Home > मॅक्स ब्लॉग्ज > कोरोनानंतरचे पर्यावरण

कोरोनानंतरचे पर्यावरण

कोरोनाच्या संकटाने मानवाला निसर्गाचा नव्याने विचार करण्यास भाग पाडलं आहे. या संकटाने पर्यावरणावर काय परिणाम केला आणि कोरोनानंतरचे पर्यावरण कसे असावे याचे विश्लेषण कऱणारा पर्यावरण अभ्यासक डॉ.मुकेश कुलकर्णी यांचा लेख नक्की वाचा....

कोरोनानंतरचे पर्यावरण
X

पर्यावरण हा शब्द ऐकला किंवा वाचला तर आपल्यासमोर झाडं, पाणी, पशु,पक्षी यासारख्या मनाला आल्हाद देणारे व आवडणारे घटक आपल्या मनात येतात. परंतु या वर्षी कोविड -१९ (कोरोना) मुळे संपूर्ण जगाला पर्यावरण या शब्दाचा खरा अर्थ कळला असेल. डोळ्याला न दिसणाऱ्या एका व्हायरसने संपूर्ण जग थांबलं.. सगळीकडे भीतीचं, दहशतीचं वातावरण तयार झालं. संपूर्ण पृथ्वीतलावर सर्व शक्तिमान व बुद्धिमान म्हणवणाऱ्या मानवजातीला सुद्धा स्वतःच्या अस्तिवासाठी धडपड करावी लागली. या संपूर्ण काळात अनेकांचे आयुष्य उजाड झाले. अनेकांच्या हातातली कामं गेली. प्रचंड सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक हानी झाली हे खरं आहे. एका मानवतावादी दृष्टीकोनातून या सर्व घडलेल्या घटनांबद्दल वाईट वाटलं. परंतु एक पर्यावरण प्रेमी म्हणून थोडंसं बंर वाटलं. हो कारण ज्या निसर्गाने मानवाला अस्तित्व टिकवण्यासाठी मदत केली आहे, त्याच निसर्गाच्या मुळावर उठलेल्या मानवाला या कोरोना संकटाने पुन्हा निसर्गाचा गांभीर्याने विचार करण्यास भाग पाडले.

शेकडो वर्षांपासून संपूर्ण मानवजातीचे भरण पोषण करणाऱ्या निसर्गाने मागील ६-८ महिन्यात मोकळा श्वास घेतला. मानवाच्या सर्व गरजा पूर्ण करण्याची क्षमता असणाऱ्या निसर्गाला या मानवजातीने अक्षरश: ओरबाडून काढायला सुरुवात केली होती. 'ऊस गोड लागला म्हणून तो मुळासकट खायचा नसतो' ही म्हण आपली प्रत्येकाची तोंडपाठ आहे. किंबहुना आपण ती अनेकदा वापरतो पण 'दुसऱ्यांसाठी'. परंतु या कोरोना महामारीमध्ये प्रत्येकाला ही म्हण लागू पडतेच. या कोरोनाने मानवजातीचे सगळे व्यवहार बंद केलेत. पण पर्यावरणासाठी हीच महामारी वरदान ठरली. कोरोनामुळे वाहतूक ठप्प होती. लोकांचे घराबाहेर पडणे थांबले होते. उगाच लाँड ड्राईव्हला जाण्याची हौस गुंडाळून ठेवावी लागली होती. रोज निघणारे प्लास्टिकचे ढिगारे कित्येक पटींनी कमी झाले होते. पाऊस असो, वादळ असो किंवा दहशतवादी हल्ले असोत...कधीही न थांबणारी मुंबई ठप्प झाली होती. मुंबईची जीवनवाहिनी असलेली लोकलसेवा पूर्णपणे बंद झाली होती. लाखो कारखान्यंच्या चिमण्यांमधून येणारा धूर बंद झाला होता.

National Aeronautics and Space Administration (NASA) आणि The European Space Agency (ESA)यांच्या अभ्यासानुसार, कोरोना संक्रमणाच्या भीतीमुळे चीनमधील वूहानसह अनेक महत्वाच्या शहरामंध्ये संचारबंदी लागू केली होती. या काळात तेथील वातावरणातील नायट्रोजन डायऑक्साइड (NO2) या वायूच्या प्रमाणात लक्षणीय घट आढळून आली.

The Centre for Research on Energy and Clean Air यांच्या अहवालानुसार, २४ ते ३० जानेवारी दरम्यान चीनमध्ये नववर्षा निमित्त सुट्ट्या असतात. यामुळे दरवर्षी तेथील नागरिक वेगवेगळ्या पद्धतीने आनंद साजरा करतात. यात फटाक्यांची आतषबाजी, सुट्ट्यांनिमित्त लांबवरचा प्रवास करणे इ. गोष्टींचा समावेश आहे. परंतु यावर्षी या सुट्ट्यांनंतरच्या दोन आठवड्यांच्या काळातसुद्धा चीनमधील CO2 च्या उत्सर्जनात जवळपास २२-३० टक्क्यांनी घट दिसून आली.

हवेच्या गुणवत्तेचा विचार करता वातावरणात अनेक प्रकारचे कण (Particulate matter) असतात. यातील काही आपल्या डोळ्यांना दिसतात तर काही दिसत नाहीत. ज्या कणांचा व्यास (Diameter) १०मायक्रॉन किंवा त्यापेक्षा कमी असतो, ज्यांना PM10 असे म्हणतात अशा कणांचा मनुष्याच्या श्वसन संस्थेवर विपरीत परिणाम होतो. यापेक्षा कमी आकार असलेले कण म्हणजे ज्यांचा व्यास २.५ मायक्रॉन इतका आहे. सदरचे कण हे मानवाच्या ह्रदयावर घातक परिणाम करण्याबरोबरच डोळ्यांवर सुद्धा वाईट परिणाम करतात, अशा कणांना PM2.5 असे म्हणतात. हे सगळं लिहिण्याचे कारण असे आहे की, भारताची राजधानी दिल्लीमध्ये लॉकडाऊनच्या काळात PM 10 व PM 2.5 चे प्रमाण सुमारे ५०% ने कमी होते. तसेच दिल्लीच्या आसपास औद्योगिक वसाहतीमधील हवेच्या गुणवत्तेत सुमारे ६० टक्क्यांपेक्षा जास्त सुधारणा नोंदवण्यात आली आहे.

भारतामध्ये 22 मार्च 2020 रोजी जनता कर्फ्यू पाळला गेला होता व त्यानंतर 24 मार्चपासून लॉकडाऊनची सुरुवात झाली होती. यादरम्यान सगळी वाहतूक व इतर बाबी बंद करण्यात आला. याचा परिणाम म्हणजे पंजाबमधील जालंधर शहरातून 213 किमी दूर असलेल्या धौलधार पर्वत रांगा या स्पष्टपणे दिसू लागल्या. Central Pollution Control Board (CPCB) च्या Real Time water monitoring data च्या आकडेवारीनुसार लॉकडाऊनमध्ये गंगा आणि यमुना या दोन पवित्र नदयांच्या पाण्याच्या पातळीत इतकी सुधारणा झाली की सदर पाणी मानवाच्या वापरण्यासाठी (उदा.आंघोळ इ.) आणि मत्स्यपालनासाठीसुद्धा वापरता येण्याजोगे होते.

संपूर्ण जगात सर्वात जास्त कार्बन उत्सर्जन करणाऱ्या देशांच्या यादीत चीन प्रथम क्रमांकावर आहे. 2018 च्या आकडेवारी नुसार चीन दरवर्षी 10.06GT (Metric gigatons) इतका कार्बन डायऑक्साईड उत्सर्जित केला. या यादीत भारत तिसऱ्या क्रमांकावर असून भारताने 2.65 GT इतका कार्बन डायऑक्साईड उत्सर्जित केला होता. वरील आकडेवारीच्या अनुषंगाने विचार करता चीनमध्ये लॉकडाऊन मध्ये कार्बन उत्सर्जनात 25 टक्क्यांनी घट झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. या आकडेवारीनुसार यामध्ये देशातील एकूण कार्बन उत्सर्जनात 1% घट झाली आहे.

सर्वात उल्लेखनीय बाब म्हणजे, देशभरात लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे पुणे शहरात रोज निर्माण होणाऱ्या घन कचऱ्यामध्ये जवळपास 29 टक्क्यांनी घट झाली. तसेर् चेन्नई आणि नागपूर या शहरांमध्ये अनुक्रमे 28% व 25% इतकी घट झाली. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने लॉकडाऊनच्या आधी भारतातील प्रमुख शहरातील हवेच्या गुणवत्तेची तपासणी केली असता, फक्त 48% शहरांमधील हवेची गुणवत्ता समाधानकारक होती. परंतू लॉकडाऊनच्या काळात 78% शहरांच्या हवेची गुणवत्ता ही चांगल्या व समाधानकारक पातळीवर होती.

कोरोनामुळे मुंबईतील अनेक रहिवासी भागात रस्त्यावर मोर आणि इतर प्राणीसुद्धा लोकांच्या पाहण्यात आले. तसेच नेहमी गजबजलेल्या बीटवर अनेक प्राण्यांच्या व जलचरांचा मुक्त संचार बघण्यास मिळाला. काही देशांमध्ये तर समुद्रकिनारी अनेक दुर्मिळ प्राणी आढळून आले.

एकंदरीतत ज्याप्रमाणे आयुष्यात आपण खूप धावपळ करत असतो आणि एका क्षणी वाटतं आता खूप ताण आला आहे, थकलो आहे, भागलो आहे आणि मग 'ब्रेक तो बनता है' च्या नावाखाली आपण 4-8 दिवस तणावमुक्त होतो. त्याप्रमाणे मानवाच्या ओरबाडण्याच्या वृत्तीचा ताण येवून निसर्गानेसुद्धा कोरोनामुळे ब्रेक घेतला व माहेरी आलेल्या लेकीसारखा मनमोकळा, शांत, निवांत वेळ अनुभवला असे म्हणायला हरकत नाही.


डॉ. मुकेश कुलकर्णी

Updated : 30 Nov 2020 3:56 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top