कुणाल तुझ्या डोक्यात फरक पडलाय का?
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात कुणाल कामराची ट्विट करण्याची हिम्मत झालीच कशी? कुणाल कामराला काय शिक्षा होणार? सर्वोच्च न्यायालयाच्या अलिकडे भुमिकांची खास खुमासदार शब्दात Adv. अतुल सोनक यांनी घेतलेला समाचार नक्की वाचा?
X
हाय कुणाल,
कसा आहेस? डोक्यात फरक बिरक पडलाय का तुझ्या? म्हणे माफी मागणार नाही... अबे माफी माग लवकर, नाहीतर ते तुला चांगलीच अद्दल घडवतील. त्यांचा अवमान करायची तुझी 'हिंमत' च कशी झाली? तू स्वतः ला समजतो तरी कोण? ते कोण आहेत हे तरी कळतं का तुला? त्यांनी मनात आणलं तर अख्खा देश सुतासारखा सरळ आणू शकतात ते. ते करत नाहीत तो त्यांचा मोठेपणा. अनेक ठिकाणी त्यांची बोलती बंद असते. ही फॅक्ट आहे. बोलती बंद केली जाते असे मी म्हणणार नाही. कारण त्यामुळे अवमान होतो. तसेच यांच्या पेक्षाही कोणी मोठे आहेत असा समज होतो. तसे नसते बरं...
त्यांच्या सर्वोच्च इमारतीवर भाजपचा झेंडा मॉर्फ करून लावण्याच्या तुझ्या करामतीची तारीफ करावी तितकी कमीच आहे. पण त्यावर भक्त व्हॉटअबाऊटरीवर उतरतात. तू तसा भक्तांना पुरून उरतोस म्हणा. असो. पूर्वी कसे हे सर्वोच्च लोक केंद्र सरकारवर कसे धडाधड तोंडसुख घ्यायचे, ताशेरे ओढायचे आणि भाजपावाले त्याचा आधार घेत आंदोलने करायचे, सरकारवर टीका करायचे, मंत्र्यांचे राजीनामे मागायचे. मज्जा यायची नै? पण २०१४ नंतर या सर्वोच्च लोकांनी सरकारला झोडपायचा हा घाऊक प्रकार जवळ जवळ बंद करून टाकलाय.
सरकार चा प्रत्येक निर्णय कसा चांगलाच आहे, लोकाभिमुख आहे हेच सांगायचा. या सर्वोच्च लोकांचा प्रयत्न असतो. मोस्ट लाऊड अर्णब च्या प्रत्येक महत्वाच्या (घटनात्मक दृष्ट्या) याचिकेला भरपूर वेळ द्यावा लागत असल्यामुळे नोटाबंदी, इलेक्टोरल बॉण्ड्स, काश्मीर प्रश्न, साबरीमला, अशा काही बिनमहत्वाच्या प्रकरणांमध्ये येत्या पन्नास साठ वर्षांत सुनावणी होईलच अशी आशा करू या. एक इरसाल मित्र परवा म्हणाला,
'आपल्या न्यायपालिकेनेही आता चड्डी घातलीय'
मला तरी अर्थ कळला नाही बुवा. तुला कळाला का? असो.
तू त्यांचा अवमान केलास हे मात्र बरे नाही केलेस. आता त्यांना तुझ्या प्रकरणात लक्ष घालावे लागेल. पुन्हा बाकीच्या अनेक याचिका मागे पडतील. ते बिच्चारे कल्याणसिंग! १९९५ सालापासून त्यांच्या खांद्यावर एका अवमान याचिकेचे ओझे घेऊन फिरत आहेत. तू एक आयडिया कर. त्या सर्वोच्च लोकांना सुचव, म्हणा आधी आतापर्यंतच्या सर्व प्रलंबित अवमान याचिका माझ्या याचिकेपूर्वी निकाली काढा आणि माझ्या विरुद्धची अवमान याचिका ऐका. ते तुझं ऐकतील च याची काही शाश्वती नाही म्हणा. कारण ते फक्त काही लोकांचंच ऐकतात असे सांगणारे सांगतात.
लोयांचा नैसर्गिक मृत्यू झाला आणि हे सर्वोच्च, उच्च आणि त्यांच्या हाताखाली काम करणारे अनेक लोक आमूलाग्र बदलले... असेही काही निष्णात देशद्रोही सांगतात.
तुझ्या ट्विटमुळे एक मात्र छान झाले. जगभरातल्या सगळ्या फ्लाईट अटेंडंट लोकांना आपण सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीच्या लेव्हल चे कर्मचारी झाल्याचा समज होऊन त्यांनी यावर्षी दिवाळी जोरात साजरी केल्याचे आताच कळले. साळवेंना गांधींच्या हाईटवर नेऊन ठेवलेस आणि महेश जेठमलानीला नेहरूंच्या हाईटवर नेऊन ठेवलेस... त्याबद्दल सेवाग्राम आश्रमात पाच पंचवीस लोकांच्या उपस्थितीत निषेध सभा आयोजित करण्यात येणार आहे. तसेच पुढच्या वर्षीच्या संघाच्या विजयादशमी उत्सवात प्रमुख अतिथी म्हणून हरीश साळवे यांना बोलवायचे की सुशांतचे मारेकरी पकडणाऱ्या अर्णब गोस्वामी यांना बोलवायचे यावरून सांघिक दिवाळी फराळ करता करता जोरदार चर्चा झडत असल्याचे कळले.
ज्येष्ठ अवमानकर्ते प्रशांत भूषण यांना १ रुपया दंड तर तुला किती यावर सट्टेबाजांनी खायवाडी पण सुरू केल्याचेही नुकतेच कळले.
तू माफी माग रे बाबा... हट्टीपणा करू नकोस, तुझ्या माफी मागण्याच्या गनिमी काव्याचा उदो उदो काही वर्षांनी होऊन कदाचित तुला स्वातंत्र्यवीर ही उपाधी ही मिळेल किंवा सर्वोच्च लोकांची कशी जिरवली म्हणून भारतरत्न ही मिळेल, कुणी सांगावे...