा होता असं नाही. हा प्रयोग सुरु झाला त्यावेळी करोनाची दुसरी लाट सुरू होती. त्यामुळे प्रशिक्षण ऑनलाईन दिले गेले. पेरणी कशी करायची, इतर पिके कशी लावायची याबाबत अनेकजणींना अपुरी माहिती मिळाली. परिणामी परस्परावलंबी मिश्र पिकांची काही ठिकाणी शास्त्रोक्त पद्धतीने पेरण्या झाल्या नाहीत. मिश्र पीक म्हणजे सर्व एकत्र करून लावावे असे नाही तर कोणत्या पिकामध्ये कोणते पीक लावावे, कोणत्या पीकानंतर कोणते पीक घ्यावे याचे शेतकरणींना ट्रेनिंग मध्ये मार्गदर्शन केले जाते. “ पहिल्या वर्षी शेतकरी महिलांचे ऑनलाईन ट्रेनिंग झाल्यामुळे ती पद्धत समजली नाही आणि काही महिलांची ट्रकटर ने पेरणी झाल्यामुळे मुग वेगळ्या ठिकाणी, उडीद वेगळ्या ठिकाणी आणि तूर दुसरीकडे अशी पेरणी झाली त्यामुळे त्याचा फायदा मागे राहिलेल्या पिकाला झाला नाही.” असे सोपेकॉमच्या स्वाती सातपुते सांगतात.
“पहिल्या दोन्ही वर्षी डुकाराने मिश्र शेतीतल अन्नधान्यांची नुकसान केलं. आमची शेती जंगलाकाठी असल्याने रोही , डुकरांचा त्रास खूप जास्त आहे. तारांच कुंपण लावल तर त्याला पण ते ऐकत नाहीत,” असे सुनिताताई सांगतात. जनावरांचा त्रास खूपच असल्याने अनेक जणींच शेत जनावरांनी खाऊन टाकले. त्यामुळे शेतकरणींच नुकसान झाले. वर्षाताई सांगतात, “यंदा त्यांनी लावलेल्या मिश्रशेतीतील दोन ओळींचे रोहींनी नुकसान केल. जमीन वाया जाईल म्हणून अखेर त्यांनी पुन्हा पेरणी केली आणि एका ओळीमध्ये शेवटी नाईलाजाने फक्त कापूस लावला.”
एकल शेतकरणी असल्यानं यांच्याकडे बैल आहेतच असं नाही. मिश्रशेतीमध्ये ट्रॅक्टरचा वापर करता येत नाही. त्यामुळे मग अनेकजणींना खूप अडचण आली. वर्षाताई सांगतात, “पुरुष माणसांच्या मागे लागून बैलाने सारं काम करून घेण सोप नाही. अनेकदा बोलावूनही वेळेत येत नाहीत. त्यामुळे मग काम उशीराने होतात. सुरुवातीला माणसांना घेऊन शेतात काम करायला पण भीती वाटायची पण हळूहळू भीती मोडली.” डवरणी, फवारणी ही काम शेतकरणी करत नाहीत. त्यामुळे यासाठी त्यांना पुरुषांवरच अवलंबून राहावे लागते.
एकल शेतकरणींनी हा प्रयोग करताना त्यांची खिल्ली गावामध्ये अनेकजणांनी उडवली. अशी शेती कुणी करते का असं गावातल्या इतर महिला त्यांना वारंवार बोलायच्या. यामुळे जमीन आणि उत्पन्न वाया चाललयं असही म्हणायच्या. “पहिल्या वर्षी त्यांच मी काहीच ऐकल नाही. पण जेव्हा मी भाजीपाला, मूग, उडीद, भेंडी, शेंगा घरी आणायला लागले तेव्हा ‘हो, बाई हीनं ही शेती करून दाखविली’ असं म्हणायला लागल्या. त्यांनाही मी भाजीपाला देते. त्यामुळे आता त्यांनाही वाटत आपण पण लावावं. पण त्यांचे मालक ऐकत नाहीत” असं निलिमा ताई सांगतात.
गावात खूप जण आम्हाला बोलतात. पण आपल्या घरात डबे भरून हे धान्य खायला असल्यावर यांच कशाला ऐकायच, असं थेट उत्तर वर्षाताईनी दिलं. या शेतकरणी एकट्या असल्या तरी आता अनुभवाने धीट झालेल्या आहेत हे जाणवतं. निलिमाताई सांगतात, “पहिल्या वर्षाची डाळ अजून माझ्या घरात भरून आहे. दुसऱ्या वर्षी काहीच पिक नाही झालं पण या डाळी, कडधान्य असल्यान फारशी चणचण भासली नाही.”
शेतकरणींनी मिश्र शेती करण्याचा केवळ निर्णय घेतला नाही, येणाऱ्या प्रत्येक अडचणींवर मात करण्याचे उपायही त्यांनी शोधले. मकामच्या यवतमाळ विभागाच्या समन्वयक माधुरी खडसे ताई सांगतात, “जंगली जनावरांच्या त्रास कमी होण्यासाठी शेतकरणींनी गट करून सौर उर्जेवरील बॅटरी खरेदी केल्या. वनविभागाकडे याबाबत वारंवार तक्रारीही आम्ही केल्या. परंतु तक्रार करण्यासाठीचा वाहतुकीचा खर्च हा त्यानंतर मिळणाऱ्या भरपाईच्या तुलनेत कितीतरी जास्त असल्याने शेतकरणींना तक्रार करणे परवडणारे नाही.” शेताला कुंपण करून देण्याची मागणी या शेतकरणी करत आहेत. वनविभाग यासाठी तयार नसून याऐवजी जंगलाला कुंपण करण्याचा पर्याय त्यांनी सुचविला आहे, जो की आदिवासी समाजाच्या या शेतकऱ्यांना मान्य नाही कारण जंगल हेच त्यांचे प्रमुख संसाधन आहे. त्यामुळे हा प्रश्न सध्या अनुत्तरितच राहिलेला आहे.
एकदा शेतकरणीने निर्णय घेतला तर त्याच्या परिणामांना सामोरे जायची पण त्यांची तयारी असल्याचे सुनिताताईंशी बोलताना जाणवते. “गावात अनेकजण ही शेती करायला विरोध करतात. तुमच्यामुळे आमच्यापण शेतात जनावर येऊन नुकसान करतील असं म्हणतात. पण त्यांच ऐकतच नाही. माझी शेती, मीच ठरवणार यात काय लावायच ते,” असं त्या ठामपणे म्हण तात.
पहिल्या दोन्ही वर्ष नुकसान झालं तरी यंदा पुन्हा मिश्र शेती का बर केली अस विचारताच सुनिताताई सांगतात, माझं दोन वर्ष पीक काही आलं नाही. पण नुकसान फार झाल नाही. कारण त्याला खर्च पण मी फार घातला नव्हता. आपल्या पिकाबरोबर डवरणी, निंदन, होऊन जाते. बियाणे- खताचा खर्च काहीच नव्हता. त्यामुळे त्याच्यामुळे डोक्यावर कर्ज बसलं अस झालं नाही. म्हणून आता पुन्हा करून पाहायचं ठरवलं.”
पिकांवर फवारणी केली नाही तर कीड येत नाही का याच उत्तर देताना निलिमा ताई सांगतात, “पिकांवर अशी कोणतीच मोठी कीड आलेली नाही. काही कीड आली पण मी पहिल्या वर्षी काहीच फवारल नाही. आपोआपच ती कीड निघून गेली.” ढगाळ वातावरण झाल्याने आता निलिमाताईंच्या शेतात पिकांवर मावा आलेला दिसला. त्याबाबत बोलताना त्या सांगतात, “पाऊस जोरात आला की मावा आपोआपच निघून जातो त्याला काहीच करावं लागत नाही.”
कीड खूप जास्त आली तर निंबुळ्या, दशपर्णी अशा विविध झाडपाल्याचा वापर करून तयार केलेल्या अर्काची फवारणी केली जाते. पण याची फारशी आवश्यकता अजून तरी पडलेली नाही. मिश्रशेतीच नुकसान प्रामुख्याने जनावरांमुळे आणि वातावरणातील बदलामुळे म्हणजे जसं गेल्यावर्षी पाऊस खूपच जास्त आला याकारणाने झाल्याचे स्वाती ताई नोंदवितात.
मिश्र शेतीच्या रचनेबाबत अधिक माहिती देताना स्वातीताई सांगतात, यामध्ये चवळी ही सापळा पीक म्हणून दिलेल आहे. चवळी किडीला आकर्षित करणारे पीक असल्यामुळे मावा आला तरी या पिकावर आधी येतो. त्यामुळे इतर पिकांचे रक्षण होते. तसेच काही पिक जशी बाजरी, ज्वारी ही पक्षी थांबा म्हणून दिलेली आहेत. जेणेकरून पक्षी येऊन बसल्यास पिकांवरील अळी, कीड खाऊन नष्ट करतील. अशा अनेक शास्त्रीय बाबींचाही या मिश्र शेतीमध्ये विचार केलेला आहे.
सुरुवातीला खताशिवाय कापूस त्यातही नॉन बीटी कापूस येणारच नाही अशी धारणा या शेतकरणींची होती. त्यामुळे मिश्र शेतीमध्ये कापूसघेण्यास त्या फारशा तयार नव्हत्या. परंतु हळूहळू त्यांना पटलं आणि आज त्या कापूस, तूर, सोयबीन सह २५ ते ३० प्रकारची पिके घेत आहेत, असं स्वातीताई सांगतात. मिश्र शेतीमध्ये भाजीपाला, अन्नधान्य घरी खाण्यापुरत काही जणींना झाला, तर काहीजणींनी विकला ही आहे.
मिश्र शेतीमुळे जमीन भुसभुशीत झाली असल्याचही अनेक शेतकरणींनी नोंदवलय. निलिमाताई सांगतात, “आता दर तीन वर्षांनी मी मिश्र शेतीची जागा बदलयाच ठरवलंय त्यामुळे हळूहळू जमिनीच चांगल पोषण होईल. रासायनिक खतामुळे कडक झालेल्या जमिनीमध्ये यामुळे बदल झाला तर पीकपण चांगल येईल.”
हळदीबाबतची अंधश्रद्धा दूर
मिश्र शेतीमध्ये सुरुवातीला शेतकरणींनी हळद लावण्यास विरोध केला. मासिक पाळी आलेल्या बाईने जर झाडाला हात लावला तर झाड सडते व पाप होते, असा त्यांचा समज होता. हळदीच्या शेतात म्हाताऱ्या महिलांनाच मजुरीला म्हणून बोलवतात, अशी अनेक कारणे शेतकरणींनी दिली. ही अंधश्रद्धा दूर करण्यासाठी शेतकरणींना समजावून मुद्दाम हळदीचे पीक लावण्यास सांगितले. काही शेतकरणींनी पुढाकार घेतला आणि हळद लावली देखील. हात लागला तर झाड सुकून जाईल अशी भीती सुरुवातीला शेतकरणींना वाटत होती. पण हळदीला तर काही झालेच नाही आणि घरी खाण्यापुरती हळद शेतकरणींनी काढली. त्यामुळे अंधश्रद्धा दूर झाली. “मी प्रयोग करण्यासाठी म्हणून घराजवळच हळद लावली. पाळीच्या दिवसांत मी तिला पाणी घालते. आजूबाजूला जाणाऱ्या बायकांचा पण तिला हात लागतो. आता तीन महिने झाले तरी हळद चांगली कशी फुललेली आहे असा प्रश्न मीच आजूबाजूच्या बायकांना करते, तेव्हा त्यापण आश्चर्यचकित होतात. त्यामुळे आता हळूहळू आपला समज चुकीचा आहे गावातल्या इतर शेतकरणींना पण पटायला लागलं आहे,” अस निलिमाताई आनंदाने सांगतात.
..
केवळ उत्पन्न नव्हे तर निर्णय घेण्याची सक्षमता
मिश्र शेतीचा प्रयोग घेताना एकट्या शेतकरणींचे उत्पन्न कसे वाढेल हाच केवळ उद्देश्य नव्हता. तर या शेतकरणी त्यांच्या अनुभवावरून, त्यांना पिढ्यानपिढ्या मिळालेल्या ज्ञानाचा वापर करून शेतीतील निर्णय घेण्यासाठी सक्षम करणे हा देखील यामागचा हेतू आहे, असं मकामच्या सीमा कुलकर्णी आर्वजून सांगतात. यातील काही शेतकरणी शेतीमध्ये बारकाईने लक्ष देऊन अभ्यासदेखील करत आहेत. वातावरणाचा शेतीवर होणारा परिणाम, मित्रजीवाणू, मित्रपक्षी शेतात आले का, मातीमध्ये सुधारणा झाली का, शेतावर कीड आली तर कोणती होती, कशी गेली अशा विविध बाबींच्या नोंदी त्या रोज वहीमध्ये नोंदवत आहेत. मिश्र शेतीमध्ये आलेल्या पिकांचे बियाण पुढच्या वर्षासाठी जतन त्या करायला लागलेल्या आहेत. यासाठीच आवश्यक प्रशिक्षणही त्यांना दिले जात आहे. यातून बँक तयार करायचही त्यांनी ठरवलंय. त्यामुळे बियाणांसाठी त्या संस्थेवर दरवर्षी अवलंबून राहणार नाहीत, असेही सीमाताईंनी स्पष्ट केले.
स्वातीताई सांगतात, आत्महत्याग्रस्त कुटुंबातील शेतकरणीं केवळ हा प्रयोग करून थांबलेल्या नाहीत तर गावातील इतर एकल महिलांनाही याची माहिती देत आहेत. त्यामुळे यावर्षी मिश्र शेती करणाऱ्या शेतकरणींची संख्या दोन वर्षात १८४ वरून २४२ वर गेली आहे. एकल शेतकरणींचा गावपातळीवर गट तयार करण्यात आले आहेत. कोणतीही अडचण आल्यास या गटामधून आवश्यकत मदत, मार्गदर्शन त्यांना मिळते. या गटाच्या माध्यमातूनच एकल महिलांचे विविध योजनांचा फायदा देखील करून देण्यात आला आहे. या शेतकरणींसोबतच इतर शेतकरणीदेखील नवऱ्यांचा विरोध झुगारुन मिश्र शेती करत आहेत. बीडच्या ऊसतोडीला जाणाऱ्या, स्थलांतरण करणाऱ्या शेतकरणींही मिश्र शेतीमध्ये सहभागी झाल्या आहेत.
सुनिताताई सांगतात, “आमच्या आजी आजोबांच्या काळात ज्वारी, बाजरी अशी अनेक पिके घ्यायचे. खत आम्हाला माहितीच नव्हतं. पण काळानुसार कापूस आणि तूर ही दोनच पिकं राहिली आणि खताचाच वापर सुरू झाला.” सुनिताताईंनी दोन वर्षापूर्वी कर्ज फेडण्यासाठी म्हणून १० एकर जमीन कसायला घेतली. आपली तीन एकर आणि ही १० एकर अशी १३ एकर जमीनीवर पोराला हाताखाली घेऊन त्यांनी काबाड कष्ट केले. त्यावर्षी त्यांनी ११० क्विंटल कापूस काढला. थोडं कर्ज फिटलं. पुन्हा एवढाच कापूस करायचा म्हणून जिद्दीन त्यांनी पुन्हा दुसऱ्यावर्षी शेतीला खर्च लावला आणि शेत करायला घेतलं. पुरुष माणसाच्या बरोबरीच काम करत शेतात मेहनत घेतली. प्रसंगी बैल घेऊन डवरा हाणला. खांदे दुखले तरी फवारणीपण केली. परंतु गेल्यावर्षी अतिपाऊस झाला आणि शेतात सगळा चिखलंच झाला. डोक्यावर अडीच लाखाच कर्ज बसलं. “काबाड कष्टाच सार पाणी झालं कर्जातून बाहेर पडायच म्हणून सारं केलं पण कर्जात रुतूनच बसलो.” असं सुनिताताई म्हणतात तेव्हा किती धीराच काळीज पाहिजे या सर्वाला सामोरे जायला अस मनात वाटायला लागतं.
कर्जाला कंटाळलेल्या सुनिताताईंनी यंदा शेतात रासायनिक खताऐवजी गांडुळ खेत, शेणखत असं सेंद्रिय खतच वापरायचे ठरवलं आहे. त्या सांगतात, गेले तीन वर्षे मी एक एकर शेतात चारकोल खत करत आहे. पराटी अर्धवट जाळून त्याचा कोळसा करून तेच खत पसरवत आहे. दुसर कोणतच खत मी त्या शेताला दिलेले नाही. आज त्या शेतातली जमीन तर भुसभुशीत झालीच आहे. पण इतर शेतापेक्षा त्यात पराटीपण खूप चांगली आली आहे. त्यामुळे आता रासायनिक खत आणि फवारणी करायचीच नाही यावर्षी मी ठरवलंय.”
खांद्यावर दोन-अडीच लाखांचा कर्ज, काबाड कष्ट करून ही ओंजळ रिकामीच राहणाऱ्या सुनिताताईंमध्ये हे बळ येत कुठून? यांना नाही का विष खाऊन आत्महत्या करावीशी वाटत हा प्रश्न मनात आल्याशिवाय राहत नाही. यावर सुनिताताई हसून म्हणतात, “काय करते बाई इख खाऊन आपल्या पोराबाळांच काय. त्याले कोण बघणार. हीतच राहायचं आणि हीतच कष्ट करायचं.”